व्हिडिओ पाहण्यासाठी

मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांवरून हे सिद्ध होतं का की येशूच मसीहा आहे?

मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांवरून हे सिद्ध होतं का की येशूच मसीहा आहे?

बायबलचं उत्तर

 हो. बायबलमध्ये “नेतृत्व करणारा” मसीहा म्हणजेच “जगाचा तारणकर्ता” याच्याबद्दल पुष्कळ भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या. पृथ्वीवर असताना येशूने यांपैकी बऱ्‍याच भविष्यवाण्या पूर्ण केल्या. (दानीएल ९:​२५; १ योहान ४:​१४) इतकंच काय, तर मृत्यूनंतरही येशूने मसीहाबद्दच्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या.​—स्तोत्र ११०:१; प्रेषितांची कार्यं २:​३४-​३६.

 “मसीहा” म्हणजे काय?

 मसीहा हा शब्द मशीआक  या हिब्रू शब्दातून आला आहे. ग्रीक भाषेत त्याचा समानार्थी शब्द ख्रिस्तोस  असा आहे, ज्यापासून ख्रिस्त हा शब्द आला आहे. मसीहा आणि ख्रिस्त या दोन्ही शब्दांचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. त्यामुळे “येशू ख्रिस्त” याचा अर्थ, “येशू जो अभिषिक्‍त आहे” किंवा “येशू जो मसीहा आहे” असा होतो.

 बायबलच्या काळात, सहसा डोक्यावर तेल ओतून एखाद्या व्यक्‍तीला अभिषिक्‍त केलं जायचं. यावरून दिसायचं की त्या व्यक्‍तीला खास अधिकाराच्या पदावर नियुक्‍त करण्यात आलंय. (लेवीय ८:​१२; १ शमुवेल १६:१३) त्याच प्रकारे, देवाने येशूला एका खास अधिकाराच्या पदावर म्हणजेच मसीहा म्हणून नियुक्‍त केलं. (प्रेषितांची कार्यं २:​३६) इथे फरक फक्‍त एवढाच होता की देवाने तेलाने नाही, तर पवित्र शक्‍तीने येशूचा अभिषेक केला.​—मत्तय ३:​१६.

 मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या एकापेक्षा जास्त व्यक्‍तींनी पूर्ण करणं शक्य होतं का?

 नाही. जसं बोटांच्या ठशांवरून फक्‍त एकाच व्यक्‍तीची ओळख पटवून दिली जाऊ शकते. तसंच, बायबलच्या भविष्यवाण्यांवरून फक्‍त एकाच मसीहाची किंवा ख्रिस्ताची ओळख पटते. असं असलं तरी बायबल आपल्याला इशारा देतं, “खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील आणि लोकांना, इतकंच काय तर निवडलेल्या लोकांनाही फसवण्यासाठी मोठमोठी चिन्हं आणि चमत्कार करतील.”​—मत्तय २४:२४.

 मसीहा अजून यायचाय, असं म्हणता येईल का?

 नाही. बायबलमध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की मसीहा इस्राएलच्या दावीद राजाचा वंशज असेल. (स्तोत्र ८९:​३, ४) पण ज्यात दावीदच्या घराण्याची नोंद होती, त्या यहुदी वंशावळी आज आपल्याजवळ नाहीत. कारण, इ.स. ७० मध्ये रोमी लोकांनी जेव्हा यरुशलेमवरती कब्जा मिळवला होता, तेव्हा या वंशावळी नष्ट झाल्या. a तेव्हापासून कोणालाही हे सिद्ध करणं शक्य झालेलं नाही की तो दावीदच्या राजघराण्याचा आहे. पण येशूच्या काळात मात्र त्या वंशावळी उपलब्ध होत्या. त्यामुळे जर तो खरंच दावीदच्या वंशाचा नसता, तर ही गोष्ट कोणीही सहज सिद्ध करून दाखवू शकलं असतं. पण कोणीही, अगदी त्याच्या शत्रूंनींही असं केलं नाही.​—मत्तय २२:४१-​४६.

 बायबलमध्ये मसीहाबद्दलच्या एकूण किती भविष्यवाण्या आहेत?

 मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्यांचा नेमका आकडा सांगता येणार नाही. कारण या भविष्यवाण्या मोजायची पद्धत वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ, यशया ५३:२-७ मधल्या अहवालात मसीहाबद्दल बऱ्‍याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. काही जण या संपूर्ण अहवालाला एकच भविष्यवाणी म्हणून मोजतील; तर इतर जण कदाचित त्यात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला एक वेगळी भविष्यवाणी म्हणून मोजतील.

 येशूने पूर्ण केलेल्या मसीहाबद्दलच्या काही भविष्यवाण्या

भविष्यवाणी

कोणत्या वचनांत?

पूर्णता

अब्राहामची संतती

उत्पत्ती २२:१७, १८

मत्तय १:१

अब्राहामचा मुलगा इसहाक याचा वंशज

उत्पत्ती १७:१९

मत्तय १:२

इस्राएलच्या यहूदा वंशात जन्म

उत्पत्ती ४९:१०

मत्तय १:​१, ३

दावीद राजाच्या घराण्यातून येईल

यशया ९:७

मत्तय १:१

कुमारीच्या पोटी जन्म

यशया ७:​१४

मत्तय १:​१८, २२, २३

बेथलेहेममध्ये जन्म होईल

मीखा ५:२

मत्तय २:​१, ५, ६

इम्मानुएल b नावाने ओळखतील

यशया ७:​१४

मत्तय १:​२१-​२३

गरीब कुटुंबात जन्म

यशया ५३:२

लूक २:७

त्याच्या जन्मानंतर मुलांची हत्या

यिर्मया ३१:१५

मत्तय २:​१६-​१८

इजिप्तमधून बोलवण्यात आलं

होशेय ११:१

मत्तय २:​१३-​१५

नासरेथकर नाव पडलं c

यशया ११:१

मत्तय २:​२३

मसीहाच्या आधी दूत येईल

मलाखी ३:१

मत्तय ११:​७-​१०

इ.स. २९ मध्ये मसीहा म्हणून अभिषेक d

दानीएल ९:​२५

मत्तय ३:​१३-​१७

देवाने जाहीरपणे “माझा मुलगा” म्हटलं

स्तोत्र २:७

प्रेषितांची कार्यं १३:३३, ३४

देवाच्या मंदिरासाठी आवेशी

स्तोत्र ६९:९

योहान २:​१३-​१७

आनंदाचा संदेश सांगणारा

यशया ६१:१

लूक ४:​१६-​२१

गालीलमधलं प्रचारकार्य तेजस्वी प्रकाशासारखं

यशया ९:​१, २

मत्तय ४:​१३-​१६

मोशेसारखा चमत्कार करणारा

अनुवाद १८:१५

प्रेषितांची कार्यं २:​२२

मोशेप्रमाणे त्याने देवाचे विचार सांगितले

अनुवाद १८:१८, १९

योहान १२:४९

आजार बरे केले

यशया ५३:४

मत्तय ८:​१६, १७

स्वतःकडे लक्ष वेधलं नाही

यशया ४२:२

मत्तय १२:१७, १९

दुःखी-कष्टी लोकांना दया दाखवली

यशया ४२:३

मत्तय १२:​९-​२०; मार्क ६:​३४

देवासारखा न्याय दाखवला

यशया ४२:​१, ४

मत्तय १२:१७-​२०

अद्‌भुत सल्लागार

यशया ९:​६, ७

योहान ६:​६८

यहोवाचं नाव घोषित केलं

स्तोत्र २२:२२

योहान १७:६

उदाहरणं देऊन बोलायचा

स्तोत्र ७८:२

मत्तय १३:३४, ३५

नेतृत्व करणारा

दानीएल ९:​२५

मत्तय २३:१०

अनेकांनी विश्‍वास ठेवला नाही

यशया ५३:१

योहान १२:३७, ३८

अडखळण्याचा खडक

यशया ८:​१४, १५

मत्तय २१:४२-​४४

माणसांनी नाकारलं

स्तोत्र ११८:२२, २३

प्रेषितांची कार्यं ४:​१०, ११

त्याचा विनाकारण द्वेष केला

स्तोत्र ६९:४

योहान १५:२४, २५

गाढवावर बसून यरुशलेममध्ये विजयी प्रवेश

जखऱ्‍या ९:९

मत्तय २१:​४-९

मुलांकडून स्तुती

स्तोत्र ८:२

मत्तय २१:१५, १६

यहोवाच्या नावाने आला

स्तोत्र ११८:२६

योहान १२:१२, १३

जवळच्या सोबत्याकडून विश्‍वासघात

स्तोत्र ४१:९

योहान १३:१८

चांदीच्या ३० नाण्यांसाठी विश्‍वासघात e

जखऱ्‍या ११:१२, १३

मत्तय २६:१४-​१६; २७:​३-​१०

मित्र त्याला सोडून गेले

जखऱ्‍या १३:७

मत्तय २६:३१, ५६

खोट्या साक्षीदारांनी त्याच्याविरुद्ध साक्ष दिली

स्तोत्र ३५:११

मत्तय २६:५९-​६१

आरोप लावणाऱ्‍यांपुढे शांत राहिला

यशया ५३:७

मत्तय २७:१२-​१४

त्याच्यावर लोक थुंकले

यशया ५०:६

मत्तय २६:६७; २७:२७, ३०

डोक्यावर मारण्यात आलं

मीखा ५:१

मार्क १५:१९

चाबकाचे फटके मारण्यात आले

यशया ५०:६

योहान १९:१

मारणाऱ्‍यांना रोखलं नाही

यशया ५०:६

योहान १८:२२, २३

सरकारी अधिकाऱ्‍यांनी त्याच्याविरूद्ध कट रचला

स्तोत्र २:२

लूक २३:१०-​१२

हातापायांना खिळे ठोकून वधस्तंभावर लटकवलं

स्तोत्र २२:१६

मत्तय २७:३५; योहान २०:२५

लोकांनी त्याच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकल्या

स्तोत्र २२:१८

योहान १९:२३, २४

अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं

यशया ५३:१२

मत्तय २७:३८

निंदा आणि अपमान झाला

स्तोत्र २२:​७, ८

मत्तय २७:३९-​४३

पापी लोकांसाठी दुःख सोसलं

यशया ५३:​५, ६

१ पेत्र २:​२३-​२५

देवाने सोडून दिलंय असं वाटलं

स्तोत्र २२:१

मार्क १५:३४

आंबट आणि कडू पदार्थ मिसळलेला द्राक्षारस देण्यात आला

स्तोत्र ६९:२१

मत्तय २७:३४

मृत्यूआधी तहानलेला

स्तोत्र २२:१५

योहान १९:२८, २९

जीवन देवाच्या हातात सोपवलं

स्तोत्र ३१:५

लूक २३:४६

जीवन अर्पण केलं

यशया ५३:१२

मार्क १५:३७

पापापासून सोडवण्यासाठी खंडणी दिली

यशया ५३:१२

मत्तय २०:२८

हाडं मोडण्यात आली नाहीत

स्तोत्र ३४:२०

योहान १९:३१-​३३, ३६

भोसकण्यात आलं

जखऱ्‍या १२:१०

योहान १९:३३-​३५, ३७

श्रीमंतांच्या कबरेत पुरण्यात आलं

यशया ५३:९

मत्तय २७:५७-​६०

मृत्यूनंतर पुन्हा उठवण्यात आलं

स्तोत्र १६:१०

प्रेषितांची कार्यं २:​२९-​३१

विश्‍वासघात करणाऱ्‍याच्या जागी दुसरा शिष्य

स्तोत्र १०९:८

प्रेषितांची कार्यं १:​१५-​२०

देवाच्या उजव्या हाताला बसला

स्तोत्र ११०:१

प्रेषितांची कार्यं २:​३४-​३६

a मॅक्लिंटॉक आणि स्ट्राँग यांच्या सायक्लोपिडियामध्ये  म्हटलंय, “आपण हे खातरीने म्हणू शकतो की यहुदी कुळांची आणि घराण्यांची नोंद असलेल्या वंशावळी, यरुशलेमच्या पराभवाच्या वेळी नष्ट झाल्या; त्याआधी त्या अस्तित्वात होत्या.”

b इम्मानुएल या हिब्रू शब्दाचा अर्थ “देव आपल्यासोबत आहे” असा होतो. यावरून, मसीहा म्हणून येशूची काय भूमिका होती हे स्पष्ट होतं. येशूने पृथ्वीवर केलेल्या कार्यांवरून सिद्ध झालं की देव त्याच्या उपासकांसोबत आहे.​—लूक २:​२७-​३२; ७:​१२-​१६.

c “नासरेथकर” हा शब्द नेतसेर  या हिब्रू शब्दापासून आला आहे. त्या शब्दाचा अर्थ “अंकुर” असा होतो.

d बायबलमध्ये इ.स. २९ या वर्षी मसीहा प्रकट होईल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. याबद्दल जास्त माहितीसाठी “दानीएलाची भविष्यवाणी मशीहाच्या आगमनाविषयी भाकीत करते” हा लेख पाहा.

e ही भविष्यवाणी जखऱ्‍याच्या पुस्तकात असली तरीपण मत्तयने म्हटलं की ती ‘यिर्मया संदेष्ट्याने सांगितली आहे.’ (मत्तय २७:९) असं दिसून येतं की शास्त्रवचनांच्या ज्या भागाला ‘संदेष्ट्यांची लिखाणं’ म्हटलं जायचं, त्यात यिर्मया हे पहिलं पुस्तक आहे असं कधीकधी मानलं जायचं. (लूक २४:४४) मत्तयने या पूर्ण भागाला सूचित करण्यासाठी “यिर्मया” या नावाचा उल्लेख केला असावा. याच भागात जखऱ्‍याचं पुस्तकसुद्धा आहे.