व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वधुमूल्य म्हणून जनावरंसुद्धा दिली जात होती

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन इस्राएलमध्ये मुलीच्या कुटुंबाला वधुमूल्य का दिलं जायचं?

बायबल काळात लग्नाची बोलणी झाल्यावर वधूच्या कुटुंबाला वधुमूल्य दिलं जायचं. आणि वधुमूल्य म्हणून मौल्यवान वस्तू, जनावरं किंवा पैसे दिले जायचे. कधीकधी वधूच्या कुटुंबासाठी काम करूनसुद्धा ही किंमत दिली जायची. याचं एक उदाहरण म्हणजे, याकोबने राहेलसोबत लग्न करण्यासाठी तिच्या वडिलांच्या घरी सात वर्षं काम केलं. (उत्प. २९:१७, १८, २०) पण या रिवाजाच्या मागे काय कारण होतं?

याबद्दल बोलताना बायबलचे एक विद्वान कॅरोल मेयर्स असं म्हणतात: “शेतीवाडी करणाऱ्‍या कुटुंबातली मुलगी लग्न करून जायची तेव्हा कुटुंबात काम करणारी एक व्यक्‍ती कमी व्हायची. आणि त्यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी त्या काळात मुलीच्या कुटुंबाला वधुमूल्य दिलं जायचं.” यामुळे दोन्ही कुटुंबातलं आपसातलं नातंसुद्धा मजबूत व्हायचं. शिवाय कठीण परिस्थितीत या दोन्ही कुटुंबांची एकमेकांना मदत व्हायची. तसंच वधुमूल्य दिल्यामुळे मुलीचा विवाह निश्‍चित झाला आहे हेसुद्धा दिसून यायचं. तसंच तिची काळजी घ्यायची आणि संरक्षण करायची जबाबदारी आता तिच्या वडिलांची नाही तर तिच्या होणाऱ्‍या पतीची आहे हे सूचित व्हायचं.

पण वधुमूल्य दिल्यामुळे एक व्यक्‍ती आपल्यासाठी बायको विकत घेत आहे, असा याचा अर्थ होत होता का? नाही. एनशंट इस्राएल—इट्‌स लाईफ ॲन्ड इन्टीट्युशन्स  (प्राचीन इस्राएलमधलं जीवन आणि रीतीरिवाज) नावाच्या एका पुस्तकात असं म्हटलं आहे: “प्राचीन इस्राएलमध्ये मुलीच्या कुटुंबाला पैशाच्या किंवा इतर गोष्टींच्या रुपात वधुमूल्य द्यावं लागायचं. त्यामुळे त्या काळात पत्नी म्हणून मुलगी विकत घेतली जात होती की काय, असं कदाचित आपल्याला वाटेल. पण असं दिसून येतं, की वधुमूल्य हे एखाद्याच्या मुलीला पत्नी करून घेण्यासाठी दिली जाणारी किंमत नव्हती. तर कुटुंबात एक काम करणारी व्यक्‍ती कमी झाल्यामुळे, मुलीच्या कुटुंबाला होणाऱ्‍या नुकसानीच्या बदल्यात दिली जाणारी भरपाई होती.”

आजसुद्धा काही देशांमध्ये वधुमूल्य देण्याचा रिवाज पाळला जातो. अशा देशांमध्ये साक्षीदार आईवडील वधुमूल्य घेताना अवाजवी अपेक्षा ठेवत नाहीत. उलट या बाबतीतसुद्धा ते आपला ‘समजूतदारपणा’ दाखवून देतात. (फिलिप्पै. ४:५; १ करिंथ. १०:३२, ३३) शिवाय त्यामुळे ते लोभी आणि “पैशावर प्रेम करणारे” नाहीत हे दिसून येतं. (२ तीम. ३:२) यासोबतच, जेव्हा अवाजवी वधुमूल्याची मागणी केली जात नाही, तेव्हा नवऱ्‍या मुलावरसुद्धा त्याचा जास्त ताण येत नाही. त्याला काम करून वधुमूल्याची किंमत जमा करेपर्यंत लग्न पुढे ढकलण्याची गरज पडत नाही. किंवा मग त्याला वधुमूल्य देण्यासाठी आपली पायनियर सेवा सोडून पूर्ण वेळेचं काम करावं लागत नाही.

काही देशांमध्ये वधुमूल्याकरता काही कायदे करण्यात आले आहेत. अशा देशांमध्ये ख्रिस्ती पालक या कायद्यांचं पालन करतात. कारण बायबल म्हणतं, की “प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावं,” आणि जे कायदे देवाच्या नियमांच्या विरुद्ध नाहीत त्यांचं पालन करावं.—रोम. १३:१; प्रे. कार्यं ५:२९.