व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | पालकांसाठी

घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

हे कठीण का आहे?

मुलांनी घरातल्या कामात मदत करावी अशी अपेक्षा काही कुटुंबात केली जाते. आणि अशा कुटुंबात मुलंसुद्धा तक्रार न करता मदत करतात. पण इतर कुटुंबात, पालक आपल्या मुलांकडून फार अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून मग मुलंही घरातल्या कामांमध्ये जास्त हातभार लावत नाही.

संशोधकांना दिसून आलं आहे, की खासकरून पाश्‍चात्त्य देशातल्या मुलांचा इतरांची सेवा करण्याऐवजी सेवा करून घेण्याकडे जास्त कल असतो. स्टीवन नावाच्या वडिलांचं असं म्हणणं आहे, की घरात काम करण्याच्या बाबतीत “आजकाल मुलांकडून फार कमी अपेक्षा केल्या जातात. त्यांना व्हिडिओ गेम्स खेळण्यासाठी, इंटरनेटवर वेळ घालवण्यासाठी किंवा टिव्ही बघण्यासाठी मोकळीक दिली जाते.”

याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? घरकामात हातभार लावणं खरंच महत्त्वाचं आहे का? यामुळे घर टापटिप राहण्यासोबतच मुलांचा विकास होण्यासही मदत होते का?

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

मुलं आठवडाभर खूप व्यस्त असतात. त्यांना शाळेचा भरपूर होमवर्क असतो. त्यांना शाळेनंतर इतर काही उपक्रमही दिले जातात. खासकरून अशा वेळी काही पालक मुलांना घरातली कामं देण्याचं टाळतात. पण त्यांना मदतीसाठी सोबत घेण्याचे कोणते काही फायदे आहेत, ते आपण पाहू या.

मुलांना जबाबदार बनण्यासाठी मदत होते. जी मुलं घरातल्या कामांमध्ये मदत करतात, ती सहसा शाळेमध्ये अभ्यासात किंवा इतर बाबतीत हुशार असतात. मुलांमध्ये शिकण्यासाठी आवश्यक असणारे गुण, जसं की आत्मविश्वास, शिस्त, निश्चयीपणा हे घरात हातभार लावल्यामुळे विकसित व्हायला मदत होते.

सेवा करण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी मदत होते. जी मुलं घरात मदत करतात ती सहसा मोठी होऊन समाज सेवा करण्याचं निवडतात, असं काहींच्या लक्षात आलं आहे. घरातली कामं केल्यामुळे ते आधी इतरांच्या गरजांचा विचार करायला शिकतात. दुसरीकडे पाहता, आधी उल्लेख केलेल्या स्टीवनच्या म्हणण्यानुसार, “मुलांकडून जेव्हा कामाच्या बाबतीत काहीच अपेक्षा केल्या जात नाहीत, तेव्हा इतरांनी आपली सेवा करावी असं त्यांचं मत तयार होतं. यामुळे मोठे झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी ते तयार झालेले नसतात.”

कुटुंबात ऐक्य वाढतं. घरातल्या कामांमध्ये मदत केल्यामुळे मुलांना हे समजायला मदत होते, की कुटुंबात त्यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि कुटुंबाप्रती त्यांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. पण जर पालकांनी शाळेनंतरच्या उपक्रमांना घरातल्या कामांपेक्षा जास्त महत्त्व दिलं, तर मुलांना या गोष्टीची जाणीव होत नाही. म्हणून स्वतःला विचारा: ‘माझ्या मुलाने त्याच्या फुटबॉल टीमसोबत जास्त वेळ घालवला, त्यांच्यासोबत जवळचं नातं जोडलं, पण कुटुंब म्हणून जी टीम आहे त्यापासून तो दुरावला तर काय फायदा?’

तुम्ही काय करू शकता?

लहान वयापासूनच सुरुवात करा. मुलं तीन वर्षांची असतात तेव्हापासूनच त्यांना मदतीसाठी सोबत घेतलं पाहिजे, असं काही पालकांचं म्हणणं आहे. इतर काही सुचवतात, की दोन किंवा त्यापेक्षाही कमी वय असतानाच आपण मुलांना काही कामं दिली पाहिजेत. कारण मुलांना पालकांसोबत काम करायला आणि त्यांचं अनुकरण करायला आवडतं.—बायबल तत्त्व: नीतिसूत्रे २२:६.

वयानुसार काम द्या. तीन वर्षांचं मूल खेळणी आवरण्याचं, लहान-सहान डाग पुसण्याचं किंवा धुण्याचे कपडे वेगळे करण्याचं काम करू शकतं. तसंच, मुलं मोठी असली तर कचरा काढणं, गाडी धुणं, किंवा जेवण बनवण्याचं कामही ती करू शकतात. मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना काम द्या. तुमची मुलं दिलेली कामं किती आनंदाने करतात हे पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.

कामाला कमी प्राधान्य देऊ नका. मुलांना दररोज भरपूर होमवर्क असतो. म्हणून कदाचित पालकांना आपल्या मुलांना काम देणं इतकं महत्त्वपूर्ण वाटणार नाही. द प्राइज ऑफ प्रिवलेज या पुस्तकात म्हटलं आहे, की शाळेत मुलांना चांगले मार्क्स मिळावेत म्हणून आईवडील त्यांना काम देत नाहीत. आणि यावरून हेच दिसून येतं, की कामाला कमी प्राधान्य दिलं जातं. पण आधी सांगितल्याप्रमाणे, घरकामात हातभार लावल्यामुळे मुलांना चांगले विद्यार्थी बनण्यासाठी मदत होते. ते जे काही शिकतात त्याचा फायदा त्यांना मोठं झाल्यावर, जेव्हा त्यांचं स्वतःचं एक कुटुंब असेल तेव्हा होईल.—बायबल तत्त्व: फिलिप्पैकर १:१०.

काम देण्यामागचा उद्देश लक्षात ठेवा. तुमची मुलं काम संपवण्यासाठी कदाचित जास्त वेळ घेऊ शकतात. तसंच, काम आणखीन चांगल्या प्रकारे करता येईल, असंही तुम्हाला वाटू शकतं. पण अशा वेळी ते काम स्वतः करण्याचा मोह टाळा. कारण मुलांनी मोठ्यांसारखं कुशलतेनं काम करावं हा काम देण्यामागचा उद्देश नाही, तर त्यांनी जबाबदार बनावं आणि कामातून आनंद मिळवावा हा आहे.—बायबल तत्त्व: उपदेशक ३:२२.

कामाच्या मोबदल्यात पैसे देण्याचं टाळा. काहींचं असं म्हणणं आहे, की मुलांना कामाच्या मोबदल्यात पैसे दिले पाहिजे, म्हणजे ते जबाबदार बनतात. याउलट इतरांचं असं म्हणणं आहे, की असं केल्याने मुलांचं लक्ष, कुटुंबाची मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून काय मिळेल यावर असतं. तसंच ते हेसुद्धा म्हणतात, की मुलांकडे जास्त पैसे आले की ते काम करण्यासही नाकारू शकतात. यावरून दिसून येतं, की मुलांना कामात हातभार लावण्याचं महत्त्व समजलेलं नाही. मग यातून आपण काय शिकतो? मुलांना कामाच्या मोबदल्यात पैसे देणं योग्य ठरणार नाही.