व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सर्व सांत्वनदाता देव”

“सर्व सांत्वनदाता देव”

देवाच्या जवळ या

“सर्व सांत्वनदाता देव”

२ करिंथकर १:३, ४

जीवनातील पुष्कळ गोष्टी, जसे की दुःख, निराशा, एकाकीपणा यांमुळे आपण उदास होऊ, अगदी खचून जाऊ. अशावेळी आपल्या मनात प्रश्‍न येईल: ‘मला कोण मदत करेल?’ दुसरे करिंथकर १:३, ४ मधील प्रेषित पौलाचे शब्द दाखवतात की सांत्वनाचा झरा असलेला यहोवा देव आपल्याला मदत करेल.

तिसऱ्‍या वचनात देवाला “करुणाकर पिता” असे संबोधण्यात आले आहे. म्हणजे काय? “करुणाकर” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, इतरांना भोगाव्या लागणाऱ्‍या दुःखांबद्दल कळवळा असा होऊ शकतो. * या शब्दाचे भाषांतर, “दयानिधी,” किंवा “करुणासागर” असेही करता येईल, असे एका बायबल संदर्भ ग्रंथात म्हटले आहे. देवाची ‘करुणा’ त्याला कार्य करण्यास प्रवृत्त करते. देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या या पैलूविषयी कळल्यावर आपल्याला त्याच्या जवळ यावेसे वाटते, नाही का?

पौल यहोवाला “सर्व सांत्वनदाता देव” असेही संबोधतो. पौलाने येथे वापरलेल्या शब्दाच्या इतरही अर्थछटा आहेत. जसे की “दुःखात असलेल्या व्यक्‍तीला सांत्वन देणे, तिला मदत होईल असे काहीतरी करणे किंवा उत्तेजन देणे.” द इनटरप्रीटर्स बायबल म्हणते: “आपण दुःखात असलेल्या व्यक्‍तीला तिचे दुःख धैर्याने सहन करण्याचे प्रोत्साहन देऊन तिला सांत्वन देत असतो.”

तुमच्या मनात कदाचित असा प्रश्‍न येईल, की ‘देव आपल्याला सांत्वन व दुःख सहन करीत राहण्याचे धैर्य कसे देतो?’ त्याचे वचन बायबल आणि आपल्याला मिळालेली प्रार्थनेची देणगी या दोन प्रमुख गोष्टींद्वारे तो आपल्याला सांत्वन व धैर्य देतो. पौल म्हणतो, की देव प्रेमळपणे आपल्याला त्याचे वचन देतो जेणेकरून “शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी.” शिवाय, हृदयपूर्वक प्रार्थनांद्वारे आपण, “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” अनुभवू शकू.—रोमकर १५:४; फिलिप्पैकर ४:७.

यहोवा कोठवर आपले सांत्वन करतो? पौल म्हणतो, की देव “आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो.” (२ करिंथकर १:४) आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दबाव आले, आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख झेलावे लागले तरी देव आपल्याला आवश्‍यक ते बळ देतो आणि टिकून राहण्याची शक्‍ती देतो. कसे वाटते हे ऐकून? सांत्वनदायक, नाही का?

देवाकडून मिळणारे सांत्वन हे, केवळ ज्याला ते मिळते त्याच्यापुरतेच राहत नाही. पौल पुढे म्हणतो, की देवाने दिलेल्या सांत्वनाने आपण, ‘जे कोणी संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ’ होतो. आपल्या हालअपेष्टांत आपल्याला सांत्वन मिळाल्यामुळे आपण समानुभूती दाखवून संकटात असलेल्या इतरांना मदतीचा हात पुढे करण्यास प्रवृत्त होतो.

पण “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा, आपल्या समस्या किंवा आपले दुःख गायब करतो, असे नाही. तरीपण, आपण एका गोष्टीची मात्र खात्री बाळगू शकतो: आपण जर सांत्वन मिळण्यासाठी देवाकडे वळालो तर जीवनात येणाऱ्‍या कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांवर मात करण्याचे तो आपल्याला बळ देईल. असा हा सांत्वनदाता देव उपासनेस व स्तुतीस पात्र आहे. (w०८ ९/१)

[तळटीप]

^ परि. 5 देवाला “करुणाकर पिता” अर्थात करुणेचा झरा म्हटलेले आहे कारण तो कनवाळुपणाचा उगमस्थान आहे. दयाळुपणा त्याचा स्वभावगुण आहे.