बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का आहेत?
आज बायबलची इतकी वेगवेगळी भाषांतरं का आहेत? ही नवीन भाषांतरं, तुम्हाला बायबल समजून घेण्यासाठी मदत वाटते की एक अडथळा? या भाषांतरांची सुरुवात कुठून झाली, हे समजून घेतल्यामुळे त्यांचं महत्त्व ओळखण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
पण, मूळ बायबल कोणी लिहिलं आणि ते केव्हा लिहिण्यात आलं?
मूळ बायबल
बायबलला सहसा दोन भागांमध्ये विभागण्यात येतं. पहिल्या भागात ३९ पुस्तकं आहेत आणि त्यात “देवाची पवित्र वचने” देण्यात आली आहेत. (रोमकर ३:२) देवाने विश्वासू पुरुषांना ही पुस्तकं लिहिण्यासाठी प्रेरित केलं. त्यांनी जवळजवळ १,१०० वर्षांच्या मोठ्या काळात ही पुस्तकं लिहिली. याचं लिखाण इ.स.पू. १५१३ पासून इ.स.पू. ४४३ नंतरच्या काही काळापर्यंत चाललं. त्यांनी बहुतेक भाग इब्री भाषेत लिहिला. त्यामुळे या भागाला इब्री शास्त्रवचने म्हणतात. तसंच, याला जुना करार म्हणूनही ओळखलं जातं.
दुसरा भाग २७ पुस्तकांनी बनलेला आहे. हा भागही “देवाचे वचन” आहे. (१ थेस्सलनीकाकर २:१३) देवाने येशू ख्रिस्ताच्या विश्वासू शिष्यांना प्रेरित केलं आणि त्यांनी जवळजवळ ६० वर्षांच्या कमी काळात ही पुस्तकं लिहिली. त्यांनी जवळपास इ.स. ४१ ते इ.स. ९८ या काळात ही पुस्तकं लिहिली. त्यांनी बहुतेक भाग ग्रीक भाषेत लिहिला. त्यामुळे या भागाला ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने, तसंच नवा करार म्हणूनही ओळखलं जातं.
देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेली सर्व ६६ पुस्तकं मिळून पूर्ण बायबल तयार होतं. बायबल म्हणजे मानवांसाठी असलेला देवाचा संदेश. पण, बायबलची इतर भाषांतरं का तयार करण्यात आली? याची तीन मुख्य कारणं आहेत. ती म्हणजे:
-
लोकांना त्यांच्या मातृभाषेत बायबल उपलब्ध करून देण्यासाठी.
-
नक्कल करणाऱ्यांकडून झालेल्या चुका सुधारून, बायबलच्या मूळ लिखाणांमधली अचूकता टिकवून ठेवण्यासाठी.
-
जुन्या आणि वापरात नसलेल्या शब्दांच्या जागी, आधुनिक शब्द टाकण्यासाठी.
सुरुवातीच्या दोन भाषांतरांत या गोष्टी कशा दिसून येतात याकडे लक्ष द्या.
ग्रीक सेप्टुअजिंट
येशू पृथ्वीवर येण्याच्या जवळजवळ ३०० वर्षांआधी यहुदी विद्वानांनी इब्री शास्त्रवचनांचं दुसऱ्या भाषेत, म्हणजेच ग्रीक भाषेत भाषांतर करायला सुरुवात केली. याला ग्रीक सेप्टुअजिंट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण हे भाषांतर का तयार करण्यात आलं? कारण, त्या काळात अनेक यहुदी लोकांना इब्री भाषा येत नव्हती. ते ग्रीक भाषा बोलायचे. म्हणून या भाषांतरामुळे त्यांना “पवित्र लिखाणांचे” ज्ञान घेण्यासाठी मदत झाली.—२ तीमथ्य ३:१५.
सेप्टुअजिंट मुळे यहुदी नसलेल्या ग्रीक बोलणाऱ्या लाखो लोकांनाही, बायबल समजण्यासाठी मदत झाली. ती कशी? सेप्टुअजिंट भाषांतराबद्दल प्रोफेसर विल्बर्ट फ्रान्सीस हॉवर्ड म्हणतात: “पहिल्या शतकाच्या मधल्या काळापासून, हे भाषांतर ख्रिस्ती चर्चचं बायबल बनलं. या चर्चच्या मिशनरींनी वेगवेगळ्या सभास्थानांत जाऊन येशू हाच मसीहा आहे, हे शास्त्रवचनांतून सिद्ध करून दाखवलं.” (प्रेषितांची कार्ये १७:३, ४; २०:२०) या एका कारणामुळे बऱ्याच यहुदी लोकांना “सेप्टुअजिंटमध्ये आवड राहिली नाही,” असं फ्रेड्रिक फिवी ब्रूस या बायबल विद्वानाचं म्हणणं आहे.
येशूच्या शिष्यांना जसजशी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची पुस्तकं मिळायची, तसतसं ते त्या पुस्तकांना इब्री शास्त्रवचनांच्या सेप्टुअजिंट भाषांतरासोबत जोडायचे. अशा प्रकारे आज आपल्याजवळ असलेलं संपूर्ण बायबल तयार झालं.
लॅटिन व्हल्गेट
संपूर्ण बायबल तयार झाल्याच्या, जवळजवळ ३०० वर्षांनंतर जेरोम नावाच्या एका धार्मिक विषयाच्या विद्वानाने बायबलचं लॅटिन भाषांतर तयार केलं. याला नंतर लॅटिन व्हल्गेट म्हटलं जाऊ लागलं. पण, त्या काळात लॅटिन भाषेची इतरही भाषांतरं होती. मग, एका नवीन भाषांतराची गरज का पडली? द इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया यात म्हटलं आहे, की जेरोम यांना “चुकीचं भाषांतर, स्पष्ट दिसणाऱ्या चुका आणि खात्री नसताना समावेश करण्यात किंवा गाळण्यात आलेल्या गोष्टींत” सुधार करायचा होता.
जेरोमने अशा बऱ्याच चुका सुधारल्या. पण, काही काळाने चर्चच्या अधिकाऱ्यांनी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. त्यांनी फक्त लॅटिन व्हल्गेट या बायबल भाषांतरालाच मान्यता दिली आणि असं ते कितीतरी शतकांपर्यंत करत राहिले! याचा काय परिणाम झाला? यामुळे बायबल एक असं पुस्तक बनलं, जे सर्वसामान्य लोकांच्या समजण्यापलीकडे होतं. कारण, काही काळाने बऱ्याच लोकांना लॅटिन भाषा जराही येत नव्हती.
अनेक भाषांतरं तयार झाली
मधल्या काळात लोक, बायबलची इतरही भाषांतरं तयार करत गेले. त्यांपैकी एक म्हणजे प्रचलित असलेलं सिरियाक पेशीट्ट. हे भाषांतर जवळजवळ इ.स. ५ व्या शतकात तयार झालं. पण, १४ व्या शतकापर्यंत अनेक सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या भाषेत बायबल उपलब्ध नव्हतं. मग, १४ व्या शतकापासून वेगवेगळ्या भाषेत बायबलची भाषांतरं तयार करण्याचे नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले.
इंग्लंडमध्ये १४ व्या शतकाच्या शेवटी, जॉन विक्लिफ यांनी त्यांच्या देशातल्या सर्वसामान्य लोकांनाही समजेल अशा भाषेत, म्हणजेच इंग्रजी भाषेत बायबलचं भाषांतर तयार केलं. अशा प्रकारे त्यांनी मृत झालेल्या भाषेच्या बंधनातून बायबलला मुक्त करण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर, लवकरच योहानस गुटेनबर्ग यांनी छपाई तंत्राचा शोध लावला. यामुळे बायबल विद्वानांना खूप मदत झाली. या शोधामुळे संपूर्ण युरोपमध्ये वापरात असलेल्या अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये बायबलची नवीन भाषांतरं छापून, ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक मार्ग तयार झाला.
इंग्रजी भाषेत आणखीन वेगवेगळी भाषांतरं तयार करण्यात आली. यामुळे, ‘एकाच भाषेत वेगवेगळी भाषांतरं तयार करण्याची काय गरज आहे?’ असा प्रश्न टीकाकारांनी केला. १८ व्या शतकात जॉन लुईस या इंग्लंडमधल्या चर्चच्या अधिकाऱ्याने असं लिहिलं: “भाषा ही जुनी होत जाते आणि समजण्यासाठी कठीण बनते. त्यामुळे भाषांतर वापरातल्या भाषेतलं असावं आणि लोकांना समजावं यासाठी जुन्या भाषांतरात काही बदल करण्याची गरज पडते.”
पूर्वी कधी नव्हे इतकं, आज बायबल विद्वानांसाठी जुन्या भाषांतरांत सुधार करणं सोपं झालं आहे. त्यांना बायबलची प्राचीन भाषा आज आणखीन स्पष्टपणे समजते. शिवाय, अलीकडेच सापडलेल्या बायबलच्या मौल्यवान प्राचीन हस्तलिखित प्रतीही त्यांच्याजवळ आहेत. यामुळे बायबलच्या मूळ लिखाणांतली अचूकता तपासून पाहायला मदत होते.
या सर्व गोष्टींचं परीक्षण केल्यानंतर, नवीन बायबल भाषांतरं खरंच खूप मदतीची आहेत असं आपण म्हणू शकतो. पण, बायबलची काही भाषांतरं निवडताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मनापासून देवावर प्रेम असल्यामुळे जेव्हा भाषांतरकार बायबलची नवीन भाषांतरं तयार करतात, तेव्हा त्यांनी केलेली भाषांतरं आपल्यासाठी खरंच खूप फायद्याची ठरतात. ▪