मुलांना शिस्त कशी लावावी?
“येणाऱ्या प्रत्येक कारचा आवाज मी श्वास रोखून ऐकत होतो. आज तिसऱ्यांदा जॉर्डनला घरी यायला उशीर झाला होता. माझ्या मनात असंख्य प्रश्न येत होते: ‘कुठं असेल तो?, त्याला काही झालं तर नसेल ना?, आमच्या मनाला किती घोर लागलाय याची त्याला कल्पनासुद्धा आहे का?’ तो घरी आला तेव्हा माझ्या रागाचा भडका होणारच होता.”—जॉर्ज.
“माझी मुलगी जोरात किंचाळली तेव्हा माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी वळून पाहिलं तर ती डोकं घट्ट धरून रडत होती. कारण माझ्या चार वर्षांच्या मुलानं तिला मारलं होतं.”—नीकोल.
“‘मी ती अंगठी चोरली नाही; मला ती सापडली!’ असं आमची सहा वर्षांची मुलगी नॅटली निरागसपणे म्हणत होती. ती तिची चूक मान्य करायलाच तयार नव्हती. ही गोष्ट आमच्या मनाला इतकी लागली की आम्हाला रडू आलं. कारण आम्हाला माहीत होतं, की ती चक्क खोटं बोलत आहे.”—स्टीफन.
तुम्हालाही मुले असतील तर या पालकांच्या भावना तुम्ही समजू शकता का? असे प्रसंग समोर येतात तेव्हा तुमच्या मनात कदाचित पुढील प्रश्न येऊ शकतात: मुलांना शिस्त लावावी का?, आणि लावावी तर कशी? तसेच, मुलांना शिस्त लावणे चुकीचे आहे का?
शिस्त म्हणजे काय?
बायबलमध्ये “शिस्त” हा शब्द फक्त शिक्षेच्या संदर्भात नव्हे, तर प्रामुख्याने मार्गदर्शन, शिक्षण आणि सुधारणूक यांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे. दुर्व्यवहार किंवा क्रूरता यांच्याशी त्याचा मुळीच संबंध जोडलेला नाही.—नीतिसूत्रे ४:१, २.
शिस्त लावण्याची तुलना बागकामाशी करता येईल. माळी जमीन तयार करतो, रोपाला पाणी व खत घालतो. तसेच, कीटक व तण यांपासून तो त्याचे संरक्षण करतो. माळी वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्रितपणे व काळजीपूर्वक उपयोग करतो तेव्हा रोपाची चांगली वाढ होते. रोप वाढत असताना त्याची योग्य दिशेने वाढ व्हावी म्हणून माळ्याला त्याची छाटणी करावी लागते. त्याचप्रमाणे, पालकसुद्धा निरनिराळ्या मार्गांनी मुलांची काळजी घेतात. पण, काही वेळा पालकांना आपल्या मुलांना शिस्त लावावी लागते. यामुळे मुलांमधील चुकीच्या प्रवृत्ती सुरुवातीलाच छाटल्या जातात व मुलांना योग्य वळण लागण्यास मदत मिळते. रोपाला कायमची इजा होऊ नये म्हणून माळी काळजीपूर्वक रोपाची छाटणी करतो. त्याचप्रमाणे, शिस्तसुद्धा प्रेमळपणे लावली जावी.
शिस्त लावण्याच्या बाबतीत यहोवा देवाने पालकांसमोर उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. त्याची शिस्त इतकी प्रभावशाली व उत्तम आहे, की पृथ्वीवरील त्याच्या आज्ञाधारक उपासकांना ती “प्रिय” वाटू लागते. (नीतिसूत्रे १२:१) त्याचे उपासक त्याची शिस्त सोडून देत नाहीत, तर ती “दृढ धरून” ठेवतात. (नीतिसूत्रे ४:१३) शिस्त लावण्याच्या देवाच्या पद्धतीची तीन प्रमुख वैशिष्ट आहेत. तो (१) प्रेमळपणे, (२) योग्य प्रमाणात व (३) स्तर न बदलता शिस्त लावतो. त्यांचे अनुसरण केल्यास मुलांना शिस्त स्वीकारण्यास तुम्ही मदत करू शकता.
प्रेमळपणे लावलेली शिस्त
देवाच्या शिस्तीचा पाया प्रेम असून प्रेमापोटीच तो शिस्त लावतो. बायबल म्हणते: “जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, नीतिसूत्रे ३:१२) तसेच यहोवा दयाळू, कृपाळू व मंदक्रोध आहे. (निर्गम ३४:६) त्यामुळे शिस्त लावताना तो कधीच दुर्व्यवहाराचा किंवा क्रूरतेचा अवलंब करत नाही. शिवाय कठोर, टीकात्मक किंवा झोंबणाऱ्या शब्दांचाही तो वापर करत नाही. अशा सर्व गोष्टी तरवारीप्रमाणे एखाद्याच्या मनावर घाव करू शकतात.—नीतिसूत्रे १२:१८.
तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.” (हे कबूल आहे, की संयम राखण्याच्या बाबतीत देवाच्या परिपूर्ण उदाहरणाचे तंतोतंत अनुकरण करणे पालकांना शक्य नाही. मुले कधीकधी पालकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू शकतात. अशा वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: जर शिस्त रागाच्या भरात लावली गेली तर ती सहसा क्रूर, वाजवीपेक्षा जास्त आणि निरुपयोगी ठरू शकते. अशी शिस्त मुळात शिस्त असूच शकत नाही. उलट त्यावरून हेच दिसून येईल, की तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण नाही.
दुसरीकडे पाहता, भावनांवर नियंत्रण ठेवून प्रेमळपणे लावलेल्या शिस्तीमुळे सहसा चांगले परिणाम घडून येतात. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखिलेले जॉर्ज आणि नीकोल यांनी कशा प्रकारे आपली समस्या हाताळली ती विचारात घ्या.
“जॉर्डन घरी आला तेव्हा आम्हा पती-पत्नीच्या मनात राग खदखदत होता. पण, रागावर नियंत्रण ठेवून आम्ही त्याचं स्पष्टीकरण ऐकून घेतलं. रात्र खूप झाली होती, त्यामुळं आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यावर बोलण्याचं ठरवलं. आम्ही एकत्र मिळून प्रार्थना केली आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्याशी शांतपणे बोलण्याच्या आणि त्याच्या मनापर्यंत पोहचण्याच्या स्थितीत होतो. आम्ही जे काही नियम बनवले ते त्यानं स्वखुषीनं मान्य केले आणि आपण किती बेजबाबदारपणे वागलो हेही त्यानं स्वीकारलं. यातून एक गोष्ट आमच्या लक्षात आली; ती म्हणजे रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया दाखवल्यास बरेचदा उलट परिणाम घडून येतात. त्याऐवजी, आधी शांतपणे ऐकून घेतल्यास सहसा चांगले परिणाम घडून येतात.”—जॉर्ज.
“माझ्या मुलानं माझ्या मुलीला मारलं तेव्हा मला खूप राग आला. पण, रागाच्या भरात मला कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नव्हता. त्यामुळं काहीही न बोलता मी त्याला त्याच्या खोलीत जायला सांगितलं; नंतर माझा राग शांत झाला तेव्हा मी कडक शब्दांत त्याला सांगितलं की हाणामारी मुळीच चालणार नाही. त्याच्या अशा वागण्यामुळं त्याच्या बहिणीला किती त्रास झाला हेही मी त्याला सांगितलं. याचा परिणाम असा झाला, की त्याची चूक त्याच्या लक्षात आली. त्यानं बहिणीची माफी मागितली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली.”—नीकोल.
होय, योग्य प्रकारची शिस्त नेहमी प्रेमापोटीच दिली जाते; मग ती शिक्षा असली तरीही.
योग्य प्रमाणात लावलेली शिस्त
यहोवा नेहमी “योग्य प्रमाणातच” शिस्त लावतो. (यिर्मया ३०:११; ४६:२८, मराठी कॉमन लँग्वेज) शिस्त लावताना तो सर्व गोष्टी विचारात घेतो; अगदी न दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा. पालक त्याचे अनुकरण कसे करू शकतात? लेखाच्या सुरुवातीला उल्लेख करण्यात आलेले स्टीफन म्हणतात: “नॅटली तिची चूक कबूल करायला तयारच नाही हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं; ती असं का वागत आहे हे आम्हाला कळत नव्हतं. पण ती वयानं लहान आहे, नासमज आहे हे आम्ही लक्षात घेतलं.”
नीकोलचे पती रॉबर्टसुद्धा सर्व गोष्टी विचारात घेण्याचा प्रयत्न करतात. मुलं चुकीचं वागतात तेव्हा ते वारंवार स्वतःला हे प्रश्न विचारतात: ‘आपलं मूल पहिल्यांदाच असं वागलं, की नेहमीच असं वागतं? मूल थकलंय, की त्याला बरं वाटत नाही? त्याचं हे वागणं दुसऱ्या एखाद्या समस्येचं लक्षण तर नसेल?’
समंजस पालक हेदेखील लक्षात ठेवतात, की मुले ही मुलेच असतात. प्रेषित पौलानेसुद्धा ही गोष्ट मान्य केली. त्याने म्हटले: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत.” (१ करिंथकर १३:११) रॉबर्ट म्हणतात: “लहान असताना मी कसा वागायचो ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळं योग्य दृष्टिकोन बाळगण्यास आणि टोकाची प्रतिक्रिया टाळण्यास मला मदत मिळते.”
पालकांनी मुलांकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करू नये. हे खूप महत्त्वाचे आहे. पण त्याच वेळी, मुलांच्या चुकीच्या वागण्याकडे किंवा चुकीच्या सवयींकडे त्यांनी डोळेझाक करू नये. मुलाची क्षमता, त्याच्या कमतरता आणि इतर गोष्टी विचारात घेतल्याने त्याला योग्य प्रमाणात शिस्त लावणे शक्य होईल.
स्तर न बदलता लावलेली शिस्त
मलाखी ३:६ म्हणते: “मी परमेश्वर बदलणारा नव्हे.” या गोष्टीवर देवाच्या सेवकांचा भरवसा आहे. देव बदलणारा नाही या जाणिवेमुळे त्यांना सुरक्षित वाटते. शिस्तीच्या बाबतीत तुमचे स्तर नेहमी सारखेच असतील, तर मुलांनाही सुरक्षित वाटेल. पण, तुमच्या मूडच्या हिशोबाने तुमचे स्तर बदलले तर मुले गोंधळून जातील व चिडचिडी होतील.
येशूने जे म्हटले ते आठवा: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे.” हे शब्द पालकांनाही तितकेच लागू होतात. (मत्तय ५:३७) तुम्ही तुमच्या शब्दाला जागणार की नाही याचा पुरेसा विचार करूनच ताकीद द्या. चुकीचे वागल्यास अमुक शिक्षा दिली जाईल अशी जर ताकीद दिली असेल तर ती शिक्षा त्याला नक्की द्या.
अशा प्रकारे शिस्त लावण्यासाठी मुलांशी मनमोकळा संवाद करणे खूप महत्त्वाचे आहे. रॉबर्ट म्हणतात: “पत्नीनं मुलांना एखादी गोष्ट करण्यास मनाई केली असेल; पण तीच गोष्ट करण्याची परवानगी मुलांनी माझ्याकडून घेतली ही गोष्ट लक्षात येताच मी माझा निर्णय बदलतो आणि पत्नीनं घेतलेल्या निर्णयाशी सहमत होतो.” एखादी गोष्ट कशी हाताळावी याबद्दल पतीपत्नीमध्ये दुमत असेल, तर त्यांनी खासगीत त्याविषयी बोलावे आणि एकाच निर्णयावर पोहचावे.
शिस्त लावणे आवश्यक
यहोवाचे अनुकरण करून तुम्ही प्रेमळपणे, योग्य प्रमाणात आणि स्तर न बदलता मुलांना शिस्त लावली तर तुमच्या प्रयत्नांमुळे मुलांना नक्कीच फायदा होईल. तुमच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली मुले प्रौढ व जबाबदार व्यक्ती बनतील. बायबल म्हणते त्याप्रमाणे: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”—नीतिसूत्रे २२:६. ▪ (w14-E 07/01)