लवकरच द्वेष कायमचा संपेल!
आपण आपल्या मनातून जरी द्वेष काढून टाकला, तरी दुसऱ्यांच्या मनातून द्वेष काढून टाकणं आपल्याला शक्य नाही. आणि त्यामुळे ज्या लोकांची काहीही चूक नाही ते लोक द्वेषाला बळी पडत राहतील. मग लोकांच्या मनातून द्वेष कायमचा कोण काढून टाकू शकतो?
फक्त यहोवा देवच या जगातून द्वेष कायमचा काढून टाकू शकतो. आणि तो असं करेल असं वचनही त्याने दिलं आहे.—नीतिवचन २०:२२.
देव द्वेषाची सगळी मूळं कायमची उपटून टाकेल
-
१. सैतान. आज आपल्याला या जगात सगळीकडे द्वेष पाहायला मिळतो आणि त्यासाठी खरंतर सैतानच जबाबदार आहे. त्यामुळे देव सैतानाचा आणि त्याच्यासारखाच द्वेष पसरवणाऱ्या इतर दुष्ट लोकांचा नाश करेल.—स्तोत्र ३७:३८; रोमकर १६:२०.
-
२. सैतानाचं दुष्ट जग. द्वेषाला खत-पाणी घालणाऱ्या जगातल्या गोष्टींचा देव कायमचा नाश करेल. जसं की, द्वेष पसरवणारे भ्रष्ट राजकारणी आणि धार्मिक पुढारी. तसंच, व्यापाराच्या नावाखाली बेईमानी करणाऱ्या आणि लोकांना लुबाडणाऱ्यांचाही देव कायमचा नाश करेल.—२ पेत्र ३:१३.
-
३. माणसांमधल्या कमतरता. बायबल सांगतं की माणसं जन्मापासूनच पापी आहेत आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच कमतरता आहेत. जसं की, वाईट विचार करणं आणि वाईट वागणं. (रोमकर ५:१२) या कमतरतांमुळेच लोक इतरांचा द्वेष करतात आणि त्यांच्याशी वाईट वागतात. पण देव लवकरच माणसांमधल्या या कमतरता काढून टाकायला आपल्याला मदत करेल आणि द्वेष कायमचा नाहीसा करेल.—यशया ५४:१३.
द्वेषाचं नामोनिशाण नसेल अशा सुंदर जगाचं देवाने वचन दिलंय
-
१. कोणावरही अन्याय होणार नाही. लवकरच संपूर्ण पृथ्वीवर देवाचं राज्य असेल आणि ते कायम टिकेल. (दानीएल २:४४) त्या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि कोणासोबतही भेदभाव होणार नाही. आज ज्या लोकांना अन्याय सहन करावा लागतो त्यांना देव न्याय मिळवून देईल.—लूक १८:७.
-
२. सर्वजण शांतीने राहतील. हिंसा किंवा युद्धांमुळे कोणालाही त्रास सहन करावा लागणार नाही. (स्तोत्र ४६:९) या पृथ्वीवर फक्त चांगले आणि शांतीप्रिय लोक राहतील. त्यामुळे त्यांना कसलाही धोका असणार नाही.—स्तोत्र ७२:७.
-
३. सर्व लोक चांगल्या परिस्थितीत कायम जीवनाचा आनंद घेतील. जगातले सगळे लोक एकमेकांवर प्रेम करतील. (मत्तय २२:३९) कोणतंही दुःख तिथे नसेल आणि कोणाला वाईट गोष्टींची आठवणही राहणार नाही. (यशया ६५:१७) त्या वेळी जगात द्वेषाचं नामोनिशाणही नसेल. सगळे लोक सुखासमाधानाने राहतील आणि “भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.”—स्तोत्र ३७:११.
तुम्हाला अशा जगात राहायला आवडणार नाही का? नक्कीच, आपल्या सगळ्यांनाच आवडेल. पण आजच्या काळातही अनेकांनी बायबलच्या शिकवणींचा अभ्यास करून आपल्या मनातून द्वेष काढून टाकला आहे. (स्तोत्र ३७:८) जगभरातल्या लाखो यहोवाच्या साक्षीदारांनी हेच केलं आहे. ते जरी वेगवेगळ्या देशातून, संस्कृतीतून आणि वंशातून असले, तरी त्यांच्यामध्ये एका कुटुंबासारखं प्रेम आणि एकता आहे.—यशया २:२-४.
यहोवाच्या साक्षीदारांना अन्याय आणि भेदभावाचा चांगल्या प्रकारे सामना करायला कशामुळे मदत झाली हे त्यांना तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल. त्यांच्यासोबत बायबलच्या शिकवणींवर चर्चा केल्यामुळे, तुम्हालाही बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. तुम्हाला तुमच्या मनातून द्वेष काढून टाकायला आणि इतरांवर प्रेम वाढवायला मदत होईल. तसंच, जे तुमचा द्वेष करतात आणि तुमच्या उपकारांची जाणीव ठेवत नाहीत, अशांसोबतही तुम्ही दयेने कसं वागू शकता हे तुम्हाला शिकायला मिळेल. त्यामुळे इतरांसोबतचं तुमचं नातं आणखी चांगलं होईल आणि आत्ताही तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जिथे द्वेषाचं नामोनिशान नसेल अशा देवाच्या राज्यात कायम जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हेसुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल.—स्तोत्र ३७:२९.