व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आत्म्यात आवेशी असा’

‘आत्म्यात आवेशी असा’

‘आत्म्यात आवेशी असा’

“उद्योगात मंद नसून आत्म्यात आवेशी, प्रभूची सेवा करणारे असा.”—रोम. १२:११, पं.र.भा.

१. इस्राएल लोक पशुबलिदाने व इतर अर्पणे का द्यायचे?

यहोवाचे सेवक त्याच्याबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यासाठी आणि त्याच्या इच्छेनुसार वागण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करतात तेव्हा यहोवाला आनंद वाटतो. प्राचीन काळी, त्याने आपल्या सेवकांकडून निरनिराळ्या प्रकारची पशुबलिदाने आणि इतर अर्पणे स्वीकारली. मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएलांना पापांची क्षमा मिळवण्यासाठी व उपकारस्तुती करण्यासाठी अशी बलिदाने देण्यास सांगण्यात आले होते. आज ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांकडून यहोवा अशा बलिदानांची अपेक्षा करत नाही. तरीसुद्धा, रोममधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रातील १२ व्या अध्यायात प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे, काही विशिष्ट प्रकारची अर्पणे देण्याची अजूनही आपल्याकडून अपेक्षा केली जाते. ही अर्पणे कोणती? हे आता पाहू या.

जिवंत अर्पण

२. ख्रिस्ती या नात्याने आपण कशा प्रकारचे जीवन जगतो आणि यात काय समाविष्ट आहे?

रोमकर १२:१, २ वाचा. रोमकरांना लिहिलेल्या पत्राच्या सुरुवातीला पौलाने हे स्पष्ट केले की अभिषिक्‍त ख्रिस्ती, मग ते यहुदी असोत किंवा इतर राष्ट्रांचे, ते त्यांच्या कर्मांमुळे नव्हे तर विश्‍वासामुळे देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरतात. (रोम. १:१६; ३:२०-२४) पौल १२ व्या अध्यायात स्पष्ट करतो की ख्रिश्‍चनांनी जीवनात आत्मत्यागी वृत्ती बाळगण्याद्वारे देवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्‍त केली पाहिजे. यासाठी आपल्या मनाचे नवीकरण होणे आवश्‍यक आहे. अपरिपूर्णतेमुळे आपण जन्मतःच ‘पाप व मरण ह्‍यांच्या नियमाच्या’ अधीन आहोत. (रोम. ८:२) म्हणूनच, आपले अंतर्बाह्‍य रूपांतर होणे गरजेचे आहे. म्हणजेच, आपल्या पूर्वीच्या आशाआकांक्षा पूर्णपणे बदलून एक ‘नवी मनोवृत्ती’ आपण स्वीकारली पाहिजे. (इफिस. ४:२३) अशा प्रकारचा बदल केवळ देवाच्या आत्म्याच्या मदतीनेच शक्य आहे. पण त्यासोबतच, आपणही मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण “या युगाबरोबर समरूप” न होण्याचा म्हणजेच या जगातील अनैतिक आचारविचारांचा व किळसवाण्या मनोरंजनाचा स्वतःवर प्रभाव न पडू देण्याचा पूर्ण शक्‍तिनिशी प्रयत्न केला पाहिजे.—इफिस. २:१-३.

३. आपण ख्रिस्ती कार्यांत का भाग घेतो?

‘देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी’ आपण आपल्या बुद्धीचा वापर करावा असेही पौल सांगतो. आपण दररोज बायबल वाचतो. वाचलेल्या गोष्टींवर मनन करतो. प्रार्थना करतो. ख्रिस्ती सभांना जातो. तसेच, प्रचार कार्यातही सहभाग घेतो. या सर्व गोष्टी आपण का करतो? मंडळीतील वडील आपल्याला वारंवार असे करण्याचे प्रोत्साहन देतात म्हणून आपण या गोष्टी करतो का? वडील आपल्याला प्रेमळपणे या गोष्टी करण्याची आठवण करून देतात याबद्दल आपण निश्‍चितच त्यांचे आभारी आहोत. पण, वर उल्लेख केलेली ख्रिस्ती कार्ये आपण करतो याचे मुख्य कारण म्हणजे देवाचा आत्मा आपल्याला त्याच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्‍त करण्यासाठी या सर्व गोष्टी करण्यास प्रेरित करतो. शिवाय, आपण या गोष्टी कराव्यात अशी देवाची इच्छा आहे याची आपल्याला स्वतःला खातरी पटली आहे. (जख. ४:६; इफिस. ५:१०) ही सर्व ख्रिस्ती कार्ये केल्याने आपल्याला खूप आनंद व समाधान मिळते. कारण एका खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीप्रमाणे जीवन व्यतीत केल्याने यहोवा आपला स्वीकार करेल याची आपल्याला जाणीव आहे.

निरनिराळी कृपादाने

४, ५. ख्रिस्ती वडिलांनी आपली कृपादाने कशा प्रकारे वापरली पाहिजेत?

रोमकर १२:६-८, ११ वाचा. पौल सांगतो, की “आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत.” पौलाने उल्लेख केलेल्या कृपादानांपैकी, बोध करणे तसेच अधिकाऱ्‍याचे काम करणे यांसारखी कृपादाने खासकरून ख्रिस्ती वडिलांशी संबंधित आहेत. पौल या वडिलांना “आस्थेने” मंडळीचे काम पाहण्याचा सल्ला देतो.

हीच आस्था शिक्षण देताना आणि ‘सेवा करतानाही’ वडिलांनी दाखवावी असे पौल म्हणतो. संदर्भावरून असे दिसून येते की पौल या ठिकाणी, जिला “एक शरीर” म्हणण्यात आले आहे त्या मंडळीत “सेवा” करण्याविषयी सांगत होता. (रोम. १२:४, ५) ही सेवा प्रेषितांची कृत्ये ६:४ यात उल्लेख केलेल्या सेवेसारखीच आहे. त्या वचनात प्रेषित असे म्हणतात: “आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.” ख्रिस्ती वडील ही सेवा कशा प्रकारे करतात? ते मंडळीच्या सदस्यांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यास साहाय्य करण्यासाठी आपल्या कृपादानांचा उपयोग करतात. तसेच, प्रार्थनापूर्वक अभ्यास व संशोधन करणे, शिक्षण देणे व मेंढपाळ भेटी देणे यांद्वारे ते मंडळीतील बांधवांना देवाच्या वचनातून आस्थेने मार्गदर्शन करतात तेव्हा ते या “सेवेत तत्पर” असल्याचे दाखवतात. मंडळीत देखरेख करणाऱ्‍या वडिलांनी आपल्या कृपादानांचा प्रामाणिकपणे वापर केला पाहिजे आणि कळपातील मेंढरांची “संतोषाने” काळजी वाहिली पाहिजे.—रोम. १२:७, ८; १ पेत्र ५:१-३.

६. या लेखाचा मुख्य विषय असलेल्या रोमकर १२:११ मधील सल्ल्याचे आपण कशा प्रकारे पालन करू शकतो?

पौल पुढे म्हणतो: “उद्योगात मंद नसून आत्म्यात आवेशी, प्रभूची सेवा करणारे असा.” सेवाकार्यात आपला उत्साह मंदावला आहे असे जाणवल्यास, आपण बायबलचा नियमित, अर्थपूर्ण अभ्यास करत आहोत किंवा नाही हे तपासून पाहिले पाहिजे आणि यहोवाच्या आत्म्याच्या साहाय्यासाठी अधिकाधिक प्रार्थना केली पाहिजे. असे केल्याने, आपला निरुत्साह दूर होऊन आपल्याला पुन्हा एकदा सेवेत आवेशी होणे शक्य होईल. (लूक ११:९, १३; प्रकटी. २:४; ३:१४, १५, १९) पवित्र आत्म्याने सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ उत्साहाने सांगण्यास प्रेरित केले. (प्रे. कृत्ये २:४, ११) त्याच प्रकारे देवाचा आत्मा आपल्यालाही सेवाकार्यात उत्साही, “आत्म्यात आवेशी” असण्यास साहाय्य करेल.

नम्र असणे आणि मर्यादांची जाणीव राखणे

७. यहोवाच्या सेवेत नम्र असणे आणि आपल्या मर्यादांची जाणीव राखणे का महत्त्वाचे आहे?

रोमकर १२:३, १६ वाचा. आपल्याजवळ असलेली सर्व कृपादाने यहोवाच्या दयेने व कृपेनेच ‘प्राप्त झाली’ आहेत. आणखी एका ठिकाणी पौल असे म्हणतो: “आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.” (२ करिंथ. ३:५) त्यामुळे, आपण कधीही स्वतःची बढाई मारू नये. आपण नम्रपणे हे ओळखले पाहिजे की सेवाकार्यात मिळणारे यश हे आपल्या कौशल्यामुळे नव्हे तर देवाच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मिळते. (१ करिंथ. ३:६, ७) म्हणूनच पौल म्हणतो: “कोणी स्वतःला जितके मानणे योग्य आहे त्यापेक्षा अधिक मानू नये.” (पं.र.भा.) अर्थात, स्वतःविषयी आदर असणे व यहोवाच्या सेवेत आपण जे काही साध्य करतो त्याविषयी आनंदी व समाधानी असणे योग्यच आहे. पण त्याच वेळी आपण आपल्या मर्यांदांची जाणीव राखल्यास, स्वतःच्या मतांवर अडून राहण्याची प्रवृत्ती आपल्याला टाळता येईल. त्याऐवजी आपण ‘मर्यादेने’ स्वतःबद्दल विचार केला पाहिजे.

८. आपण ‘स्वतःला शहाणे समजणे’ कशा प्रकारे टाळू शकतो?

यहोवाच्या सेवेत मिळालेल्या यशाबद्दल बढाई मारणे मूर्खपणाचे ठरेल. कारण ‘वाढविणारा देवच आहे.’ (१ करिंथ. ३:७) पौल म्हणतो की देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या “विश्‍वासाच्या परिमाणानुसार” सर्वांनी स्वतःला मानले पाहिजे. इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याऐवजी, इतर जण त्यांच्याजवळ असलेल्या विश्‍वासानुसार जे काही साध्य करतात त्याची आपण कदर केली पाहिजे. पौल पुढे म्हणतो: “परस्पर एकचित्त असा.” दुसऱ्‍या एका पत्रात पौल आपल्याला असा सल्ला देतो: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” (फिलिप्पै. २:३) आपल्या बंधू व भगिनींपैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मान्य करण्यासाठी खरी नम्रता असणे आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली नम्र मनोवृत्ती असल्यास ‘आपण स्वतःला शहाणे समजणार नाही.’ काही विशेषाधिकारांमुळे कदाचित काही जण सर्वांच्या नजरेत येतील. त्याउलट, साधी कामे करताना कदाचित इतरांचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही. पण ‘लीन वृत्ती’ बाळगल्यास अशी साधी कामे करतानाही आपण सर्व जण खरा आनंद अनुभवू शकतो.—१ पेत्र ५:५.

मंडळीतील ऐक्य

९. पौल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची तुलना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांशी का करतो?

रोमकर १२:४, ५, ९, १० वाचा. पौल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची तुलना शरीराच्या निरनिराळ्या अवयवांशी करतो, जे मस्तक असलेल्या ख्रिस्ताच्या अधीन राहून ऐक्याने सेवा करतात. (कलस्सै. १:१८) आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या या ख्रिश्‍चनांना तो याची आठवण करून देतो, की शरीरात अनेक अवयव असले आणि ते सर्व वेगवेगळी कार्ये करत असले, तरीसुद्धा ते “पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर” आहेत. इफिसस येथील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाही पौलाने अशाच प्रकारचा सल्ला दिला: “आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते.”—इफिस. ४:१५, १६.

१०. ‘दुसऱ्‍या मेंढरांनी’ कोणता अधिकार मान्य केला पाहिजे?

१० ख्रिस्ताचे शरीर हे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीला म्हणण्यात आले असल्यामुळे, ‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ त्यात समावेश नसला, तरीसुद्धा ते देखील या उदाहरणावरून बरेच काही शिकू शकतात. (योहा. १०:१६) पौल सांगतो, की यहोवाने “सर्व काही [ख्रिस्ताच्या] पायाखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले.” (इफिस. १:२२) आज, ज्या “सर्व” गोष्टी यहोवाने आपल्या पुत्राच्या अधीन केल्या आहेत, त्यांत दुसऱ्‍या मेंढरांचा समावेश आहे. तसेच, ख्रिस्ताने आपल्या ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाला’ सोपवलेल्या त्याच्या ‘सर्वस्वातही’ दुसऱ्‍या मेंढरांचा समावेश होतो. (मत्त. २४:४५-४७) म्हणूनच, पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या या दुसऱ्‍या मेंढरांनी ख्रिस्ताला आपले मस्तक मानून, विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या आणि त्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या नियमन मंडळाच्या, तसेच, मंडळीत देखरेख करण्यासाठी नेमलेल्या वडिलांच्या अधीन राहिले पाहिजे. (इब्री १३:७, १७) असे केल्याने ते ख्रिस्ती मंडळीतील ऐक्य वाढवण्यास हातभार लावू शकतात.

११. आपले ऐक्य कशामुळे शक्य होते आणि पौलाने आणखी कोणता सल्ला दिला?

११ अशा प्रकारचे ऐक्य प्रेमामुळे शक्य होते, जे “पूर्णता करणारे बंधन” आहे. (कलस्सै. ३:१४) रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायात पौल या गोष्टीवर भर देतो. तो म्हणतो, की आपल्या प्रेमात “ढोंग नसावे” आणि “बंधुप्रेमाच्या बाबतीत” आपण “एकमेकांना खरा स्नेहभाव” दाखवला पाहिजे. असे केल्यामुळे आपल्या मनात एकमेकांबद्दल आदर निर्माण होईल. प्रेषित पौल म्हणतो: “तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” पण, मंडळीची शुद्धता कायम राखण्याच्या बाबतीत आपण कोणतीही तडजोड करू नये. भावनांच्या आहारी जाणे म्हणजे प्रेम नाही हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. प्रेमाविषयी सल्ला देताना पौल म्हणतो: “वाइटाचा वीट माना; बऱ्‍याला चिकटून राहा.”

आतिथ्य करणे

१२. आदरातिथ्य करण्याच्या बाबतीत मासेदोनियातील ख्रिस्ती बांधवांकडून आपण काय शिकू शकतो?

१२रोमकर १२:१३ वाचा. बांधवांबद्दल असलेले प्रेम आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे ‘पवित्र जनांच्या गरजा भागवण्यास’ प्रवृत्त करेल. आपण श्रीमंत नसलो तरी, आपल्याजवळ जे काही आहे त्यातून आपण आपल्या बांधवांच्या गरजा भागवू शकतो. मासेदोनियातील ख्रिस्ती बांधवांच्या बाबतीत पौलाने असे लिहिले: “संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्‌य, ह्‍यामध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्‍तीप्रमाणे व शक्‍तीपलीकडेहि आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की, [यहूदियातील] पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.” (२ करिंथ. ८:२-४) मासेदोनियातील हे ख्रिस्ती स्वतः गरीब असले तरी त्यांचे मन मोठे होते. यहूदियातील आपल्या गरजू बांधवांना मदत करणे हा त्यांच्या दृष्टीने एक बहुमान होता.

१३. ‘आतिथ्य करण्यात तत्पर असण्याचा’ काय अर्थ होतो?

१३ “आतिथ्य करण्यात तत्पर असा” हा वाक्यांश, उत्सुक असणे असा अर्थ असलेल्या एका ग्रीक संज्ञेचे भाषांतर आहे. द न्यू जेरूसलेम बायबल यात “आतिथ्य करण्याची संधी शोधा” असे या संज्ञेचे भाषांतर करण्यात आले आहे. कधीकधी, आदरातिथ्य करण्यासाठी आपण एखाद्याला जेवणाचे आमंत्रण देतो. आणि त्या व्यक्‍तीबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यासाठी असे करणे ही निश्‍चितच एक चांगली गोष्ट आहे. पण आदरातिथ्य करण्याचा हा एकमेव मार्ग नाही. आपण उत्सुक असल्यास, आदरातिथ्य करण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत असे आपल्याला आढळेल. उदाहरणार्थ, आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा प्रकृतीमुळे इतरांना जेवायला बोलवणे आपल्याला शक्य नसल्यास साधा चहा, कॉफी किंवा सरबत घेण्यासाठी आपण त्यांना आपल्या घरी बोलवू शकतो. हासुद्धा आतिथ्य करण्याचा एक मार्ग आहे.

१४. (क) “आतिथ्य” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द कोणत्या शब्दांपासून बनला आहे? (ख) परदेशीयांना मदत करण्यासाठी आपण उत्सुक आहोत हे आपल्याला सेवाकार्यात कशा प्रकारे दाखवता येईल?

१४ आतिथ्य करणे हे आपल्या मनोवृत्तीशी संबंधित आहे. “आतिथ्य” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द “प्रेम” आणि “अनोळखी व्यक्‍ती” या शब्दांपासून बनलेला आहे. अनोळखी व्यक्‍ती किंवा परदेशीयांबद्दल आपली कशी मनोवृत्ती आहे? जे बांधव आपल्या मंडळीच्या क्षेत्रात राहायला आलेल्या परदेशीयांना सुवार्ता सांगण्यासाठी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात ते खरोखरच आतिथ्य करण्यात तत्पर आहेत असे म्हणता येईल. अर्थात, सर्वांनाच नवीन भाषा शिकणे कदाचित शक्य नसेल. तरीपण, बायबलमधील संदेश अनेक भाषांत असलेल्या सर्व राष्ट्रांतील लोकांकरता सुवार्ता या पुस्तिकेचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याद्वारे आपण सर्व जण परदेशीयांना मदत करण्यात सहभाग घेऊ शकतो. या पुस्तिकेचा वापर केल्यामुळे तुम्हाला सेवाकार्यात काही चांगले परिणाम दिसून आले आहेत का?

एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे

१५. रोमकर १२:१५ यात दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याच्या बाबतीत येशूने कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले?

१५रोमकर १२:१५ वाचा. या वचनात पौलाने जो सल्ला दिला त्याचा दोन शब्दांत सारांश देता येईल: सहानुभूती दाखवा. इतर जण आनंदी असोत किंवा दुःखी, आपण त्यांच्या भावना समजून घ्यायला व त्यांत सहभागी व्हायला शिकले पाहिजे. आत्म्यात आवेशी असल्यास आपण त्यांच्या आनंदात सामील आहोत किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटते हे आपल्या वागण्याबोलण्यातून दिसून येईल. ख्रिस्ताचे ७० शिष्य प्रचार मोहिमेवरून परत आले आणि त्यांच्या कार्यामुळे साध्य झालेल्या चांगल्या परिणामांबद्दल आनंदाने सांगू लागले तेव्हा येशूही “पवित्र आत्म्यात उल्लसित” झाला. (लूक १०:१७-२१) तो त्यांच्या आनंदात सहभागी झाला. दुसरीकडे पाहता, येशूचा मित्र लाजर याचा मृत्यू झाला तेव्हा त्यानेही ‘शोक करणाऱ्‍यांबरोबर शोक केला.’—योहा. ११:३२-३५.

१६. आपण आपल्या बांधवांच्या सुखदुःखात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो आणि खासकरून कोणी असे केले पाहिजे?

१६ सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत आपण येशूचे अनुकरण केले पाहिजे. आपल्या बांधवाला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला असेल, तर आपणही त्याच्या आनंदात सामील झाले पाहिजे. पण, त्याच वेळी आपल्या बंधूभगिनींना अनुभवावे लागणारे दुःख व निराशा यांचीही आपण जाणीव ठेवली पाहिजे. सहसा, दुःखी किंवा निराश असलेल्या आपल्या बांधवांबद्दल सहानुभूती दाखवून नुसतेच त्यांचे ऐकून घेतले तरी आपण त्यांचे दुःख बरेच हलके करू शकतो. कधीकधी तर, त्यांचे दुःख पाहून आपल्याला इतके वाईट वाटते की आपल्याला अश्रू आवरता येत नाहीत. (१ पेत्र १:२२) खासकरून मंडळीतील वडिलांनी, सहानुभूती दाखवण्याविषयी पौलाने दिलेल्या या सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१७. रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायातून आतापर्यंत आपल्याला काय शिकायला मिळाले आणि पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१७ रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायातून ज्या वचनांचे आतापर्यंत आपण परीक्षण केले, त्यांतून आपल्याला ख्रिस्ती या नात्याने आपल्या वैयक्‍तिक जीवनात, तसेच आपल्या बांधवांसोबत व्यवहार करताना पालन करता येईल असे मार्गदर्शन मिळाले आहे. पुढील लेखात आपण या अध्यायातील उर्वरीत वचनांचे परीक्षण करू. ख्रिस्ती मंडळीच्या बाहेरील लोकांबद्दल, तसेच आपला विरोध व छळ करणाऱ्‍यांबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगावा व त्यांच्याशी कसे वागावे याविषयी आपल्याला या वचनांतून मार्गदर्शन मिळेल.

उजळणी

• आपण “आत्म्यात आवेशी” आहोत हे कसे दाखवू शकतो?

• देवाची सेवा करताना नम्र असणे आणि आपल्या मर्यादांची जाणीव राखणे का महत्त्वाचे आहे?

• आपण कोणकोणत्या मार्गांनी आपल्या बांधवांबद्दल सहानुभूती दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४ पानांवरील चित्रे]

या ख्रिस्ती कार्यांत आपण का सहभाग घेतो?

[६ पानांवरील चित्र]

परदेशीयांना देवाच्या राज्याबद्दल शिकून घेण्यास मदत करण्यात आपण सर्व जण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो?