सगळ्यांवर प्रेम करा
देवाने जो पहिला मानव बनवला, त्याचं नाव आदाम होतं. आपण सगळे त्याचीच मुलं आहोत. त्यामुळे आपण सगळे एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत. आणि कुटुंबातल्या सदस्यांनी एकमेकांचा आदर करावा, एकमेकांवर प्रेम करावं असं देवाला वाटतं. पण आजकाल असं प्रेम फार कमी पाहायला मिळतं. या गोष्टीचं देवाला खूप वाईट वाटतं.
प्रेमाबद्दल पवित्र शास्त्रात काय सांगितलं आहे?
“स्वतःसारखेच इतरांवर प्रेम करा.”—लेवीय १९:१८, मराठी कॉमन लँग्वेज.
“आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा.”—मत्तय ५:४४.
आपण इतरांवर प्रेम कसं करू शकतो?
पवित्र शास्त्रात १ करिंथकर १३:४-७ या वचनांत देवाने प्रेमाचं वर्णन कसं केलं आहे ते आता आपण पाहू या:
“प्रेम सहनशील आणि दयाळू” असतं.
विचार करा: तुमच्या हातून एखादी चूक होते तेव्हा तुमच्यावर रागावण्याऐवजी लोक तुमच्याशी धीराने आणि दयाळूपणे वागतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?
“प्रेम हेवा करत नाही.”
विचार करा: लोक जेव्हा तुमच्या प्रत्येक हेतूवर शंका घेतात आणि तुमचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?
प्रेम “स्वार्थ पाहत नाही.”
विचार करा: लोक स्वतःच्याच मतांवर अडून राहत नाहीत, तर तुमच्या मतांचाही आदर करतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?
प्रेम “चुकांचा हिशोब ठेवत नाही.”
विचार करा: ज्यांच्या हातून पाप घडतं, पण जे नंतर पश्चात्ताप करतात अशांना देव मोठ्या मनाने माफ करतो. देवाबद्दल पवित्र शास्त्रात म्हटलं आहे: “तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.” (स्तोत्र १०३:९) आपण जर एखाद्याचं मन दुखावलं आणि त्या व्यक्तीने आपल्याला माफ केलं तर आपल्याला किती बरं वाटतं! म्हणून इतर जण आपलं मन दुखावतात तेव्हा आपणही त्यांना माफ करायला तयार असलं पाहिजे.—स्तोत्र ८६:५.
प्रेम “अनीतीमुळे आनंदित होत नाही.”
विचार करा: आपलं काही वाईट झाल्यामुळे इतरांना आनंद झाला तर आपल्याला ते नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती दुःखात असते, संकटात असते तेव्हा आपणही आनंद मानू नये; मग ती व्यक्ती पूर्वी आपल्याशी वाईट वागली असली तरीही.
आपल्याला जर देवाकडून आशीर्वाद हवे असतील तर आपण सगळ्या प्रकारच्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे; मग ते कोणत्याही वयाचे, देशाचे किंवा धर्माचे असोत. सगळ्यांवर प्रेम करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करणं.