हा फक्त छोटासा गैरसमज आहे का?
४-५ वर्षांची एक लहान मुलगी एका कारखान्याकडे पाहत होती. कारखान्याच्या चिमणीतून धूर वर जाताना काहीसा ढगांसारखा दिसत होता. तिला वाटलं हा कारखाना ढग बनवतो. लहान मुलांच्या अशा छोट्या गैरसमजांमुळे आपल्याला हसू येतं. पण जेव्हा मोठे गैरसमज होतात तेव्हा त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, औषधाच्या बाटलीवर लिहिलेली माहिती जर नीट वाचली नाही, तर ते आपल्या जीवावर बेतू शकतं.
आध्यात्मिक गोष्टींबाबतीत गैरसमज आणखीच वाईट ठरू शकतो. जसं की, काही लोकांनी येशूच्या शिकवणींचा चुकीचा अर्थ घेतला. (योहान ६:४८-६८) त्याच्या शिकवणींचा नेमका अर्थ जाणून घेण्याऐवजी, त्यांनी येशूने शिकवलेल्या सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण खरंतर असं करून त्यांचंच नुकसान झालं!
जीवनात मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही बायबल वाचता का? वाचत असाल, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण वाचन करताना तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे का? खूप लोकांना बायबल वाचताना गैरसमज होतो. पुढील तीन सर्वसाधारण गैरसमजांबद्दल विचार करा.
-
बायबलमध्ये दिलेल्या “देवाचे भय धर” या आज्ञेबद्दल काही लोकांचा चुकीचा समज झाला आहे. त्यांना वाटतं की देवाबद्दल आपल्या मनात दहशत असली पाहिजे. (उपदेशक १२:१३) पण जे त्याची उपासना करतात त्यांच्याकडून देव अशी अपेक्षा करत नाही. तो म्हणतो, “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (यशया ४१:१०) देवाबद्दल भय असणे म्हणजे त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती आणि गाढ आदर असणे.
-
“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो . . . जन्मसमय व मृत्युसमय” असतो. या प्रेरीत वचनांचा काही लोकांनी चुकीचा अर्थ लावला आहे. मनुष्य कधी मरणार याची वेळ देवाने आधीच ठरवली आहे, असा निष्कर्ष यावरून काही लोकांनी काढला. (उपदेशक ३:१, २) पण खरंतर या वचनात मानवी जीवनाचं सत्य सांगितलं आहे आणि हेदेखील की मरण सर्वांनाच येतं. आपण किती काळ जगू ते आपण घेत असलेल्या निर्णयांवर अवलंबून असतं असंही देवाच्या वचनात म्हटलं आहे. उदाहरणार्थ, बायबलमध्ये लिहिलं आहे: “परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते.” (नीतिसूत्रे १०:२७; स्तोत्र ९०:१०; यशया ५५:३) आपण म्हणू हे कसं शक्य आहे? आपण जेव्हा देवाच्या वचनाचा आदर करतो आणि जास्त दारू पिणं, अनैतिक गोष्टीं करणं यांपासून लांब राहतो तेव्हा आपलं आयुष्य वाढतं.—१ करिंथकर ६:९, १०.
-
स्वर्ग आणि पृथ्वी ही “अग्नीसाठी राखलेली आहेत,” असं जेव्हा काही लोक बायबलमध्ये वाचतात, तेव्हा ते त्याचा शब्दशः अर्थ घेतात. त्यांना वाटतं की देव आगीने पृथ्वीचा नाश करणार आहे. (२ पेत्र ३:७) पण या पृथ्वीचा तो कधीच नाश होऊ देणार नाही असं देव वचन देतो. बायबलमध्ये म्हटलं आहे की, “तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही.” (स्तोत्र १०४:५; यशया ४५:१८) देव पृथ्वीचा नाही तर या जगातल्या भ्रष्ट व्यवस्थेचा कायमचा नाश करेल. जसं, एखादी वस्तू आगीत पूर्णपणे नाश होते. आणि स्वर्ग हा जो शब्द वापरला गेला आहे, त्याचा अर्थ होतो आकाश, ताऱ्यांनी भरलेलं विश्व किंवा देवाचं राहायचं ठिकाण. यांपैकी कोणत्याच गोष्टी नष्ट होणार नाहीत.
बायबलमध्ये शिकवलेल्या गोष्टींबद्दल कधीकधी गैरसमज का होतो?
वर दिलेल्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल, की बऱ्याचदा लोकांना बायबलमधल्या वचनांबद्दल गैरसमज होतो. पण देव असं का होऊ देतो? काही म्हणतील: ‘जर देव बुद्धिमान आहे आणि त्याला सर्व माहीत आहे तर तो आपल्याला असं पुस्तक देऊ शकला असता जे सर्वांना सहज कळलं असतं. मग त्याने असं का केलं नाही?’ बायबलमध्ये शिकवलेल्या
गोष्टींबद्दल गैरसमज का होतो याची आपण तीन कारणं पाहू या.-
१. जे नम्र आहेत आणि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनाच ते समजेल अशी बायबलची रचना करण्यात आली आहे. येशूने आपल्या पित्याला म्हटलं: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या आहेत.” (लूक १०:२१) जे योग्य मनोवृत्ती बाळगतात, फक्त त्यांनाच त्यातला संदेश कळेल अशी बायबलची रचना करण्यात आली आहे. “ज्ञानी आणि विचारवंत” ज्यांच्यात बऱ्याचदा गर्विष्ठ मनोवृत्ती असू शकते, अशांना बायबलविषयी गैरसमज होतो. पण जे लोक ‘बाळकांप्रमाणे’ मनोवृत्ती ठेवतात, म्हणजे जे नम्र आणि शिकण्यासाठी तत्पर असतात, असे लोक जेव्हा बायबल वाचतात तेव्हा त्यांना देवाच्या वचनाबद्दल योग्य समज मिळते. खरंच, देवाने बायबलची रचना किती कुशलपणे केली आहे!
-
२. बायबलचा संदेश अशा लोकांसाठी आहे, जे तो संदेश समजण्यासाठी प्रामाणिकपणे देवाच्या मदतीवर अवलंबून राहतात. येशूने म्हटलं की तो जे शिकवत आहे ते पूर्णपणे समजण्यासाठी, लोकांना मदतीची गरज लागेल. त्यांना मदत कुठून मिळेल? येशूने समजावलं: “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल.” (योहान १४:२६) याचा अर्थ, लोक बायबलमध्ये जे वाचतात ते समजण्यासाठी, देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे म्हणजे सक्रिय शक्तीद्वारे त्यांना मदत करतो. पण जे लोक देवाच्या मदतीवर अवलंबून राहत नाहीत अशांना तो त्याचा पवित्र आत्मा देत नाही. त्यामुळेच त्यांना बायबलमध्ये जे लिहिलं आहे ते समजणं अवघड वाटतं. पवित्र आत्मा, जास्त समज असलेल्या ख्रिस्ती लोकांना प्रेरणा देतो, की ज्यांना बायबल समजण्याची इच्छा आहे, अशांना त्यांनी मदत करावी.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३५.
-
३. काही बायबल वृत्तांत, देवाने ठरवलेल्या योग्य वेळीच लोक समजू शकतात. उदाहरणार्थ, संदेष्टा दानीएल याला भविष्याबद्दल देवाने एक संदेश लिहायला सांगितला होता. एका देवदूताने त्याला म्हटलं: “हे दानीएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव.” अनेक शतकांपर्यंत खूप लोकांनी दानीएलचं पुस्तक वाचलं, पण त्यांना ते कळलं नाही. इतकंच काय तर दानीएलने ज्या गोष्टी लिहिल्या त्यातल्या काही त्यालादेखील कळल्या नाहीत. त्याने नम्रपणे कबूल केलं: “मी हे ऐकले पण समजलो नाही.” पण देवाने ठरवलेल्या विशिष्ट वेळी लोकांना दानीएलने लिहिलेली देवाची भविष्यवाणी समजणार होती. देवदूताने पुढे असं म्हटलं: “दानीएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.” देवाचा संदेश कुणाला समजणार होता? “दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांस तो प्राप्त होईल.” (दानीएल १२:४, ८-१०) याचा अर्थ, योग्य वेळ येईपर्यंत काही बायबल वचनांचा देव खुलासा करत नाही.
योग्य वेळ आली नसल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना कधी बायबलबद्दल गैरसमज झाला आहे का? हो, झाला आहे. पण देवाने जेव्हा त्याच्या योग्य वेळी त्यांची समज सुधारली तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांनी ती लगेच स्वीकारली. असं करून त्यांनी ख्रिस्ताच्या प्रेषितांचं अनुकरण केलं. येशूने जेव्हा-जेव्हा त्यांना सुधारलं तेव्हा-तेव्हा त्यांनी नम्रपणे स्वतःमध्ये बदल केले.—प्रेषितांची कृत्ये १:६, ७.
ढग कसे तयार होतात याबद्दल त्या लहान मुलीला झालेल्या छोटाश्या गैरसमजाने जास्त फरक पडत नाही. पण बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच ते समजण्यासाठी तुम्ही मदत घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही जे वाचत आहात ते समजण्यासाठी अशा लोकांची मदत घ्या, जे नम्र मनोवृत्तीने बायबलचा अभ्यास करतात, देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतात आणि जाणतात की, देवाची इच्छा आहे, की आपण आज बायबलबद्दल जास्तीत जास्त जाणून घेतलं पाहिजे. यहोवाच्या साक्षीदारांशी बोलायला किंवा jw.org या वेबसाईटवर त्यांनी संशोधन करून तयार केलेले लेख वाचायला कचरू नका. बायबलमध्ये असं अभिवचन दिलं आहे: “जर तू विवेकाला हाक मारशील . . . देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”—नीतिसूत्रे २:३-५.