वाचकांचे प्रश्न
येशूने प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात केली तेव्हा प्रचारासाठी पाठवलेले ७० शिष्य कुठे होते? ते त्याला सोडून गेले होते का?
येशूने प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात केली तेव्हा ७० शिष्य तिथे नव्हते. म्हणून मग आपण असा विचार करू नये, की येशूने त्यांना स्वीकारलं नव्हतं किंवा मग ते त्याला सोडून गेले होते. त्या वेळी येशूला फक्त त्याच्या प्रेषितांसोबत राहायचं होतं.
१२ काय किंवा ७० काय, त्यांपैकी सगळेच येशूचे शिष्य होते. येशूने सर्वातआधी बऱ्याच शिष्यांमधून १२ पुरुषांना निवडलं आणि त्यांना ‘प्रेषित’ असं नाव दिलं. (लूक ६:१२-१६) गालीलमध्ये असताना “त्याने आपल्या १२ प्रेषितांना जवळ बोलावलं” आणि “त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करायला आणि रोग्यांना बरं करायला पाठवलं.” (लूक ९:१-६) नंतर यहूदीयात येशूने “आणखी ७० जणांना निवडलं. . . . त्याने त्यांना जोडीजोडीने आपल्यापुढे पाठवलं.” (लूक ९:५१; १०:१) यामुळे जिथे-जिथे राज्याचा संदेश पोचला तिथे-तिथे लोक येशूचे शिष्य झाले होते.
जे यहुदी येशूचे शिष्य बनले होते ते अजूनही दरवर्षी वल्हांडण सण कदाचित आपल्या कुटुंबासोबत पाळत होते. (निर्ग. १२:६-११, १७-२०) येशूच्या मृत्यूच्या काही वेळ आधी, येशू आणि त्याचे प्रेषित यरुशलेमला गेले होते. पण त्याने यहूदीया, गालील आणि पेरियामध्ये असलेल्या सगळ्या शिष्यांना बोलवून मोठ्या प्रमाणावर वल्हांडण सण साजरा केला नाही. यावरून स्पष्ट होतं की येशूला हा वेळ फक्त त्याच्या प्रेषितांसोबत घालवायचा होता. त्याने त्यांना सांगितलं: “मी दुःख भोगण्याआधी, तुमच्यासोबत हे वल्हांडणाचं भोजन करावं अशी माझी फार इच्छा होती.”—लूक २२:१५.
असं करण्यासाठी येशूकडे एक चांगलं कारण होतं. ते म्हणजे, तो लवकरच “जगाचं पाप दूर करणारा देवाचा कोकरा,” म्हणून मरण पावणार होता. (योहा. १:२९) लोक यरुशलेममध्ये देवाला बलिदानं द्यायचे म्हणून येशूचा मृत्यूसुद्धा यरुशलेममध्येच होणार होता. इस्राएली लोकांना वल्हांडणाच्या कोकऱ्यामुळे आठवण व्हायची की यहोवाने त्यांना इजिप्तमधून सोडवलंय. पण येशूचं बलिदान यापेक्षा मोठं असणार होतं, कारण त्यामुळे मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळणार होती. (१ करिंथ. ५:७, ८) येशूच्या बलिदानामुळे १२ प्रेषित ख्रिस्ती मंडळीचा पाया बनणार होते. (इफिस. २:२०-२२) विशेष म्हणजे, पवित्र नगरीला यरुशलेमला ‘१२ दगडांचा पाया होता’ आणि “त्यांवर कोकऱ्याच्या १२ प्रेषितांची १२ नावं लिहिलेली होती.” (प्रकटी. २१:१०-१४) यावरून स्पष्ट होतं की विश्वासू प्रेषितांची देवाचा उद्देश पूर्ण करण्यात एक महत्त्वाची भूमिका होती. म्हणून आपण असं म्हणू शकतो, की येशूला आपला शेवटचा वल्हांडण सण आणि त्यानंतर त्याने सुरुवात केलेलं प्रभूचं सांजभोजन त्यांच्यासोबतच करायचं होतं.
येशूचे ७० शिष्य आणि इतर शिष्य त्या वेळी भोजनाला त्याच्यासोबत नव्हते. तरी येशूने सुरुवात केलेल्या प्रभूच्या सांजभोजनाच्या विधीचे फायदे सर्वच विश्वासू शिष्यांना होणार होते. त्या रात्री येशूने प्रेषितांना राज्याच्या कराराबद्दल सांगितलं. पण नंतर अभिषिक्त झालेले सगळे ख्रिस्तीसुद्धा या कराराचा भाग होणार होते.—लूक २२:२९, ३०.