दुसरी गोष्ट
नम्रता कशी विकसित कराल?
नम्रता म्हणजे काय?
नम्र व्यक्ती इतरांचा आदर करते. ती उद्धटपणे वागत नाही किंवा इतरांनी तिला विशेष मान किंवा आदर द्यावा अशी ती अपेक्षा करत नाही. ती मनापासून इतरांचा विचार करते आणि त्यांच्याकडून शिकून घ्यायला तयार असते.
काही जण विचार करतात की नम्र व्यक्ती कमजोर असते पण हे खरं नाही. खरंतर नम्र असल्यामुळे आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होण्यासाठी आणि मर्यादा ओळखण्यासाठी मदत होते.
नम्र असणं महत्त्वाचं का आहे?
-
नम्रतेमुळे चांगले नातेसंबंध तयार होतात. द नार्सिसिजम एपीडेमिक नावाचं पुस्तक म्हणतं: “सहसा, नम्र व्यक्तीला मैत्री करणं सोपं जातं.” ते पुस्तक पुढे असंही म्हणतं: “नम्र व्यक्तीला इतरांशी बोलणं आणि सर्वांशी मिळूनमिसळून राहणं अवघड जात नाही.”
-
नम्रतेमुळे तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल. तुमच्या मुलांनी नम्रता हा गुण विकसित केला तर त्यांना आता आणि भविष्यातही याचा फायदा होईल, जसं की नोकरी शोधताना. एका पुस्तकात एका डॉक्टरांनी म्हटलं: “जर एक तरुण स्वतःबद्दल गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वास बाळगत असेल आणि त्याला आपल्या कमतरतांची जाणीव नसेल, तर नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना त्याची चांगली छाप पडणार नाही.” त्या पुस्तकात पुढे असंही म्हटलं आहे: “पण इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती नोकरीसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगते, तेव्हा त्या तरुणाने त्याकडे लक्ष दिलं तर त्याला नोकरी मिळण्याची जास्त शक्यता असते.” *
मुलांना नम्र बनण्यासाठी कसं शिकवावं?
मुलांना स्वतःबद्दल संतुलित दृष्टिकोन ठेवण्याचं प्रोत्साहन द्या.
बायबल तत्त्व: “काहीही नसताना जर आपण काहीतरी आहोत असा कोणी विचार करत असेल, तर तो स्वतःचीच फसवणूक करत आहे.”—गलतीकर ६:३.
-
अशक्य असणाऱ्या गोष्टी बोलू नका. जसं की, “तुझी सर्व स्वप्नं खरी होतील” किंवा “तुला जे बनायचंय ते तू बनू शकतोस” अशी वाक्यं प्रेरणादायक वाटू शकतात पण वास्तविक जीवनात सहसा असं होणं शक्य नसतं. याउलट, पूर्ण करता येतील अशी ध्येयं तुमच्या मुलांनी ठेवली आणि ती साध्य करण्यासाठी मेहनत घेतली तर ती पुढे जाऊन यशस्वी होऊ शकतील.
-
विशिष्ट गोष्टींसाठी प्रशंसा करा. ‘किती गुणी आहेस तू!’ फक्त असं बोलून मुलांना नम्र राहण्यासाठी प्रोत्साहन मिळणार नाही. म्हणून विशिष्ट गोष्टींसाठी त्यांची प्रशंसा करा.
-
सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतीत मुलांवर मर्यादा घाला. सहसा सोशल मीडियाच्या माध्यमाने लोकांना सांगायचं असतं की ते किती चांगले आहेत आणि त्यांनी किती चांगली कामं केली आहेत. पण हे नम्रतेच्या अगदी विरोधात आहे.
-
मुलांना लगेच माफी मागण्याचं प्रोत्साहन द्या. जर तुमच्या मुलांनी एखादी चूक केली तर ती त्यांच्या लक्षात आणू द्या आणि ती त्यांना मान्य करायला मदत करा.
कदर बाळगण्यासाठी प्रोत्साहन द्या.
बायबल तत्त्व: “कृतज्ञता दाखवा.”—कलस्सैकर ३:१५.
-
सृष्टीबद्दल कदर बाळगा. मुलांनी सृष्टीत असलेल्या सर्व गोष्टींबद्दल कदर बाळगली पाहिजे आणि जिवंत राहण्यासाठी यांपैकी बऱ्याच गोष्टींची आपल्याला गरज आहे हे त्यांनी समजलं पाहिजे. आपल्याला श्वास घेण्यासाठी हवेची, पिण्यासाठी पाण्याची आणि खाण्यासाठी अन्नाची गरज असते. अशा उदाहरणांचा वापर करून, सृष्टीत असलेल्या सुंदर गोष्टींबद्दल मुलांच्या मनात कदर विकसित करा.
-
लोकांबद्दल कदर बाळगा. प्रत्येक व्यक्ती आपल्यापेक्षा कोणत्या न कोणत्या बाबतीत चांगली असते. त्यामुळे त्यांच्याविषयी मनात ईर्ष्या बाळगण्याऐवजी त्यांच्याकडून शिकण्याचं मुलांना प्रोत्साहन द्या.
-
कदर व्यक्त करा. मुलांना फक्त शब्दांनी नव्हे तर मनापासून ‘थँक्यू’ बोलायला शिकवा. कदर बाळगल्यामुळे आपल्याला नम्र बनण्यास मदत होते.
इतरांची सेवा करण्याच्या महत्त्वाबद्दल आपल्या मुलांना शिकवा.
बायबल तत्त्व: “नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा, आणि फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पैकर २:३, ४.
-
मुलांना घरातली कामं करायची सवय लावा. तुम्ही जर आपल्या मुलांना घरातली कामं करायला दिली नाहीत तर त्यांना वाटेल की घरातली कामं इतकी महत्त्वाची नाहीत. आधी घरची कामं करावी आणि नंतर खेळावं याची मुलांना जाणीव करून द्या. मुलांना लक्षात आणून द्या की घरची कामं केल्याने इतरांना फायदा होतो आणि यामुळे इतर जण त्यांची प्रशंसा करतील आणि त्यांच्याशी प्रेमाने वागतील.
-
इतरांची सेवा करणं ही एक सन्मानाची गोष्ट आहे हे आपल्या मुलांना स्पष्ट करा. इतरांची सेवा केल्याने मुलांना प्रौढ व्यक्ती बनण्यासाठी मदत होते. म्हणून कोणाला मदतीची गरज आहे हे ओळखण्यासाठी मुलांना मदत करा. त्यांना मदत करण्यासाठी ते काय करू शकतात याबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. मुलं इतरांना मदत करतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा आणि त्यांना पाठिंबा द्या.
^ परि. 8 हे वाक्य कोलॅप्स ऑफ पॅरेंटिंग या पुस्तकातून आहे.