नैसर्गिक विपत्तींना तोंड कसे द्याल?
नैसर्गिक विपत्तींना तोंड कसे द्याल?
अलीकडे नैसर्गिक विपत्ती वारंवार येऊ लागल्या आहेत. शिवाय, पूर्वीपेक्षा जास्त विनाशकारकही बनल्या आहेत. तर मग, एक व्यक्ती कशा प्रकारे या विपत्तींना तोंड देऊ शकते? विपत्तींना तोंड देण्यासाठी कोणती काही व्यावहारिक पावले उचलता येतील याविषयी पाहू या.
सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. बायबल सांगते, “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.” (नीतिसूत्रे २२:३) हा सुज्ञ सल्ला विपत्तींच्या बाबतीतही उपयुक्त ठरू शकतो. ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची, पूर येण्याची किंवा चक्रीवादळ अथवा तुफान येण्याची पूर्वसूचना देण्यात आल्यास धोक्याच्या क्षेत्रातून बाहेर पडून सुरक्षित स्थळी जाणे शहाणपणाचे ठरेल. घरापेक्षा किंवा मालकीच्या इतर वस्तूंपेक्षा केव्हाही जीवनच जास्त मौल्यवान आहे.
काहींना कदाचित, विपत्ती येण्याची जास्त शक्यता असलेल्या क्षेत्रात न राहण्याची निवड करणे शक्य होईल. एका अधिकारसूत्रानुसार: “भौगोलिक दृष्ट्या, विपत्ती येण्याची शक्यता विशिष्ट भागांत जास्त आढळते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील फार कमी भागात हा धोका सर्वात जास्त असल्याचे दिसून येते. आणि भविष्यातील बहुतेक मोठ्या विपत्ती याच क्षेत्रांत घडतील.” उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यालगतचे सखल प्रदेश, किंवा पृथ्वीच्या विभंग रेषांच्या जवळ असलेले क्षेत्र. जर तुम्ही अशा धोकादायक क्षेत्रांत राहण्याचे टाळण्याच्या किंवा जास्त सुरक्षित क्षेत्रात राहायला जाण्याच्या स्थितीत असाल, तर विपत्तींपासून तुम्ही बऱ्याच प्रमाणात स्वतःचे संरक्षण करू शकाल.
पूर्वतयारी करा. सगळी काळजी घेतली असूनही, तुम्ही एखाद्या अनपेक्षित विपत्तीचे शिकार बनू शकता. पूर्वतयारी केली असल्यास तुम्हाला या विपत्तीला तोंड देणे जास्त सोपे जाईल. हेसुद्धा याआधी उद्धृत केलेल्या नीतिसूत्रे २२:३ यातील सल्ल्याच्या एकवाक्यतेत आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत लगेच उचलून पळ काढता येईल अशी इमर्जन्सी किट तुम्ही तयार करून ठेवली आहे का? वन-टू-थ्री ऑफ डिझास्टर एज्युकेशन या प्रकाशनानुसार अशा इमर्जन्सी किटमध्ये पुढील वस्तू असल्या पाहिजेत: प्रथमोपचाराचे साहित्य, बाटलीबंद पाणी, टिकाऊ खाद्यपदार्थ, आणि महत्त्वाची कागदपत्रे. तसेच, तुमच्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या विपत्ती येऊ शकतात आणि प्रत्येक विपत्तीच्या वेळी आपण काय करणार याविषयी तुमच्या कुटुंबासोबत आधीपासूनच चर्चा करणे शहाणपणाचे ठरेल.
देवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवा. हे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मदतदायी ठरेल. बायबलमध्ये देवाला “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” म्हणण्यात आले आहे आणि तो “आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करितो” असे त्यात सांगितले आहे. दुसऱ्या एका वचनात, “दीनांचे सांत्वन करणारा” असे देवाचे वर्णन करण्यात आले आहे.—२ करिंथकर १:३, ४; ७:६.
देवावर विश्वास ठेवणाऱ्यांवर कोणतीही परिस्थिती आल्यास, देवाला त्याची पुरेपूर जाणीव असते. तो प्रेमळ देव असून आपल्या लोकांना निरनिराळ्या मार्गांनी उमेद व प्रोत्साहन देतो. (१ योहान ४:८) कोणत्याही परिस्थितीत, एखादा चमत्कार होण्यासाठी नव्हे तर देवाच्या शक्तिशाली पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केल्यास तुम्हाला मदत मिळू शकते. पवित्र आत्मा आपद्ग्रस्तांना सांत्वनदायक व दिलासादायक ठरू शकतील असे बायबलमधील उतारे त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो. खरोखर, देवाच्या विश्वासू सेवकांनाही प्राचीन इस्राएलच्या दावीद राजासारखा अनुभव येऊ शकतो, ज्याने म्हटले: “मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.”—स्तोत्र २३:४.
यहोवाचे साक्षीदार एकमेकांना साहाय्य करतात. पहिल्या शतकात अगब नावाच्या एका ख्रिस्ती संदेष्ट्याने असे सुचवले की “सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. (हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला.)” यहूदीयातील येशूच्या बऱ्याच शिष्यांना या दुष्काळाचा फटका बसला. इतरत्र राहणाऱ्या शिष्यांनी आपल्या ख्रिस्ती बांधवांवर आलेल्या या संकटाचे वृत्त ऐकले तेव्हा त्यांनी काय केले? या अहवालात म्हटले आहे: “प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहूदीयात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे.” (प्रेषितांची कृत्ये ११:२८, २९) त्यांनी गरजेच्या वस्तू पाठवून आपल्या बांधवांना प्रेमळपणे साहाय्य केले.
आजही जेव्हा विपत्ती येतात तेव्हा देवाच्या सेवकांची प्रतिक्रिया यापेक्षा वेगळी नसते. यहोवाचे साक्षीदार आपल्या बांधवांच्या मदतीला धावून येतात ही गोष्ट सर्वज्ञात आहे. उदाहरणार्थ, २७ फेब्रुवारी, २०१० रोजी चिली येथे शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला तेव्हा यहोवाचे साक्षीदार विपत्तीग्रस्त भागातील बांधवांना मदत करण्यासाठी लगेच कामाला लागले. कार्ला, जिचे घर त्सुनामीत वाहून गेले ती सांगते: “अगदी दुसऱ्याच दिवशी इतर भागांतील बांधव [साक्षीदार] आम्हाला साहाय्य करण्यासाठी आले हे पाहून आम्हाला खूप सांत्वन व प्रोत्साहन मिळालं. त्या स्वयंसेवकांच्या चांगुलपणातून खुद्द यहोवानंच आमचं सांत्वन केलं यात काहीही शंका नाही. मला खरोखर त्या प्रसंगी यहोवाचं प्रेम व संरक्षण अनुभवायला मिळालं.” कार्ला हिचे आजोबा साक्षीदार नाहीत. पण साक्षीदारांनी दिलेली मदत पाहून ते म्हणाले: “इतक्या वर्षांपासून माझ्या चर्चमध्ये मी जे पाहात आलोय त्यापेक्षा हे अगदीच वेगळं आहे.” ते इतके प्रभावित झाले की त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांकडे बायबल अभ्यासाची विनंती केली.
विपत्तींच्या वेळी देवावर प्रेम करणाऱ्यांच्या सहवासात राहिल्यामुळे तुम्हाला खूप साहाय्य मिळू शकते. पण, ही पृथ्वी विपत्तींच्या शापातून पूर्णपणे मुक्त होईल असा काळ कधी येईल का? बायबल या विषयावर काय सांगते हे आता पाहू या. (w११-E १२/०१)
[६ पानांवरील चित्र]
आणीबाणीच्या परिस्थितीत लगेच उचलून पळ काढता येईल अशी इमर्जन्सी किट तुम्ही तयार करून ठेवली आहे का?
[७ पानांवरील चित्र]
कोणत्याही परिस्थितीत, एखादा चमत्कार होण्यासाठी नव्हे तर देवाच्या शक्तिशाली पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केल्यास तुम्हाला मदत मिळू शकते
[७ पानांवरील चित्र]
यहोवाचे साक्षीदार आपल्या बांधवांना विपत्तींतून सावरण्यास साहाय्य करतात
[७ पानांवरील चित्र]
“मला यहोवाचं प्रेम व संरक्षण अनुभवायला मिळालं”