वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
येशूने १२ प्रेषितांना प्रचार करण्यासाठी पाठवले तेव्हा त्याने त्यांना सोबत काठी घेण्यास व वहाणा घालण्यास सांगितले होते का?
काहींचे असे म्हणणे आहे, की येशूने त्याच्या प्रेषितांना प्रचार करण्यास पाठवले याबद्दलचे शुभवर्तमानातील तिन्ही अहवाल परस्परविरोधी आहेत. या अहवालांची तुलना केल्यावर आपण एका लक्षवेधक निष्कर्षावर पोहचू शकतो. सर्वप्रथम, मार्क व लूक यांनी जे लिहिले त्याची तुलना करा. मार्कचा अहवाल म्हणतो: “[येशूने] त्यांस आज्ञा केली की, वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका; भाकरी, झोळणा, किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वहाणा घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.” (मार्क ६:७-९) लूकने असे नमूद केले: “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी, झोळी, भाकरी, किंवा पैका घेऊ नका; अंगरखेहि दोन दोन घेऊ नका.” (लूक ९:१-३) हे दोन अहवाल परस्परविरोधी असल्याचे आपल्याला वाटेल. मार्कच्या अहवालानुसार प्रेषितांनी आपल्यासोबत काठी घ्यायची होती व वहाणा घालायच्या होत्या. पण, लूकचा अहवाल म्हणतो, की त्यांनी सोबत काहीच घ्यायचे नव्हते, काठीसुद्धा नाही. मार्कने वहाणांचा उल्लेख केला, पण लूकने तो केला नाही.
येशूला या प्रसंगी काय सांगायचे होते हे समजण्यासाठी आपण तिन्ही शुभवर्तमानांमध्ये दिलेल्या समान माहितीचे परीक्षण करू या. वर उल्लेखित अहवालांमध्ये, तसेच मत्तय १०:५-१० मधील अहवालात, प्रेषितांना “दोन अंगरखे” घालू नका किंवा घेऊ नका असे सांगण्यात आले होते. प्रत्येक प्रेषिताने एक अंगरखा घातलाच होता. तेव्हा, वाटेसाठी त्यांनी दुसरा अंगरखा घ्यायचा नव्हता. तसेच, त्यांनी वहाणाही घातल्या होत्या. त्यामुळे त्यांनी वाटेसाठी वहाणांचा आणखी एक जोड सोबत घ्यायचा नव्हता असे मार्क म्हणत होता. पण, काठीबद्दल काय? द ज्यूइश एन्सायक्लोपीडिया यात असे म्हटले आहे: “प्राचीन हिब्रू लोकांमध्ये हातात काठी घेण्याची सर्वसामान्य रीत होती असे दिसते.” (उत्प. ३२:१०) येशूने प्रेषितांना आज्ञा दिली तेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या काठीवाचून त्यांनी “वाटेसाठी दुसरे काही” घ्यायचे नव्हते असा मार्कने उल्लेख केला. त्यामुळेच, वाटेसाठी जास्त वस्तू घेण्यात प्रेषितांनी आपला वेळ खर्च करू नये या येशूच्या सूचनेवर शुभवर्तमानांचे लेखक जोर देत होते.
या मुद्द्यावर मत्तयने आणखी जोर दिला, कारण येशूने प्रेषितांना ही आज्ञा दिली तेव्हा तो स्वतः तेथे उपस्थित होता व त्याने तो अहवाल नमूद केला. येशूने म्हटले: “सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका; वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे.” (मत्त. १०:९, १०) पण, प्रेषितांनी घातलेल्या वहाणांचे व त्यांच्या हातात असलेल्या काठ्यांचे काय? प्रेषितांजवळ आधीपासूनच असलेल्या या वस्तू त्यांनी फेकून द्याव्यात असे येशूने म्हटले नाही, तर अशा प्रकारच्या आणखी वस्तू त्यांनी घेऊ नयेत असे येशू त्यांना सांगत होता. येशूने अशी आज्ञा का दिली? कारण, “कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे.” हाच येशूच्या आज्ञेचा मुख्य मुद्दा होता, जो त्याने डोंगरावरील प्रवचनात दिलेल्या सल्ल्याच्या एकवाक्यतेत होता. त्या वेळी त्याने म्हटले होते, की काय खावे, काय प्यावे किंवा काय घालावे याची चिंता करत बसू नका.—मत्त. ६:२५-३२.
शुभवर्तमानातील अहवाल पहिल्यांदा वाचताना ते परस्परविरोधी वाटत असले, तरी ते सर्व एकच मुद्दा सांगत होते. प्रेषितांनी आहे तसेच जायचे होते. त्यांनी आणखी जास्त वस्तू घेऊन विकर्षित व्हायचे नव्हते. का? कारण यहोवा त्यांच्या गरजा भागवणार होता.