व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौथी गोष्ट

जबाबदार व्यक्‍ती कसं बनावं?

जबाबदार व्यक्‍ती कसं बनावं?

जबाबदार व्यक्‍ती बनण्यात काय सामील आहे?

जबाबदार लोक भरवशालायक असतात. त्यांना दिलेलं काम ते वेळेवर आणि चांगल्या प्रकारे करतात.

मुलं लहान असली तरी ती जबाबदार बनायला शिकू शकतात. पेरेंटींग विथाऊट बॉर्डर्स  नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे की, “मुलं १५ महिन्यांची झाली की आईवडील जे सांगतील ते ती करतात. आणि जेव्हा ती १८ महिन्यांची होतात तेव्हा तर आईवडील जे करतात ते त्यांना करायचं असतं. बऱ्‍याचशा संस्कृतींत, मुलं ५ ते ७ वर्षांची होतात तेव्हा ते घरातल्या कामांमध्ये हातभार कसं लावू शकतात हे आईवडील त्यांना शिकवतात. मुलं लहान असली तरी ती अनेक कामं अगदी नीट करतात.”

जबाबदार व्यक्‍ती बनणं महत्त्वाचं का आहे?

पुष्कळ मुलं जेव्हा मोठी होतात आणि आईवडिलांपासून वेगळी राहायला जातात तेव्हा त्यांना जीवनातल्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देता येत नाही. काहींच्या बाबतीत हे यासाठी घडतं कारण त्यांच्या आईवडिलांनी याआधी त्यांना पैशाचा सुज्ञपणे वापर करायला, घर चालवायला किंवा रोजच्या लहानमोठ्या जबाबदाऱ्‍या हाताळायला शिकवलेलं नसतं.

तात्पर्य हेच, की मुलांना लहान असतानाच जबाबदार व्यक्‍ती बनायला शिकवलं तर मोठं झाल्यावर आपण काय करावं हे त्यांना स्वतःहून कळेल. हाऊ टू रेझ अॅन अडल्ट या पुस्तकात म्हटलं आहे की, “मुलं सज्ञान किंवा अठरा वर्षांची होईपर्यंत त्यांनी तुमच्यावर अवलंबून राहावं अशी तुमची इच्छा असू नये, कारण त्यांना नंतर एकट्याने जगाचा सामना करावा लागणार असतो.”

मुलांना जबाबदार व्यक्‍ती बनायला शिकवणं

घरातली काही कामं नेमून द्या.

बायबल तत्त्व: “सर्व श्रमांत लाभ आहे.”—नीतिसूत्रे १४:२३.

लहान मुलांना आपल्या आईवडिलांना त्यांच्या कामांत मदत करायला आवडतं. तुम्ही त्यांची ही नैसर्गिक इच्छा लक्षात घेऊन त्यांना घरातली काही कामं नेमून देऊ शकता.

काही आईवडील आपल्या मुलांना कामं देत नाहीत. त्यांचं असं मत असतं की शाळेत जाणाऱ्‍या मुलांना ढीगभर अभ्यास असतो तर त्यांना काम देऊन त्यांचा भार आणखी का वाढवावा?

पण जी मुलं घरातली कामं करतात ती सहसा शाळेत हुशार असतात कारण त्यांना दिलेली सर्व कामं ती स्वीकारतात आणि पूर्णही करतात. त्याशिवाय, पेरेंटींग विथाऊट बॉर्डर्स  या पुस्तकात म्हटलं आहे, “मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आपल्याला मदत करायची इच्छा असते. पण आपण त्यांना तसं करू दिलं नाही तर इतरांना मदत करणं इतकं महत्त्वाचं नाही असं त्यांना वाटू लागतं . . . आणि इतकंच काय तर त्यांची कामं इतर कोणीतरी करावीत अशीही अपेक्षा ते करू लागतात.”

पुस्तकातल्या या वाक्यावरून समजतं, की आईवडिलांनी मुलांना घरातली कामं करायला शिकवली तर ती इतरांना मदत करायला शिकतील आणि स्वार्थी बनणार नाहीत. मुलांनी घरातली कामं केल्यामुळे त्यांना वाटेल की घरात त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे आणि त्या कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

आपल्या हातून झालेल्या चुकांसाठी आपण जबाबदार आहोत हे मुलांना समजायला मदत करा.

बायबल तत्त्व: “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.”—नीतिसूत्रे १९:२०.

तुमची मुलं जेव्हा चुकतात जसं की, त्यांच्याकडून चुकून एखाद्याच्या वस्तूचं नुकसान झालं असेल तेव्हा ती चूक लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या परिणामांना त्यांना सामोरं जाऊ द्या. वस्तूचं नुकसान झालं असेल तर ते माफी मागू शकतात किंवा झालेल्या नुकसानाची भरपाई करू शकतात कारण या गोष्टी करणं त्यांच्या क्षमतेपलीकडे नाही.

मुलांनी केलेल्या चुकांसाठी ते जबाबदार आहेत हे त्यांना कळेल तेव्हा त्यांना पुढील गोष्टी शिकायला मिळतील:

  • प्रामाणिक बनायला आणि आपल्या चुका कबूल करायला

  • आपल्या चुकांसाठी इतरांचं नाव पुढे करण्याचं टाळायला

  • कारणं देण्याचं टाळायला

  • गरज पडली तर माफी मागायला