व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—रशियामध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—रशियामध्ये

सन १९९१ मध्ये रशियातील साक्षीदारांच्या कार्यावर अनेक वर्षांपासून असलेली बंदी उठवण्यात आली आणि त्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. यामुळे तिथल्या साक्षीदारांच्या आनंदाला सीमा उरली नाही. पुढं त्या देशातील प्रचारकांची संख्या दहा पटीनं वाढून, १,७०,००० च्या घरात जाईल अशी कल्पनाही तेव्हा कोणी केली नव्हती. या प्रचारकांमध्ये दुसऱ्या देशांतून आलेले बरेच राज्य प्रचारक आहेत. हे प्रचारक रशियात येऊन आध्यात्मिक कापणीच्या कार्यात हातभार लावण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. (मत्त. ९:३७, ३८) चला तर मग त्यांच्यापैकी काहींची थोडी ओळख करून घेऊ या.

स्वेच्छेनं पुढं आलेल्या बांधवांची मंडळ्यांना मदत

रशियातील बंदी उठवण्यात आली त्या वर्षी ग्रेट ब्रिटनमध्ये राहणारे मॅथ्यू २८ वर्षांचे होते. त्या वर्षी झालेल्या एका अधिवेशनात पूर्व युरोपमधील मंडळ्यांना मदतीची गरज आहे असं सांगण्यात आलं. यामध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील एका मंडळीचादेखील वक्त्यानं उल्लेख केला. तिथल्या मंडळीत एकही वडील नव्हते आणि फक्त एक सेवा सेवक मंडळीची काळजी घेत होता. पण, तरी तिथले प्रचारक शेकडो बायबल अभ्यास चालवत होते! मॅथ्यू आठवून सांगतात “ते भाषण ऐकल्यानंतर रशियाचा विचार माझ्या डोक्यातून जातच नव्हता. तिथं जाण्याच्या माझ्या इच्छेबद्दल मी प्रार्थनेत यहोवाला सांगितलं.” रशियाला जाता यावं म्हणून त्यांनी थोडे पैसे जमवले, आपली बरीचशी मालमत्ता विकली आणि १९९२ साली ते रशियात राहायला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांना कोणता अनुभव आला?

मॅथ्यू

मॅथ्यू म्हणतात, “तिथली भाषा समजून घेणंच माझ्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. त्यामुळे आध्यात्मिक विषयावर एखाद्याशी चांगली चर्चा करणं मला जमत नव्हतं.” त्यांच्यापुढं आणखी एक समस्या होती. ती म्हणजे राहण्यासाठी एक ठिकाण शोधणं. ते म्हणतात, “मी आजपर्यंत इतकी घरं बदललीत, की आता मी नेमकी किती घरं बदलली हेच माझ्या लक्षात नाही.” सुरवातीला जरी अशा अडचणी असल्या तरी मॅथ्यू म्हणतात, “रशियाला येण्याचा माझा निर्णय मी आजपर्यंत घेतलेला सर्वात चांगला निर्णय होता. इथं सेवा केल्यामुळे यहोवावर पूर्णपणे विसंबून राहायला मी शिकलो आणि प्रत्येक वेळी तो मला मार्गदर्शन देत गेला.” नंतर मॅथ्यू यांना वडील आणि खास पायनियर म्हणून नियुक्त करण्यात आलं. आता ते सेंट पीटर्सबर्गजवळ असणाऱ्या शाखा कार्यालयात सेवा करत आहेत.

१९९९ साली, जपानमधील हिरो नावाचे एक बांधव सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहिले होते. त्या वेळी त्यांचं वय २५ होतं. प्रशालेतील संचालकानं त्यांना दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याचं उत्तेजन दिलं. रशियामध्ये मदतीची गरज आहे हे हिरो यांनी ऐकलं होतं. त्यामुळे त्यांनी रशियन भाषा शिकण्यास सुरवात केली. तसंच त्यांनी आणखी काही व्यावहारिक पावलं उचलली. ते म्हणतात, “सहा महिन्यांसाठी मी रशियाला गेलो. तिथं खूप कडाक्याची थंडी असते. ती मला सहन होईल की नाही हे पाहण्यासाठी मी मुद्दाम नोव्हेंबर महिन्यात तिथं गेलो.” हिवाळ्यात तिथं राहिल्यानंतर ते जपानला परतले. परत आल्यानंतर त्यांनी आपली जीवनशैली अगदी साधी केली. त्यामुळे रशियात जाऊन सेवा करण्यासाठी पैसे जमवणं त्यांना शक्य झालं.

हिरो आणि स्वेटलाना

रशियात येऊन हिरो यांना आता १२ वर्षं झाली आहेत. इथं त्यांनी बऱ्याच मंडळ्यांत सेवा केली आहे. काही वेळा तर १०० पेक्षा जास्त प्रचारक असलेल्या मंडळीत त्यांना एकटेच वडील म्हणून सेवा करावी लागली. एका मंडळीत तर त्यांना दर आठवडी सेवा सभेतील अनेक भाग हाताळावे लागायचे. ते एकटेच ईश्वरशासित सेवा प्रशाला, टेहळणी बुरूज अभ्यास आणि पाच वेगवेगळ्या ठिकाणचे पुस्तक अभ्यासदेखील चालवायचे. तसंच, त्यांना अनेक मेंढपाळ भेटीदेखील घ्याव्या लागायच्या. तो काळ आठवून ते म्हणतात, “बांधवांना आणि बहिणींना आध्यात्मिक रीत्या मदत पुरवताना मला खूप आनंद व्हायचा.” गरज असलेल्या ठिकाणी सेवा केल्यामुळे त्यांना काय फायदा झाला? ते म्हणतात, “रशियाला जाण्याआधीही मी वडील आणि पायनियर म्हणून सेवा करायचो. पण, इथं आल्यानंतर यहोवासोबतच्या माझ्या नात्याला एक नवीनच अर्थ मिळालाय. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मी यहोवावर भरवसा ठेवायला शिकलो.” २००५ साली त्यांनी स्वेटलानाशी लग्न केलं. ते दोघंही सध्या पायनियरिंग करत आहेत.

मायकल आणि ओल्गा, मरीना आणि मॅथ्यू यांच्यासोबत

३४ वर्षांचा मॅथ्यू आणि २८ वर्षांचा मायकल हे दोघं भाऊ कॅनडाचे आहेत. हे दोघंही रशियाला गेले होते. तिथल्या मंडळीत येणाऱ्या अनेक आस्थेवाईक लोकांना पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. पण, सभा चालवण्यासाठी तिथं पुरेसे बांधव नव्हते. मॅथ्यू म्हणतो, “मी ज्या मंडळीला भेट दिली तिथं २०० लोक होते. पण, फक्त एक वृद्ध वडील आणि एक तरुण सेवा सेवक तिथल्या सर्व सभा चालवत होते. यामुळे इथं येऊन या बांधवांना मदत करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.” तो २००२ साली रशियात राहायला आला.

चार वर्षांनंतर मायकलसुद्धा रशियात आला. इथं आल्यानंतर त्याला जाणवलं की बांधवांची अजूनही खूप गरज आहे. सेवा सेवक या नात्यानं त्याच्यावर मंडळीच्या जमा-खर्चाची, साहित्याची आणि क्षेत्र नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवाय, जी कामं सहसा मंडळीच्या सचिवाला करावी लागतात ती कामंदेखील त्याला करावी लागायची. जसं की जाहीर भाषण देणं, संमेलनाचं आणि राज्य सभागृहांच्या बांधकामाचं नियोजन करणं. खरंतर, आजदेखील तिथल्या मंडळ्यांना मदतीची गरज आहे. या सर्व जबाबदाऱ्या हाताळणं सोपं नसलं तरी वडील या नात्यानं काम करणारा मायकल म्हणतो, “बांधवांना मदत केल्यामुळे मला खूप समाधान मिळतं. जीवन जगण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे!”

यादरम्यान मॅथ्यूनं मरीनाशी लग्न केलं आणि मायकलनी ओल्गाशी लग्न केलं. ही दोन्ही जोडपी इतर प्रचारकांसोबत मंडळ्यांना मदत करत आहेत.

कापणीच्या कार्यात बहिणींची मदत

तातयाना

१९९४ साली तातयानाच्या मंडळीत सहा खास पायनियर सेवा करण्यासाठी आले होते. तेव्हा ती १६ वर्षांची होती. हे पायनियर चेक प्रजासत्ताक, पोलंड आणि स्लोवाकिया इथून युक्रेनमधील तिच्या मंडळीत आले होते. तिला आजही ते पायनियर आठवतात. त्यांच्याबद्दल ती सांगते, “ते खूप आवेशी आणि मनमिळाऊ होते. ते खूप दयाळू होते आणि बायबलबद्दल त्यांना चांगली माहितीही होती.” यहोवानं या स्वार्थत्यागी पायनियरांना कसा आशीर्वाद दिला हे तिनं पाहिलं आणि त्यांच्यासारखंच बनण्याचा निश्चय केला.

त्या पायनियरांच्या उदाहरणामुळे तिला खूप उत्तेजन मिळालं. तातयाना शाळेच्या सुट्टीत इतर प्रचारकांसोबत युक्रेन आणि बेलारूसमधील अशा ठिकाणी प्रचार करण्यासाठी जायची जिथं कधीच प्रचार करण्यात आला नव्हता. अशा ठिकाणी जाऊन प्रचार करणं तिला खूप आवडायचं आणि त्यामुळेच रशियात जाऊन आपली सेवा आणखी वाढवण्याचं तिनं ठरवलं. सर्वात आधी, काही दिवसांसाठी रशियात एका पायनियर बहिणीकडे ती राहायला गेली. ही पायनियर बहीण दुसऱ्या देशातून तिथं सेवा करण्यासाठी आली होती. पायनियरिंग करण्यासाठी मदत होईल असं कामदेखील तातयानाला शोधायचं होतं. पुढं २००० साली ती रशियात राहायला आली. हा बदल तिच्यासाठी सोपा होता का?

तातयाना म्हणते, “इथं घर घेणं मला परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मला भाड्यानं खोली घेऊन राहावं लागायचं. पण हे काही सोयीस्कर नव्हतं. कधीकधी तर मला घरी परत जावं की काय असं वाटायचं. पण, सेवा करत राहिल्यास मला फायदाच होईल हे ओळखण्यासाठी यहोवानं मला नेहमी मदत केली.” तातयाना आज रशियात मिशनरी म्हणून सेवा करत आहे. ती म्हणते, “दुसऱ्या देशात घालवलेल्या या सर्व काळात अनेक चांगले अनुभव आणि मित्रमैत्रिणी मला मिळाले आहेत. पण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवावर असलेला माझा विश्वास खूप वाढला आहे.”

मसाको

जपानमधील पन्नाशीत असलेल्या मसाको नावाच्या बहिणीला आधीपासून मिशनरी म्हणून सेवा करण्याची खूप इच्छा होती. पण, तब्येतीमुळे आपल्याला हे जमणार नाही असं त्यांना वाटायचं. असं असूनही जेव्हा त्यांच्या तब्येतीत थोडाफार सुधार झाला, तेव्हा त्यांनी रशियातील आध्यात्मिक कापणीच्या कामात हातभार लावण्याचं ठरवलं. तिथं राहण्यासाठी एक चांगलं ठिकाण आणि चांगली नोकरी मिळवणं कठीण होतं. पण तरी, जपानी भाषा शिकवण्याचं आणि साफसफाईचं काम करून त्या पायनियरिंग करायच्या. सेवा करत राहण्यासाठी त्यांना कशामुळे मदत मिळाली?

रशियात १४ पेक्षा जास्त वर्षं सेवा केल्यानंतर मसाको म्हणतात, “सेवाकार्यात मिळणाऱ्या आनंदापुढं माझ्या या समस्यांचं मला काहीच वाटत नाही. राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात प्रचार केल्यामुळे माझं जीवन अगदी अर्थपूर्ण बनलं आहे. यादरम्यान यहोवानं माझ्या मूलभूत गरजा कशा पुरवल्या, हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. माझ्यासाठी हा एक चमत्कारच आहे.” मसाको यांनी फक्त रशियातच नव्हे तर जास्त गरज असलेल्या किर्गिझस्तानात जाऊनदेखील सेवा केली आहे. तसंच, इंग्लिश, चीनी आणि वीगुर भाषेच्या गटांनाही त्यांनी मदत केली आहे. सध्या त्या सेंट पीटर्सबर्ग इथं पायनियर म्हणून सेवा करत आहेत.

मदत करण्यासाठी पुढं आलेली कुटुंबं

इंगा आणि मीचाएल

सहसा बरीच कुटुंबं आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता दुसऱ्या देशात स्थलांतर करतात. पण, याच्या अगदी उलट बायबल काळातील अब्राहाम आणि सारा यांच्यासारखीच काही कुटुंबं आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या देशांत गेली आहेत. (उत्प. १२:१-९) मीचाएल आणि इंगा या युक्रेनमधील जोडप्याचंच उदाहरण घ्या. ते २००३ साली रशियात राहायला आले. बायबलबद्दल शिकून घेण्याची इच्छा असलेले बरेच लोक त्यांना तिथं भेटले.

मीचाएल म्हणतो, “पूर्वी कधीही प्रचार करण्यात आलेला नाही अशा क्षेत्रात आम्ही एकदा प्रचार करत होतो. तेव्हा एका वृद्ध माणसानं दार उघडलं आणि विचारलं, ‘तुम्ही सुवार्ता सांगण्यासाठी आलात ना?’ आम्ही हो म्हटल्यानंतर, मत्तय २४:१४ चा संदर्भ देऊन ते म्हणाले ‘तुम्ही एक ना एक दिवस याल हे मला पक्कं माहीत होतं. येशूचे शब्द पूर्ण होणारच ना!’” मीचाएल म्हणतो, “त्याच क्षेत्रात आम्हाला बॅप्टिस्ट स्त्रियांचा एक गट भेटला. त्या दहा जणी सत्यासाठी अक्षरशः भुकेल्या होत्या. त्यांच्याकडे ‘तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल’ हे पुस्तक होतं आणि दर आठवडी त्या त्यातून बायबलचा अभ्यास करायच्या. आम्ही कितीतरी तास त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि राज्य गीतंदेखील गायिली. शिवाय, आम्ही सोबत मिळून जेवणदेखील केलं. तो दिवस आजही मी विसरलेलो नाही.” प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी कार्य केल्यामुळे, यहोवाच्या आणखी जवळ जाण्यास आणि लोकांबद्दल असलेलं प्रेम आणखी वाढवण्यास मदत झाली आहे असं मीचाएल आणि इंगा यांना वाटतं. तसंच, यहोवाच्या आशीर्वादामुळे त्यांचं जीवन अगदी समाधानी बनलं आहे असंही त्यांना वाटतं. सध्या ते विभागीय कार्यात आहेत.

ऑक्साना, एलेक्से आणि यूरी

२००७ साली यूरी आणि ऑक्साना या युक्रेनमधील जोडप्यानं रशियातील शाखा कार्यालयाला भेट दिली. तिशीत असलेल्या या जोडप्यासोबत एलेक्से हा त्यांचा १३ वर्षांचा मुलगादेखील होता. त्या ठिकाणी रशियाचा नकाशा पाहताना अजूनही फार मोठ्या क्षेत्रात सेवाकार्य झालेलं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. ऑक्साना म्हणते, “या ठिकाणी राज्य प्रचारकांची किती नितांत गरज आहे हे नकाशा पाहिल्यानंतर आम्हाला जाणवलं. यामुळे रशियात स्थायिक होण्याचा निर्धार आम्ही केला.” पण, पाऊल उचलण्याकरता त्यांना कशामुळे मदत झाली? यूरी म्हणतो, “आपल्या प्रकाशनांतील ‘परदेशात सेवा करायला तुम्हाला आवडेल का?’ अशा विषयाचे लेख वाचल्यामुळे आम्हाला मदत झाली. * शाखा कार्यालयानं आम्हाला ज्या क्षेत्रात जाण्याविषयी सुचवलं होतं तिथं आम्ही गेलो. आणि तिथं जाऊन राहण्याची आणि नोकरीची सोय कशी करता येईल ते मी पाहिलं.” २००८ साली ते रशियात राहायला गेले.

सुरवातीला नोकरी शोधणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. आणि कित्येक वेळा त्यांना आपलं घर बदलावं लागलं. यूरी म्हणतो, “निराश होऊ नये म्हणून आम्ही नेहमी यहोवाला प्रार्थना करायचो. आणि यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून प्रचारकार्य करत राहायचो. देवाच्या सेवेला जीवनात प्रथम स्थानी ठेवल्यानं तो आपली काळजी कशी घेतो हे आम्ही अनुभवलं आहे. त्याची सेवा करत राहिल्यामुळे आमचं कौटुंबिक नातं आणखी मजबूत झालं आहे.” (मत्त. ६:२२, ३३) जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा केल्यामुळे एलेक्सेवर काय परिणाम झाला? ऑक्साना म्हणते, “यामुळे त्याला खूप फायदा झाला. नऊ वर्षांचा असतानाच त्यानं बाप्तिस्मा घेतला होता. प्रचारकांची किती जास्त गरज आहे हे त्यालाही जाणवलं. आणि म्हणून प्रत्येक वेळी शाळेला सुट्ट्या पडल्या की तो साहाय्यक पायनिरिंग करायचा. सेवाकार्यासाठी असलेलं त्याचं प्रेम आणि आवेश पाहून आम्हाला खूप आनंद होतो.” सध्या यूरी आणि ऑक्साना खास पायनियर म्हणून सेवा करत आहेत.

“मला एकाच गोष्टीची खंत वाटते”

आध्यात्मिक कापणीच्या कार्यात हातभार लावणाऱ्या बंधुभगिनींच्या अनुभवांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. ती म्हणजे, दुसऱ्या क्षेत्रात जाऊन सेवा करण्यासाठी यहोवावर पूर्ण भरवसा असणं गरजेचं आहे. हे खरं आहे की गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पण, आस्थेवाईक लोकांना भेटल्यामुळे त्यांना जो आनंद अनुभवायला मिळतो त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येणार नाही. तुम्हीही राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकता का? जर असा निर्णय तुम्ही घेतला तर तुम्हालाही यूरीप्रमाणेच वाटेल. गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल तो म्हणतो, “मला एकाच गोष्टीची खंत वाटते. हा निर्णय मी आधीच का घेतला नाही?”

^ परि. 20 टेहळणी बुरूज १५ ऑक्टोबर १९९९, पृष्ठे २३-२७ पाहा.