४ संशय दूर करा
४ संशय दूर करा
“अरे अल्पविश्वासी तू संशय का धरिलास?”—मत्तय १४:३१.
आक्षेप: काही वेळा येशूच्या शिष्यांच्या मनातही शंका आली होती. (मत्तय १४:३०; लूक २४:३६-३९; योहान २०:२४, २५) खरेतर बायबलमध्ये अल्पविश्वासाला “सहज गुंतविणारे पाप” असे म्हटले आहे. (इब्री लोकांस १२:१) प्रेषित पौलाने लिहिले: “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) याचा अर्थ काही जण आपल्यात विश्वास उत्पन्न करू शकत नाहीत, अशातला भाग नाही. तर अनेक जण मुद्दामहून आपल्यात तो उत्पन्न करत नाहीत. पण जे करतात त्यांना देव आशीर्वाद देतो.
तुम्ही काय करू शकता? तुमच्या मनात कोणत्या कारणांमुळे संशय निर्माण होतो ती कारणे ओळखा. उदाहरणार्थ शिष्य थोमा याला इतर शिष्यांनी येशूचे पुनरूत्थान झाले आहे व आम्ही त्याला पाहिले आहे असे सांगितले होते तरी त्याने शंका घेतली. त्याला पुरावा हवा होता. याचा काय परिणाम झाला? त्याचा विश्वास मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारा पुरावा येशूने त्याला दिला.—योहान २०:२४-२९.
आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी आवश्यक असणारी उत्तरे यहोवा देव बायबलच्या माध्यमाने देतो. उदाहरणार्थ, अनेक जणांचा देवावरील विश्वास उडाला आहे कारण मानवजातीला सहन कराव्या लागणाऱ्या युद्धाला, हिंसेला व दुःखाला देव जबाबदार आहे असा दोष प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या ते त्याच्यावर लावतात. पण बायबल याबद्दल काय म्हणते?
मानवी सरकारांद्वारे देव शासन करत नाही. सैतान म्हटलेली अदृश्य आत्मिक व्यक्ती या “जगाचा अधिकारी” आहे असा येशूने उल्लेख केला. (योहान १४:३०) याच सैतानाने त्याची फक्त एकदाच उपासना करण्याच्या मोबदल्यात येशूला पृथ्वीवरील सर्व राज्यांवरचा अधिकार देऊ करत त्याला म्हटले: “सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो.” सैतानाकडे हा अधिकार होता ही गोष्ट येशूने नाकारली नाही. उलट तो त्याला म्हणाला: “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे.” (लूक ४:५-८) आज जगात जे दुःख आहे त्याला देव नाही तर सैतान व मानवी सरकारे जबाबदार आहेत.—प्रकटीकरण १२:९, १२.
यहोवा लवकरच दुःखास कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करेल. यासाठी त्याने केव्हाच आपला पुत्र ख्रिस्त येशू याच्याकरवी मानवजातीवर राज्य करण्यासाठी एका राज्याची किंवा स्वर्गीय सरकाराची व्यवस्था केली आहे. (मत्तय ६:९, १०; १ करिंथकर १५:२०-२८) बायबलमध्ये करण्यात आलेल्या भविष्यवाणीनुसार या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार आज संपूर्ण जगभरात केला जात आहे. (मत्तय २४:१४) लवकरच हे राज्य त्याच्या सर्व विरोधकांचा व मानवी दुःखाला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा नाश करेल.—दानीएल २:४४; मत्तय २५:३१-३३, ४६; प्रकटीकरण २१:३, ४.
बायबलवर भरवसा ठेवल्यामुळे कोणते फायदे मिळतात? मनात संशय धरणारे लोक, ‘माणसांच्या धुर्तपणाने, . . . प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणाऱ्या व फिरणाऱ्या’ लाटांप्रमाणे आहेत. (इफिसकर ४:१४; २ पेत्र २:१) याउलट आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवणारे लोक “विश्वासात स्थिर” राहू शकतात.—१ करिंथकर १६:१३.
या नियतकालिकेचे प्रकाशक असलेले यहोवाचे साक्षीदार यांना तुमच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी तुम्हाला मदत देण्यास आवडेल. त्यांच्या सभांना उपस्थित राहून त्यांच्या शिकवणींचे परीक्षण करण्याचे ते तुम्हाला आमंत्रण देत आहेत. हे आमंत्रण स्वीकारल्याने देवावरील तुमचा विश्वास नक्कीच मजबूत होईल. (w०९ ५/१)
अधिक माहितीसाठी बायबल नेमके काय शिकवते? * या पुस्तकातील “देवाचे राज्य काय आहे?” अध्याय ८ व “देव दुःख काढून का टाकत नाही?” अध्याय ११ पाहा.
[तळटीप]
^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले.
[९ पानांवरील चित्र]
आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे जे मिळवतात त्यांच्या विश्वासाचा पाया मजबूत असतो