नवीन मंडळीशी कसं जुळवून घ्यावं?
तुम्हाला कधी नवीन मंडळीत जावं लागलंय का? जर असेल तर जीन-चार्ल्स या भावाने जे म्हटलं त्याच्याशी तुम्ही सहमत असाल. त्यांनी म्हटलं: “कुटुंबातल्या प्रत्येकाची आध्यात्मिकता टिकवून ठेवणं आणि नवीन मंडळीशी जुळवून घेणं एक आव्हानच आहे.” नोकरी शोधणं, राहायची सोय बघणं आणि मुलं असतील तर नवीन शाळा शोधणं यांसोबतच नवीन ठिकाणी राहायला जाणाऱ्या कुटुंबाला तिथल्या वातावरणाशी, वेगळ्या संस्कृतीशी आणि प्रचाराच्या नवीन क्षेत्राशी जुळवून घेणंसुद्धा एक आव्हानच आहे.
निकोलस आणि सेलिनला एका वेगळ्या समस्येचा सामना करावा लागला. फ्रान्स शाखेतून त्यांना एका नवीन मंडळीत जाण्याची नेमणूक मिळाली. त्यांनी म्हटलं: “सुरुवातीला आम्ही खूप खूश होतो, पण नंतर आम्हाला आधीच्या मंडळीतल्या भाऊबहिणींची आठवण यायला लागली. नवीन मंडळीतल्या भाऊबहिणींशी आमची अजून मैत्री झाली नव्हती.” a अशा बदललेल्या परिस्थितीत, तुम्ही नवीन मंडळीत आनंदाने यहोवाची सेवा कशी करू शकता? यासाठी बाकीचे भाऊबहीण कशी मदत करू शकतात? आणि नवीन मंडळीत तुम्हाला कोणते आध्यात्मिक आशीर्वाद मिळू शकतात, तसंच तुम्हीही तिथल्या भाऊबहिणींना कसं प्रोत्साहन देऊ शकता?
आव्हानांना तोंड देण्यासाठी चार बायबल तत्त्वं
१. यहोवावर विसंबून राहा. (स्तो. ३७:५) जपानमध्ये राहणारी कझूमी नावाची एक बहीण २० वर्षांपासून एका मंडळीत होती. पण तिच्या पतीची बदली झाल्यामुळे तिला ती मंडळी सोडावी लागली. मग तिने ‘आपला मार्ग यहोवाच्या हाती कसा सोपवला?’ ती म्हणते: “मी यहोवाला जे-जे वाटतंय ते सगळं सांगितलं. माझ्या चिंतेबद्दल, एकटेपणाबद्दल, भीतीबद्दल सांगितलं. मी जेव्हा-जेव्हा यहोवासमोर माझं मन मोकळं केलं, तेव्हा-तेव्हा तो मला लागणारी ताकद पुरवायचा.”
तुम्ही यहोवावरचा भरवसा कसा वाढवू शकता? जसं एक रोपटं चांगलं वाढावं म्हणून आपण त्याला पाणी टाकतो, त्याला खत घालतो, तसंच आपला विश्वास वाढवण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. आधी सांगितलेल्या निकोलसला अब्राहाम, येशू आणि पौलच्या उदाहरणांवर मनन केल्यामुळे यहोवावरचा भरवसा वाढवता आला. त्यांनी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच त्याग केले होते. बायबलचा वैयक्तिक अभ्यास नियमितपणे केल्यामुळे तुम्हाला जीवनात होणाऱ्या कोणत्याही बदलांशी जुळवून घेता येईल. पण त्यासोबतच यामुळे नवीन
मंडळीच्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीही तुम्हाला शिकून घेता येतील.२. तुलना करू नका. (उप. ७:१०) जूएल नावाचा भाऊ बेनिनवरून अमेरिकेला गेला. तिथे त्याला एका वेगळ्या संस्कृतीशी जुळवून घ्यावं लागलं. तो म्हणतो: “मला वाटायचं की आता मला प्रत्येकाला माझ्याबद्दल सांगत बसावं लागेल.” तो आधी जिथे होता तिथल्यापेक्षा इथे काही गोष्टी वेगळ्या असल्यामुळे तो नवीन मंडळीतल्या भाऊबहिणींपासून दूर राहू लागला. भाऊबहिणींसोबत चांगली ओळख करून घेतल्यावर त्याचा दृष्टिकोन बदलला. तो म्हणतो: “मला वाटतं की आपण पृथ्वीवर कुठेही असलो तरी माणसं सारखीच असतात. त्यांच्यात फक्त वागण्याबोलण्याचा फरक असतो. त्यामुळे लोक जसे आहेत तसं त्यांना स्वीकारणं महत्त्वाचं असतं.” म्हणून तुमच्या आधीच्या मंडळीसोबत तुलना करू नका. ॲनी-लिज नावाची एक पायनियर बहीण म्हणते: “मी मागे काय सोडलंय हे शोधायला मी नवीन ठिकाणी आले नाही, तर नवीन गोष्टींचा शोध करायला मी इथे आले.”
वडिलांनीसुद्धा आपल्या आधीच्या मंडळीसोबत तुलना करू नये. एखादी गोष्ट जर वेगळ्या पद्धतीने केली जात असेल तर ती चुकीची आहे असं नाही. कुठलीही सूचना देण्याआधी स्थानिक परिस्थिती जाणून घेणं चांगलं राहील. (उप. ३:१, ७ख) स्वतःच्या कल्पना मंडळीवर लादण्यापेक्षा आपल्या उदाहरणातून मंडळीचं नेतृत्व करणं हे कधीही चांगलं.—२ करिंथ. १:२४.
३. नवीन मंडळीत सहभागी व्हा. (फिलिप्पै. १:२७) दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं, तर खूप वेळ आणि शक्ती लागते. पण सुरुवातीपासूनच आणि शक्य असेल तर प्रत्यक्ष रित्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहणं आवश्यक आहे. कारण जर तुमच्या नवीन मंडळीत तुम्ही दिसतच नसाल किंवा क्वचितच दिसत असाल तर भाऊबहीण तुम्हाला कशी मदत करू शकतील? लुसिंडा नावाची एक बहीण आपल्या दोन मुलींसोबत दक्षिण आफ्रिकेतल्या एका मोठ्या शहरात राहायला गेली. ती म्हणते: “मी नवीन मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत माझी ओळख वाढवली पाहिजे, सेवेत इतरांसोबत काम केलं पाहिजे आणि सभांमध्ये सहभाग घेतला पाहिजे असा सल्ला मला देण्यात आला होता. या सल्ल्याचं पालन करण्यासोबतच आम्ही क्षेत्रसेवेच्या सभेसाठी आमचं घरसुद्धा दिलं.”
‘आनंदाच्या संदेशावरचा विश्वास’ वाढवण्यासाठी नवीन मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत उपासनेशी संबंधित कामांत ‘खांद्याला खांदा लावून झटणं’ हा एक उत्तम मार्ग आहे. आधी सांगितलेल्या ॲनी-लिजला वडिलांनी सगळ्यांसोबत प्रचार करायचं प्रोत्साहन दिलं होतं. मग याचा काय परिणाम झाला? ती म्हणते: “स्वतःला मंडळीचा भाग बनवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, हे माझ्या लगेच लक्षात आलं.” तसंच, राज्य सभागृहाची साफसफाई आणि देखभाल करण्यासारख्या कामांत जेव्हा तुम्ही स्वतःहून पुढे येता तेव्हा तुम्ही हे दाखवत असता की आता तुम्ही या नवीन मंडळीला तुमची मंडळी मानता. तुम्ही मंडळीत जितकं जास्त सहभागी व्हाल तितकं लवकर मंडळीचे भाऊबहीण तुम्हाला स्वीकारतील आणि तुम्हालाही नवीन आध्यात्मिक कुटुंबाचा भाग बनल्यासारखं वाटेल.
४. नवीन मित्र जोडा. (२ करिंथ. ६:११-१३) तुम्हाला इतरांची काळजी आहे हे जर त्यांना जाणवलं, तर त्यांचे मित्र बनायला तुम्हाला सोपं जाईल. म्हणून सभा सुरू होण्याआधी आणि सभा संपल्यानंतर थोडं थांबा. म्हणजे तुम्हाला इतरांसोबत बोलायला आणि त्यांना जाणून घ्यायला पुरेसा वेळ मिळेल. तसंच, त्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. त्यांचं नाव लक्षात ठेवल्यामुळे आणि त्यांच्यासोबत प्रेमाने बोलल्यामुळे त्यांना तुमच्यासोबत वेळ घालवावासा वाटेल आणि तुमच्यासोबत मैत्री करावीशी वाटेल.
लोकांनी आपल्याला त्यांच्यामध्ये सामील करून घ्यावं म्हणून तुम्ही आहात त्यापेक्षा वेगळं असल्याचं भासवू नका. तर भाऊबहिणींना तुम्ही जसं आहात तसंच जाणून घेऊ द्या. लुसिंडाने केलं तसं करा. ती म्हणते: “भाऊबहिणींना घरी बोलवायला आम्ही स्वतः पुढाकार घेतल्यामुळे आता आमची त्यांच्यासोबत पक्की मैत्री झाली आहे.”
एकमेकांचं स्वागत करा
अनोळखी लोकांनी भरलेल्या राज्य सभागृहात जायला काही जणांना भीती वाटू शकते. मग सभागृहात नवीन आलेल्या लोकांना तसं वाटू नये म्हणून तुम्ही काय करू शकता? ‘ख्रिस्ताने जसं तुमचं स्वागत केलं,’ तसं तुम्हीही ‘एकमेकांचं स्वागत करा’ असं प्रेषित पौलने प्रोत्साहन दिलं. (रोम. १५:७, तळटीप) ख्रिस्ताचं अनुकरण करून मंडळीतले वडील नवीन लोकांचं स्वागत करू शकतात. (“ नवीन मंडळीत गेल्यावर . . . ” ही चौकट पाहा.) पण मंडळीतले सगळेच, अगदी लहान मुलंसुद्धा नवीन लोकांशी मैत्री करू शकतात.
इतरांचं स्वागत करण्यासाठी आपण त्यांचा पाहुणचार करू शकतो. त्यासोबतच, आपण त्यांना व्यावहारिक मदतसुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ, एका बहिणीने मंडळीत आलेल्या एका बहिणीला शहरातली आसपासची ठिकाणं आणि बस-ट्रेनची सोय दाखवायला आपला महत्त्वाचा वेळ तिच्यासाठी खर्च केला. त्या बहिणीने अशा प्रकारे मदत केल्यामुळे नवीन बहिणीला खूप बरं वाटलं. आणि नवीन ठिकाणाशी जुळवून घ्यायला तिला सोपं गेलं.
प्रगती करायची संधी
टोळाच्या शरीराची वाढ पूर्ण होताना त्याचे पंख उडण्यासाठी मजबूत होत असतात. पण त्यासाठी त्याला बऱ्याचदा त्याची कात टाकावी लागते. त्याचप्रमाणे, नवीन मंडळीत जाताना, यहोवाच्या सेवेत आपले पंख पसरवण्यापासून रोखणाऱ्या कोणत्याही भीतीला एका अर्थाने आपण टाकून दिलं पाहिजे. निकोलस आणि सेलिन म्हणतात: “एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत गेल्यामुळे तुम्हाला बरंच काही शिकता येतं. नवीन लोकांशी, वेगळ्या
परिस्थितीशी जुळवून घेतल्यामुळे आपल्याला नवीन गुण स्वतःमध्ये वाढवता येतात.” आधी उल्लेख केलेल्या जीन-चार्ल्स यांच्या कुटुंबाला कसा फायदा झाला, याबद्दल ते म्हणतात: “या बदलामुळे आमची मुलं नवीन मंडळीत बहरू लागली आहेत. काही महिन्यातच माझ्या मुलीने आठवड्यादरम्यानच्या सभेत भाग करायला सुरवात केली. आणि माझा मुलगाही बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनला.”जर तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला नवीन ठिकाणी, उदाहरणार्थ गरज असलेल्या ठिकाणी जाता येत नसेल तर काय? तर मग तुम्ही जिथे आहात तिथे नव्याने सुरुवात करायला आणि वर दिलेले काही सल्ले लागू करायला काय हरकत आहे? यहोवावर विसंबून राहून, इतरांसोबत सेवेत जायची योजना करून आणि नवीन लोकांशी मैत्री करून किंवा मंडळीत आधीपासूनच असलेल्या भाऊबहिणींशी आपली मैत्री मजबूत करून तुम्ही स्वतःला मंडळीच्या कामात पूर्णपणे व्यस्त ठेवू शकता. तसंच तुम्ही नवीन किंवा गरज असलेल्या लोकांना व्यावहारिकपणे मदत पुरवू शकता का? प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे. म्हणून असं केल्यामुळे तुम्ही एका अर्थाने आध्यात्मिक प्रगतीच करत असता. (योहा. १३:३५) तुम्ही ही खातरी बाळगू शकता, की “अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.”—इब्री १३:१६.
कितीही कठीण वाटत असलं तरी अनेक भाऊबहिणींना नवीन मंडळीत जाऊन सेवा करायला यश मिळालंय. आणि तुम्हालाही यश मिळू शकतं! ॲनी-लिज म्हणते: “मंडळी बदल्यामुळे मला माझं मन मोठं करायला मदत झाली.” कझूमीलाही आता खातरी पटली आहे की नवीन ठिकाणी गेल्यामुळे “पूर्वी कधी नाही अशा प्रकारे यहोवाचा पाठिंबा अनुभवता येतो.” आणि जूएलबद्दल काय? तो म्हणतो: “इतरांशी मैत्री केल्यामुळे आता मला एकटं वाटत नाही. आता मला या नवीन मंडळीचा भाग असल्यासारखंच वाटतं. मंडळी सोडावी लागली तर मला खूप कठीण जाईल.”
a नवीन ठिकाणी गेल्यावर घराची ओढ सतावत असेल तर १५ मे १९९४ च्या टेहळणी बुरूज अंकातला “देवाच्या सेवेत असताना घरच्या ओढीचा सामना करणे” हा लेख पाहा.