व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचक विचारतात . . .

नाताळच्या प्रथा चुकीच्या का आहेत?

नाताळच्या प्रथा चुकीच्या का आहेत?

नाताळ म्हटलं, की आपल्या मनात लगेच हा ख्रिस्ती लोकांचा सण आहे ज्यात ते येशू ख्रिस्ताचा वाढदिवस साजरा करतात, असा विचार येतो. पण, या सणाच्या वेळी साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रथांचं परीक्षण केल्यावर आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो, की या प्रथांचा येशूच्या जन्माशी कसा काय संबंध लावला जातो?

अशीच एक प्रथा, काल्पनिक सांता क्लॉजची आहे. १९३१ साली एका उत्तर अमेरिकन कंपनीनं, नाताळाच्या वेळी सॉफ्ट ड्रिंक्सच्या जाहिरातीसाठी लाल कपडे घातलेल्या, पांढरी दाढी असलेल्या व लालचुटूक गाल असलेल्या लोभस व्यक्तिमत्त्वाच्या सांता क्लॉजचा उपयोग केला तेव्हा या कंपनीचा बराच माल खपला. पण १९५० च्या दशकात, ब्राझीलमधील काहींनी सांता क्लॉजसारख्याच ‘ग्रॅन्डपा इंडियन’ नावाच्या एका काल्पनिक व्यक्तीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम काय झाला? “सांता क्लॉजनं तर, ‘ग्रॅन्डपा इंडियन’ आणि बाळ येशू या दोघांनाही मागं टाकलं आणि तोच डिसेंबर २५ सणाचा प्रतिक बनला,” असं कार्लोस ई. फॅन्टीनाटी नावाच्या प्राध्यापकांनी म्हटलं. पण नाताळाच्या वेळी, सांता क्लॉजसारख्या काल्पनिक गोष्टींचा समावेश असल्यामुळंच फक्त, नाताळ सण साजरा करणं चूक आहे का? या प्रश्‍नाचं उत्तर मिळण्यासाठी आपण, ख्रिस्ती धर्माची सुरुवात झाली तेव्हाचा विचार करू या.

“ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन शतकांदरम्यान, हुतात्म्यांचा आणि येशूचा वाढदिवस पाळण्याला ख्रिस्ती लोकांनी कडाडून विरोध केला,” असं एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका यामध्ये म्हटलं आहे. का केला त्यांनी विरोध? वाढदिवस पाळण्याची प्रथा ही मूर्तिपूजक होती आणि मूर्तिपूजेशी संबंधित कोणतीही गोष्ट आपण टाळली पाहिजे, असं हे ख्रिस्ती मानत असत. शिवाय, बायबलमध्ये येशूच्या जन्माची तारीख कुठंही सांगण्यात आलेली नाही.

आरंभीच्या ख्रिश्चनांनी वाढदिवस पाळण्याच्या प्रथेचा कडाडून विरोध केला असला तरी, इ.स. चवथ्या शतकात कॅथलिक चर्चने (चर्चच्या पुढाऱ्यांनी) मात्र नाताळ सणाची स्थापना केली. कॅथलिक चर्चला लोकांवर पकड मजबूत करायची होती पण त्यांच्यासमोर काही अडचणी होत्या. मूर्तिपूजक रोमी लोकांचेदेखील सणवार होते. ते दक्षिणायनाच्या दिवशीदेखील (जेव्हा लवकर अंधार पडतो त्या हिवाळ्यातल्या एका विशिष्ट दिवशी) सण पाळत असत. शिवाय, दर वर्षी डिसेंबर १७ ते जानेवारी १ हे “रोमी लोकांसाठी सणासुदीचे दिवस होते. या काळात ते त्यांच्या दैवतांची उपासना करत, मेजवान्या आणि मौजमस्ती करत असत. लोक शिकारीला जात असत, मिरवणुका काढत असत,” असं पेनी एल रिस्टेड क्रिसमस इन अमेरिका नावाच्या त्यांच्या पुस्तकात म्हणतात. आणि डिसेंबर २५ हा दिवस, रोमी लोक अजिंक्य सूर्याचा वाढदिवस म्हणून साजरा करत असत. कॅथलिक चर्चला रोमी लोकांच्या या प्रथा बंद करून नाताळाची स्थापना करायची होती. म्हणून त्यांनी, अगदी त्याच दिवशी नाताळाची तारीख ठरवली. सूर्याचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्यांनी रोमी लोकांना अनेक आमिषं दाखवून डिसेंबर २५ हा दिवस येशूचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यास जवळजवळ भागच पाडलं. जेरी बोलर यांच्या सॅन्टा क्लॉज, ए बायोग्राफी या आपल्या पुस्तकात म्हटलं, की रोमी लोकांना काही फरक पडला नाही. नाताळ सणासोबत ते हिवाळ्यातील त्यांचे इतर सणही पाळत असत. नवीन सण असला तरी, प्रथा मात्र जुन्याच होत्या.

या सर्वांवरून स्पष्ट होतं, की नाताळ सणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या प्रथांचा उगम वाटतो तसा पवित्र नाही. द बॅटल फॉर ख्रिसमस नावाच्या आपल्या पुस्तकात स्टीवन निस्सनबोम म्हणतात की, नाताळ सण “मुळातच एक मूर्तिपूजक सण आहे ज्याच्यावर फक्त ‘ख्रिस्ती सण’ हे लेबल लावलं जातं.” म्हणून, नाताळ सणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या प्रथांमुळं देव आणि येशू या दोघांचाही अनादर होतो. ही क्षुल्लक गोष्ट आहे का? बायबलमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला आहे: “नीति व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार?” (२ करिंथकर ६:१४) एखाद्या झाडाचा बुंधा वाकडाच वाढला असेल तर तो सरळ करता येत नाही. त्याच प्रकारे, नाताळ सणाच्या प्रथाच वाकड्या असल्यामुळं त्या “सरळ” करता येत नाहीत.—उपदेशक १:१५. ▪ (w15-E 12/01)