वाचकांचे प्रश्न
इस्राएली लोकांना रानात मान्ना आणि लावे पक्षी यांच्याशिवाय आणखी काही खायला होतं का?
४० वर्षं रानात फिरत असताना इस्राएली लोकांसाठी मान्ना हे त्याचं मुख्य अन्न होतं. (निर्ग. १६:३५) पण दोन वेळा यहोवाने त्यांना लावे पक्षीसुद्धा खायला दिले. (निर्ग. १६:१२, १३; गण. ११:३१) पण यासोबतच या सबंध काळात त्यांना काही प्रमाणात का असेना, इतर प्रकारचं अन्नही खायला मिळालं.
उदाहरणार्थ, यहोवाने काही वेळा आपल्या लोकांना ‘मुक्कामासाठी अशा एका जागी’ आणलं, ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी आणि खायला अन्न होतं. (गण. १०:३३) यांपैकी एक ठिकाण म्हणजे, एलीम इथलं मरुवन. “तिथे पाण्याचे १२ झरे आणि खजुराची ७० झाडं होती.” (निर्ग. १५:२७) प्लांट्स ऑफ द बायबल (बायबल काळातली झाडं) या पुस्तकात तिथल्या झाडांबद्दल असं म्हटलंय, की “ही खजुराची झाडं वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळतात, . . . आणि तिथल्या लोकांचं हे मुख्य अन्न आहे. कारण तिथल्या लाखो लोकांना यामुळे अन्नपदार्थ, खाद्य तेल आणि आसरा मिळतो.”
यासोबतच इस्राएली लोक कदाचित फेरन इथे असलेल्या मोठ्या मरुवनातसुद्धा थांबले असतील. हे मरुवन फेरन खोऱ्याचाच एक भाग आहे. डिस्कवरिंग द वर्ल्ड ऑफ बायबल (बायबल काळातल्या गोष्टींचा शोध) नावाचं एक पुस्तक म्हणतं: “हे खोरं १३० कि.मी. लांब असून सीनायमध्ये असलेल्या खोऱ्यांपैकी सगळ्यात लांब, सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात प्रसिद्ध खोरं आहे.” हे पुस्तक पुढे म्हणतं, की “ज्या ठिकाणी हे खोरं समुद्राला मिळालंय तिथून ४५ कि.मी. पुढे गेल्यानंतर आपण फेरन मरुवनात पोहोचतो. हे मरुवन समुद्र सपाटीपासून २००० फूट उंचीवर आहे आणि ४.८ कि.मी. लांब आहे. या मरुवनात भरपूर खजुराची झाडं आहेत आणि ते इतकं सुंदर आहे, की त्याची तुलना कधीकधी एदेन बागेशी केली जाते. हजारो वर्षांपासून लोक या ठिकाणी खजुराच्या झाडांसाठी येतात.”
इजिप्तमधून बाहेर पडताना इस्राएली लोकांनी मळलेलं पीठ आणि त्यासाठी लागणारी भांडी घेतली. तसंच त्यांनी काही धान्य आणि तेलसुद्धा घेतलं असेल. पण त्यांना हे जास्त काळासाठी पुरलं नसेल. यासोबतच त्यांनी “मेंढरं, गुरंढोरं अशी बरीच जनावरंही” सोबत घेतली होती. (निर्ग. १२:३४-३९) पण रानातल्या रूक्ष वातावरणामुळे त्यांच्याजवळ असलेले बरेच प्राणी मरून गेले असतील. तसंच काही प्राणी त्यांनी खाण्यासाठी वापरले असतील, तर काही प्राण्यांचा वापर त्यांनी अर्पणासाठी, अगदी खोट्या देवांना अर्पण म्हणूनसुद्धा केला असेल. a (प्रे. कार्यं ७:३९-४३) तरी काही प्रमाणात त्यांनी आपल्याकडे असलेल्या प्राण्यांचे कळप नक्कीच वाढवले असतील. यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे यहोवाने त्यांना जे म्हटलं त्यावरून आपण असं म्हणू शकतो. यहोवाने म्हटलं: “तुमची मुलं ४० वर्षं ओसाड रानात मेंढपाळ होतील.” (गण. १४:३३) त्यामुळे या प्राण्यांचा वापर त्यांनी दुधासाठी आणि मांसासाठी केला असेल याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ४० वर्षांसाठी तीस लाख लोकांना पुरेल इतकं हे अन्न नक्कीच नव्हतं. b
पण या प्राण्यांना अन्न आणि पाणी कुठून मिळालं असेल? c त्या काळात पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्या रानामध्ये भरपूर प्रमाणात हिरवळ असावी. इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स (शास्त्रवचनांवर सूक्ष्म दृष्टी) खंड १ मध्ये म्हटलंय, ३,५०० वर्षांआधी “अरबमध्ये पावसाचं प्रमाण आजच्या तुलनेत जास्त होतं. त्या ठिकाणी असणाऱ्या दऱ्या आणि नदीची खोरी जरी आता ओसाड असली, तरी त्या काळात तिथे नद्या वाहत असाव्यात. यावरून कळतं, की त्या काळात पाण्याचे झरे वाहतील इतक्या प्रमाणात पाऊस होत असावा.” तरी तो संपूर्ण भाग तसा ओसाड आणि भीतीदायकच होता. (अनु. ८:१४-१६) यहोवाने जर चमत्कार करून इस्राएली लोकांना पाणी पुरवलं नसतं तर कदाचित ते आणि त्यांचे पाळीव प्राणी लवकरच मरून गेले असते.—निर्ग. १५:२२-२५; १७:१-६; गण. २०:२, ११.
यहोवाने इस्राएली लोकांना मान्ना का दिला होता याचं कारण मोशेने त्यांना सांगितलं. त्याने म्हटलं, “माणूस फक्त भाकरीने नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनामुळे जगतो, याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी त्याने असं केलं.”—अनु. ८:३.
a रानात इस्राएली लोकांनी यहोवाला अर्पण दिल्याच्या दोन घटना आपल्याला वाचायला मिळतात. यांपैकी पहिली, याजकपदाची सुरुवात करताना आणि दुसरी वल्हांडणाच्या वेळी. या दोन्ही घटना इ.स.पू. १५१२ मध्ये घडल्या, म्हणजे इजिप्तमधून इस्राएली लोक बाहेर पडले त्याच्या दुसऱ्या वर्षातच.—लेवी. ८:१४–९:२४; गण. ९:१-५.
b इस्राएली लोकांची रानातली ४० वर्षं संपायला आली तेव्हा त्यांनी युद्धांच्या लुटीमधून स्वतःसाठी हजारो प्राणी घेतले. (गण. ३१:३२-३४) तरीसुदधा वचन दिलेल्या देशात पोहोचेपर्यंत ते मान्ना खात राहिले.—यहो. ५:१०-१२.
c इस्राएली लोकांकडे असलेल्या प्राण्यांनीसुद्धा मान्ना खाल्ला असावा असं म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला जितका मान्ना खाता येईल तितकाच ते गोळा करू शकत होते.—निर्ग. १६:१५, १६.