भाग ५
घरच्या लोकांचे मन कसे राखाल?
“ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.”—कलस्सैकर ३:१२
लग्नामुळे एका नवीन कुटुंबाची सुरुवात होते. आई-वडिलांबद्दल तुमच्या मनात नेहमीच प्रेमाची व आदराची भावना असेल. पण, लग्नानंतर तुमच्यासाठी तुमचा विवाहसोबती पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती बनते. ही गोष्ट घरातल्या काहींना समजणे कदाचित जड जाऊ शकते. पण, बायबलची तत्त्वे तुम्हाला यांमध्ये समतोल राखण्यास मदत करतील. नवीन कौटुंबिक नाते आणखी घट्ट करत असतानाच घरच्यांचे मन राखण्यासही बायबलची तत्त्वे तुम्हाला मदत करतील.
१ घरच्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा
बायबल काय म्हणते: “आपला बाप व आपली आई यांचा मान राख.” (इफिसकर ६:२) मुले कितीही मोठी झाली तरी त्यांनी नेहमी आई-वडिलांचा मान राखला पाहिजे. लक्षात असू द्या, की मुलगा किंवा मुलगी या नात्याने तुमच्या सोबत्याला त्याच्या आई-वडिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. बायबल म्हणते: “प्रीती हेवा करत नाही.” तेव्हा, तुमच्या सोबत्याचा त्याच्या आई-वडिलांसोबत जो नातेसंबंध आहे त्यामुळे असुरक्षित वाटून घेऊ नका.—१ करिंथकर १३:४; गलतीकर ५:२६.
तुम्ही काय करू शकता:
-
अशी विधाने टाळा: “तुझ्या घरातले नेहमीच मला कमी लेखतात” किंवा “मी जे काही करते ते तुझ्या आईला कधीच पटत नाही”
-
तुमच्या सोबत्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा
२ गरज असल्यास ठाम राहा
बायबल काय म्हणते: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ति २:२४) तुमचे लग्न झाल्यानंतरही आई-वडिलांना वाटू शकते, की अजूनही तुमची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे कदाचित ते तुमच्या संसारात वाजवीपेक्षा जास्त दखल घेतील.
आई-वडिलांनी किती दखल घ्यावी हे तुम्ही व तुमच्या सोबत्याने मिळून ठरवले पाहिजे आणि ते प्रेमळपणे त्यांना सांगितले पाहिजे. याबद्दल तुम्ही मनमोकळेपणाने आणि स्पष्टपणे त्यांच्याशी बोलू शकता. पण, असे करत असताना कठोरतेने बोलू नका. (नीतिसूत्रे १५:१) नम्रता, सौम्यता व सहनशीलता हे गुण तुम्हाला त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्यास आणि “एकमेकांना प्रीतीने वागवून” घेण्यास मदत करतील.—इफिसकर ४:२.
तुम्ही काय करू शकता:
-
घरातल्या लोकांनी वाजवीपेक्षा जास्त दखल घेतल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये तणाव निर्माण होत असेल, तर सर्व काही शांत झाल्यावर एकमेकांशी बोला
-
ही समस्या कशी हाताळावी हे दोघे मिळून ठरवा