व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन नकोसं वाटतं तेव्हा

जीवन नकोसं वाटतं तेव्हा

ब्राझीलमध्ये राहणारी ॲडरायना म्हणते: “या भावना रात्रंदिवस मनातून जातच नव्हत्या. म्हणून मी ठरवलं की आता आपलं आयुष्य संपवलेलंच बरं.”

तुम्हालाही आशा प्रकारच्या भावनांचा सामना करावा लागला असेल तर तुम्ही ॲडरायनाच्या भावना समजू शकता. तिला गंभीर स्वरूपाचं नैराश्‍य आलं होतं. तसंच, तिला खूप उदास आणि आशाहीन वाटायचं. ॲडरायनाला एक असा आजार झाला होता ज्यामुळे एका व्यक्‍ती नेहमीच दुःखी आणि निराश असते.

जपानमध्ये राहणाऱ्‍या काऊरू नावाच्या व्यक्‍तीला त्याच्या वृद्ध आणि आजारी आईवडिलांची काळजी घ्यावी लागली. तो म्हणतो: “कधीकधी नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप इतका जास्त असायचा की मनावर खूप दडपण यायचं. यामुळे हळूहळू माझी भूक कमी झाली आणि मला शांत झोप लागत नव्हती. मला वाटू लागलं होतं, मी मेलो तर या सगळ्या समस्या कायमच्याच संपून जातील.”

नाईजीरियामध्ये राहणारा ओजीबोडे म्हणतो: “मी नेहमी इतका दुःखी व्हायचो की मी सारखा रडायचो. म्हणून मग मी माझं जीवन संपवण्यासाठी मार्ग शोधू लागलो.” पण आनंदाची गोष्ट म्हणजे ओजीबोडे, काऊरू आणि ॲडरायना या तिघांनी आत्महत्या केली नाही. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, जगभरात दरवर्षी जवळजवळ ८ लाख लोक आत्महत्या करतात.

मदत कुठून मिळेल?

आत्महत्या करणाऱ्‍यांमध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. त्यातल्या बऱ्‍याचशा पुरुषांना इतरांकडून मदत स्वीकारायला संकोच वाटतो. येशूने म्हटलं, की आजारी असलेल्यांना वैद्याची गरज असते. (लूक ५:३१) म्हणून जर तुमच्याही मनात अशाच भावना असतील तर मदत मागायला कचरू नका. नैराश्‍याचा सामना करणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांना औषधोपचारामुळे मदत झाली आहे. ओजीबोडे, काऊरू आणि ॲडरायना यांनी डॉक्टरांची मदत स्वीकारली आणि आता त्यांची परिस्थिती फार सुधारली आहे.

डॉक्टर औषधं देऊन, निराश झालेल्या व्यक्‍तीशी बोलून किंवा दोन्ही पद्धतींचा उपयोग करून तिला बरं करण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच नैराश्‍याचा सामना करणाऱ्‍या व्यक्‍तीला तिच्या कुटुंबातल्या लोकांनी व मित्रांनी समजून घेऊन धीराने आणि प्रेमाने आधार देणंही गरजेचं आहे. पण सर्वात जवळचा मित्र, यहोवा देव हा आपल्या वचनाद्वारे म्हणजेच बायबलद्वारे आपल्याला मदत पुरवतो.

नैराश्‍यावर कायमचा तोडगा

नैराश्‍याचा सामना करणाऱ्‍यांना बऱ्‍याचदा खूप जास्त काळापर्यंत औषधं घेण्याची गरज पडू शकते. तसंच, त्यांना त्यांच्या जीवनशैलीतही बरेचसे फेरबदल करावे लागू शकतात. तुम्हीही नैराश्‍याचा सामना करत असाल तर ओजीबोडेसारखं तुमच्यासमोरही उज्ज्वल भविष्य आहे. याबद्दल तो म्हणतो: “यशया ३३:२४ या वचनाची पूर्णता होण्याची मी वाट बघतोय. त्या वचनात म्हटलं आहे की पृथ्वीवरचा एकही रहिवासी ‘मी रोगी आहे’ असं म्हणणार नाही.” ओजीबोडेसारखंच आपणही देवाने अभिवचन दिलेल्या “नवे आकाश” याची वाट पाहत आहोत. आणि तेव्हा ‘दुःख’ कायमचं नाहीसं होईल. (प्रकटीकरण २१:१, ४) त्या वेळी सर्व प्रकारच्या भावनिक आणि मानसिक त्रासाचा कायमचा अंत होईल. तुम्हाला दुःख देणाऱ्‍या भावना कायमच्या नाहीशा होतील. या वेदनादायक भावना तुम्ही पुन्हा कधीही “स्मरणार” नाही किंवा त्या तुमच्या “ध्यानात” येणार नाहीत.​—यशया ६५:१७.