मी बाप्तिस्मा घ्यावा का?
अध्याय ३७
मी बाप्तिस्मा घ्यावा का?
खाली दिलेली वाक्यं चूक की बरोबर?
खऱ्या ख्रिश्चनांनी बाप्तिस्मा घेणं गरजेचंय.
□ बरोबर
□ चूक
वाईट गोष्टी करण्यापासून तुम्ही वाचावं हा बाप्तिस्म्याचा मुख्य उद्देश आहे.
□ बरोबर
□ चूक
बाप्तिस्म्यामुळे तारण होतं.
□ बरोबर
□ चूक
बाप्तिस्मा झाला नसेल तर तुम्हाला तुमच्या वागणुकीसाठी देवाला हिशोब द्यावा लागणार नाही.
□ बरोबर
□ चूक
तुमचे मित्र जर बाप्तिस्मा घेत असतील तर तुम्हीही बाप्तिस्म्यासाठी तयार आहात.
□ बरोबर
□ चूक
जर तुम्ही देवाचे नियम पाळत असाल, त्याच्यासोबत मैत्री करायचा प्रयत्न करत असाल आणि तुमच्या विश्वासाबद्दल दुसऱ्यांशी बोलत असाल तर नक्कीच तुम्ही बाप्तिस्मा घ्यायचाही विचार करत असाल. पण तुम्ही यासाठी खरंच तयार आहात का हे तुम्हाला कसं कळेल? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या वाक्यांवर विचार करू या.
● खऱ्या ख्रिश्चनांनी बाप्तिस्मा घेणं गरजेचंय.
बरोबर. येशूने सांगितलं की त्याच्या शिष्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) त्याने स्वतःसुद्धा बाप्तिस्मा घेतला होता. जर तुम्हालाही येशूचा शिष्य बनायचं असेल तर तुम्हीही बाप्तिस्मा घेणं गरजेचंय. पण तसं करण्यासाठी तुमची मनापासून इच्छा असली पाहिजे. आणि स्वतःहून तो निर्णय घेण्याइतपत तुमच्यात समज असली पाहिजे.
● वाईट गोष्टी करण्यापासून तुम्ही वाचावं हा बाप्तिस्म्याचा मुख्य उद्देश आहे.
चूक. एखाद्याने यहोवाला समर्पण केलंय हे सर्वांना कळावं म्हणून बाप्तिस्मा घेतला जातो. समर्पण हे एखाद्या करारासारखं नाहीये ज्यात इच्छा नसतानाही काही अटी पाळाव्याच लागतात. दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला काही गोष्टी कराव्याशा वाटतात पण फक्त बाप्तिस्मा घेतलाय म्हणून तुम्हाला त्या करता येत नाहीत असं नाही. खरंतर तुम्हाला यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगायची मनापासून इच्छा असल्यामुळे तुम्ही समर्पण केलं पाहिजे.
● बाप्तिस्म्यामुळे तारण होतं.
बरोबर. तारण मिळण्यासाठी बाप्तिस्मा घेणं हे महत्त्वाचं पाऊल आहे. (१ पेत्र ३:२१) पण बाप्तिस्मा घेतला म्हणजे तारण होईलच असं नाही. त्यामुळे तारण मिळावं या उद्देशाने नाही, तर तुमचं यहोवावर प्रेम आहे आणि कायम त्याची सेवा करायची तुम्हाला मनापासून इच्छा आहे म्हणून तुम्ही बाप्तिस्मा घेतला पाहिजे.—मार्क १२:२९, ३०.
● बाप्तिस्मा झाला नसेल तर तुम्हाला तुमच्या वागणुकीसाठी देवाला हिशोब द्यावा लागणार नाही.
चूक. याकोब ४:१७ मध्ये म्हटलंय: “योग्य काय हे माहीत असून जो ते करत नाही, तो पाप करतो.” मग त्याचा बाप्तिस्मा झालेला असो किंवा नसो. त्यामुळे योग्य काय हे जर तुम्हाला माहीत असेल आणि जीवनात नेमकं काय करायचंय ते ठरवण्याइतके तुम्ही समजदार असाल तर तुम्ही आईवडिलांशी किंवा मंडळीतल्या एखाद्या प्रौढ भावाशी किंवा बहिणीशी बोलू शकता. मग बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही आणखी कशी प्रगती करू शकता हे तुम्हाला समजेल.
● तुमचे मित्र बाप्तिस्मा घेत आहेत म्हणजे तुम्हीही बाप्तिस्म्यासाठी तयार आहात.
चूक. तुम्हाला स्वतःला मनापासून इच्छा असल्यामुळे तुम्ही बाप्तिस्म्याचा निर्णय घेतला पाहिजे. (स्तोत्र ११०:३) यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असण्याचा काय अर्थ होतो हे तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल, आणि ही जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात याची तुम्हाला खातरी असेल, तरच तुम्ही बाप्तिस्मा घेतला पाहिजे.—उपदेशक ५:४, ५.
जीवनाला नवीन दिशा देणारा निर्णय
बाप्तिस्मा हा जीवनाला नवीन दिशा देणारा निर्णय आहे आणि यामुळे तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. पण यासोबतच हा निर्णय घेतल्यामुळे तुमच्यावर एक मोठी जबाबदारीसुद्धा येते. ती म्हणजे, यहोवाला केलेल्या समर्पणानुसार जीवन जगण्याची जबाबदारी.
तुम्ही हा निर्णय घ्यायला तयार आहात का? असाल तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण यामुळे खूप मोठा सन्मान तुम्हाला मिळेल—यहोवाची मनापासून सेवा करण्याचा आणि त्याला केलेल्या समर्पणाप्रमाणे जीवन जगण्याचा.—मत्तय २२:३६, ३७.
पुढच्या अध्यायात
जीवन यशस्वी होण्यासाठी तुम्ही योग्य ध्येयं कशी ठेवू शकता हे जाणून घ्या.
मुख्य वचन
“तुम्ही आपली शरीरं जिवंत, पवित्र आणि देवाला स्वीकारयोग्य बलिदान म्हणून अर्पण करावीत.”—रोमकर १२:१.
हे करून पाहा
तुमच्या आईवडिलांचा सल्ला घेऊन मंडळीतल्या अशा एखाद्या व्यक्तीची मदत घ्या, जी तुम्हाला यहोवाच्या सेवेत पुढे यायला मदत करू शकेल.—प्रेषितांची कार्यं १६:१-३.
तुम्हाला माहीत होतं का . . .?
तुम्ही तारणासाठी योग्य आहात हे दाखवण्यासाठी जी “खूण” केली जाते, त्यात बाप्तिस्मा हा एक महत्त्वाचा भाग आहे.—यहेज्केल ९:४-६.
मी ठरवलंय . . .
बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी मी बायबलच्या या शिकवणी आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न करीन: ․․․․․
या विषयाबद्दल मला माझ्या आईवडिलांकडून हे जाणून घ्यायला आवडेल ․․․․․
तुम्हाला काय वाटतं?
● बाप्तिस्म्याचा निर्णय गंभीरपणे विचार करून का घेतला पाहिजे?
● कोणत्या कारणामुळे एखादी तरुण व्यक्ती बाप्तिस्मा घ्यायची घाई करू शकते?
● कोणत्या गोष्टीमुळे कदाचित एखादी तरुण व्यक्ती समर्पण करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला विनाकारण वेळ लावू शकते?
[संक्षिप्त आशय]
“माझा बाप्तिस्मा झालाय हे लक्षात ठेवल्यामुळे मला जीवनात योग्य निर्णय घ्यायला आणि अशा गोष्टी टाळायला मदत झाली ज्यांचे भयंकर परिणाम होऊ शकले असते.”—हॉली
[चौकट/चित्र]
बाप्तिस्म्याबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्न
बाप्तिस्मा कशाला सूचित करतो? आधी तुम्ही स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत होता. पण जेव्हा तुम्हाला पाण्यात पूर्णपणे बुडवून बाप्तिस्मा दिला जातो, तेव्हा तुमचं आधीचं जीवन संपून यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुन्हा जिवंत झाला आहात असं सूचित होतं.
यहोवाला जीवन समर्पित करायचा काय अर्थ होतो? याचा अर्थ तुम्ही स्वतःचं जीवन यहोवाच्या स्वाधीन करता आणि जीवनात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवाच्या इच्छेला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं वचन देता. (मत्तय १६:२४) बाप्तिस्म्याच्या काही काळाआधी तुम्ही यहोवाला प्रार्थनेत समर्पण करणं योग्य राहील.
बाप्तिस्मा घेण्याआधी तुमचं जीवन कसं असलं पाहिजे? बायबलमधल्या स्तरांप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे आणि तुमच्या विश्वासाबद्दल इतरांशी बोललं पाहिजे. प्रार्थना करून आणि बायबलचा अभ्यास करून तुम्ही देवासोबतची तुमची मैत्री वाढवली पाहिजे. यहोवाची सेवा तुम्ही इतरांना खूश करण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वतःला इच्छा असल्यामुळे केली पाहिजे.
विशिष्ट वयाआधीच तुमचा बाप्तिस्मा झाला पाहिजे असं आहे का? बाप्तिस्म्यासाठी वय सगळ्यात महत्त्वाचं नाही. पण समर्पणाचा अर्थ समजून घेण्याइतकं तुम्ही समजदार असलं पाहिजे.
तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा असेल पण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला थोडं थांबायला सांगितलं तर काय? यहोवाला आवडतील असे गुण वाढवण्यासाठी तुम्ही आणखी थोडं थांबावं असं कदाचित त्यांना वाटत असेल. त्यांचा सल्ला ऐका आणि यहोवासोबत तुमची मैत्री वाढवण्यासाठी त्या वेळेचा उपयोग करा.—१ शमुवेल २:२६.
[चौकट]
वर्कशीट
तुम्ही बाप्तिस्मा घ्यायचा विचार करत आहात का?
खाली दिलेल्या प्रश्नांच्या आणि वाक्यांच्या मदतीने तुम्ही कुठपर्यंत प्रगती केली आहे ते पाहा. तुमची उत्तरं लिहिण्याआधी वचनं उघडून पाहायला विसरू नका.
तुमचा यहोवावर भरवसा आहे हे तुम्ही सध्या कसं दाखवत आहात?—स्तोत्र ७१:५. ․․․․․
चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी तुमची समजशक्ती प्रशिक्षित आहे हे तुम्ही कसं दाखवून दिलंय?—इब्री लोकांना ५:१४. ․․․․․
तुम्ही दिवसातून किती वेळा प्रार्थना करता? ․․․․․
तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही प्रार्थनेत स्पष्टपणे यहोवाला सांगता का? आणि तुमच्या प्रार्थनांवरून यहोवासोबतच्या तुमच्या नात्याबद्दल काय कळतं?—स्तोत्र १७:६. ․․․․․
तुमच्या प्रार्थनेच्या बाबतीत तुम्हाला कोणती विशिष्ट ध्येयं ठेवायला आवडेल ते लिहा. ․․․․․
तुम्ही नियमितपणे बायबलचा वैयक्तिक अभ्यास करता का?—यहोशवा १:८. ․․․․․
वैयक्तिक अभ्यासात तुम्ही काय-काय करता? ․․․․․
तुमच्या वैयक्तिक अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला कोणती विशिष्ट ध्येयं ठेवायला आवडेल ते लिहा. ․․․․․
तुम्ही चांगल्या प्रकारे सेवाकार्य करता का? (उदाहरणार्थ: बायबलच्या मूलभूत शिकवणी तुम्ही इतरांना समजावून सांगू शकता का? आवड दाखवणाऱ्या लोकांना तुम्ही पुन्हा जाऊन भेटता का? तुम्ही बायबल अभ्यास मिळवायचा प्रयत्न करत आहात का?)
□ हो □ नाही
तुमचे आईवडील तुमच्यासोबत प्रचाराला आले नाहीत तरी तुम्ही जाता का?—प्रेषितांची कार्यं ५:४२.
□ हो □ नाही
तुमच्या सेवाकार्याच्या बाबतीत तुम्हाला कोणती विशिष्ट ध्येयं ठेवायला आवडेल ते लिहा.—२ तीमथ्य २:१५. ․․․․․
तुम्ही ख्रिस्ती सभांना नियमितपणे जाता की फक्त अधूनमधून?—इब्री लोकांना १०:२५. ․․․․․
तुम्ही सभांमध्ये कोणकोणत्या मार्गांनी भाग घेता? ․․․․․
तुमचे आईवडील सभेला येऊ शकले नाहीत तरी तुम्ही जाता का? (जर त्यांची परवानगी असेल तर)?
□ हो □ नाही
तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे करायला खरंच आनंद वाटतो असं तुम्ही म्हणू शकता का?—स्तोत्र ४०:८.
□ हो □ नाही
तुम्हाला अशा काही घटना आठवतात का जेव्हा तुम्ही मित्रांच्या दबावापुढे झुकला नाहीत?—रोमकर १२:२. ․․․․․
यहोवावर असलेलं तुमचं प्रेम टिकवून ठेवायला तुम्ही काय करायचं ठरवलंय?—यहूदा २०, २१. ․․․․․
तुमच्या आईवडिलांनी किंवा मित्रांनी यहोवाची सेवा करायचं सोडून दिलं तरी तुम्ही ती करत राहणार का?—मत्तय १०:३६, ३७.
□ हो □ नाही
[चित्र]
लग्नासारखाच बाप्तिस्मासुद्धा जीवनाला नवीन दिशा देणारा निर्णय आहे, जो आपण हलक्यात घेऊ नये