मुलांच्या गरजा व इच्छा
मुलांच्या गरजा व इच्छा
जन्मतःच एका नवजात अर्भकाला गरज असते ती वात्सल्याची, हळुवार थोपटण्याची, प्रेमळ स्पर्शाची. काही तज्ज्ञांच्या मते जन्मानंतरचे १२ तास निर्णायक असतात. ते म्हणतात, की बाळंतपण होताच आईला आणि बाळाला “आरामाची किंवा आहाराची गरज नसते; त्यांना हवी असते एकमेकांची जवळीक व उबदार स्पर्श. एकमेकांकडे पाहण्याची व एकमेकांचा आवाज ऐकण्याची त्यांना गरज व उत्कंठा असते.” *
आपल्या बाळाला पाहता क्षणीच आईवडील त्याला जवळ घेतात, त्याला कुरवाळतात, गोंजारतात; असे करा म्हणून त्यांना सांगावे लागत नाही. आणि बाळालाही आपल्या आईवडिलांच्या सहवासात सुरक्षित वाटते, त्यांच्या लडिवाळपणाला तेही प्रतिसाद देते. त्यांच्यात निर्माण होणारे हे बंधन इतके मजबूत असते की आईवडील थहानभूक विसरून आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी तयार होतात.
दुसरीकडे पाहता, आईवडिलांशी हा भावनिक जिव्हाळा निर्माण न झाल्यास, नवजात अर्भक अक्षरशः कोमेजून मरू शकते. म्हणूनच काही डॉक्टर असे मानतात की बाळंतपणानंतर लगेच बाळ आईच्या हातात दिले पाहिजे. प्रसूतीनंतर लवकरात लवकर, कमीतकमी ३० ते ६० मिनिटांकरता आई व बाळाला एकमेकांचा सहवास मिळण्याची व्यवस्था केली जावी असा सल्ला ते देतात.
आईवडील व मूल यांच्यात भावनिक जिव्हाळा निर्माण होण्याच्या महत्त्वावर भर दिला जात असला तरीसुद्धा, काही इस्पितळांत आई व बाळाला प्रसूतीनंतर लगेच एकमेकांचा
सहवास मिळणे कठीण, काही वेळा तर अशक्य असते. सहसा जंतूसंसर्गाच्या भीतीने नवजात बालकाला आईपासून दूर ठेवले जाते. पण काही पुराव्यांवरून असे सूचित होते की नवजात अर्भके आपल्या आईजवळ राहिल्यास जीवघेण्या संसर्गांचे प्रमाण खरे तर कमी होते. त्यामुळे, आता अधिकाधिक इस्पितळे आई व बाळाला प्रसूतीनंतर लवकरात लवकर व जास्तीत जास्त वेळ सोबत राहण्याची परवानगी देऊ लागली आहेत.जिव्हाळा निर्माण होण्याविषयी काळजी
काही आयांना आपल्या बाळाला पाहता क्षणी त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटत नाही. त्यामुळे त्यांना शंका वाटते: ‘माझ्या बाळासोबत भावनिक जिव्हाळा निर्माण होण्यात अडचणी तर येणार नाहीत?’ बऱ्याच आया आपल्या बाळाला पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडत नाहीत, हे खरे असले तरीसुद्धा यात काळजी करण्यासारखे काहीही नाही.
आईला आपल्या बाळाविषयी लगेच जिव्हाळा वाटला नाही तरी कालांतराने सर्वकाही सुरळीत होते. एका अनुभवी आईच्या शब्दांत, “जन्माच्या वेळी कोणतीही अमुक परिस्थिती तुमच्या बाळासोबतचे तुमचे नाते कायमचे तोडू वा जोडू शकत नाही.” तरीसुद्धा, तुम्ही जर गरोदर असाल आणि या संदर्भात तुम्हाला काळजी वाटत असेल, तर तुम्ही याविषयी आधीपासूनच आपल्या प्रसूतीतज्ज्ञाशी चर्चा करू शकता. आपल्या नवजात बाळासोबत तुम्हाला प्रसूतीनंतर नेमका केव्हा व किती वेळ घालवण्यास आवडेल याविषयी तुम्ही आधीच आपल्या इच्छा स्पष्ट करू शकता.
“माझ्याशी बोला!”
काही विशिष्ट कालमर्यादा अशा असतात जेव्हा मुले विशिष्ट प्रकारच्या प्रेरणेला अत्यंत संवेदनशील असतात. ही कालमर्यादा ओसरल्यावर, ती विशिष्ट संवेदनशीलताही ओसरते. उदाहरणार्थ लहान मुले नवी भाषा, किंबहुना एकाच वेळी अनेक भाषाही अगदी सहज शिकतात. पण भाषा शिकण्याचा सर्वात उत्तम काळ पाच वर्षांच्या वयाच्या आसपास संपत आलेला असतो असे म्हणतात.
मूल १२ ते १४ वर्षांच्या वयोगटात पोचल्यावर मात्र भाषा शिकणे एक अत्यंत कठीण काम बनते. लहान मुलांचे तंत्रिकारोगतज्ज्ञ पीटर हटनलॉकर यांच्या मते, या काळात “मेंदूतील भाषा प्रभुत्वाशी संबंधित क्षेत्रातील अनुबंधनांचे घनत्व व संख्या कमी होते.” त्याअर्थी, भाषाज्ञान मिळवण्याचा सर्वात उत्तम काळ जीवनाच्या पहिल्या काही वर्षांतच असतो!
भाषाज्ञान हे मुलांच्या संपूर्ण बोधक्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावते. पण बोलायला शिकण्याची अवघड कला, मुले कशी आत्मसात करतात? मुख्यत्वे, आपल्या आईवडिलांशी केलेल्या मौखिक संवादातून. लहान मुले खासकरून मानवी प्रेरणेला प्रतिसाद देतात. मॅसच्यूसेट्स इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे बॅरी ॲरन्स म्हणतात: “बाळ . . . आपल्या आईच्या आवाजाची नक्कल करते.” पण गंमतीची गोष्ट म्हणजे, बाळ सर्व आवाजांची नक्कल करत नाही. ॲरन्स निरीक्षण करतात की “आईच्या आवाजासोबतच अधूनमधून येणाऱ्या पाळण्याच्या आवाजाची मात्र बाळ नक्कल करत नाही.”
वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आईवडील आपल्या बाळांशी बोलण्याकरता मात्र एक विशिष्ट प्रकारची तालबद्ध भाषा वापरतात. या लाडीक भाषेत आई किंवा बाबा आपल्या बाळाशी बोलत असतात तेव्हा बाळाच्या हृदयाची गती वाढते. यामुळे शब्दांत व ते शब्द ज्या वस्तूंस सूचित करतात त्यांत संबंध जोडण्याची प्रक्रिया जलदरित्या घडते. एकही शब्द न बोलता, बाळ जणू आईबाबांना म्हणत असते: “माझ्याशी बोला!”
“माझ्याकडे बघा!”
पहिल्या वर्षी, बाळाची काळजी घेणाऱ्या प्रौढ व्यक्तीसोबत, जी सहसा आईच असते, एक घनिष्ट भावनिक नातेसंबंध जुळतो. या भावनिक नात्याची सुरक्षितता न लाभलेल्या बालकांपेक्षा, ज्यांना ती लाभली ती सहसा अधिक आनंदी, मनमिळाऊ असतात. मूल तीन वर्षांचे होईपर्यंत आईसोबत हा भावनिक जिव्हाळा स्थापन होणे आवश्यक आहे असे म्हटले जाते.
वातावरणातील प्रभावाला अतिशय संवेदनशील असण्याच्या या निर्णायक काळात जर बाळ उपेक्षित राहिले तर काय
घडण्याची शक्यता आहे? मार्था फॅरिल एरिक्सन यांनी तब्बल वीस वर्षांपर्यंत २६७ आयांचा व त्यांच्या मुलांच्या विकासांचा मागोवा घेतला; त्या असे मत व्यक्त करतात: “लहानपणी होणारी उपेक्षा, एखाद्या रोपाला कीड लागावी त्याप्रमाणे हळूहळू मुलांच्या उत्साहाला खाऊन टाकते; मग एक वेळ अशी येते जेव्हा त्या मुलाला इतर कोणाशी संबंध स्थापित करण्याची उत्सुकता राहात नाही व आपल्या भोवतालच्या जगाविषयी कोणत्याही प्रकारचे कुतूहल राहात नाही.”भावनिक उपेक्षेचे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट करण्याकरता टेक्सस बाल रुग्णालयाचे डॉ. ब्रूस पेरी यांनी हे उदाहरण दिले: “सहा महिन्यांच्या एका बाळाच्या शरीरातले प्रत्येक हाड मोडा किंवा दोन महिन्यांपर्यंत त्या बाळाला भावनिकरित्या उपेक्षित ठेवा, या दोन्हींपैकी एक निवडण्यास जर कोणी मला सांगितले तर मी म्हणेन की बाळाच्या शरीरातले प्रत्येक हाड तुम्ही मोडले तर बेहत्तर.” का? पेरी यांच्या म्हणण्यानुसार “हाडे कालांतराने सांधतील पण जर बाळाच्या विकासाकरता अत्यावश्यक असणाऱ्या बौद्धिक प्रेरणेपासून तुम्ही त्याला दोन महिन्यांपर्यंत वंचित ठेवले तर त्याच्या मेंदूला तुम्ही कायमचे नुकसान केलेले असेल.” हे नुकसान कायमस्वरूपी आहे किंवा नाही याविषयी बरीच परस्परविरोधी मते व्यक्त केली जातात. पण बऱ्याच शास्त्रोक्त अभ्यासांवरून दिसून येते की बाळाच्या बौद्धिक विकासाकरता भावनिकरित्या पोषक वातावरण अत्यावश्यक आहे.
“थोडक्यात सांगायचे झाल्यास,” इन्फंट्स या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “[चिमुकल्या जिवांची] जडणघडण ही प्रेम करण्यासाठी आणि करवून घेण्यासाठीच झालेली असते.” बाळ रडते तेव्हा “माझ्याकडे बघा!” अशी आईवडिलांना त्याची आर्त हाक असते. आईवडिलांनी त्याच्या या हाकेला वात्सल्यपूर्ण प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारच्या भावनिक देवाण-घेवाणीमुळे बाळाला आपल्या गरजा इतरांना व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मिळतो. ते इतरांशी सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यास शिकते.
‘मूल हट्टी तर होणार नाही ना?’
‘प्रत्येक वेळी रडल्यावर मी बाळाकडे लक्ष दिले तर ते नंतर हट्टी तर होणार नाही?’ असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल. तुमची भीती निराधार नाही. या प्रश्नावर अनेक मते व्यक्त केली जातात. प्रत्येक मूल वेगळे असल्यामुळे त्यांच्याशी वागण्याची सर्वात उत्तम पद्धत कोणती हे आईवडिलांनी ठरवावे. पण अलीकडील संशोधनावरून असे सूचित होते की बाळाला भूक लागते, किंवा ते अस्वस्थ होते तेव्हा त्याच्या शरीरातील तणावाला प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणेतून स्ट्रेस हॉर्मोन्स पाझरतात. आपल्याला होणारा त्रास बाळ रडून व्यक्त करते. असे म्हणतात, की आई किंवा बाबा बाळाच्या रडण्याकडे लक्ष देऊन त्याला काय हवं-नको ते बघतात तेव्हा बाळाच्या मेंदूत विशिष्ट कोशिकांचे जाळे तयार होण्यास सुरवात होते की जे त्याला स्वतःला आपणहूनच शांत करण्यास शिकायला मदत करते. शिवाय, डॉ. मेगन गुनर सांगतात त्यानुसार, ज्या बाळाच्या रडण्याकडे आईबाबा लक्ष देतात आणि त्याच्या गरजा पूर्ण करतात त्याच्या शरीरात तणावाच्या वेळी पाझरणारे कॉर्टिसॉल हे हॉर्मोन कमी प्रमाणात दिसून येते. आणि हे बाळ अस्वस्थ झाले तरी, आपल्या शरीरातील तणाव प्रतिक्रिया ते लवकर बंद पाडू शकते.
एरिक्सन तर म्हणतात की “ज्या बाळांकडे, खासकरून पहिल्या ६-८ महिन्यांत लगेच व सातत्याने लक्ष देण्यात आले, ती अशा बाळांपेक्षा कमी रडताना आढळतात की ज्यांच्या रडण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.” बाळाच्या रडण्याला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देणेही तितकेच महत्त्वाचे
आहे. जर तुम्ही प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने प्रतिसाद दिला, म्हणजे बाळ रडताच दूध पाजायला घेतले किंवा कडेवर घेतले तर तुमचे बाळ पुढे नक्कीच हट्टी बनेल. कधीकधी बाळाच्या रडण्याला फक्त तुमच्या आवाजाने प्रतिसाद देऊन पाहा. किंवा बाळाच्या जवळ सरकणे, त्याच्या कानात कुजबुजणे हे देखील करून पाहता येईल. कधीकधी तर फक्त पाठीवर किंवा पोटावर हात फिरवल्याने प्रश्न सुटेल.“बाळ रडणार नाही, तर आणखी काय करेल?” पूर्वेकडील बऱ्याच देशात या अर्थाची एक म्हण आहे. आपल्याला काय वाटतंय, काय हवंय हे सांगण्याची बाळाजवळ एकच भाषा असते आणि ती म्हणजे रडण्याची. तुम्ही काहीतरी मागितल्यावर प्रत्येक वेळी तुमच्याकडे कुणी पूर्णपणे दुर्लक्ष केले तर तुम्हाला कसे वाटेल? मग जरा विचार करा, कुणीतरी काळजी घेतल्याशिवाय पूर्णपणे असहाय असणाऱ्या तुमच्या बाळाला, जर त्याने आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर कसे वाटेल? पण बाळाच्या रडण्याला कोणी प्रतिसाद द्यायचा?
बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची?
संयुक्त संस्थानांत अलीकडे करण्यात आलेल्या जनगणनेत दिसून आले की ५४ टक्के मुलांच्या जन्मापासून ते तिसऱ्या वर्गात जाईपर्यंत, त्यांच्या आईवडिलांशिवाय दुसरी एखादी व्यक्ती नियमितपणे त्यांची काळजी घेते. बऱ्याच कुटुंबात एकाच्या पगाराने उदरनिर्वाह चालत नाही. आणि बऱ्याच स्त्रिया आपल्या नवजात शिशुची काही आठवडे किंवा काही महिने काळजी घेता यावी म्हणून बाळंतपणाची रजा घेतात. पण त्यानंतर काय?
अर्थात, अशाप्रकारचे निर्णय घेण्याकरता कोणतेही सक्तीचे नियम करता येत नाहीत. पण बाळाच्या जीवनातल्या या निर्णायक काळात ते अजूनही अत्यंत नाजूक असते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. या बाबतीत आईवडील दोघांनी गांभीर्याने विचार करावा. निर्णय घेण्याआधी आपल्यापुढे कोणकोणते पर्याय आहेत हे पडताळून पाहावे.
अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे डॉ. जोसेफ झांगा म्हणतात, “आई व वडिलांकडून मुलांना जो वेळ हवा असतो, त्याची उणीव सर्वात उत्तम शिशुगृहांत त्यांना ठेवूनही भरून काढता येत नाही, असे अलीकडे अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले आहे.” मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जितका संपर्क यायला हवा तितका शिशुगृहांत येत नाही याविषयी काही तज्ज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे.
मुलांच्या आवश्यक गरजांविषयी जागरूक असणाऱ्या काही नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी, आपल्या मुलांचा भावनिक सांभाळ करण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणावर सोपवण्याऐवजी घरी राहण्याचा पर्याय निवडला आहे. एका स्त्रीने असे म्हटले: “मला जे समाधान मिळाले आहे ते इतर कोणत्याही कामातून मला मिळाले नसते याची मला खात्री आहे.” अर्थात, आर्थिक दबावांमुळे सगळ्याच मातांना अशाप्रकारचे निर्णय घेणे शक्य नसते. बऱ्याच आईवडिलांजवळ आपल्या मुलांना पाळणाघरांत ठेवण्याशिवाय पर्याय नसतो; त्यामुळे मग ते इतरवेळी आपल्या मुलांसोबत असताना त्यांच्याकडे लक्ष देण्याचा व वात्सल्य दाखवण्याचा अधिक जागरूकपणे प्रयत्न करतात. त्याचप्रकारे, बऱ्याच एक-पालक कुटुंबांतही पालकांचा नाईलाज असतो, पण तरीसुद्धा ते आपल्या मुलांचे संगोपन करण्याकरता असामान्य परिश्रम घेतात आणि त्यांचे प्रयत्न बऱ्याच प्रमाणात सफलही होतात.
मुलांना वाढवणे अतिशय आनंददायक व संतुष्टीदायक असू शकते. पण तरीसुद्धा म्हणावे तितके ते सोपे नाही; बरेच त्याग करावे लागतात. तुम्ही सफल पालक कसे होऊ शकाल?
(g०३ १२/२२)
[तळटीप]
^ या लेखमालेत, सावध राहा! अनेक मान्यवर बाल-संगोपन तज्ज्ञांची मते सादर करत आहे कारण ही माहिती पालकांना कामी पडू शकेल. पण अनेकदा ही मते कालांतराने बदलतात किंवा सुधारली जातात हे कबूल करावे लागेल. बायबलच्या दर्जांच्या बाबतीत असे घडत नाही आणि या दर्जांचे सावध राहा! पूर्णपणे समर्थन करते.
[६ पानांवरील चौकट/चित्र]
अबोल बाळं
जपानच्या काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्या देशात अशा बाळांची संख्या वाढत चालली आहे जी रडत नाहीत व हसतही नाहीत. बालरोग तज्ज्ञ सातोशी यानागीसावा यांनी या बाळांना अबोल बालके असे नाव दिले आहे. ही बाळं आपल्या भावना व्यक्त करण्याचे का सोडून देतात? काही डॉक्टरांच्या मते आईवडिलांचा सहवास न मिळाल्यामुळे ही बाळं अशी होतात. या स्थितीला लादलेली असहायता (एन्फोर्स्ड हेल्पलेसनेस) म्हणतात. एका अनुमानानुसार बाळ आपल्या आईचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्याकडे सतत दुर्लक्ष झाले किंवा त्याच्या रडण्याचा वारंवार चुकीचा अर्थ लावण्यात आला तर हळूहळू बाळ आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रयत्न सोडून देते.
टेक्सस चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे डॉक्टर ब्रूस पेरी म्हणतात, की “योग्य वेळी बाळाला योग्य उत्तेजन न मिळाल्यास, इतरांच्या भावनांप्रती संवेदनशील बनवणाऱ्या त्याच्या मेंदूतल्या भागाचा नीट विकास होणार नाही.” भावनिक दुर्लक्ष टोकाला गेल्यास, त्या बाळाची इतरांबद्दल सहानुभूती दाखवण्याची क्षमता कायमची नाहीशी होऊ शकते. डॉ. पेरी यांचे मानणे आहे की अनेकदा मादक पदार्थांच्या आहारी जाण्याच्या व किशोरवयात हिंसक वागणुकीच्या प्रकरणात अशाप्रकारचे बालपणीचे अनुभव कारणीभूत असू शकतात.
[७ पानांवरील चित्र]
आई व बाळाचा आपसांत संवाद साधल्यावर आपोआपच जिव्हाळा वाढतो