पुरातन काळातील मातीच्या भांड्यावर कोरलेलं बायबलमधील एक नाव
२०१२ साली पुरातत्व शास्त्रज्ञांना मातीच्या भांड्याचे काही तुकडे सापडले. हे तुकडे ३,००० वर्षांपूर्वीचे होते. सापडलेल्या या भांड्याच्या तुकड्यांमुळे संशोधनकर्त्यांना खूप आनंद झाला. पण, त्यांच्या आनंदाचं खरं कारण म्हणजे, त्यावर कोरलेलं एक नाव.
पुरातत्व शास्त्रज्ञांनी जेव्हा या भांड्याच्या तुकड्यांना एकत्र जोडलं, तेव्हा त्यावर कनानी भाषेत जे लिहिलं होतं ते स्पष्टपणे दिसू लागलं. त्यावर लिहिलं होतं: “एश्बा-एल बेन बेदा,” म्हणजे “बेदाचा मुलगा एश्बा-एल.” पुरातन वस्तूवर हे नाव आढळून आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
बायबलमध्येही एश्बाल नावाच्या एका पुरुषाचा उल्लेख आढळतो. तो शौल राजाच्या पुत्रांपैकी एक होता. (१ इति. ८:३३; ९:३९) ज्यांना हे मातीचं भांडं सापडलं त्या पुरातत्व शास्त्रज्ञांपैकी, प्रोफेसर योसेफ गारफिंकेल हे एक आहेत. ते म्हणतात: “ही खरंच आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे, की एश्बा-एल हे जे नाव बायबलमध्ये फक्त दाविदाच्या शासनादरम्यान आढळतं ते नाव आता पुरातत्व शास्त्राच्या पुराव्यांमध्येही आहे.” पुरातत्व संशोधन बायबल अहवालांना दुजोरा देतो याचा हा आणखी एक पुरावा आहे.
बायबलमध्ये, शौलाचा मुलगा एश्बाल याला ईश-बोशेथ असंही म्हणण्यात आलं आहे. (२ शमु. २:१०) त्याच्या नावातील “बाल” याच्या ठिकाणी “बोशेथ” असं का म्हणण्यात आलं आहे? संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे, की दुसरे शमुवेल या पुस्तकाच्या लेखकाने एश्बाल हे नाव वापरण्याचं जाणीवपूर्वक टाळलं असावं. कारण, हे नाव इस्राएली लोकांना “बआल” या कनानी देवाची आठवण करून देत असावं. बआल हा वादळाचा देव आहे अशी कनानच्या लोकांची धारणा होती आणि ते त्याची उपासना करायचे. बायबलमधील दुसरे शमुवेल या पुस्तकात जरी एश्बाल हे नाव आढळत नसलं, तरी पहिले इतिहास या पुस्तकात मात्र हे नाव आपल्याला पाहायला मिळतं.