अभ्यास लेख ४२
तुम्ही “आज्ञाधारक” राहायला तयार असता का?
‘वरून येणारी बुद्धी ही आज्ञाधारक असते.’—याको. ३:१७.
गीत १०१ एकता जपू या
सारांश a
१. आज्ञाधारक राहायला आपल्याला कठीण का जाऊ शकतं?
आज्ञाधारक राहणं कठीण आहे असं कधी तुम्हाला वाटलंय का? दावीद राजालाही असंच वाटलं होतं. त्यामुळे त्याने देवाला प्रार्थना केली: “तुझ्या आज्ञा पाळण्याची इच्छा माझ्यात जागृत कर.” (स्तो. ५१:१२) दावीदचं यहोवावर खूप प्रेम होतं. पण तरी त्याला कधीकधी त्याच्या आज्ञेत राहायला कठीण गेलं. आणि साहजिकच आपल्यालाही तसं वाटू शकतं. का बरं? पहिली गोष्ट म्हणजे, आज्ञा मोडण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये जन्मापासूनच असते. दुसरी गोष्ट म्हणजे, सैतानाने जसं देवाविरुद्ध बंड केलं, तसं आपणही देवाविरुद्ध बंड करावं म्हणून तो आपल्याला नेहमी प्रवृत्त करत असतो. (२ करिंथ. ११:३) तिसरी गोष्ट म्हणजे, आपण अशा जगात राहतोय जिथे बंडखोर प्रवृत्ती सर्रास पाहायला मिळते. आणि जसं बायबलमध्ये म्हटलंय, की ही प्रवृत्ती “आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये आज कार्य करत आहे.” (इफिस. २:२) त्यामुळे पाप करायला लावणाऱ्या प्रवृत्तीशी झगडत राहण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत. पण त्यासोबतच दियाबल आणि हे जग, देवाची आज्ञा मोडायला लावण्यासाठी आपल्यावर जो दबाव टाकतात, त्याचाही प्रतिकार करण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. तसंच, आपण यहोवाच्या आणि त्याने ज्यांना अधिकार पदावर नियुक्त केलंय त्यांच्या आज्ञेत राहण्यासाठी खास परिश्रम घेतले पाहिजेत.
२. “आज्ञाधारक” राहण्यासाठी तयार असण्याचा काय अर्थ होतो? (याकोब ३:१७)
२ याकोब ३:१७ वाचा. याकोबने देवाच्या प्रेरणेने लिहिलं की बुद्धिमान व्यक्ती “आज्ञाधारक” राहायला तयार असते. याचा नेमका काय अर्थ होतो याचा विचार करा. यहोवाने ज्यांना काही प्रमाणात अधिकार दिलाय, त्यांच्या आज्ञेत राहायला आपण आनंदाने तयार असलं पाहिजे. पण जे यहोवाच्या नियमांच्या विरोधात वागतात, त्यांच्या आज्ञेत राहायची यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही.—प्रे. कार्यं ४:१८-२०.
३. ज्यांना अधिकार देण्यात आलाय त्यांची आज्ञा आपण का पाळली पाहिजे?
३ आपल्याला माणसांपेक्षा यहोवाच्या आज्ञेत राहणं सोपं वाटू शकतं. कारण शेवटी यहोवाचं मार्गदर्शन परिपूर्ण आणि योग्यच असतं. (स्तो. १९:७) पण माणसांच्या बाबतीत असं म्हणता येत नाही. तरीपण यहोवाने काही प्रमाणात आईवडिलांना, सरकारी अधिकाऱ्यांना आणि मंडळीतल्या वडिलांना अधिकार दिलाय. (नीति. ६:२०; १ थेस्सलनी. ५:१२; १ पेत्र २:१३, १४) त्यामुळे आपण जेव्हा त्यांच्या आज्ञेत राहतो, तेव्हा खरंतर आपण यहोवाच्याच आज्ञेत राहत असतो. यहोवाने ज्यांना अधिकार सोपवलाय त्यांच्याकडून मार्गदर्शन स्वीकारणं आणि त्याप्रमाणे वागणं आपल्याला कधीकधी कठीण जाऊ शकतं. पण तरीसुद्धा आपण त्यांच्या अधीन राहून त्यांच्या आज्ञा कशा पाळू शकतो ते आता आपण पाहू या.
आईवडिलांच्या आज्ञा पाळा
४. आज बरीच मुलं आपल्या आईवडिलांचं का ऐकत नाहीत?
४ आज आपली लहान मुलं अशा मुलांमध्ये वावरत असतात, जी त्यांच्या ‘आईवडिलांचं ऐकत नाहीत.’ (२ तीम. ३:१, २) पण ही मुलं असं का वागतात? कारण काहींना असं वाटतं, की आपले आईवडील बोलतात एक आणि करतात एक. आणि म्हणून त्यांचं ऐकण्यात काही अर्थ नाही. तर काही मुलांना वाटतं की आपले आईवडील जुन्या विचारांचे आहेत. म्हणून त्यांचा सल्ला आजच्या काळात लागू होणारा नाही. तर इतरांना असं वाटतं, की आपले आईवडील जास्तच कडक आहेत. पण बायबलमध्ये यहोवाने अशी आज्ञा दिली आहे: “देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण असं करणं योग्य आहे.” (इफिस. ६:१) पण बऱ्याच मुलांना असं करायला कठीण जातं. तुम्हालाही असंच वाटतं का? जर तसं असेल, तर बायबलमधला हा सल्ला पाळायला तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे मदत होईल?
५. आज्ञा पाळण्याच्या बाबतीत येशूचं तरुणांसाठी एक चांगलं उदाहरण आहे असं का म्हणता येईल? (लूक २:४६-५२)
५ आज्ञा पाळण्याच्या बाबतीत येशूचं खूप चांगलं उदाहरण आहे. म्हणून तुम्ही त्याच्याकडून शिकू शकता. (१ पेत्र २:२१-२४) तो एक परिपूर्ण मनुष्य होता, पण त्याचे आईवडील अपरिपूर्ण होते. त्याच्या आईवडिलांकडून बऱ्याचदा चुका झाल्या. इतकंच काय तर त्याला समजून घेण्यात त्यांचा बऱ्याचदा गैरसमजही झाला. पण इतकं असूनसुद्धा येशूने त्याच्या आईवडिलांचा आदर केला. (निर्ग. २०:१२) येशू १२ वर्षांचा असताना काय झालं त्याकडे लक्ष द्या. (लूक २:४६-५२ वाचा.) त्याचे आईवडील यरुशलेममध्ये त्याला विसरून निघून गेले. सणानंतर आपल्या सगळ्या मुलांना सोबत नेण्याची जबाबदारी खरंतर योसेफ आणि मरीयाची होती. पण जेव्हा योसेफ आणि मरीयाला येशू भेटतो तेव्हा मरीया उलट येशूलाच दोष देते. त्या वेळी येशू कदाचित म्हणू शकला असता की ‘तुमचंच चुकलं.’ पण तो असं नाही म्हणाला. उलट, त्याने त्याच्या आईवडिलांना आदराने उत्तर दिलं. त्या वेळी ‘येशू काय म्हणत होता हे त्यांना समजलं नाही.’ तरीपण तो “त्यांच्या आज्ञेत राहिला.”
६-७. आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहायला कोणत्या गोष्टीमुळे तरुणांना मदत होऊ शकते?
६ तरुणांनो, तुमच्या आईवडिलांकडून कदाचित चुका होत असतील. किंवा तुमच्या बाबतीत त्यांचे गैरसमज होत असतील. तर अशा वेळी तुम्हाला त्यांच्या आज्ञेत राहायला कठीण जातं का? कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होऊ शकते? पहिली गोष्ट, यहोवाला या बाबतीत कसं वाटतं याचा विचार करा. बायबल म्हणतं, जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या आज्ञेत राहता, तेव्हा “प्रभूला आनंद होतो.” (कलस्सै. ३:२०) जेव्हा तुमचे आईवडील तुम्हाला समजून घेत नाहीत, किंवा ते तुमच्यासाठी खूप कठीण असे नियम बनवतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं हे यहोवाला माहीत आहे. पण असं असूनसुद्धा जेव्हा तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहता, तेव्हा यहोवा खूश होतो.
७ दुसरी गोष्ट, तुमच्या आईवडिलांना कसं वाटतं याचा विचार करा. जेव्हा तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहता, तेव्हा ते खूश होतात आणि त्यामुळे तुम्ही त्यांचा भरवसा कमवता. (नीति. २३:२२-२५) तसंच, यामुळे त्यांच्यासोबतचं तुमचं नातंही मजबूत होऊ शकतं. बेल्जियममध्ये राहणारा ॲलेक्झांद्रे नावाचा एक भाऊ म्हणतो: “जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे वागू लागलो, तेव्हा मला त्यांच्या आणखी जवळ असल्यासारखं वाटलं. आणि त्यामुळे आम्ही सगळेच खूश होतो.” b तिसरी गोष्ट, आईवडिलांच्या आज्ञेत राहिल्यामुळे तुम्हाला भविष्यात कसा फायदा होईल याचा विचार करा. ब्राझीलमध्ये राहणारा पौलो म्हणतो: “आईवडिलांच्या आज्ञेत राहायला शिकल्यामुळे मला यहोवाच्या आणि ज्यांना अधिकार देण्यात आलाय त्यांच्या आज्ञेत राहायला मदत झाली.” आपण आईवडिलांचं का ऐकलं पाहिजे यासाठी देवाच्या वचनात एक महत्त्वाचं कारण दिलंय. त्यात म्हटलंय: “तुमचं भलं होईल आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्य लाभेल.”—इफिस. ६:२, ३.
८. बरेच तरुण त्यांच्या आईवडिलांचं का ऐकतात?
८ बऱ्याच तरुणांच्या लक्षात आलंय की आईवडिलांच्या आज्ञेत राहिल्यामुळे त्यांना बराच फायदा झालाय. ब्राझीलमधल्या लुईजाचे आईवडील तिला काही काळासाठी मोबाईल फोन देत नव्हते. आणि ही गोष्ट तिला खूप खटकायची. ती म्हणायची, ‘माझ्या वयाच्या सगळ्या मुलांकडे फोन आहे आणि माझ्याकडेच नाही.’ पण काही वेळानंतर तिच्या लक्षात आलं, की तिचे आईवडील तिच्या भल्यासाठीच असं करत होते. ती आता म्हणते: “आईवडिलांच्या आज्ञेत राहणं हे साखळ्यांनी जखडून ठेवल्यासारखं नाही, तर एका सीटबेल्टसारखं आहे, ज्यामुळे मी सुरक्षित राहू शकते.” अमेरिकेत राहणाऱ्या एका तरुण बहिणीला आताही कधीकधी तिच्या आईवडिलांच्या आज्ञेत राहायला कठीण जातं. ती म्हणते: “माझ्या आईवडिलांनी अमुक एक नियम का घालून दिलाय हे जेव्हा मला पूर्णपणे समजत नाही, तेव्हा त्यांचे नियम पाळल्यामुळे माझं आधी कसं संरक्षण झालंय याचा मी विचार करते.” अरमेनियामध्ये राहणारी मोनिका म्हणते: “मी माझ्या आईवडिलांच्या आज्ञा न मोडता त्यांचं ऐकते तेव्हा माझं भलंच होतं.”
“वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या” आज्ञा पाळा
९. सरकारचे नियम पाळण्याच्या बाबतीत बऱ्याच लोकांना कसं वाटतं?
९ बरेच लोक हे मान्य करतात, की त्यांना सरकारची गरज आहे आणि त्यांनी ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ घालून दिलेले काही नियम तरी पाळले पाहिजेत. (रोम. १३:१) पण याच लोकांना जेव्हा काही नियम आवडत नाहीत किंवा त्यांना ते चुकीचे वाटतात, तेव्हा ते हे नियम पाळत नाहीत. आता कर भरण्याच्या बाबतीतच विचार करा. युरोपमधल्या एका देशात बऱ्याच लोकांना असं वाटतं, की सरकार गरजेपेक्षा जास्त कर उकळत असेल तर तो न भरलेलाच बरा. म्हणूनच त्या देशातले नागरिक सरकारला पूर्ण कर देत नाहीत.
१०. आपल्याला काही नियम आवडत नसले तरी आपण ते का पाळले पाहिजेत?
१० बायबल सांगतं की मानवी सरकारं सैतानाच्या नियंत्रणात आहेत. त्यांच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून लवकरच त्यांचा नाश करण्यात येणार आहे. (स्तो. ११०:५, ६; उप. ८:९; लूक ४:५, ६) पण बायबल असंही सांगतं की “जो अधिकाराचा विरोध करतो तो देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा विरोध करतो.” म्हणून सर्वकाही सुव्यवस्थित राहण्यासाठी यहोवाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्पुरत्या काळासाठी जो अधिकार दिलाय, त्याच्या आपण अधीन असलं पाहिजे. तसंच, आपल्याला त्यांना ‘जे द्यायचं आहे ते दिलं पाहिजे.’ म्हणजेच आपण कर भरला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. (रोम. १३:१-७) कदाचित त्यांनी घालून दिलेला एखादा नियम आपल्या सोयीचा नसेल किंवा आपल्याला तो चुकीचा वाटत असेल, किंवा त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक फटका बसत असेल. पण जोपर्यंत ते आपल्याला यहोवाच्या आज्ञेविरोधात काही करायला सांगत नाहीत, तोपर्यंत यहोवाच्या सांगण्याप्रमाणे आपण त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे.—प्रे. कार्यं ५:२९.
११-१२. लूक २:१-६ मध्ये सांगितल्याप्रमाणे योसेफ आणि मरीयाने नियम पाळणं सोपं नसतानाही काय केलं आणि त्याचा काय परिणाम झाला? (चित्रंसुद्धा पाहा.)
११ आपण योसेफ आणि मरीयाच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी तसं केलं. (लूक २:१-६ वाचा.) मरीया जेव्हा नऊ महिन्यांची गरोदर होती तेव्हा आज्ञाधारक राहण्याच्या बाबतीत त्यांची खूप मोठी परीक्षा झाली. त्या वेळी रोमी सम्राट औगुस्तने जनगणना करण्याचं फर्मान काढलं होतं. त्यासाठी योसेफ आणि मरीयाला डोंगराळ प्रदेशातून १५० कि.मी. प्रवास करून बेथलेहेमला जावं लागणार होतं. हा प्रवास मरीयासाठी खूप कठीण असणार होता. कदाचित त्यांना मरीयाच्या पोटातल्या बाळाची काळजी वाटत असेल. त्यांच्या मनात कदाचित विचार आला असेल, की तिला जर रस्त्यातच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या तर? कारण तिच्या पोटात देवाने वचन दिलेला मसीहा होता. मग हे कारण देऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञा मोडू शकत होते का?
१२ योसेफ आणि मरीयापुढे बऱ्याच अडचणी होत्या. पण तरीसुद्धा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज्ञा पाळली. त्यांनी आज्ञा पाळल्यामुळे यहोवाने त्यांना सांभाळलं. मरीया सुरक्षितपणे बेथलेहेमला पोहोचली, तिने एका सुदृढ बाळाला जन्म दिला आणि यामुळे बायबलमधली एक भविष्यवाणी पूर्ण झाली.—मीखा ५:२.
१३. आपण जेव्हा आज्ञा पाळतो तेव्हा भाऊबहिणींना कसा फायदा होतो?
१३ जेव्हा आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहतो तेव्हा आपल्याला आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो. ते कसं? एक गोष्ट म्हणजे, जे लोक नियम मोडतात त्यांना मिळणारी शिक्षा आपल्याला होत नाही. (रोम. १३:४) आपण जेव्हा स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहतो तेव्हा अधिकाऱ्यांना कळतं, की यहोवाचे साक्षीदार चांगले लोक आहेत. उदाहरणार्थ, काही दशकांआधी नायजेरियामध्ये कर भरावा लागू नये म्हणून लोक दंगली करत होते. अशा लोकांना शोधण्यासाठी काही सैनिक सभा चालू असताना आपल्या राज्य सभागृहात घुसले. पण नंतर त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांना तिथून जायला सांगितलं. तो म्हणाला: “यहोवाचे साक्षीदार नेहमीच कर भरतात.” यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट कळते, की आपण जेव्हा नियमांचं पालन करतो तेव्हा आपण यहोवाच्या साक्षीदारांचं चांगलं नाव टिकवून ठेवतो. आणि या चांगल्या नावामुळे पुढे भाऊबहिणींचं संरक्षण होऊ शकतं.—मत्त. ५:१६.
१४. एका बहिणीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना “आज्ञाधारक” राहायला कशामुळे मदत झाली?
१४ असं असलं तरी आपल्याला नेहमीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहावंसं कदाचित वाटणार नाही. अमेरिकेत राहणारी जोॲना नावाची एक बहीण म्हणते, “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहणं मला खूप कठीण जायचं, कारण त्यांच्यामुळे माझ्या कुटुंबातल्या काही लोकांना अन्याय सोसावा लागला.” पण हे विचार बदलण्यासाठी जोॲनाने खूप मेहनत घेतली. सगळ्यात आधी तिने सोशल मिडीयावरचे पोस्ट वाचणं बंद केलं. कारण त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तिच्या मनात नकारात्मक विचार येत होते. (नीति. २०:३) दुसरी गोष्ट म्हणजे, तिने सरकार बदलावं यासाठी नाही, तर यहोवावरचा भरवसा वाढावा अशी प्रार्थना केली. (स्तो. ९:९, १०) तिसरी गोष्ट म्हणजे, निष्पक्षतेबद्दल आपल्या प्रकाशनांत असलेले लेख तिने वाचले. (योहा. १७:१६) जोॲना आता म्हणते, की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदर केल्यामुळे आणि त्यांच्या आज्ञा पाळल्यामुळे तिला आता “मनाची शांती मिळाली आहे.”
यहोवाच्या संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन पाळा
१५. यहोवाच्या संघटनेकडून येणारं मार्गदर्शन स्वीकारायला आपल्याला कठीण का जाऊ शकतं?
१५ यहोवाची इच्छा आहे की मंडळीत ‘जे आपलं नेतृत्व करतात त्यांची आपण आज्ञा पाळली पाहिजे.’ (इब्री १३:१७) आपला प्रभू येशू हा परिपूर्ण आहे. पण त्याने या पृथ्वीवर ज्यांना आपलं नेतृत्व करण्यासाठी निवडलंय ते परिपूर्ण नाहीत. त्यामुळे त्यांच्या आज्ञा पाळायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. खासकरून आपल्या इच्छेविरुद्ध ते आपल्याला काही करायला सांगतात तेव्हा. प्रेषित पेत्रलाही एकदा आज्ञा पाळायला कठीण गेलं. एका स्वर्गदूताने मोशेच्या नियमाविरुद्ध असलेले प्राणी त्याला खायला सांगितले, तेव्हा त्याने एकदा नाही तर तीनदा तसं करायला नकार दिला. (प्रे. कार्यं १०:९-१६) का बरं? कारण त्याने असं आधी कधीच केलं नव्हतं. आणि म्हणून त्याला हे मार्गदर्शन पटत नव्हतं. जर पेत्रला एका परिपूर्ण स्वर्गदूताची आज्ञा पाळायला कठीण गेलं, तर आपल्याला अपरिपूर्ण माणसांचं मार्गदर्शन स्वीकारायला किती जास्त कठीण जाऊ शकतं!
१६. पौलला यरुशलेममधल्या वडिलांकडून मिळणारं मार्गदर्शन अयोग्य वाटत असलं तरी त्याने काय केलं? (प्रेषितांची कार्यं २१:२३, २४, २६)
१६ प्रेषित पौलसुद्धा ‘आज्ञा पाळायला’ तयार होता. त्याला मिळालेलं मार्गदर्शन त्याला अयोग्य वाटत असलं तरी त्याने तसं केलं. यहुदी ख्रिश्चनांनी पौलबद्दल अफवा ऐकल्या होत्या. त्यांनी ऐकलं होतं, की पौल “मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध जायची शिकवण” देतोय आणि यामुळे नियमशास्त्राचा अनादर होतोय. (प्रे. कार्यं २१:२१) म्हणून यरुशलेममधल्या वडीलजनांनी पौलला सांगितलं, की त्याने चार माणसांना मंदिरात सोबत न्यावं आणि मंदिरात स्वतःचं आणि त्याचं विधीपूर्वक शुद्धीकरण करून घ्यावं. असं केल्यामुळे हे दिसून येणार होतं, की पौल नियमशास्त्रानुसार वागतोय. पण पौलला हे माहीत होतं की आता ख्रिस्ती, नियमशास्त्राच्या अधीन नाहीत. आणि त्याने काहीच चुकीचं केलं नव्हतं. पण तरीसुद्धा पौल लगेच वडीलजनांची आज्ञा पाळायला तयार झाला. “दुसऱ्या दिवशी पौल त्या माणसांना घेऊन गेला आणि त्यांच्यासोबत त्याने स्वतःचं विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घेतलं.” (प्रेषितांची कार्यं २१:२३, २४, २६ वाचा.) अशा प्रकारे पौलने आज्ञा पाळली म्हणून भाऊबहिणींमधली एकता टिकून राहिली.—रोम. १४:१९, २१.
१७. स्टेफनीच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
१७ स्टेफनी नावाच्या एका बहिणीला तिच्या देशातल्या जबाबदार भावांनी घेतलेला निर्णय स्वीकारायला खूप कठीण गेलं. ती आणि तिचे पती दुसऱ्या भाषेच्या एका गटात आनंदाने सेवा करत होते. पण नंतर शाखा कार्यालयाने तो गट बंद केला आणि त्या जोडप्याला त्यांची भाषा बोलणाऱ्या एका मंडळीत सेवा करायला पाठवलं. स्टेफनी म्हणते: “हे ऐकून मी खूप निराश झाले. माझ्या भाषेच्या मंडळीत खरंच इतकी गरज आहे का याची मला शंका होती.” असं असूनसुद्धा तिने ते मार्गदर्शन स्वीकारायचा निर्णय घेतला. ती म्हणते, “हळूहळू माझ्या लक्षात आलं, की हा निर्णय खरंच खूप चांगला निर्णय होता. माझ्या मंडळीत असे बरेच जण आहेत, जे एकटेच सत्यात आहेत. अशांचे आम्ही आध्यात्मिक आईवडील बनलो. आता मी एका बहिणीसोबत अभ्यास करते जी काही काळाआधी अक्रियाशील होती. त्यासोबत मला वैयक्तिक अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळतोय. जबाबदार बांधवांची आज्ञा पाळण्याचा मी जो पूर्ण प्रयत्न केला त्यामुळे माझं मन मला खात नाही.”
१८. आज्ञाधारक असल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात?
१८ आपण आज्ञाधारक राहायला शिकू शकतो. येशूसुद्धा “आज्ञाधारकपणा शिकला.” तो चांगल्या परिस्थितीत नाही तर त्याला “सोसाव्या लागलेल्या गोष्टींमधून” आज्ञाधारकपणा शिकला. (इब्री ५:८) येशूप्रमाणेच आपल्यावर जेव्हा संकटं येतात, तेव्हा आपण बऱ्याचदा आज्ञाधारकपणा शिकतो. कोव्हिड महामारी सुरू झाली त्या काळाचा विचार करा. तेव्हा आपल्याला राज्य सभागृहांमध्ये प्रत्यक्ष सभा घेण्याची मनाई होती. तसंच घरोघरचं साक्षकार्यही बंद करायला सांगितलं होतं. त्या वेळी हे मार्गदर्शन पाळायला तुम्हाला कठीण गेलं का? कदाचित कठीण गेलं असेल, पण त्याप्रमाणे वागल्यामुळे तुम्ही सुरक्षित राहिलात, इतर भाऊबहिणींसोबत एकतेत राहिलात आणि यहोवालाही खूश करू शकलात. त्या वेळी मिळालेल्या सूचना पाळल्यामुळे आता आपण मोठ्या संकटासाठी ज्या काही सूचना मिळतील त्या पाळायला तयार आहोत. कारण सूचनांचं पालन केलं तरच आपला जीव वाचू शकतो.—ईयो. ३६:११.
१९. तुम्हाला आज्ञाधारक राहायची इच्छा का आहे?
१९ आपण शिकलो की आज्ञाधारक राहिल्यामुळे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात. पण खरंतर आपण यासाठी यहोवाची आज्ञा पाळतो कारण आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याला खूश करायचं आहे. (१ योहा. ५:३) यहोवाने आपल्यासाठी जे केलंय त्याची आपण कधीच परतफेड करू शकणार नाही. (स्तो. ११६:१२) पण आपण त्याची आणि त्याने ज्यांना आपल्यावर अधिकार दिलाय त्यांची आज्ञा पाळू शकतो. असं केल्यामुळे आपण सुज्ञ असल्याचं दाखवून देऊ. आणि जे सुज्ञपणे वागतात, त्यांना पाहून यहोवाचं मन आनंदित होतं.—नीति. २७:११.
गीत ८९ ऐका पालन करा आणि आशीर्वाद मिळवा!
a अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच आज्ञाधारक राहायला कठीण जातं. ज्यांना आपल्याला मार्गदर्शन देण्याचा अधिकार देण्यात आलाय त्यांचं ऐकायलासुद्धा आपल्याला कधीकधी कठीण जाऊ शकतं. जे आपल्या आईवडिलांच्या, “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या” आणि मंडळीत पुढाकार घेणाऱ्या भावांच्या आज्ञा पाळतात, त्यांना कोणते फायदे होतात याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे.
b आईवडिलांनी बनवलेले नियम पाळणं कठीण जात असेल, तर त्यांच्याशी कसं बोलायचं याबद्दल उपयोगी सल्ले jw.org या वेबसाईटर असलेल्या, “मम्मी-पापा से उनके नियमों के बारे में कैसे बात करूँ?” या लेखात मिळतील.
c चित्राचं वर्णन: बेथलेहेम इथे जाऊन नावनोंदणी करण्याबद्दल कैसराने दिलेल्या आज्ञेचं योसेफ आणि मरीयाने पालन केलं. त्याचप्रमाणे आज खरे ख्रिस्तीसुद्धा वाहतुकीच्या नियमांचं, कर भरण्याविषयीच्या नियमांचं तसंच, आरोग्याबद्दल ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ दिलेल्या सूचनांचं पालन करतात.