व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या पवित्र नावासाठी, यहोवा यासाठी हिब्रू भाषेत वापरण्यात येणारी चार अक्षरं (टेट्राग्रॅमटन); उजवीकडून डावीकडे

पक्की खात्री देणारं हिब्रू भाषेतलं सर्वात लहान अक्षर

पक्की खात्री देणारं हिब्रू भाषेतलं सर्वात लहान अक्षर

देवाने दिलेली सर्व अभिवचनं तो नक्की पूर्ण करेल या गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो का? येशूला याबद्दल पक्की खात्री होती आणि आपल्या शिकवणींद्वारे त्याने लोकांचाही भरवसा वाढवला. डोंगरावरील प्रवचनात येशूने जे उदाहरण वापरलं त्याचा विचार करा. ते आपल्याला मत्तय ५:१८ मध्ये वाचायला मिळतं. तिथं म्हटलं आहे: “मी तुम्हाला खरं सांगतो, की एकवेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होईल, पण नियमशास्त्रातील लहानातलं लहान अक्षर किंवा एक टिंबसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.”

हिब्रू भाषेतलं सर्वात लहान अक्षर योद (י) आहे. देवाचं पवित्र नाव यहोवा जेव्हा हिब्रू भाषेत लिहिलं जातं, तेव्हा योद (י) या अक्षराने त्याची सुरुवात होते. * येशूच्या काळातले शास्त्री आणि परूशी लोक देवाने दिलेल्या नियमांमधल्या प्रत्येक शब्दाला आणि अक्षराला महत्त्वपूर्ण लेखायचे. इतकंच नाही, तर त्यांच्यासाठी त्यातलं प्रत्येक “टिंबसुद्धा” अतिशय महत्त्वपूर्ण होतं.

येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की एकवेळ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होऊ शकते, पण देवाच्या नियमामधली लहानातली लहान गोष्टसुद्धा पूर्ण झाल्यावाचून राहणार नाही. पण खरोखरचं आकाश आणि पृथ्वी यांचा कधीही नाश होणार नाही, अशी खात्री आपल्याला बायबलमधून मिळते. (स्तोत्र ७८:६९) तर मग येशूच्या या उल्लेखनीय शब्दांचा काय अर्थ होता? हाच की देवाच्या नियमशास्त्रात दिलेली एकूण एक गोष्ट पूर्ण होईल; मग ती कितीही लहान असली तरीही.

लहानातली लहान माहिती यहोवा देवासाठीही महत्त्वपूर्ण आहे का? हो नक्कीच. पुढील गोष्टीचा विचार करा: देवाने प्राचीन काळातल्या इस्राएली लोकांना वल्हांडण सण साजरा करण्याबद्दल सांगितलं होतं. या सणादरम्यान अर्पण करण्यात येणाऱ्या कोकऱ्याचं एकही हाड मोडलं जाऊ नये, अशी आज्ञा त्यांना देण्यात आली होती. (निर्गम १२:४६) या लहानशा माहितीमागचं कारण, इस्राएली लोकांना समजलं असावं का? कदाचित नाही. पण ही गोष्ट भविष्यात होणाऱ्या एका घटनेला सूचित करते, हे मात्र यहोवा देवाला माहीत होतं. मसीहाला वधस्तंभावर खिळण्यात येईल, तेव्हा त्याचं एकही हाड मोडलं जाणार नाही या गोष्टीला ते सूचित करत होतं.—स्तोत्र ३४:२०; योहान १९:३१-३३, ३६.

मग येशूच्या शब्दांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपणदेखील या गोष्टीची पूर्ण खात्री बाळगू शकतो की यहोवा देवाने दिलेली सर्व अभिवचनं खरी ठरतील. त्यांतली अगदी लहानातली लहान गोष्टदेखील पूर्ण होईल. हिब्रू भाषेतलं सर्वात लहान अक्षर आपल्याला खरंच किती पक्की खात्री देतं, नाही का?

^ परि. 3 आयोटा हे ग्रीक भाषेतलं सर्वात छोटं अक्षर आहे. ते जवळजवळ हिब्रू भाषेतल्या योद (י) या अक्षरासारखंच आहे. देवाने मोशेद्वारे जे नियम दिले, ते हिब्रू भाषेत लिहिण्यात आले होते. म्हणून येशूने “एक टिंबसुद्धा” असं म्हटलं तेव्हा तो कदाचित हिब्रू भाषेतल्या योद (י) या अक्षराचा उल्लेख करत असावा.