आपल्या सोबत्याशी आदराने वागा
कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या
आपल्या सोबत्याशी आदराने वागा
वसंत * * म्हणतो: “रेश्मा रागावलेली असते तेव्हा ती खूप वेळ नुसती रडत राहते. आम्ही बोलायला बसलो तर ती चिडचिड करायला लागते किंवा मग माझ्याशी बोलतच नाही. मी काहीही केलं तरी तिच्यावर फरक पडत नाही. मग मला पण सोडून द्यावसं वाटतं.”
रेश्मा म्हणते: “वसंत घरी आला तेव्हा मी रडतच होते. मला राग का आला आहे हे मी त्याला सांगायचा प्रयत्न करत होते पण त्यानं माझं बोलणं मध्येच तोडलं. तू हे काय फुसकं कारण घेऊन बसलीस, चल सोडून दे सगळं, असं तो मला म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून तर माझं डोकं आणखीनच फिरलं.”
तुम्हालाही कधीकधी वसंत किंवा रेश्मासारखे वाटते का? दोघांनाही एकमेकांशी बोलायचे आहे खरे, पण ते सारखी चिडचिड करतात. असे का?
पुरुषांची व स्त्रियांची विचार व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि दोघांच्या गरजाही विभिन्न आहेत. एखाद्या स्त्रीला तिच्या मनातील भावना, ती कधी एकदाची कोणासमोर तरी व्यक्त करते, असे वाटते. शिवाय तिला आपल्या भावना वारंवार व्यक्त करायलाही आवडते. परंतु पुरुष, काही वाद झालाच तर तो लवकरात लवकर सोडवून शांती टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि वाद विकोपाला जाऊ शकतात असे विषय सहसा टाळायचा प्रयत्न करतो. या विभिन्नतेवर मात करून पती-पत्नी एकमेकांबरोबर संवाद कसा साधू शकतात? आपल्या जोडीदाराशी आदराने वागून तुम्ही हे साध्य करू शकता.
दुसऱ्याचा आदर करणारी व्यक्ती इतरांची किंमत करते आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते. मोठ्या पदावर असलेल्यांचा किंवा तुमच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्यांचा आदर करण्यास तुम्ही लहानपणापासून शिकला असाल. पण लग्न झाल्यावर मात्र तुम्हाला तुमच्या बरोबरीच्या व्यक्तीला अर्थात तुमच्या जोडीदाराला आदर दाखवायचा आहे. पुष्कर आणि लीना यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. लीना म्हणते: “पुष्कर त्याच्याबरोबर बोलणाऱ्या सर्वांचं अगदी सबुरीनं, समंजसपणे ऐकून घेतो. त्याच सहानुभूतीनं त्यानं माझंही ऐकावं, असं मला वाटतं.” तुम्ही कदाचित तुमच्या मित्र-मैत्रिणींचे आणि अनोळखी लोकांचेसुद्धा म्हणणे सबुरीने व आदराने ऐकत असाल. तुमच्या जोडीदाराशीदेखील मग तुम्ही असेच वागता का?
पती-पत्नीने एकमेकांचा आदर केला नाही तर घरात नेहमी तंग वातावरण असते व त्यांच्यात सतत भांडणे होऊ शकतात. एका सुज्ञ राजाने म्हटले होते: “एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा.” (नीतिसूत्रे १७:१) पतीने आपल्या पत्नीला सन्मानाने वागवावे, असे बायबलमध्ये सांगितले आहे. (१ पेत्र ३:७) आणि पत्नीनेदेखील “आपल्या पतीची भीड” राखली पाहिजे अर्थात त्याचा मनापासून आदर केला पाहिजे.—इफिसकर ५:३३.
तुम्ही एकमेकांशी आदराने संवाद कसा साधू शकता? याबाबतीत बायबलमध्ये काही व्यावहारिक सल्ला दिला आहे. तो तुम्ही पडताळून पाहू शकता.
तुमच्या जोडीदाराला काही सांगायचे असते तेव्हा
समस्या: पुष्कळ लोकांना ऐकून घेण्यापेक्षा बोलायला जास्त आवडते. तुम्हीही त्यापैकी एक आहात का? जी व्यक्ती ‘ऐकून घेण्यापूर्वीच उत्तर देते’ तिला बायबलमध्ये मूर्ख म्हटले आहे. (नीतिसूत्रे १८:१३) तेव्हा, बोलण्याआधी ऐकून घ्या. का बरे? लग्नाला २६ वर्षे पूर्ण झालेल्या कवीशाने म्हटले: “माझ्या नवऱ्यानं आधी माझं बोलणं ऐकून घेतलेलं मला आवडेल. मी त्याला काही सांगू लागले, की तो लगेच त्यावर उपाय सुचवू लागतो ते मला आवडत नाही. मला त्रास झाला आहे किंवा तो का झाला, हे त्यानं मान्य करावं असंही मला वाटत नाही. त्यानं माझं बोलणं फक्त ऐकून घ्यावं आणि मला जे वाटतं, ते योग्य आहे हे कबूल करावं.”
दुसरीकडे पाहता, काही पुरुष व स्त्रिया आपले विचार मनमोकळेपणाने व्यक्त करत नाहीत आणि त्यांच्या जोडीदाराने त्यांना खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला की ते अस्वस्थ होतात. लताचे अलिकडेच लग्न झाले आहे. तिचा नवरा आपल्या मनातील भावना पटकन व्यक्त करत नाही, हे तिला दिसून आले आहे. “मला खूप सहनशीलता दाखवावी लागते. आणि तो स्वतःहून मला काही सांगत नाही तोपर्यंत थांबून राहावं लागतं,” असे ती म्हणते.
उपाय: तुम्हा दोघांना जेव्हा अशा एखाद्या विषयावर बोलायचे असते ज्यावर कदाचित तुमचे मतभेद होतील, तेव्हा तुमच्या दोघांचेही डोके शांत आहे व तुम्ही निवांत आहात अशा वेळी हा विषय बोलायला काढा. तुमचा जोडीदार जर यावर बोलू इच्छित नसेल तर काय? एखाद्याच्या मनातील विचार विहिरीतील ‘खोल पाण्यासारखे’ असतात व एक ‘समंजस व्यक्ती ते बाहेर काढते,’ ही गोष्ट लक्षात ठेवा. (नीतिसूत्रे २०:५) तुम्ही जर विहिरीतून पाणी काढताना, बादली भरभर वर ओढली तर बादलीतले बहुतेक पाणी खाली पडू शकते. तसेच, तुम्ही जर तुमच्या जोडीदारावर बोलायची सक्ती केली तर तो लगेच स्वतःचा बचाव करू लागेल आणि त्याच्या मनातील विचार बाहेर काढण्याची तुम्हाला मिळालेली संधी तुम्ही गमावून बसाल. याऐवजी तुम्ही अतिशय कोमलतेने व आदराने प्रश्न विचारू शकता आणि तुमचा जोडीदार तुम्हाला वाटते तसे भरभर आपले विचार बोलून दाखवत नाही तेव्हा तुम्ही धीर धरू शकता.
तुमचा जोडीदार जेव्हा बोलायला लागतो तेव्हा ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे, रागास मंद’ असा. (याकोब १:१९) दुसऱ्याचे बोलणे नीट ऐकून घेणारी व्यक्ती फक्त आपल्या कानांनीच नव्हे तर अंतःकरणानेही ऐकते. तुमचा सोबती तुमच्याशी बोलत असतो तेव्हा त्याच्या भावनाही समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही ज्याप्रकारे ऐकून घेता त्यावरून, तुमच्या सोबत्याला कळेल, की तुम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे किंवा नाही.
दुसऱ्याचे बोलणे कसे ऐकून घ्यायचे हे येशूने आपल्याला शिकवले आहे. जसे की, एक आजारी मनुष्य येशूकडे मदतीसाठी आला तेव्हा त्याने लगेच त्याला बरे करून पाठवले नाही. तर, आधी त्याने त्या मनुष्याची विनंती ऐकून घेतली. मग त्या विनंतीवर त्याने विचार केला; म्हणजे त्या मनुष्याच्या भावना जणू काय त्याला जाणवल्या. आणि मग त्याने त्याला बरे केले. (मार्क १:४०-४२) तुमच्या जोडीदाराबरोबर बोलताना तुम्हीसुद्धा येशूसारखेच करू शकता. तुमच्या जोडीदाराला झटपट उपाय नको असतो तर तुमची मनःपूर्वक सहानुभूती हवी असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. यास्तव, त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐका. बोलणे ऐकून घेतल्यावर, तुमच्या सोबत्याच्या मनात जशा भावना आहेत त्या जणू काय तुम्हालाही जाणवत आहेत, असे समजा. आणि त्यानंतरच मग उपाय सांगा. असे केल्यास तुम्ही दाखवून द्याल, की तुम्ही खरोखरच तुमच्या जोडीदाराचा आदर करत आहात.
हे करून पाहा: पुढच्या वेळी तुमचा जोडीदार तुम्हाला काही सांगतो तेव्हा, लगेच त्यावर उपाय सांगू नका. त्याचे बोलणे पूर्ण होईपर्यंत थांबा आणि तुम्ही जे काही ऐकले आहे ते समजण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्ही तुमच्या सोबत्याला विचारू शकता: “मी खरंच तुझं ऐकत होतो हे तुला जाणवलं का?”
तुम्हाला काही सांगायचे असते तेव्हा
समस्या: “आपल्या सोबत्याबद्दल वाईट बोलणं, त्याचा अपमान करणं, तिरसटपणे बोलणं, यात काही गैर नसल्याचं टीव्हीवरील विनोदी कार्यक्रमांमध्ये दाखवलं जातं,” असे आधी उल्लेखण्यात आलेल्या लीनाने म्हटले. काही मुलांचे संगोपन अशा घरांमध्ये झालेले असते जेथे सर्वांचीच भाषा निरादराची असते. नंतर अशा मुलांचे जेव्हा विवाह होतात तेव्हा त्यांना आपल्या कुटुंबात सरळ बोलायला जड जाते. कॅनडात राहणारी आयव्ही म्हणते: “मी अशा घरात वाढले जेथे, सर्रासपणे एकमेकांची टीका करणं, एकमेकांवर खेकसणं, नावं ठेवणं चालायचं.”
उपाय: आपल्या सोबत्याविषयी इतरांशी बोलताना तुमच्या तोंडून “उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, . . . तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.” (इफिसकर ४:२९) आपल्या सोबत्याबद्दल तुम्ही जे काही बोलाल त्याची समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडा.
आपल्या सोबत्याबरोबर एकटे असतानाही, तिरसटपणे बोलण्याची किंवा नावे ठेवण्याची इच्छा होते तेव्हा ती टाळा. प्राचीन २ शमुवेल ६:२०-२३) काय शिकतो आपण या उदाहरणावरून? हेच की, आपल्या जोडीदाराबरोबर बोलताना काळजीपूर्वक शब्द निवडा. (कलस्सैकर ४:६) पुष्कर यांचे लग्न होऊन आठ वर्षे झाली आहेत. अजूनही पती-पत्नीत मतभेद होतात, असे ते कबूल करतात. कधीकधी ते जे काही बोलतात त्यामुळे वाद विकोपाला जातो, हे त्यांना जाणवले आहे. “आमच्यात वाद होतात तेव्हा तो वाद ‘जिंकूनही’ मला हरल्यासारखंच वाटतं. त्यापेक्षा पती-पत्नीतला नातेसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला तर जास्त समाधान मिळतं आणि त्याचा लाभही होतो.”
इस्राएलमध्ये मीखलला एकदा तिचा पती, राजा दावीद याचा खूप राग आला होता. ‘एखाद्या हलकट मनुष्यासारखा’ हा वागला असा तिने त्याला टोमणा मारला. तिचे हे शब्द ऐकून दाविदाला खूप वाईट वाटले, शिवाय देवालादेखील तिचे बोलणे आवडले नाही. (प्राचीन काळातील एका वृद्ध विधवेने आपल्या सुनांना, आपापल्या ‘पतिगृही विसावा मिळवा’ असे उत्तेजन दिले. (रूथ १:९) नवरा-बायको जेव्हा एकमेकांना सन्मानाने वागवतात तेव्हा दोघांनाही घरात “विसावा” मिळतो.
हे करून पाहा: या मथळ्याखाली दिलेल्या सूचनांची आपल्या सोबत्याबरोबर चर्चा करण्यासाठी वेळ काढा. आपल्या सोबत्याला विचारा: “मी जेव्हा चारचौघात तुझ्याविषयी बोलतो तेव्हा, तुला मी आदर देत आहे असं वाटतं, की तुझा अपमान करत आहे असं वाटतं? सुधारण्यासाठी मी काय करू शकतो?” आणि मग जेव्हा तुमचा सोबती तुम्हाला त्याचे विचार सांगतो तेव्हा ते लक्ष देऊन ऐका. ऐकलेल्या गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न करा.
सोबत्याच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात हे मान्य करा
समस्या: नव्यानेच लग्न झालेल्या काहींचा असा गैरसमज झाला होता, की बायबलमध्ये नवरा-बायकोला “एकदेह” म्हटले आहे याचा अर्थ, त्यांच्यात एकमत असले पाहिजे किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील एकच असले पाहिजे. (मत्तय १९:५) पण काही दिवसांतच त्यांना कळते, की असा विचार करणे वास्तवाला धरून नाही. लग्न होऊन काही वर्षे उलटल्यावर, त्यांच्या वेगवेगळ्या आवडी-निवडींमुळे त्यांच्यात वाद होतात. लीना म्हणते: “पुष्कर आणि माझ्यातला फरक म्हणजे, पुष्कर कोणत्याही गोष्टीचं जास्त टेन्शन घेत नाही, मी घेते. कधीकधी, मी टेन्शनमध्ये असते आणि पुष्कर मात्र निश्चिंत असतो. ते बघून मला खूप राग येतो. कारण असं वाटतं, की फक्त मलाच काळजी आणि तो मात्र निर्धास्त.”
उपाय: तुम्ही जसे आहात तसे एकमेकांना स्वीकारा आणि तुम्हा दोघांच्या आचार-विचारांमध्ये फरक आहे हे समजून घ्या. जसे की, तुमचे कान तुमच्या डोळ्यांसारखे कार्य करत नाहीत; तरीदेखील त्यांच्यातील सहकार्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येतो. अनघा यांच्या लग्नाला आता जवळजवळ ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या म्हणतात: “आमच्या दोघांची मतं देवाच्या वचनाच्या विरोधात जात नाहीत ना, मग वेगवेगळी मतं असण्याला काय हरकत आहे? आमचं लग्न झालं आहे, क्लोनिंग नाही. म्हणजे, आम्ही दोघं एकच नव्हे तर दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत.”
तुमचा सोबती जेव्हा वेगळे मत मांडतो किंवा वेगळी प्रतिक्रिया दाखवतो तेव्हा स्वतःचाच विचार करू नका. तर तुमच्या सोबत्याच्या भावनांचाही विचार करा. (फिलिप्पैकर २:४) अनघा यांचे पती कौस्तुभ म्हणतात: “अनघा अमुक एखाद्या गोष्टीवर असा का विचार करते, हे मला प्रत्येक वेळा समजत नाही किंवा मला ते पटत नाही. पण माझ्या मतापेक्षा मी तिच्यावर जास्त प्रेम करतो, याची जाणीव मी बाळगतो. ती खूष असली की मीही खूष होतो.”
हे करून पाहा: ज्या ज्या गोष्टींमध्ये तुमच्या सोबत्याचा दृष्टिकोन किंवा गोष्टी हाताळण्याची पद्धत तुमच्यापेक्षा उत्तम आहे अशा सर्व गोष्टींची एक यादी बनवा.—फिलिप्पैकर २:३.
आदर ही सुखी व टिकाऊ विवाहाची एक गुरुकिल्ली आहे. लीना म्हणते: “नवरा-बायकोला एकमेकांबद्दल आदर असेल तर ते त्यांच्या विवाहात संतुष्ट असतात, त्यांना सुरक्षित वाटते. मग काय हरकत आहे आदर दाखवायला?” (w११-E ०८/०१)
[तळटीपा]
^ परि. 3 नावे बदलण्यात आली आहेत.
^ परि. 3 हा लेख पतीला उद्देशून लिहिलेला असला तरी तो पत्नीलाही लागू होतो.
स्वतःला विचारा . . .
▪ माझ्या सोबत्याच्या आणि माझ्या आचार-विचारांमध्ये भिन्नता असल्यामुळे आमच्या कुटुंबाला कसा फायदा झाला आहे?
▪ बायबल तत्त्वांचे उल्लंघन होत नाही तेव्हा, माझ्या सोबत्याची निवड मान्य करणे उत्तम का आहे?