व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत लोकांसाठी आशा—पुनरुत्थान

मृत लोकांसाठी आशा—पुनरुत्थान

मृत लोकांचे पुनरुत्थान होईल, म्हणजे त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल या बायबलमध्ये दिलेल्या अभिवचनावर तुम्ही विश्वास ठेवता का? * खरे पाहता, मरण पावलेल्या आपल्या प्रिय जनांना भेटण्याची आशा मनाला खूप दिलासा देते. पण ही आशा वास्तवावर आधारित आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपण येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी जे उदाहरण मांडले त्याचा विचार करू या.

मृत लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल यावर प्रेषितांचा पूर्ण विश्वास होता. का? याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, त्यांची ही आशा प्रामुख्याने या वस्तुस्थितीवर आधारित होती की येशूला देवाने पुन्हा जिवंत केले होते. पुनरुत्थान झालेल्या येशूला, प्रेषितांनी आणि एका वेळी “पाचशेपेक्षा अधिक” बंधूंनी पाहिले. (१ करिंथकर १५:६) शिवाय, चारही शुभवर्तमान पुस्तकांतून हे दिसून येते की येशूचे पुनरुत्थान झाल्याची अनेक लोकांनी ग्वाही दिली आणि बहुतेकांनी त्याचे पुनरुत्थान झाल्याचे मान्य केले.—मत्तय २७:६२–२८:२०; मार्क १६:१-८; लूक २४:१-५३; योहान २०:१–२१:२५.

दुसरे कारण म्हणजे, येशूने तीन लोकांना पुन्हा जिवंत केल्याचे प्रेषितांनी स्वतः पाहिले होते—पहिल्यांदा नाईनमध्ये, नंतर कफर्णहूममध्ये आणि शेवटी बेथानीमध्ये. (लूक ७:११-१७; ८:४९-५६; योहान ११:१-४४) शेवटल्या प्रसंगी येशूने ज्या व्यक्तीचे पुनरुत्थान केले होते तिच्याविषयी या अंकाच्या सुरुवातीच्या लेखांत वर्णन करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसोबत येशूची खास मैत्री होती. त्या प्रसंगी काय झाले ते जाणून घेऊ या.

“पुनरुत्थान व जीवन मीच आहे”

मार्थाचा भाऊ लाजर याचा मृत्यू होऊन चार दिवस झाले होते. येशूने मार्थाला म्हटले: “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” येशूच्या या शब्दांचा अर्थ तिला सुरुवातीला कळला नाही. भविष्यात केव्हातरी लाजराचे पुनरुत्थान होईल असा विचार करून ती म्हणाली, की तो “पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.” असे म्हटल्यानंतर, त्याने मार्थाचा भाऊ लाजर याला पुन्हा जिवंत केले. हे पाहून मार्था किती आश्चर्यचकित झाली असेल याचा विचार करा!—योहान ११:२३-२५.

लाजराचा मृत्यू होऊन चार दिवस झाले होते; यादरम्यान तो कोठे होता? ते चार दिवस आपण आणखी कोठेतरी जिवंत होतो असे लाजराने म्हटले नाही. त्याच्याजवळ अमर आत्मा नव्हता; त्यामुळे तो स्वर्गातही गेला नव्हता. तेव्हा, येशूने त्याचे पुनरुत्थान करून त्याला देवाच्या सान्निध्यातून परत पृथ्वीवर आणले असेही म्हणता येणार नाही. तर मग, त्या चार दिवसांदरम्यान लाजर कोठे होता? खरे पाहता, तो कबरेत झोपी गेला होता.—उपदेशक ९:५, १०.

ही गोष्ट लक्षात ठेवा की येशूने मृत्यूची तुलना झोपेशी केली आहे. त्याअर्थी पुनरुत्थान करणे म्हणजे एखाद्याला जणू झोपेतून उठवणे. बायबलच्या अहवालात असे म्हटले आहे: “आपला  मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो. यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे.” (योहान ११:११-१४) लाजराचे पुनरुत्थान करण्याद्वारे येशूने त्याला त्याचे जीवन परत दिले आणि त्याला त्याच्या कुटुंबासोबत पुन्हा एकत्रित केले. त्या कुटुंबाला येशूकडून खरोखरच किती अद्भुत भेट मिळाली!

येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने जे पुनरुत्थान केले ते भविष्यात देवाच्या राज्याचा राजा या नात्याने तो जे करेल त्याची फक्त एक पूर्वझलक होती. * येशू स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करेल. त्याच्या राज्यादरम्यान तो कबरेत झोपी गेलेल्या सर्व मानवांना पुन्हा जिवंत करेल. म्हणूनच त्याने असे म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.” तुमच्या मृत प्रिय जनांना पुन्हा जिवंत झाल्याचे पाहून तुम्हाला किती आनंद होईल याचा विचार करा! शिवाय, ज्यांना जिवंत केले जाईल त्यांनासुद्धा किती आनंद होईल याचादेखील विचार करा!—लूक ८:५६.

तुमच्या मृत प्रिय जनांना पुन्हा जिवंत झाल्याचे पाहून तुम्हाला किती आनंद होईल याचा विचार करा!

सदासर्वकाळचे जीवन मिळवण्यासाठी विश्वास हवा

येशू मार्थाला म्हणाला: “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.” (योहान ११:२५, २६) येशू त्याच्या हजार वर्षांच्या राज्य शासनादरम्यान ज्यांचे पुनरुत्थान करेल त्यांनी जर त्याच्यावर विश्वास ठेवला, तर त्यांना सदासर्वकाळचे जीवन जगण्याची आशा आहे.

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.”—योहान ११:२५

पुनरुत्थानाविषयीचे वरील उल्लेखनीय विधान केल्यानंतर येशूने मार्थाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला: “हे तू खरे मानतेस काय?” ती त्याला म्हणाली: “होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे.” (योहान ११:२६, २७) मार्थाचा पुनरुत्थानावर पूर्ण विश्वास होता. तुमच्याबद्दल काय? तुम्हालाही तिच्यासारखा विश्वास उत्पन्न करायला आवडेल का? असे करण्याचे पहिले पाऊल म्हणजे मानवजातीसाठी देवाचा जो उद्देश आहे त्याबद्दलचे ज्ञान घेणे. (योहान १७:३; १ तीमथ्य २:४) या ज्ञानामुळे तुमचा विश्वास वाढू शकतो. पुनरुत्थानाबद्दल बायबल काय शिकवते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना विचारू शकता. पुनरुत्थानाच्या अद्भुत आशेविषयी तुमच्यासोबत चर्चा करायला त्यांना नक्कीच आवडेल. ▪ (w14-E 01/01)

^ परि. 2 या अंकातील पृष्ठ ६ वर असलेला, “मृत्यूमुळे सगळेच संपत नाही!” हा लेख पाहा.

^ परि. 9 भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानाविषयी बायबलमध्ये कोणते अभिवचन दिले आहे हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ७ पाहा. हे पुस्तक www.mt1130.com/mr वरदेखील उपलब्ध आहे.