देवाच्या जवळ या
“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो”
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी तुमची इच्छा आहे का? वेदना, दुःख आणि मृत्यू नसलेल्या जगात राहण्याची इच्छा तुम्ही बाळगता का? हे एक स्वप्न नाही, तर असे जग लवकरच येणार आहे. खुद्द यहोवा देवाने एक नीतिमान नवीन जग आणण्याचे अभिवचन दिले आहे. ते अभिवचन कसे पूर्ण होईल त्याचे वर्णन बायबलमधील प्रकटीकरण २१:३-५ (वाचा) या वचनांत करण्यात आले आहे.
“[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल.” (प्रकटीकरण २१:४) देव कोणते अश्रू पुसून टाकेल? हे आनंदाचे किंवा डोळ्यांना ज्यांची गरज असते ते अश्रू नाहीत; तर दुःख आणि वेदना यांमुळे जे अश्रू येतात त्यांना हे सूचित करते. देव हे अश्रू पूर्णपणे पुसून टाकेल. ते कसे? ज्या कारणांमुळे आपल्या डोळ्यांत अश्रू येतात ती कारणेच म्हणजे दुःख आणि वेदना कायमच्या नाहीशा करण्याद्वारे तो हे करेल.
“यापुढे मरण नाही.” (प्रकटीकरण २१:४) मृत्यूमुळे आजवर किती अश्रू ढाळले गेले हे वेगळे सांगायला नको. यहोवा आज्ञाधारक मानवांची मृत्यूच्या विळख्यातून सुटका करेल. कशी? मृत्यूचे मूळ कारण म्हणजे आदामाकडून वारशाने मिळालेले पाप काढून टाकण्याद्वारे. (रोमकर ५:१२) येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा आज्ञाधारक मानवांना परिपूर्ण स्थितीत आणेल. * त्यानंतर शेवटचा शत्रू, मृत्यू “नाहीसा केला जाईल.” (१ करिंथकर १५:२६) मग, यहोवा देवाने उद्देशिल्याप्रमाणे विश्वासू मानवांना सदासर्वकाळ परिपूर्ण आरोग्यासह जीवन जगणे शक्य होईल.
“शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:४) पाप आणि अपरिपूर्णतेने लाखो लोकांना मानसिक, भावनिक आणि शारीरिक वेदना दिल्या आहेत; यामुळे जीवन जगणे त्यांना असह्य झाले आहे. पण लवकरच अशा सर्व वेदना मुळापासून नाहीशा केल्या जातील.
अश्रू, मृत्यू आणि वेदना यांशिवाय जीवन जगणे खरोखरच शक्य होणार आहे. पण तुम्ही कदाचित विचाराल: ‘असं जीवन कुठं मिळेल? स्वर्गात?’ नाही. का नाही याची कारणे पाहू यात. पहिले म्हणजे, देवाने जे अभिवचन दिले त्यात सुरुवातीला म्हटले आहे: “देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे,” आणि मनुष्य तर पृथ्वीवर राहतात. (प्रकटीकरण २१:३) दुसरे म्हणजे, देवाचे वचन अशा एका जगाविषयी सांगते ज्यात “मरण” नसेल; हे असे जग आहे जेथे एकेकाळी मृत्यू होता, पण पुढे तो नसेल. स्वर्गात मृत्यू कधीच नव्हता; याउलट, पृथ्वीवर तो अनेक वर्षांपासून आहे. यावरून स्पष्ट होते, की उत्तम जीवनाबद्दल देवाने दिलेले अभिवचन पृथ्वीवरच पूर्ण होईल.
दुःख आणि वेदना यांमुळे येणारे अश्रू तो पुसून टाकेल
नीतिमान नवीन जगाबद्दल यहोवाने जे अभिवचन दिले त्यावर आपण विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे. भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल सांगितल्यानंतर तो लगेच या अभिवचनाच्या पूर्णतेची खातरी कशी देतो ते विचारात घ्या. “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो,” असे म्हटल्यानंतर तो लगेच म्हणतो: “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.” (प्रकटीकरण २१:५) देवाने दिलेले हे अभिवचन वैभवशाली रीतीने पूर्ण होईल आणि त्याचे सर्व उपासक मोठ्या आनंदाने त्याची पूर्णता होताना पाहतील. तुम्ही आणि तुमचे प्रियजन त्यांच्यापैकी एक कसे होऊ शकता हे जाणून घेण्याचे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देतो. ▪ (w13-E 12/01)
बायबल वाचन
^ परि. 5 येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ५ पाहा.