प्राणी मेल्यानंतर स्वर्गात जातात का?
बायबलचं उत्तर
बायबल असं शिकवतं की पृथ्वीवरच्या सर्व सजीवांपैकी फक्त काही माणसंच स्वर्गात जातील. (प्रकटीकरण १४:१, ३) ते तिथे येशूसोबत राजे आणि याजक म्हणून राज्य करतील. (लूक २२:२८-३०; प्रकटीकरण ५:९, १०) पण मरण पावलेल्या बाकीच्या बहुतेक लोकांना नंदनवन झालेल्या या पृथ्वीवर जगण्यासाठी पुन्हा उठवलं जाईल.—स्तोत्र ३७:११, २९.
पाळीव प्राणी किंवा कुत्रा स्वर्गात जाऊ शकतो, असं बायबलमध्ये कुठेच सांगण्यात आलेलं नाही. कारण ‘स्वर्गाचं आमंत्रण’ मिळवण्यासारखी कामं प्राणी करू शकत नाहीत. (इब्री लोकांना ३:१) ती कामं म्हणजे देवाबद्दलचं ज्ञान घेणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्या आज्ञा पाळणं. (मत्तय १९:१७; योहान ३:१६; १७:३) शिवाय बायबल सांगतं, की फक्त माणसांनाच सर्वकाळ जगण्याच्या उद्देशाने बनवण्यात आलंय.—उत्पत्ती २:१६, १७; ३:२२, २३.
स्वर्गात जाण्यासाठी पृथ्वीवरच्या सजीवांना मेलेल्यांतून उठवणं गरजेचं आहे. (१ करिंथकर १५:४२) आणि बायबलमध्ये मेलेल्यांतून पुन्हा उठवण्यात आल्याच्या बऱ्याच घटनांबद्दल सांगण्यात आलंय. (१ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७; १३:२०, २१; लूक ७:११-१५; ८:४१, ४२, ४९-५६; योहान ११:३८-४४; प्रेषितांची कार्यं ९:३६-४२; २०:७-१२) पण या सगळ्या घटनांमध्ये प्राण्यांना नाही, तर माणसांना उठवण्यात आलं होतं.
मेल्यानंतर प्राण्यांचं काय होतं?
बायबलमधून कळतं, की देवाच्या नजरेत माणसांचा आणि प्राण्यांचा जीव सारखाच आहे. (गणना ३१:२८) देवाने माणसांची आणि प्राण्यांची रचना ‘जमिनीतल्या मातीने’ आणि ‘जीवनाच्या श्वासाने’ केली.—उत्पत्ती २:७.
बायबल असंही शिकवतं, की माणसांसारखा प्राण्यांचाही मृत्यू होतो आणि मेल्यानंतर ते दोघंही मातीला जाऊन मिळतात. (निर्गम १९:१३; उपदेशक ३:१९, २०) दुसऱ्या शब्दांत, त्यांचं अस्तित्त्व संपतं. a
प्राणी पाप करतात का?
नाही. पाप करणं म्हणजे देवाची तत्त्वं मोडतील अशा प्रकारे वागणं किंवा विचार करणं. प्राण्यांमध्ये चांगल्या-वाइटातला फरक ओळखण्याची क्षमता नसल्यामुळे ते पाप करू शकत नाहीत. त्यांचं आयुष्य खूप कमी असतं आणि त्यात ते त्यांच्या उपजत बुद्धीप्रमाणे वागतात. (२ पेत्र २:१२) मग त्यांचा जीवनकाळ संपतो आणि शेवटी ते मरून जातात. पण हे मरण त्यांना पाप केल्यामुळे येत नाही.
प्राण्यांशी क्रूरतेने वागणं बरोबर आहे का?
नाही. देवाने माणसांना प्राण्यांवर आधिकार दिलाय. पण त्याने त्यांना प्राण्यांशी क्रूरपणे वागायचा आधिकार मात्र दिलेला नाही. (उत्पत्ती १:२८; स्तोत्र ८:६-८) देवाला सगळ्या प्राण्यांची काळजी आहे; अगदी छोट्या पक्ष्यांचीसुद्धा. (योना ४:११; मत्तय १०:२९) आणि म्हणूनच त्याने त्याच्या उपासकांना प्राण्यांना चांगली वागणूक द्यायला सांगितली.—निर्गम २३:१२; अनुवाद २५:४; नीतिवचनं १२:१०.