शोक करणाऱ्यांसाठी मदत
सलत राहणारं दुःख
“आमच्या लग्नाला ३९ वर्षांपेक्षा जास्त वर्षं झाली होती. साराला a दीर्घकाळ आजाराने ग्रासलं होतं आणि या आजारामुळे तिने माझी साथ कायमचीच सोडली. त्या दुःखातून सावरायला माझे मित्र माझ्यासोबत होते आणि मीही स्वतःला व्यस्त ठेवलं. पण वर्षभर मला जाणवत होतं की दुःखाने मला पार पिळवटून टाकलंय. माझं मन अस्थिर होतं; कधी बरं वाटायचं तर कधी मी बेचैन व्हायचो. तिला जाऊन जवळपास आज तीन वर्षं झालीयेत तरीही अचानक मनात खूप दुःख दाटून येतं.”—केवीन.
तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला मृत्यूमुळे गमावलं असेल तर तुमच्याही भावना केवीनच्या भावनांसारख्याच असतील. आपल्या विवाहसोबत्याचा, नातेवाइकाचा किंवा एका जिवलग मित्राचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा होणारं दुःख किंवा वेदना इतर कोणत्याही दुःखापेक्षा जास्तच असतात. यावर अभ्यास करणारे तज्ज्ञही ही गोष्ट मान्य करतात. द अमेरिकन जरनल ऑफ सायकॅट्री मधल्या एका लेखात म्हटलं आहे, की “मृत्यू हा कायमचं नुकसान करणारा आहे आणि कोणतीही गोष्ट याची भरपाई करू शकत नाही.” ज्या लोकांना अशा प्रकारचं दुःख सोसणं खूप कठीण जातं त्यांच्या मनात कदाचित असे विचार येऊ शकतात: ‘कधी मी या दुःखातून सावरणार? मी आयुष्यात पुन्हा कधी आनंदी होईन का? मला कुठून मदत मिळेल?’
या प्रश्नांची उत्तरं सावध राहा! च्या या अंकात दिली आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला जर अलीकडे गमावलं असेल तर अशा परिस्थितीत कोणत्या गोष्टी घडू शकतात याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतरच्या लेखात अशा काही मार्गांबद्दल सांगितलं आहे, ज्यांमुळे तुम्हाला तुमचं दुःख हलकं करायला मदत होईल.
पुढे दिलेले लेख या दुःखाच्या विळख्यात असलेल्या लोकांना सांत्वन आणि व्यावहारिक मदत पुरवतील अशी आम्ही मनापासून आशा बाळगतो.
a या अंकातील लेखांमध्ये काही नावं बदलण्यात आली आहेत.