व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार युद्धात भाग का घेत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार युद्धात भाग का घेत नाहीत?

वाचक विचारतात

यहोवाचे साक्षीदार युद्धात भाग का घेत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार, मग ते जगातल्या कोणत्याही भागात राहात असले, तरी युद्धात भाग घेत नाहीत. फार पूर्वीपासून त्यांनी हीच भूमिका घेतली आहे. दोन राष्ट्रांमधील सशस्त्र युद्ध असो किंवा एकाच राष्ट्रातील दोन गटांमधील संघर्ष असो, ते यांपासून अलिप्त राहतात. अर्ध्या शतकापूर्वी ऑस्ट्रेलियन एन्सायक्लोपेडिया यात असे म्हणण्यात आले: “युद्धाच्या काळात यहोवाचे साक्षीदार पूर्णपणे तटस्थ राहतात.”

साक्षीदार युद्धांत भाग घेत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे अशा प्रकारच्या संघर्षात भाग घेणे हे त्यांच्या ख्रिस्ती विवेकबुद्धीच्या विरोधात आहे. त्यांच्या विवेकावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञांचा व उदाहरणाचा प्रभाव आहे. येशूने आपल्या अनुयायांना शेजाऱ्‍यांवर प्रीती करण्यास सांगितले. त्याने तर अशी आज्ञा दिली: “आपल्या वैऱ्‍यावर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करितात त्यांचे बरे करा.” (लूक ६:२७; मत्तय २२:३९) येशूच्या एका शिष्याने त्याचे संरक्षण करण्याकरता तरवार उपसली तेव्हा त्याने त्याला असे सांगितले, की “तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) अशारीतीने, येशूने शब्दांतूनच नव्हे तर कृतीतूनही हे स्पष्टपणे दाखवले की त्याच्या अनुयायांनी सशस्त्र युद्धांत भाग घेऊ नये.

यहोवाचे साक्षीदार युद्धात भाग घेत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचा एक जगव्याप्त बंधूसमाज आहे. युद्धात भाग घेण्याचा अर्थ त्यांना आपल्याच बांधवाविरुद्ध शस्त्र उचलावे लागेल. आणि हे तर ‘एकमेकांवर प्रीति करण्याच्या’ येशूने दिलेल्या आज्ञेचे उल्लंघन ठरेल.—योहान १३:३५.

एकमेकांवर प्रेम करण्याविषयीची ही तत्त्वे यहोवाच्या साक्षीदारांच्या दृष्टीने केवळ पुस्तकी विद्या नव्हे. तर त्यांच्या प्रत्यक्ष आचरणात ते या तत्त्वांचे पालन करतात. उदाहरणार्थ, १९३९-१९४५ च्या दरम्यान चाललेल्या दुसऱ्‍या महायुद्धात, संयुक्‍त संस्थानांत ४,३०० यहोवाच्या साक्षीदारांना लष्करी सेवेस नकार दिल्यामुळे सरकारी कारागृहांत डांबण्यात आले. ब्रिटनमध्ये, युद्धाशी संबंधित कोणतेही काम करण्यास नकार दिल्यामुळे ३०० स्त्रियांसहित १,५०० पेक्षा जास्त साक्षीदारांना तुरुंगवास झाला. नात्सी जर्मनीत शस्त्रे उचलण्यास नकार दिल्यामुळे २७० पेक्षा जास्त साक्षीदारांना सरकारी आदेशानुसार मृत्यूदंड देण्यात आला. नात्सींच्या अंमलाखाली १०,००० पेक्षा जास्त साक्षीदारांना एकतर तुरुंगात नाहीतर छळ छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. जपानमधील साक्षीदारांनाही अकथनीय यातना सहन कराव्या लागल्या. दुसऱ्‍या महायुद्धात किंवा त्यानंतरच्या कोणत्याही युद्धात ज्या कोणाचे प्रियजन मृत्यूमुखी पडले असतील ते या गोष्टीची खात्री बाळगू शकतात की त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूला यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकही जण जबाबदार नव्हता.

युद्धांबाबत यहोवाच्या साक्षीदारांच्या दृष्टिकोनाबद्दल वोल्फगँग कुसरो याचे शेवटचे शब्द अतिशय बोलके आहेत. युद्धात भाग घेण्यास नकार दिल्यामुळे, १९४२ साली नात्सींनी या २० वर्षांच्या जर्मन तरुणाचा शिरच्छेद केला. (यशया २:४) लष्करी न्यायालयासमोर त्याने असे म्हटले: “मी यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबात लहानाचा मोठा झालो. माझ्यावर पवित्र शास्त्रवचनांतील देवाच्या वचनाचे संस्कार करण्यात आले. देवाने मानवांना दिलेली सर्वात मोठी आणि सर्वात पवित्र आज्ञा ही आहे, की ‘तू सर्व गोष्टींपेक्षा आपल्या देवावर प्रीती कर आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावरही प्रीती कर.’ ‘मनुष्यहत्या करू नको’ अशीही आज्ञा शास्त्रवचनांत वाचायला मिळते. या सर्व आज्ञा आपल्या निर्माणकर्त्याने काय झाडांसाठी लिहून ठेवल्या?”—मार्क १२:२९-३१; निर्गम २०:१३.

यहोवाचे साक्षीदार असे मानतात की केवळ सर्वसमर्थ देव यहोवाच पृथ्वीवर शांती कायमची प्रस्थापित करेल. तो ‘दिगंतापर्यंत लढाया बंद करण्याचे’ आपले वचन पूर्ण करेल याची त्यांना पक्की खात्री आहे.—स्तोत्र ४६:९. (w०८ ७/१)