कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | विवाह
पती-पत्नी कशी करू शकतात तडजोड?
इतकं कठीण का?
अशी कल्पना करा की एखाद्या विषयावर तुमची आणि तुमच्या जोडीदाराची मतं वेगवेगळी आहेत. अशा वेळी, तुमच्यासमोर तीन पर्याय असू शकतात:
-
१. तुम्ही तुमच्या मतावर अडून राहू शकता.
-
२. जोडीदाराचं मत निमूटपणे स्वीकारू शकता.
-
३. दोघंही तडजोड करू शकता.
पण तुम्ही कदाचित म्हणाल: ‘मला तडजोड करायला मुळीच आवडत नाही. तडजोड केल्यानं कुणाच्याच मनासारखं होत नाही!’
हे लक्षात घ्या, की तडजोड करणं म्हणजे दोघांनी स्वतःची मनं मारणं असं नाही; खासकरून ती योग्य पद्धतीनं केली तर. तडजोड करायला शिकणं ही एक कला आहे. त्यामुळं ती कशी करावी याचा विचार करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
तडजोडीबद्दल काय माहीत असलं पाहिजे?
एकत्र मिळून तोडगा काढा. लग्नाआधी तुम्हाला कदाचित स्वतःच निर्णय घ्यायची सवय असेल. पण लग्नानंतरची गोष्ट वेगळी आहे. लग्नानंतर दोघांनी आपआपली मतं बाजूला ठेवून आपल्या वैवाहिक बंधनाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. एकत्र मिळून निर्णय घेतल्यानं नुकसान नाही, तर फायदाच होतो. आलेक्झान्ड्रा नावाची एक पत्नी म्हणते: “एखाद्या समस्येवर एकेकट्यानं मार्ग काढण्याऐवजी दोघांनी मिळून काढलेला मार्ग केव्हाही चांगला.”
एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्या. विवाह सल्लागार जॉन एम गॉटमन म्हणतात: “जोडीदार म्हणेल ती प्रत्येक गोष्ट मान्य केलीच पाहिजे असं नाही. पण एकमेकांचं म्हणणं शातंपणे ऐकून घेणं गरजेचं आहे. जोडीदार एखाद्या समस्येवर बोलत असताना तुम्ही जर तुमच्या हालचालींवरून दाखवून दिलं की तुम्हाला अजिबात ऐकून घेण्याची इच्छा नाही तर त्यातून काहीच साध्य होणार नाही.” *
एकमेकांसाठी त्याग करा. “मी म्हणेल तीच पूर्व दिशा” असं म्हणणाऱ्या जोडीदारासोबत कुणालाच राहायला आवडत नाही. याउलट, दोघांनी त्यागाची भावना दाखवली तर त्यांच्या संसारात गोडवा येईल. जून नावाची एक पत्नी म्हणते: “लग्न म्हणजे फक्त घेणं नाही, तर देणंसुद्धा. काही वेळा नवऱ्याचं मन राखण्यासाठी मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणं करते; तर कधीकधी माझं मन राखण्यासाठी ते माझ्या म्हणण्याप्रमाणं करतात.”
तुम्ही काय करू शकता?
सुरुवात चांगली करा. हे लक्षात घ्या, की तुम्ही ज्या पद्धतीनं बोलायला सुरुवात कराल त्याच पद्धतीनं सहसा शेवटही होईल. तुम्ही जर उद्धटपणे बोलायला सुरुवात केली तर समस्येतून मार्ग निघण्याची शक्यता खूप कमी असेल. तेव्हा, बायबलचा सल्ला लागू करा: “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” (कलस्सैकर ३:१२) अशा प्रकारचे गुण दाखवल्यानं तुम्ही वाद घालण्याचं टाळाल आणि समस्या कशी सोडवायची याचा विचार कराल.—बायबलचं तत्त्व: कलस्सैकर ४:६.
मतं कुठं जुळतात ते पाहा. तडजोड करण्याचा प्रयत्न करताना तुमच्यात वादावादी होऊ लागली तर याचा अर्थ तुमची मतं कुठं जुळत नाहीत त्यावरच तुम्ही लक्ष देत आहात. असं करण्याऐवजी तुमची मतं कुठं जुळतात त्यावर लक्ष द्या. त्यासाठी पुढील गोष्टी करून पाहा:
दोघंही एकेक यादी बनवा. ज्या गोष्टींवर तुमची मतं ठाम आहेत त्या गोष्टी यादीच्या एका बाजूला लिहा; तर ज्या गोष्टींवर तुमची मतं ठाम नाहीत त्या गोष्टी यादीच्या दुसऱ्या बाजूला लिहा. मग दोघं मिळून त्यावर चर्चा करा. तुमच्या लक्षात येईल की ज्या गोष्टींवर तुमची मतं अगदी ठाम आहेत असं तुम्हाला आधी वाटत होतं ती तितकीपण ठाम नाहीत. त्यामुळं, तडजोड करणं सोपं जाईल. आणि जरी तुमची मतं ठाम असली तरी अशा रीतीनं चर्चा केल्यामुळं नेमकी समस्या काय आहे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल.
दोघं मिळून तोडगा काढा. काही समस्या सहज सुटण्यासारख्या असतील, तर काही कठीण असतील. अशा कठीण समस्यांवर मिळून तोडगा काढा. एकेकट्यानं काढलेल्या तोडग्यापेक्षा एकत्र मिळून काढलेला तोडगा केव्हाही चांगला. यामुळं तुमचं वैवाहिक बंधन आणखी मजबूत होईल.—बायबलचं तत्त्व: उपदेशक ४:९.
दृष्टिकोन बदलण्यास तयार असा. बायबल म्हणतं: “तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.” (इफिसकर ५:३३ ईझी-टू-रीड व्हर्शन) विवाहात प्रेम आणि आदर असेल तर पती-पत्नी एकमेकांची मतं ऐकून घ्यायला आणि आपला दृष्टिकोन बदलायलाही तयार असतील. कॅमरन नावाचा पती म्हणतो: “ज्या गोष्टी तुम्ही आयुष्यात कधीच केल्या नसत्या त्या गोष्टी केवळ जोडीदारामुळं तुम्ही आवडीनं करू लागता.—बायबलचं तत्त्व: उत्पत्ति २:१८. ▪ (g14-E 12)
^ परि. 12 द सेवेन प्रिन्सिपल्स फॉर मेकिंग मॅरेज वर्क या पुस्तकातून.