आपल्या जगण्याचा काय उद्देश आहे?
बायबलचं उत्तर
हाच प्रश्न वेगळ्या प्रकारेही विचारला जाऊ शकतो जसं की, जीवनाचा काय अर्थ आहे? किंवा माणूस जन्माला का येतो? बायबलमध्ये सांगितलंय की देवासोबत एक जवळचं नातं किंवा मैत्री जोडणं हा खरंतर माणसाच्या जीवनाचा उद्देश आहे. याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या काही मूलभूत सत्यांचा विचार करा.
देव आपला निर्माणकर्ता आहे. बायबल म्हणतं: “[देवानेच] आपल्याला बनवलं.”—स्तोत्र १००:३; प्रकटीकरण ४:११.
प्रत्येक गोष्ट बनवण्यामागे देवाचा एक उद्देश असतो आणि आपल्यालाही त्याने एका खास उद्देशाने बनवलंय.—यशया ४५:१८.
देवाने माणसाला अशा प्रकारे बनवलंय की त्याला “देवाच्या मार्गदर्शनाची भूक” असते. यामुळेच जीवनाचा उद्देश काय आहे हे जाणून घ्यायची आपल्याला इच्छा असते. (मत्तय ५:३) आणि आपण ही इच्छा पूर्ण करावी असं देवाला वाटतं.—स्तोत्र १४५:१६.
देवासोबत मैत्री करून आपण त्याच्या मार्गदर्शनाची ही भूक भागवू शकतो. देवाशी मैत्री करणं अशक्य आहे असं काही जणांना वाटू शकतं. पण बायबल आपल्याला असं प्रोत्साहन देतं: “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”—याकोब ४:८; २:२३.
देवाशी मैत्री करण्यासाठी त्याने आपल्याला ज्या उद्देशाने निर्माण केलं त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. हा उद्देश काय आहे हे आपल्याला बायबलमधून कळतं. उपदेशक १२:१३ मध्ये असं म्हटलंय: “देवाचा आदर करा, त्याच्या आज्ञा पाळा कारण यासाठीच आपल्याला निर्माण करण्यात आलं आहे.”—गूड न्यूज ट्रान्सलेशन.
भविष्यात देव सगळी दुःखं काढून टाकेल आणि त्याच्यासोबत मैत्री असलेल्यांना, म्हणजेच त्याची उपासना करणाऱ्यांना कायमचं जीवन देईल. त्या वेळी मानवांसाठी असलेला देवाचा मूळ उद्देश खऱ्या अर्थाने पूर्ण होताना आपल्याला अनुभवता येईल.—स्तोत्र ३७:१०, ११.