व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंडळीतील वृद्ध बांधवांचा आदर करा

मंडळीतील वृद्ध बांधवांचा आदर करा

“वृद्धाला मान दे.”—लेवी. १९:३२.

१. आज मानवांना कोणत्या दुःखद परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे?

म्हातारपणात येणाऱ्या दुःखदायक समस्यांना मानवांनी तोंड द्यावे असा यहोवाचा मुळीच उद्देश नव्हता. उलट, त्याची अशी इच्छा होती की मानवांनी पृथ्वीवरील नंदनवनात परिपूर्ण आरोग्याचा आनंद लुटावा. पण आज “सबंध सृष्टी . . . कण्हत आहे व वेदना भोगत आहे.” (रोम. ८:२२) मानवांना पापामुळे झालेले दुष्परिणाम भोगावे लागत आहेत हे पाहून देवाला किती दुःख होत असेल याची कल्पना करा. शिवाय, जीवनाच्या ज्या काळात इतरांच्या साहाय्याची सर्वात जास्त गरज असते त्याच काळात, म्हणजे वृद्धापकाळात बऱ्याच जणांकडे दुर्लक्ष केले जाते.—स्तो. ३९:५; २ तीम. ३:३.

२. खरे ख्रिस्ती वृद्धांची कदर का करतात?

यहोवाचे लोक त्यांच्या मंडळ्यांमध्ये असलेल्या वृद्ध बंधुभगिनींबद्दल कृतज्ञ आहेत. या अनुभवी व सुज्ञ बांधवांकडून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते आणि त्यांच्या विश्वासूपणाच्या उदाहरणामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. या प्रिय वृद्ध बंधुभगिनींपैकी एक किंवा अनेक जण कदाचित आपले कौटुंबिक सदस्य किंवा नातलग असतील. पण ते आपल्या नात्यात असोत वा नसोत, आपण या वृद्ध बंधुभगिनींना साहाय्य करण्यास प्रयत्नशील असतो. (गलती. ६:१०; १ पेत्र १:२२) आता आपण वृद्धांबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे याचे परीक्षण करू या. असे केल्यामुळे आपल्या सर्वांना बरेच काही शिकायला मिळेल. तसेच, आपल्या या प्रिय वृद्ध बांधवांची काळजी घेण्याबाबत कुटुंबातील सदस्यांसोबतच मंडळीतील बांधवांच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत यावरही आपण चर्चा करू या.

 “माझा त्याग करू नको”

३, ४. (क) स्तोत्र ७१ च्या लेखकाने यहोवाला कोणती विनंती केली? (ख) मंडळीतील वृद्धजन देवाकडे कोणती विनंती करू शकतात?

“उतारवयात माझा त्याग करू नको; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नको.” देवाच्या प्रेरणेने स्तोत्र ७१:९ यातील शब्द लिहिणाऱ्या लेखकाने अशी कळकळीची विनंती देवाजवळ केली. हे स्तोत्र, ७० व्या स्तोत्राचाच पुढील भाग आहे असे दिसते. ७० व्या स्तोत्राच्या सुरुवातीला ‘दाविदाचे स्तोत्र’ असे लिहिलेले आढळते. त्याअर्थी, स्तोत्र ७१:९ यातील विनंती दाविदाने केली असावी. दाविदाने अगदी तरुण वयापासून वृद्ध होईपर्यंत यहोवाची सेवा केली होती आणि यहोवाने अनेक पराक्रम करण्यासाठी त्याचा उपयोग केला होता. (१ शमु. १७:३३-३७, ५०; १ राजे २:१-३, १०) असे असूनही, दाविदाने यहोवाला विनंती केली की यहोवाची कृपा पुढेही त्याच्यावर टिकून राहावी.—स्तोत्र ७१:१७, १८ वाचा.

आज बरेच जण दाविदाच्या स्थितीत आहेत. वय वाढलेले असूनही आणि म्हातारपणाचे “अनिष्ट दिवस” त्यांच्यावर आलेले असूनही ते आपल्या शक्तिनुसार आजही देवाची स्तुती करत आहेत. (उप. १२:१-७) जीवनाच्या विविध क्षेत्रांत, तसेच ख्रिस्ती सेवेत पूर्वी ते जितके कार्य करायचे तितके कार्य करणे त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना आता जमत नाही. पण, दाविदाप्रमाणे तेसुद्धा यहोवाला विनंती करू शकतात की त्याची कृपा पुढेही त्यांच्यावर राहावी आणि त्याने त्यांचा सांभाळ करावा. विश्वासू वृद्धजन याची खात्री बाळगू शकतात की यहोवा नक्कीच त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देईल. कारण, त्यांच्या या प्रार्थनांतून व्यक्त होणाऱ्या रास्त अपेक्षा दाविदानेही देवाच्या प्रेरणेने व्यक्त केल्या होत्या.

५. विश्वासू वृद्धजनांकडे यहोवा कोणत्या दृष्टीने पाहतो?

बायबल अगदी स्पष्टपणे दाखवून देते की विश्वासू वृद्धजनांना यहोवा खूप मौल्यवान लेखतो आणि आपल्या सेवकांनीही या ज्येष्ठांचा आदर करावा अशी तो अपेक्षा करतो. (स्तो. २२:२४-२६; नीति. १६:३१; २०:२९) लेवीय १९:३२ यात असे म्हटले आहे, “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.” हे शब्द लिहिण्यात आले त्या काळात मंडळीतील वृद्धजनांचा आदर करणे ही देवाच्या सेवकांची एक गंभीर जबाबदारी होती आणि आजही आहे. पण दैनंदिन जीवनात या वृद्धांची काळजी घेण्याबाबत काय? ही कोणाची जबाबदारी आहे?

कुटुंबाची जबाबदारी

६. आईवडिलांची काळजी घेण्याबाबत येशूने कोणते उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे?

देवाचे वचन आपल्याला असे सांगते: “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख.” (निर्ग. २०:१२; इफिस. ६:२) येशूनेही या आज्ञेचे महत्त्व दाखवून दिले. आईवडिलांची काळजी घेण्यास नकार देणाऱ्या शास्त्री व परुशी लोकांना त्याने दोषी ठरवले. (मार्क ७:५, १०-१३) याबाबतीत येशूने स्वतः एक अनुकरणीय उदाहरण आपल्यासमोर ठेवले. उदाहरणार्थ, वधस्तंभावर शेवटच्या घटका मोजत असताना येशूने त्याची आई, जी तोपर्यंत विधवा झाली होती, तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपला प्रिय शिष्य योहान याच्यावर सोपवली.—योहा. १९:२६, २७.

७. (क) आईवडिलांची काळजी घेण्याबाबत प्रेषित पौलाने काय सांगितले? (ख) पौलाने लिहिलेल्या शब्दांच्या आधीच्या वचनांत तो कशाविषयी चर्चा करत होता?

प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले की खऱ्या ख्रिस्ती उपासकांनी आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवल्या पाहिजेत. (१ तीमथ्य ५:४, ८, १६ वाचा.) पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या या शब्दांच्या आधीच्या काही वचनांतील माहिती विचारात घ्या. मंडळीकडून आर्थिक साहाय्य मिळवण्यास कोण पात्र ठरू शकतात किंवा ठरू शकत नाहीत यासंबंधी पौल त्या ठिकाणी चर्चा करत होता. त्याने अगदी स्पष्टपणे सांगितले की वयोवृद्ध विधवांची काळजी घेण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने त्यांची मुले, नातवंडे आणि इतर नातेवाईक यांनी पार पाडली पाहिजे. अशा रीतीने आर्थिक दृष्ट्या मंडळीवर अतिरिक्त भार येणार नाही. त्याच प्रकारे आजदेखील ख्रिस्ती आपल्या गरजू नातेवाइकांची आर्थिक दृष्ट्या काळजी घेतात. ही जबाबदारी त्यांच्या उपासनेशी संबंधित आहे.

८. वृद्ध आईवडिलांची काळजी नेमकी कशी घेतली जावी याबाबत बायबलमध्ये कोणतेही विशिष्ट पर्याय सुचवलेले नाहीत हे सुज्ञपणाचे का आहे?

साध्यासोप्या शब्दांत सांगायचे तर आपल्या आईवडिलांच्या गरजा पूर्ण करणे हे प्रौढ ख्रिस्ती मुलांचे कर्तव्य आहे. पौल या ठिकाणी प्रामुख्याने ‘विश्वासात असलेल्या नातेवाइकांच्या’ संदर्भात बोलत असला, तरी सत्यात नसलेल्या आईवडिलांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. मुले नेमक्या कशा प्रकारे आपल्या आईवडिलांची काळजी घेतात हे प्रत्येक कुटुंबावर अवलंबून आहे. कारण प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते. तसेच,  कुटुंबातील सदस्यांच्या गरजा, स्वभाव आणि प्रकृती वेगवेगळी असू शकते. काही वृद्धजनांना अनेक मुले असतात तर काहींना फक्त एक मूल असते. काही जण सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरवल्या जाणाऱ्या सोयीसवलतींचा फायदा घेऊ शकतात, तर काहींना त्या उपलब्ध नसतात. तसेच, प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीदेखील वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे, जे आपल्या कुटुंबातील वृद्धजनांची काळजी घेण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत त्यांची टीका करणे हे समजूतदारपणाचे तसेच प्रेमळपणाचेही ठरणार नाही. शेवटी, बायबल तत्त्वांच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर यहोवाचा आशीर्वाद असतो आणि त्यास तो सफल करू शकतो. जसे मोशेच्या दिवसांत हे खरे होते, तसेच आजही आहे.—गण. ११:२३.

९-११. (क) काही जणांसमोर कोणती कठीण परिस्थिती येऊ शकते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) प्रौढ मुलांनी आपली पूर्णवेळेची सेवा सोडण्याची घाई का करू नये? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

आईवडील व मुले एकमेकांपासून बऱ्याच लांब अंतरावर राहत असतात, तेव्हा वृद्ध आईवडिलांना साहाय्य करणे व त्यांची काळजी घेणे हे मुलांसाठी आव्हान ठरू शकते. आईवडील अचानक आजारी पडले, खाली पडल्यामुळे त्यांचे हाड मोडले किंवा इतर समस्या निर्माण झाली तर मुलांना आईवडिलांच्या मदतीला धावून जावे लागेल. त्यानंतर, कदाचित काही काळासाठी किंवा बऱ्याच काळासाठी आईवडिलांची काळजी घेण्याकरता त्यांच्याजवळ राहण्याची गरज पडू शकते. *

१० देवाच्या सेवेतील नेमणुकांमुळे घरापासून बऱ्याच दूरच्या ठिकाणी राहत असलेल्या पूर्णवेळेच्या सेवकांवर काही वेळा अतिशय कठीण निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. बेथेल सेवा, मिशनरी सेवा किंवा प्रवासी कार्य करत असलेल्या सर्वांनाच त्यांची नेमणूक प्रिय असते; हा यहोवाकडील एक आशीर्वाद आहे असे त्यांना वाटते. पण, आईवडील आजारी पडल्यास, ‘आपण पूर्णवेळेची सेवा सोडून आईवडिलांची काळजी घेण्यासाठी घरी गेलं पाहिजे’ असा निष्कर्ष ते लगेच काढू शकतात. अशा परिस्थितीत, आपल्या आईवडिलांना खरोखर कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे किंवा आईवडिलांची इच्छा काय आहे याचा प्रार्थनापूर्वक विचार करणे सुज्ञपणाचे ठरेल. कोणीही देवाच्या सेवेतील विशेषाधिकार सोडून देण्याची घाई करू नये आणि खरेतर असे करण्याची गरज असेलच असे नाही. कदाचित आईवडिलांचे आजारपण हे फारसे गंभीर नसेल आणि त्यांच्या मंडळीतील काही बांधव त्यांना तात्पुरत्या काळासाठी मदत करण्यास आनंदाने तयार होतील.—नीति. २१:५.

११ घरापासून बऱ्याच दूरच्या ठिकाणी सेवा करत असलेल्या दोन सख्ख्या भावांचे उदाहरण विचारात घ्या. त्यांपैकी एक भाऊ दक्षिण अमेरिकेत मिशनरी सेवा करत होता, तर दुसरा ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे संस्थेच्या जागतिक मुख्यालयात काम करत होता. या भावांच्या वृद्ध आईवडिलांना मदतीची गरज होती. त्यांना कोणती मदत पुरवता येईल व ती कशी पुरवता येईल हे ठरवण्यासाठी दोन्ही मुले आपल्या पत्नींसोबत पूर्वेकडील देशात राहत असलेल्या आपल्या आईवडिलांना भेटायला गेली. काही काळाने, दक्षिण अमेरिकेत सेवा करत असलेला मुलगा व त्याची पत्नी आपली नेमणूक सोडून घरी परतण्याविषयी विचार करू लागले. त्याच दरम्यान त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या मंडळीतील वडील वर्गाच्या संयोजकाचा फोन आला. तेथील वडिलांनी या समस्येबद्दल चर्चा केली होती आणि त्यांची अशी इच्छा होती की या मिशनरी जोडप्याने शक्य होईल तोपर्यंत आपली पूर्णवेळेची सेवा सुरूच ठेवावी. हे जोडपे करत असलेल्या सेवेची त्या वडिलांना कदर होती आणि त्यांच्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी जी काही मदत लागेल ती पुरवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. वडिलांच्या या प्रेमळ कृत्याबद्दल त्या कुटुंबातील सर्वांना अतिशय कृतज्ञ वाटले.

१२. आईवडिलांची काळजी घेण्याबाबत कोणताही निर्णय घेताना एका ख्रिस्ती कुटुंबाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे?

१२ वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याबाबत एका ख्रिस्ती कुटुंबाने कोणताही निर्णय घेतला, तरी त्यांच्या निर्णयामुळे यहोवाच्या नावाचा अनादर होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. येशूच्या काळातील धर्मपुढाऱ्यांप्रमाणे आपण कधीही आपल्या आईवडिलांची काळजी घेण्याच्या जबाबदारीपासून अंग चोरू नये. (मत्त. १५:३-६) आपण घेतलेल्या निर्णयांमुळे देवाला आणि ख्रिस्ती मंडळीला सन्मान मिळावा अशी आपली इच्छा आहे.—२ करिंथ. ६:३.

मंडळीची जबाबदारी

१३, १४. मंडळ्यांनी वृद्ध बांधवांची काळजी घेण्यास उत्सुक असले पाहिजे असा निष्कर्ष आपण कोणत्या शास्त्रवचनांच्या आधारावर काढू शकतो?

१३ वरती सांगितल्याप्रमाणे पूर्णवेळेच्या सेवकांना साहाय्य करणे कदाचित सर्वांनाच शक्य होणार नाही. पण, पहिल्या  शतकात निर्माण झालेल्या एका समस्येवरून हे स्पष्ट होते की मंडळ्यांनी विश्वासात सुदृढ असलेल्या वृद्ध बंधुभगिनींची काळजी घेण्यास उत्सुक असले पाहिजे. बायबलमध्ये जेरूसलेममधील मंडळीबद्दल असे म्हटले आहे, की “त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते.” या मंडळीतील सर्व जण श्रीमंत होते असा याचा अर्थ होत नाही. खरेतर काही जणांकडे फारशी धनसंपत्ती नव्हती. पण, “ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.” (प्रे. कृत्ये ४:३४, ३५) काही काळाने, या मंडळीत एक समस्या निर्माण झाली. अन्नसामग्रीच्या रोजच्या वाटणीत काही विधवांकडे दुर्लक्ष केले जात आहे असे प्रेषितांच्या कानावर आले. त्यामुळे, प्रेषितांनी काही सुयोग्य बांधवांची नेमणूक करण्याची आज्ञा दिली. या बांधवांनी सर्व विधवांना पुरेशी अन्नसामग्री मिळेल आणि कोणताही पक्षपात केला जाणार नाही याची खात्री केली. (प्रे. कृत्ये ६:१-५) दररोज अन्नसामग्रीचे वाटप करण्याची ही व्यवस्था खरेतर एक तात्पुरती व्यवस्था होती. इ.स. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जे ख्रिस्ती बनले होते आणि आध्यात्मिक रीत्या आणखी दृढ होण्याच्या हेतूने जे पुढेही जेरूसलेममध्येच राहिले होते त्या बांधवांसाठी ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. असे असले, तरी वर उल्लेख केलेली समस्या सोडवण्यासाठी प्रेषितांनी ज्या प्रकारे लगेच पावले उचलली त्यावरून हेच दिसून येते की गरजू सदस्यांची काळजी घेण्यासाठी ख्रिस्ती मंडळीदेखील हातभार लावू शकते.

१४ याआधी सांगितल्याप्रमाणे, कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ती विधवा मंडळीकडून आर्थिक साहाय्य मिळवण्यास पात्र ठरू शकतील यासंबंधी पौलाने तीमथ्याला काही सूचना दिल्या होत्या. (१ तीम. ५:३-१६) त्याच प्रकारे बायबलचा एक देवप्रेरित लेखक याकोब यानेही असे लिहिले की अनाथ, विधवा, इतर संकटांना तोंड देणाऱ्या अथवा गरजू बांधवांची काळजी घेणे हे एका ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य आहे. (याको. १:२७; २:१५-१७) तसेच, प्रेषित योहानानेही असा तर्क केला की “जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार?” (१ योहा. ३:१७) जर गरजू बांधवांना साहाय्य करण्याची प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीवर जबाबदारी आहे, तर मग मंडळ्यांवरही ही जबाबदारी नाही का?

एखादी दुर्घटना घडल्यास, मंडळीतील बांधव कशा प्रकारे साहाय्य करू शकतात? (परिच्छेद १५, १६ पाहा)

१५. वृद्ध बंधू व भगिनींची काळजी घेण्यात कोणत्या गोष्टी गोवलेल्या आहेत?

१५ काही देशांत, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून निवृत्तिवेतन, कल्याण योजना, आणि घरी येऊन काळजी घेणारे परिचारक यांसारख्या सोयीसवलती पुरवल्या जातात. (रोम. १३:६) इतर देशांत अशा कोणत्याही सेवा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे, नातेवाइकांकडून व मंडळीकडून वृद्ध बंधू व भगिनींसाठी कितपत मदत पुरवण्याची गरज आहे हे त्यांच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर विश्वासात असलेली मुले वृद्ध आईवडिलांपासून बऱ्याच दूरच्या ठिकाणी राहत असतील तर मग त्यांना आपल्या आईवडिलांना कितपत मदत करता येईल यावर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत असलेल्या प्रौढ मुलांनी आपल्या आईवडिलांच्या मंडळीतील वडिलांशी याबाबत मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे जेणेकरून कुटुंबाच्या परिस्थितीबद्दल त्या सर्वांना कल्पना येईल. उदाहरणार्थ, मंडळीतील वडील सरकारकडून किंवा इतर सामाजिक संस्थांकडून कोणत्या स्थानिक तरतुदी वृद्धांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, याविषयी जाणून घेण्यास  आणि त्यांपासून फायदा करून घेण्यास वृद्ध आईवडिलांना साहाय्य करू शकतात. तसेच, वृद्ध आईवडिलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या काही समस्या वडिलांच्या लक्षात येऊ शकतात. उदाहरणार्थ, पोस्टाने आलेली बिले न उघडता तशीच राहत असतील किंवा औषधे योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने घेतली जात नसतील. अशा समस्यांबाबत वडील लांब राहणाऱ्या मुलांना माहिती देऊ शकतात. जेव्हा मुले व वृद्ध आईवडिलांच्या मंडळीतील वडील यांच्यामध्ये चांगले हेतू बाळगून व प्रेमळपणे अशा माहितीची देवाणघेवाण केली जाते, तेव्हा समस्या आणखी वाढण्याचे टाळता येते आणि व्यवहारात आणण्याजोगे उपाय शोधून काढणे शक्य होते. अशा रीतीने, वृद्ध आईवडिलांच्या जवळपास राहणाऱ्या बांधवांनी त्यांच्या मुलांच्या गैरहजेरीत त्यांना मदत केल्यास आणि मुलांना त्यांच्या नेमक्या परिस्थितीची माहिती दिल्यास त्या कुटुंबाच्या चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतील.

१६. काही ख्रिस्ती बांधव मंडळीतील वृद्धजनांना कशी मदत करतात?

१६ आपल्या प्रिय वृद्ध बांधवांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीमुळे काही ख्रिस्ती बांधव त्यांना होईल ते साहाय्य करण्यासाठी आपला वेळ व शक्ती खर्च करायला स्वेच्छेने पुढे येतात. ते मंडळीतील वृद्ध बांधवांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न करतात. काही बांधव मंडळीतील इतर सदस्यांसोबत कामे वाटून घेतात आणि आळीपाळीने वृद्धांना मदत करतात. आपल्या परिस्थितीमुळे जरी आपल्याला पूर्णवेळेची सेवा करणे शक्य नसले, तरी ज्यांनी ही सेवा निवडली आहे अशा बांधवांच्या वृद्ध आईवडिलांना साहाय्य करण्याद्वारे त्यांना जास्तीत जास्त काळ त्यांच्या सेवेत टिकून राहण्यास ते मदत करतात. खरोखर, हे बांधव किती प्रशंसनीय मनोवृत्ती दाखवतात! अर्थात, या बांधवांच्या उदार मनोवृत्तीमुळे मुले आपल्या आईवडिलांची काळजी घेण्याच्या जबाबदारीतून मुक्त होत नाहीत. त्यांनी जमेल त्या मार्गाने आपल्या आईवडिलांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

वृद्ध बांधवांना मान द्या सांत्वनदायक शब्दांनी

१७, १८. वृद्धजनांची काळजी घेताना समजूतदार मनोवृत्ती का महत्त्वाची आहे?

१७ वृद्धांची काळजी घेण्यात सहभाग घेणारे सर्व जण त्यांना आनंद वाटेल अशा पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करू शकतात. जर तुमचाही यात सहभाग असेल, तर नेहमी सकारात्मक मनोवृत्ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. उतारवयात कधीकधी नकारात्मक भावना किंवा नैराश्यदेखील येऊ शकते. त्यामुळे, वृद्ध बंधुभगिनींना प्रोत्साहन मिळेल अशा रीतीने त्यांच्याशी बोलण्याद्वारे त्यांचा आदर करण्याचा व त्यांचे मनोबल वाढवण्याचा खास प्रयत्न तुम्हाला करावा लागू शकतो. ज्या वृद्ध बांधवांनी अनेक वर्षांपासून यहोवाची समर्पित सेवा केली आहे त्यांची तुम्ही प्रशंसा करू शकता. तुम्ही त्यांना याची आठवण करून देऊ शकता की यहोवा किंवा त्यांचे ख्रिस्ती बांधवदेखील त्यांनी केलेली सेवा कधीही विसरणार नाहीत.—मलाखी ३:१६; इब्री लोकांस ६:१० वाचा.

१८ दैनंदिन स्वरूपात वृद्धांची काळजी घेण्यासाठी केलेल्या काही व्यवस्था त्रासदायक वाटू शकतात. पण वृद्धजन आणि त्यांची काळजी घेणारेदेखील जेव्हा समजूतदारपणे व विनोदबुद्धीने परिस्थिती हाताळतात तेव्हा त्यांना हे काहीसे सोपे जाऊ शकते. (उप. ३:१, ४) बरेच वृद्ध बांधव अवाजवी अपेक्षा न बाळगण्याची काळजी घेतात. ते ही जाणीव बाळगतात की त्यांच्या समजूतदार मनोवृत्तीमुळे इतर जण त्यांच्याकडे लक्ष देण्यास व त्यांना भेटी देण्यास जास्त उत्सुक असतील. बऱ्याच वेळा वृद्ध बांधवांना भेटायला जाणारे असे म्हणतात, की “मी त्या वृद्ध बांधवाला प्रोत्साहन देण्यासाठी गेलो, पण उलट मलाच त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं.”—नीति. १५:१३; १७:२२.

१९. भविष्याबाबत तरुण व वृद्ध कोणता दृष्टिकोन बाळगू शकतात?

१९ आपण त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, जेव्हा सर्व दुःखे आणि अपरिपूर्णतेचे दुष्परिणाम नाहीसे होतील. पण तोपर्यंत देवाच्या सेवकांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेवर आपली दृष्टी केंद्रित केली पाहिजे. देवाच्या अभिवचनांवरील विश्वास आपल्याला कठीण व दुःखदायक परिस्थितीला तोंड देण्यास साहाय्य करतो. म्हणूनच पौलाने म्हटले, “आम्ही थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे.” (२ करिंथ. ४:१६-१८, पं.र.भा.; इब्री ६:१८, १९) पण, वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी, देवाच्या अभिवचनांवर दृढ विश्वास बाळगण्यासोबतच तुम्हाला आणखी कशामुळे मदत मिळू शकेल? पुढील लेखात या संदर्भात काही उपयोगी सूचनांवर आपण चर्चा करू.

^ परि. 9 काळजी घेण्याबाबत मुलांना व वृद्ध आईवडिलांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी पुढील लेखात चर्चा केली आहे.