अभ्यास लेख ४६
यहोवाने नंदनवनाच्या अभिवचनाची खातरी कशी दिली आहे?
“पृथ्वीवरचा जो कोणी आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करेल, त्याला खऱ्या देवाकडून आशीर्वाद मिळेल.”—यश. ६५:१६.
गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा
सारांश a
१. यशया संदेष्ट्याने इस्राएली लोकांना कोणता संदेश सांगितला?
यशया संदेष्ट्याने यहोवाचं वर्णन करताना म्हटलं की तो “खरा देव” आहे. या ठिकाणी “खरा” या शब्दाचा शब्दशः अर्थ “आमेन” असा होतो. (यश. ६५:१६, तळटीप.) आणि “आमेन” म्हणजे “असंच होवो.” त्यामुळे “आमेन” या शब्दाचा वापर जेव्हा यहोवा आणि येशूच्या संदर्भात करण्यात येतो, तेव्हा एखादी गोष्ट खरी असल्याची खातरी मिळते. त्यामुळे यशया संदेष्ट्याने इस्राएली लोकांना जो संदेश दिला तो अगदी स्पष्ट होता: यहोवा भविष्याबद्दल जे काही सांगेल ते भरवशालायक आहे. आणि आतापर्यंत यहोवाने जी काही अभिवचनं दिली ती सगळी पूर्ण करून त्याने हे सिद्ध केलंय.
२. भविष्याबद्दल यहोवाने दिलेल्या अभिवचनांवर आपण भरवसा का ठेवू शकतो आणि या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
२ यहोवाने भविष्याबद्दल जी अभिवचनं दिली आहेत, त्यावर आपणसुद्धा असाच भरवसा ठेवू शकतो का? यशयाच्या काळानंतर जवळजवळ ८०० वर्षांनी, प्रेषित पौलने देवाची अभिवचनं नेहमीच भरवशालायक का असतात याचं स्पष्टीकरण दिलं. त्याने म्हटलं: “तो कधीही खोटं बोलू शकत नाही.” (इब्री ६:१८) ज्याप्रमाणे एकाच झऱ्यातून गोड आणि खारं पाणी येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे सत्याचा उगम असलेला यहोवा देव कधीच खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे आपण या गोष्टीवर नेहमी भरवसा ठेवू शकतो, की तो जे काही सांगतो ते नेहमी पूर्ण होईल. याचा अर्थ भविष्याबद्दलची अभिवचनंसुद्धा पूर्ण होतील. या लेखात आपण पुढे दिलेल्या प्रश्नांवर विचार करणार आहोत: यहोवाने भविष्याबद्दल आपल्याला कोणती अभिवचनं दिली आहेत? आणि ही अभिवचनं पूर्ण होतील याची यहोवाने आपल्याला कशी खातरी दिली आहे?
यहोवाने कोणती अभिवचनं दिली आहेत?
३. (क) कोणतं अभिवचन देवाच्या सेवकांसाठी खूप अनमोल आहे? (प्रकटीकरण २१:३, ४) (ख) प्रचारकार्यात आपण या अभिवचनाबद्दल सांगतो तेव्हा लोक काय म्हणतात?
३ ज्या अभिवचनांवर आपण आता विचार करणार आहोत, ती जगभरातल्या यहोवाच्या सगळ्याच सेवकांसाठी खूप अनमोल आहेत. (प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.) यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे एक असा काळ येईल, जेव्हा “कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.” आपल्यापैकी बरेच जण प्रचारकार्यात नंदनवनाबद्दल सांगताना या सांत्वनदायक वचनाचा वापर करतात. आपण जेव्हा लोकांना या अभिवचनाबद्दल सांगतो तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते. ते कदाचित म्हणतील: “हे ऐकायला बरं वाटतंय, पण असं खरोखर होऊ शकत नाही.”
४. (क) यहोवाने नंदनवनाचं अभिवचन दिलं तेव्हा त्याला आपल्या दिवसांबद्दल काय माहीत होतं? (ख) अभिवचन देण्यासोबतच यहोवाने आणखी काय केलं?
४ यहोवाने प्रेषित योहानला नंदनवनातलं जीवन कसं असेल याबद्दलचं अभिवचन लिहिण्याची प्रेरणा दिली. तेव्हा यहोवाला हे माहीत होतं, की पुढे जाऊन राज्याचा संदेश सांगताना आपण त्या अभिवचनाबद्दल लोकांना सांगणार आहोत. त्याला हेसुद्धा माहीत होतं, की बरेच लोक या ‘नवीन गोष्टीवर’ विश्वास ठेवणार नाहीत. (यश. ४२:९; ६०:२; २ करिंथ. ४:३, ४) म्हणून आपण प्रकटीकरण २१:३, ४ मधल्या गोष्टी खरंच पूर्ण होतील, याबद्दल इतरांना आणि स्वतःला खातरी व्हावी म्हणून काय करू शकतो? यहोवाने आपल्याला हे सांत्वनदायक अभिवचनच दिलं नाही, तर या अभिवचनावर विश्वास ठेवण्यासाठी खातरीलायक कारणंसुद्धा दिली आहेत. मग ती कारणं कोणती आहेत?
यहोवा त्याचं अभिवचन पूर्ण होण्याची खातरी देतो
५. कोणत्या वचनात आपल्याला देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवायची कारणं मिळतात आणि त्यात काय सांगितलं आहे?
५ यहोवाने नंदनवनाबद्दल आपल्याला जे अभिवचन दिलंय, त्यावर भरवसा ठेवण्याची कारणं आपल्याला पुढच्या वचनात मिळतात. तिथे आपण असं वाचतो: “राजासनावर बसलेला देव म्हणाला: ‘पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.’ पुढे तो असंही म्हणाला: ‘लिही, कारण ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत.’ मग तो मला म्हणाला: ‘ती वचनं पूर्ण झाली आहेत! मी अल्फा आणि ओमेगा, म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे.’”—प्रकटी. २१:५, ६क.
६. प्रकटीकरण २१:५, ६ मध्ये जे म्हटलंय त्यामुळे देवाच्या अभिवचनावरचा आपला विश्वास का मजबूत होतो?
६ देवाच्या अभिवचनावरचा आपला भरवसा या वचनामुळे कसा भक्कम होतो? प्रकटीकरणाचा भव्य कळस या पुस्तकात या वचनाबद्दल असं म्हटलंय: “विश्वासू मानवजातीसाठी यहोवा जणू काय हस्ताक्षर करत किंवा भविष्यकालीन आशीर्वादांची हमी देत आहे.” b प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये देवाने आपलं अभिवचन दिलं आहे. पण ५ व्या आणि ६ व्या वचनांमध्ये तो जणू आपलं हस्ताक्षर करून हे अभिवचन नक्की पूर्ण होईल याची गॅरंटी देत आहे. ही गॅरंटी देताना यहोवा काय म्हणतो याकडे आता आपण बारकाईने लक्ष देऊ या.
७. पाचव्या वचनाच्या सुरुवातीला कोण बोलत आहे आणि हे इतकं खास का आहे?
७ पाचव्या वचनाच्या सुरुवातीला, “राजासनावर बसलेला देव म्हणाला: . . . ” असं लिहिलंय. (प्रकटी. २१:५क) यावरून कळतं की इथे यहोवा बोलतोय. तसंच, प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या दृष्टान्तांमध्ये यहोवा फक्त तीन वेळा बोलला आहे. आणि हे त्यांपैकी एक वचन आहे. त्यामुळे ही गॅरंटी कोणी शक्तिशाली स्वर्गदूताने नाही किंवा पुनरुत्थान झालेल्या येशूने नाही, तर स्वतः यहोवाने दिली आहे, हे आपल्याला समजतं. आणि ही गोष्टच, यहोवा नंतर पुढे दिलेल्या वचनात जे म्हणतो, त्यावर भरवसा ठेवायला आपल्याला आधार देते. का बरं? कारण तिथे म्हटलंय की यहोवा “कधीही खोटं बोलू शकत नाही.” (तीत १:२) त्यामुळे प्रकटीकरण २१:५, ६ मध्ये आपण जे काही वाचतो त्यावर आपण नक्कीच भरवसा ठेवू शकतो.
“पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे”
८. आपलं अभिवचन नक्की पूर्ण होईल हे सांगण्यासाठी यहोवा काय म्हणतो? (यशया ४६:१०)
८ आता आपण “पाहा!” या शब्दावर थोडंसं लक्ष देऊ या. (प्रकटी. २१:५) “पाहा!” या शब्दासाठी जो मूळ ग्रीक शब्द आहे, त्याचा प्रकटीकरण या पुस्तकात वारंवार वापर करण्यात आला आहे. एका संदर्भग्रंथात याबद्दल असं म्हटलंय, की “पुढे दिलेल्या गोष्टींकडे वाचकाचं लक्ष वेधण्यासाठी” या शब्दाचा वापर सहसा करण्यात आला आहे. मग या शब्दानंतर काय सांगण्यात आलं? पुढे देव असं म्हणतो: “मी सर्वकाही नवीन करत आहे.” इथे यहोवा भविष्यात होणाऱ्या बदलांबद्दल बोलत आहे. पण त्याच्यासाठी हे अभिवचन इतकं खरं आहे, की ते जणू काही घडतच आहे.—यशया ४६:१० वाचा.
९. (क) “मी सर्वकाही नवीन करत आहे” या शब्दांवरून यहोवा कोणत्या दोन गोष्टी करणार असल्याचं कळतं? (ख) सध्याच्या “आकाश” आणि ‘पृथ्वीचं’ काय होईल?
९ आता प्रकटीकरण २१:५ वचनातल्या पुढच्या शब्दांवर आपण लक्ष देऊ या. या वचनात असं म्हटलंय, की “मी सर्वकाही नवीन करत आहे.” बायबलमध्ये या अध्यायात, या शब्दांवरून हे कळतं की यहोवा दोन गोष्टी करणार आहे. एक, जुन्या व्यवस्थेचा नाश करणार आहे आणि त्याऐवजी नवीन व्यवस्था आणणार आहे. प्रकटीकरण २१:१ मध्ये म्हटलंय: “आधीचं आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती.” इथे “आधीचं आकाश” हे सैतानाच्या आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांच्या प्रभावाखाली असलेल्या राजकीय सरकारांना सूचित करतं. (मत्त. ४:८, ९; १ योहा. ५:१९) तसंच बायबलमध्ये “पृथ्वी” हा शब्द कधीकधी पृथ्वीवर राहत असलेल्या मानवांना सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे. (उत्प. ११:१; स्तो. ९६:१) त्यामुळे “आधीची पृथ्वी” ही आज पृथ्वीवर असलेल्या दुष्ट मानवांना सूचित करते. यहोवा आत्ताच्या या “आकाश” आणि ‘पृथ्वीमध्ये’ सुधारणा करणार नाही, तर त्यांचा पूर्णपणे नाश करून टाकेल. आणि त्यांच्या जागी “नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी” आणेल. हे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी, नवीन सरकार आणि नीतिमान लोकांच्या नवीन मानवी समाजाला सूचित करतं.
१०. यहोवा कोणत्या गोष्टींना नवीन करणार आहे?
१० प्रकटीकरण २१:५ मध्ये यहोवा ज्या गोष्टी नवीन करणार आहे, त्यांबद्दल तो स्वतः काय म्हणतो ते वाचायला मिळतं. या वचनात यहोवा, “मी नवीन गोष्टी करत आहे” असं म्हणत नाही, तर “मी सर्वकाही नवीन करत आहे” असं म्हणतो. यावरून कळतं की यहोवा पृथ्वी आणि मानवांना परिपूर्ण स्थितीत आणेल म्हणजे एका अर्थाने त्यांना नवीन करेल. यशयाने भविष्यवाणी केल्यानुसार पूर्ण पृथ्वी मग एका बागेसारखी म्हणजे एदेन बागेसारखी बनेल. तसंच, अगदी व्यक्तिगत पातळीवरसुद्धा आपण हे नवीनीकरण अनुभवू. लंगडे, आंधळे, बहिरे बरे होतील. इतकंच नाही, तर मेलेले लोकसुद्धा पुन्हा जिवंत होतील.—यश. २५:८; ३५:१-७.
‘ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत. . . . ती पूर्ण झाली आहेत!’
११. यहोवाने योहानला कोणती आज्ञा दिली आणि का?
११ आपण यहोवावर भरवसा ठेवू शकतो याचं आणखी एक कारण तो देतो. त्याने योहानला म्हटलं: “लिही, कारण ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत.” (प्रकटी. २१:५) यहोवाने फक्त ‘लिहिण्याची’ आज्ञाच दिली नाही तर त्याने त्यासाठी कारणसुद्धा दिलं. त्याने म्हटलं: “कारण ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत.” म्हणजेच देव जे काही म्हणतो ते भरवशालायक आहे. यहोवाने योहानला ‘लिहिण्याची’ जी आज्ञा दिली, ती त्याने पाळली हे किती बरं झालं! कारण त्यामुळेच आपण देवाने दिलेल्या नंदनवनाच्या अभिवचनांबद्दल वाचू शकतो आणि भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांवर मनन करू शकतो.
१२. “ती वचनं पूर्ण झाली आहेत!” असं यहोवा का म्हणतो?
१२ देव पुढे काय म्हणतो? तो म्हणतो: “ती वचनं पूर्ण झाली आहेत!” (प्रकटी. २१:६) पण नंदनवनाची अभिवचनं पूर्ण झालेली नसतानाही तो असं का म्हणतो? कारण त्याचा उद्देश पूर्ण करण्यापासून कोणतीही गोष्ट त्याला रोखू शकत नाही. यहोवाने जी अभिवचनं दिली आहेत त्यांच्यावर भरवसा ठेवण्याचं आणखी एक कारण तो आपल्याला देतो. ते कारण कोणतं आहे ते आता पाहू.
“अल्फा आणि ओमेगा मी आहे”
१३. “अल्फा आणि ओमेगा मी आहे” असं यहोवा का म्हणतो?
१३ सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, दृष्टान्तात यहोवा स्वतः तीन वेळा बोलतो. (प्रकटी. १:८; २१:५, ६; २२:१३) आणि प्रत्येक वेळी यहोवा एकसारखंच वाक्य बोलतो. तो म्हणतो: “अल्फा आणि ओमेगा मी आहे.” ग्रीक वर्णमालेतलं पहिलं अक्षर म्हणजे अल्फा आणि शेवटचं अक्षर म्हणजे ओमेगा. “अल्फा आणि ओमेगा” या शब्दांचा वापर करून यहोवाला हे सांगायचं होतं, की ज्या गोष्टींची तो सुरुवात करतो त्यांचा तो यशस्वीपणे शेवटही करतो.
१४. (क) यहोवाने एका अर्थाने “अल्फा” कधी म्हटलं आणि तो “ओमेगा” कधी म्हणेल याचं एक उदाहरण द्या. (ख) उत्पत्ती २:१-३ मध्ये आपल्याला कोणती गॅरंटी मिळते?
१४ यहोवाने आदाम आणि हव्वाला निर्माण केल्यानंतर मानवजातीसाठी असलेला त्याचा उद्देश काय आहे हे सांगितलं. बायबल त्याबद्दल असं म्हणतं: “देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला: ‘फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका.’” (उत्प. १:२८) यहोवाने पहिल्यांदा जेव्हा त्याचा हा उद्देश बोलून दाखवला, तेव्हा एका अर्थाने तो “अल्फा” असं म्हणाला. या उद्देशाप्रमाणे आदाम आणि हव्वाची परिपूर्ण आणि आज्ञाधारक मुलं या पृथ्वीला भरून टाकणार होती आणि तिला नंदनवन बनवणार होती. भविष्यात जेव्हा यहोवाचा हा उद्देश पूर्ण होईल, तेव्हा एका अर्थाने तो “ओमेगा” असं म्हणेल. यहोवाने “आकाश व पृथ्वी आणि त्यांत असलेलं सर्वकाही” बनवून पूर्ण केल्यावर त्याचा उद्देश पूर्ण होईल याची गॅरंटीही दिली. त्याच्याबद्दल आपल्याला उत्पत्ती २:१-३ मध्ये वाचायला मिळतं. (वाचा.) इथे सांगितल्याप्रमाणे यहोवाने सातवा दिवस त्याच्यासाठी पवित्र ठरवला. यावरून काय कळतं? यावरून कळतं, की यहोवा मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश सातव्या दिवसाच्या शेवटी नक्कीच पूर्ण करेल.
१५. मानवजातीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशात सैतानाने अडथळा आणला आहे असं का वाटू शकत होतं?
१५ आदाम आणि हव्वाने बंड केल्यानंतर ते पापी बनले आणि त्यांनी त्यांच्या संततीला पाप आणि मृत्यू वारशाने दिला. (रोम. ५:१२) त्यामुळे असं वाटलं असतं, की परिपूर्ण आणि आज्ञाधारक मानवांनी पृथ्वी भरून टाकण्याचा यहोवाचा जो उद्देश आहे, त्यात सैतानाने अडथळा आणलाय. असंही दिसत होतं, की आता सैतान यहोवाला “ओमेगा” कधीच म्हणू देणार नाही. सैतानाला कदाचित वाटलं असेल की यहोवाकडे आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आता खूप कमी पर्याय उरलेत. त्यांपैकी एक म्हणजे आदाम आणि हव्वाचा नाश करून, मानवजातीसाठी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी एक नवीन जोडपं निर्माण करणं. पण जर यहोवाने असं केलं असतं, तर यहोवा खोटं बोलत आहे असा आरोप सैतानाने लावला असता. कारण उत्पत्ती १:२८ मध्ये यहोवाने आदाम आणि हव्वाला सांगितलं होतं, की त्यांची संतती या पृथ्वीला भरून टाकेल.
१६. यहोवा आपला उद्देश पूर्ण करू शकला नाही असा आरोप आपण त्याच्यावर लावू शकतो असं सैतानाला का वाटलं असावं?
१६ देव आणखी कोणता पर्याय वापरेल असं सैतानाला वाटलं असावं? कदाचित सैतानाला असं वाटलं असावं की देव आदाम आणि हव्वाच्या अपरिपूर्ण मुलांचा जन्म होऊ देईल, पण ती मुलं कधीच परिपूर्ण होणार नाहीत. (उप. ७:२०; रोम. ३:२३) पण जर तसं झालं असतं, तर यहोवा आपला उद्देश पूर्ण करू शकला नाही असा आरोप सैतानाने त्याच्यावर लावला असता. कारण या पर्यायामुळे देवाचा उद्देश पूर्ण झाला नसता; म्हणजेच आदाम आणि हव्वाच्या परिपूर्ण आणि आज्ञाधारक मुलांनी ही नंदनवन पृथ्वी कधीच भरली नसती.
१७. सैतान आणि पहिल्या मानवी पालकांनी केलेल्या बंडामुळे निर्माण झालेल्या समस्येला यहोवाने कसं सोडवलं आणि त्याचा काय परिणाम होईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ सैतान आणि आपल्या पहिल्या मानवी पालकांनी बंड केल्यामुळे जी समस्या निर्माण झाली होती, ती यहोवाने ज्या प्रकारे सोडवली ते पाहून सैतान अवाक झाला असेल. (स्तो. ९२:५) यहोवाने आदाम आणि हव्वाला मुलं होऊ दिली. असं करून, यहोवाने सिद्ध केलं की तो लबाड किंवा खोटा नाही, तर खरा आहे. आणि अशा प्रकारे आपला उद्देश पूर्ण करण्यात तो विजयी ठरला. आदाम आणि हव्वाच्या आज्ञाधारक मुलांना वाचवण्यासाठी त्याने ‘संततीचा’ जन्म होऊ दिला आणि तो आपला उद्देश पूर्ण करत राहिला. (उत्प. ३:१५; २२:१८) खंडणी बलिदानाची यहोवाने केलेली तरतूद पाहून सैतान नक्कीच थक्क झाला असेल! का? कारण ही तरतूद निःस्वार्थ प्रेमावर आधारलेली होती. (मत्त. २०:२८; योहा. ३:१६) सैतानाच्या स्वार्थी मनोवृत्तीत हा गुण मुळीच पाहायला मिळत नाही. पण खंडणीच्या या तरतुदीमुळे काय साध्य होणार होतं? यहोवाच्या मूळ उद्देशाप्रमाणे, हजार वर्षांच्या शेवटी आदाम-हव्वाच्या परिपूर्ण आणि आज्ञाधारक संततीला पृथ्वीवरच्या नंदनवनात कायमचं जीवन मिळणार होतं. आणि जेव्हा हे होईल, तेव्हा यहोवा एका अर्थाने “ओमेगा” म्हणेल.
यहोवाच्या नंदनवनाबद्दलच्या अभिवचनावरचा आपला भरवसा आपण कसा वाढवू शकतो?
१८. कोणत्या तीन कारणांमुळे आपण यहोवाच्या अभिवचनावर भरवसा ठेवू शकतो? (“ यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवायची तीन कारणं” ही चौकटसुद्धा पाहा.)
१८ आज बरेच लोक देवाच्या नंदनवनाच्या अभिवचनावर शंका घेतात. मग आपण या लेखात आत्तापर्यंत जे पाहिलं, त्यावरून त्यांना या गोष्टीची खातरी करून देण्यासाठी आपण काय सांगू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे, हे अभिवचन स्वतः यहोवा देत आहे. म्हणूनच प्रकटीकरणाच्या पुस्तकात असं म्हटलंय: “राजासनावर बसलेला देव म्हणाला: ‘पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.’” यहोवाकडे त्याचं अभिवचन पूर्ण करण्याची बुद्धी आणि ताकद तर आहेच पण तसं करण्याची त्याची इच्छासुद्धा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, यहोवा आपलं हे अभिवचन पूर्ण करेल ही गोष्ट इतकी निश्चित आहे की यहोवाच्या दृष्टिकोनातून ते जणू पूर्ण झाल्यासारखंच आहे. म्हणूनच तो म्हणतो: “ही वचनं विश्वसनीय आणि खरी आहेत. . . . ती वचनं पूर्ण झाली आहेत!” आणि तिसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा यहोवा एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हीच गोष्ट त्याने, “अल्फा आणि ओमेगा मी आहे” असं जे म्हटलंय त्यातून दिसून येते. सैतान खोटा आहे आणि तो अपयशी ठरला आहे हे यहोवा नक्कीच सिद्ध करेल.
१९. देवाने दिलेल्या नंदनवनाच्या अभिवचनावर लोक जेव्हा शंका घेतात तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगू शकता?
१९ नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा-जेव्हा तुम्ही लोकांना प्रचारकार्यात देवाच्या अभिवचनांबद्दल सांगता, तेव्हा-तेव्हा देवाच्या अभिवचनांवरचा तुमचा भरवसा आणखी पक्का होत असतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा प्रकटीकरण २१:४ मधून देवाच्या नंदनवनाबद्दल तुम्ही लोकांना सांगाल आणि लोकांनी जर तुम्हाला असं म्हटलं की “हे तर फक्त ऐकायलाच चांगलं वाटतं, पण खरं होऊ शकत नाही” तर तुम्ही काय कराल? तेव्हा ५ आणि ६ वचनातून तुम्ही त्यांना समजावून सांगा. आणि यहोवाने जणू आपलं हस्ताक्षर करून या गोष्टीची कशी गॅरंटी दिली आहे हे त्यांना दाखवा.—यश. ६५:१६.
गीत १४५ नंदनवन—देवाचं अभिवचन
a नंदनवनाचं अभिवचन नक्की पूर्ण होईल यावर विश्वास ठेवण्यासाठी यहोवाने जी गॅरेंटी दिली आहे, त्याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. याबद्दल जेव्हा-जेव्हा आपण प्रचारकार्यात लोकांशी बोलतो, तेव्हा-तेव्हा यहोवाच्या अभिवचनांवरचा आपला भरवसा आपण मजबूत करत असतो.