जीवन कथा
“मी पाहायचो, पण मला समजायचं नाही”
१९७५ मध्ये मी दोन वर्षांचा होतो तेव्हा माझ्या बाबतीत काहीतरी ठीक नाही याची आईला शंका आली. आईनं मला कडेवर घेतलं असताना कोणीतरी एक मोठी वस्तू जमिनीवर आपटली तेव्हा मोठा आवाज झाला. आईनं पाहिलं की त्यामुळं मी मुळीच दचकलो नाही. मी तीन वर्षांचा झालो, तरी मला बोलायला येत नव्हतं. नंतर आमच्या कुटुंबाला एक धक्कादायक बातमी कळली. माझं परीक्षण केल्यावर तज्ज्ञांनी सांगितलं की मी मुळीच ऐकू शकत नाही!
मी खूप लहान होतो तेव्हा आईबाबांचा घटस्फोट झाला. त्यामुळं, आम्हा चार भावंडांना—माझ्याव्यतिरिक्त दोन मोठ्या भावांना आणि एका बहिणीला—वाढवण्याची जबाबदारी एकट्या आईवर येऊन पडली. आज कर्णबधीर मुलांना ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्या प्रकारचं शिक्षण त्या वेळी फ्रान्समध्ये दिलं जात नसे. आणि शिक्षण देण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जायच्या त्या कधीकधी खूपच त्रासदायक असायच्या. तरीसुद्धा, लहानपणापासूनच माझी परिस्थिती इतर कर्णबधीर लोकांच्या तुलनेत बरीच चांगली होती. असं मी का म्हणू शकतो ते तुम्हाला सांगतो.
काही काळापर्यंत, अनेक शिक्षण तज्ज्ञांचं मत होतं, की कर्णबधीर मुलांना बोलीचा आणि ओठांच्या हालचालींचा वापर करून शिकवलं जावं. खरंतर फ्रान्समध्ये, जिथं मी लहानाचा मोठा झालो होतो, तिथं शाळेत संकेत भाषेचा वापर करण्याची मनाई होती. शाळेत वर्ग सुरू असताना, काही कर्णबधीर मुलांचे हात त्यांच्या पाठीमागे बांधले जायचे.
माझ्या जीवनातील सुरुवातीच्या काही वर्षांत, मला दर आठवड्यात कितीतरी तास एका उच्चारणोपचार तज्ज्ञासोबत (स्पीच थेरपिस्ट) घालवावे लागले. ती माझा जबडा किंवा डोकं धरून वारंवार असे आवाज काढायला सांगायची जे मी ऐकूच शकत नव्हतो. मी इतर मुलांसोबत बोलू शकत नव्हतो. तो काळ माझ्या जीवनातील अतिशय त्रासदायक काळ होता.
नंतर, मी सहा वर्षांचा असताना मला कर्णबधिरांच्या बोर्डिंग शाळेत घालण्यात आलं. मी पहिल्यांदा इतर कर्णबधीर मुलांच्या संपर्कात आलो. इथंसुद्धा संकेत भाषेचा वापर करण्यावर प्रतिबंध होता. आम्ही हातांनी इशारे करताना कोणी पाहिलं, तर आमच्या बोटांवर छडीचा मार बसायचा किंवा आमचे केस ओढले जायचे. पण, आम्ही तयार केलेल्या संकेतांचा वापर करून आम्ही लपूनछपून संवाद साधायचो. अशा प्रकारे शेवटी मी इतर मुलांसोबत संवाद साधू शकलो. पुढील चार वर्षं मजेत गेली.
पण, मी दहा वर्षांचा होतो तेव्हा मला सामान्य मुलांसाठी असलेल्या प्राथमिक शाळेत घालण्यात आलं. माझं जगच उद्ध्वस्त झालं! मला वाटलं, इतर सर्व कर्णबधीर मुलं मरण पावली आहेत आणि सबंध जगात मी एकटाच कर्णबधीर उरलो आहे. माझ्यासोबत संकेत भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास उच्चारणोपचाराचे काहीच फायदे होणार नाहीत असा सल्ला डॉक्टरांनी आमच्या कुटुंबाला दिला होता. त्यामुळं, माझ्या कुटुंबानं संकेत भाषा शिकली नाही आणि मलादेखील कर्णबधीर मुलांसोबत सहवास करण्याची परवानगी दिली नाही. मला अजूनही आठवतं: एकदा आम्ही श्रवणोपचार तज्ज्ञाकडे गेलो होतो. त्याच्या टेबलावर संकेत भाषेचं एक पुस्तक ठेवलं होतं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र पाहून मी त्याकडे बोट दाखवून म्हणालो, “ते मला हवंय!” त्या डॉक्टरनं लगेच ते पुस्तक लपवलं. *
बायबलमधील सत्य शिकण्याची सुरुवात
आईनं आम्हा मुलांमध्ये ख्रिस्ती तत्त्वं रुजवण्याचा प्रयत्न केला. ती आम्हाला बॉरडोच्या जवळ असलेल्या मेरीनयाक इथं यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना घेऊन जायची. लहान असताना, सभांमध्ये जे शिकवलं जायचं ते मला फारसं समजायचं नाही. पण, मंडळीतले लोक आळीपाळीनं माझ्याजवळ बसायचे आणि काय शिकवलं जात आहे ते मला लिहून दाखवायचे. त्यांचा जिव्हाळा आणि कळकळ पाहून मी प्रभावित झालो. घरी आई बायबलमधून माझा अभ्यास घ्यायची, पण ती मला जे शिकवायची त्याचा अर्थ मला कधीच पूर्णपणे समजायचा नाही. मला दानीएल संदेष्ट्यासारखंच वाटायचं. एका देवदूताकडून त्याला एक भविष्यावाणी मिळाल्यावर त्यानं म्हटलं: “मी हे ऐकले पण समजलो नाही.” (दानीएल १२:८) माझ्या बाबतीत म्हणाल तर, “मी पाहायचो, पण मला समजायचं नाही.”
असे असूनही, बायबलमधील मूलभूत सत्ये हळूहळू माझ्या मनात मूळ धरू लागली. मला ज्या गोष्टींचा अर्थ स्पष्टपणे समजला होता त्या मी माझ्या मनात साठवल्या आणि त्यांचा जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न केला. इतरांचं आचरण पाहूनही मी अनेक गोष्टी शिकलो. उदाहरणार्थ, बायबल आपल्याला धीर धरण्यास सांगतं. (याकोब ५:७, ८) पण, धीर धरणं म्हणजे काय ते मला समजत नव्हतं. तरीसुद्धा, मी इतर बंधुभगिनींना हा गुण दाखवताना पाहिलं, तेव्हा मला समजलं की धीर दाखवणं म्हणजे काय आहे. खरंच, ख्रिस्ती मंडळीमुळं मला बराच फायदा झाला.
घोर निराशा आणि एक सुखद धक्का
मी किशोरावस्थेत होतो तेव्हा एके दिवशी रस्त्यावर काही कर्णबधीर तरुण संकेत भाषेत एकमेकांशी संवाद साधत असल्याचं मी पाहिलं. मी गुप्तपणे त्यांच्यासोबत सहवास करू लागलो आणि फ्रेंच संकेत भाषा शिकू लागलो. मी ख्रिस्ती सभांना जाणं सुरूच ठेवलं. मंडळीत स्टेफान नावाचा एक तरुण साक्षीदार होता. त्यानं माझ्याबद्दल खास आपुलकी दाखवली. माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्न केले. तो मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच वाटू लागला. पण, लवकरच मला घोर निराशेचा सामना करावा लागणार होता. स्टेफाननं सैन्यात भरती होण्यास नकार दिल्यामुळं त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. मी पार उद्ध्वस्त झालो! स्टेफान नसल्यामुळं, मी खूप निराश झालो आणि सभांना जायचं जवळजवळ पूर्णपणे थांबवलं.
अकरा महिन्यांनंतर, स्टेफानची तरुंगातून सुटका झाली आणि तो घरी परतला. स्टेफान माझ्यासोबत संकेत भाषेत संवाद करू लागला हे पाहून मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसेना! काय घडलं होतं? तुरुंगात असताना स्टेफाननं फ्रेंच संकेत भाषा शिकून घेतली होती. माझ्यासोबत संवाद साधताना स्टेफान जे हातवारे करत होता ते पाहून आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मी रोमांचित झालो. मी विचार केला आता स्टेफान मला बायबलमधील सत्यं समजण्यास चांगल्या प्रकारे मदत करू शकतो.
शेवटी बायबलमधील सत्यं मला समजू लागली
स्टेफाननं माझ्यासोबत बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. आता कुठं मी पूर्वी बायबलमधून ज्या गोष्टी शिकलो होतो त्यांचा एकमेकांशी संबंध जोडू शकलो. लहान असताना, मला आपल्या बायबल आधारित प्रकाशनांतील सुंदर चित्रं पाहायला खूप आवडायचं. बायबलमधील कथा पाठ करण्यासाठी मी चित्रांतील प्रत्येक पात्राची तुलना करायचो आणि कथेतील बारीकसारीक तपशील निरखून पाहायचो. मला अब्राहाम, त्याची “संतती” आणि “मोठा लोकसमुदाय” यांच्याबद्दल माहीत होतं. पण, या सर्व गोष्टींचा अर्थ काय आहे हे मला संकेत भाषेत समजावून सांगण्यात आलं तेव्हाच त्यांचा खरा अर्थ मी समजू शकलो. (उत्पत्ति २२:१५-१८; प्रकटीकरण ७:९) यावरून स्पष्टच आहे, की संकेत भाषाच माझी स्वाभाविक भाषा आणि माझी आवडती भाषा आहे.
सभांमध्ये जे शिकवलं जायचं ते आता मला समजू शकत होतं, त्यामुळं ते माझ्या हृदयापर्यंत पोहचत होतं आणि अशा प्रकारे सत्याबद्दल माझी तहान आणखी वाढली. स्टेफानच्या मदतीमुळं बायबलची माझी समज वाढत गेली, आणि १९९२ मध्ये मी आपलं जीवन यहोवा देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. पण, लहानपणी इतरांशी संवाद साधू शकत नसल्यामुळं मी लाजाळू बनलो व इतरांसोबत सहवास करणं मला कठीण वाटायचं.
लाजाळूपणावर मात करण्यासाठी संघर्ष
कालांतराने, मी ज्या कर्णबधीर लोकांच्या गटासोबत सहवास करायचो, त्याला बॉरडो प्रांताच्या पेसाक या उपनगरातील मंडळीसोबत एक करण्यात आलं. ते खूप चांगलं झालं. त्यामुळं, मी पुढेही आध्यात्मिक प्रगती करू लागलो. इतरांशी संवाद साधण्याची माझी
क्षमता अजूनही मर्यादित होती, पण ऐकू शकणारे माझे मित्र मला सर्व काही समजलं आहे याची खातरी करायचे. झेल आणि एलोडी नावाच्या एका जोडप्यानं माझ्याशी संवाद करण्याकरता बरीच मेहनत घेतली. ते सभेनंतर मला अधूनमधून त्यांच्यासोबत जेवण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी बोलवायचे. अशा प्रकारे, आमच्यामध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. खरंच, देवाच्या प्रेमळ मार्गांवर चालणाऱ्या लोकांसोबत सहवास करणं किती आनंदाची गोष्ट आहे!याच मंडळीत मी सुंदर वनेसाला भेटलो. ती संवेदनशील होती आणि भेदभाव करायची नाही. त्यामुळं, मी तिच्याकडे आकर्षित झालो. माझा कर्णबधीरपणा हा एक अडसर आहे असा तिनं कधीच विचार केला नाही. तर, एका कर्णबधीर व्यक्तीशी संवाद साधण्याची ही एक सुसंधी आहे असं ती मानायची. मी तिच्या प्रेमात पडलो आणि २००५ मध्ये आम्ही लग्न केलं. इतरांशी संवाद साधायला मला कठीण जात असलं, तरी वनेसानं माझ्या लाजाळूपणावर मात करण्यास व मनमोकळेपणानं माझ्या भावना व्यक्त करण्यास मला मदत केली. माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ती मला जे साहाय्य करते त्याबद्दल मी तिचे मनस्वी आभार मानतो.
यहोवाकडून आणखी एक भेट
आमचं लग्न ज्या वर्षी झालं होतं, त्याच वर्षी लूवीएमध्ये असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या फ्रान्समधील शाखा कार्यालयानं भाषांतर कार्याच्या प्रशिक्षणासाठी मला एक महिन्याकरता बोलावलं. शाखा कार्यालयाद्वारे अलीकडील वर्षांत फ्रेंच संकेत भाषेत डीव्हीडीवरील कार्यक्रम तयार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. पण, अजूनही बरंच कार्य करायचं असल्यामुळं, संकेत भाषेत भाषांतर करणाऱ्या गटाला मदतीची गरज आहे.
मला आणि वनेसाला वाटलं, की शाखा कार्यालयात सेवा करणं हा माझ्याकरता एक मोठा बहुमान आणि यहोवाकडून एक भेट आहे. पण, त्याच वेळी मला हेही मान्य करावं लागेल, की आम्हाला थोडीशी भीती वाटत होती. आमच्या मंडळीतील संकेत भाषा गटाचं काय होईल? आमच्या घराचं काय? त्या भागात वनेसाला काम मिळेल की नाही? यहोवानं अद्भुत रीतीनं प्रत्येक समस्येवर उपाय शोधायला आम्हाला मदत केली. यहोवाचं आमच्यावर आणि इतर कर्णबधीर लोकांवर प्रेम असल्याचं मी अनुभवलं आहे.
एकजुटीनं राहणाऱ्या लोकांचा आधार
मी स्वतः संकेत भाषेमध्ये भाषांतर करणाऱ्या गटासोबत काम करत असल्यानं, कर्णबधीर लोकांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्यासाठी काय काय केलं जात आहे मी हे चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि माझे अनेक सहकारी माझ्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात हे पाहून मला अतिशय आनंद होतो. त्यांनी शिकून घेतलेली संकेत भाषेची काही चिन्हं ते वापरण्याचा प्रयत्न करतात हे पाहून माझं हृदय भरून येतं. मी त्यांच्यापैकी नाही असं मला मुळीच वाटत नाही. या सर्व प्रेमळ कृत्यांवरून यहोवाच्या लोकांमध्ये असलेलं अद्भुत ऐक्य दिसून येतं.—स्तोत्र १३३:१.
यहोवानं मला मदत करण्यासाठी ख्रिस्ती मंडळीद्वारे नेहमीच कोणाचा तरी वापर केला आहे याबद्दल मी मनापासून त्याचे आभार मानतो. इतर कर्णबधीर लोकांनी आपल्या प्रेमळ सृष्टिकर्त्याबद्दल जाणून घ्यावं आणि त्याच्या जवळ यावं म्हणून त्यानं काही प्रमाणात माझा वापर केला आहे याबद्दल मी त्याचा आभारी आहे. मी मोठ्या आतुरतेनं त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा संवाद साधण्यातील सर्व अडथळे काढून टाकले जातील. आणि त्या वेळी ऐक्यात असलेल्या मानवी कुटुंबाचे सदस्य या नात्यानं सर्व लोक “शुद्ध वाणी,” म्हणजे यहोवा देवाबद्दलचे आणि त्याच्या उद्देशांविषयीचे सत्य बोलतील.—सफन्या ३:९. ▪ (w१३-E ०३/०१)
^ १९९१ पर्यंत फ्रान्स सरकारने मुलांना शिक्षण देण्यासाठी संकेत भाषेचा वापर करण्याची अधिकृत परवानगी दिली नव्हती.