भाग १८
येशू अनेक चमत्कार करतो
येशू राजा बनल्यावर आपल्या सामर्थ्याचा कशा प्रकारे उपयोग करेल हे तो चमत्कार करण्याद्वारे दाखवतो
इतर मानवांना कधीही करता आली नसती, अशी कार्ये करण्याचे सामर्थ्य देवाने येशूला दिले होते. येशूने अनेक मोठमोठे चमत्कार केले. बरेचदा त्याने मोठ्या जमावांपुढे हे चमत्कार केले. या चमत्कारांवरून येशूने दाखवले की अपरिपूर्ण मानवांना ज्या शत्रूंवर व ज्या समस्यांवर मात करणे आजवर शक्य झाले नाही, त्यांवर मात करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. काही उदाहरणे पाहा.
येशूने लोकांना अन्न दिले. येशूने केलेल्या पहिल्या चमत्कारात त्याने पाण्याचे द्राक्षारसात रूपांतर केले. आणखी दोन प्रसंगी त्याने फक्त दोनचार भाकरी व माशांच्या साहाय्याने, हजारो लोकांच्या जमावाला अन्न देऊन तृप्त केले. या दोन्ही प्रसंगी येशूने दिलेले अन्न लोकांना पुरून उरले.
येशूने रोग्यांना बरे केले. येशूने “लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी” बरी केली. (मत्तय ४:२३) अंधळे, बहिरे, कुष्ठरोगी, लकवा मारलेले, लुळे-पांगळे असे सर्व प्रकारचे लोक येशूकडे येऊन बरे झाले. असा कोणताही आजार नव्हता ज्याला बरे करणे त्याच्या शक्तिबाहेर होते.
येशूने वादळवाऱ्यावर नियंत्रण केले. येशू व त्याचे शिष्य एकदा जहाजाने गालील समुद्रातून जात असताना अचानक मोठे तूफान आले. ते पाहून शिष्यांच्या तोंडचे पाणी पळाले. पण येशूने खवळलेल्या समुद्राकडे पाहून फक्त इतकेच म्हटले, “उगा राहा, शांत हो.” आणि त्याच क्षणी वादळ शमले आणि सर्व काही शांत झाले. (मार्क ४:३७-३९) आणखी एकदा भयानक वादळ आले असताना येशू पाण्यावरून चालला.—मत्तय १४:२४-३३.
येशूने दुरात्म्यांवर नियंत्रण केले. दुरात्मे मानवांपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली आहेत. बरेच लोक देवाच्या या दुष्ट शत्रूंच्या तावडीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करूनही अयशस्वी ठरले आहेत. पण येशूने मात्र कितीतरी वेळा अशा दुरात्म्यांना बाहेर पडण्याचा आदेश देऊन, पीडित लोकांना मुक्त केले. त्याला दुरात्म्यांचे जराही भय वाटत नसे. उलट, येशूला त्यांच्यावर अधिकार आहे हे माहीत असल्यामुळे तेच त्याला भ्यायचे.
येशूने मृतांनाही जिवंत केले. मृत्यूपुढे माणूस असहाय ठरतो. म्हणूनच मृत्यूला अगदी योग्यपणे “शेवटला शत्रू” म्हणण्यात आले आहे. (१ करिंथकर १५:२६) पण येशूने मृतांना पुन्हा जिवंत केले. एकदा त्याने एका विधवेच्या मुलाला जिवंत केले, तर आणखी एका प्रसंगी त्याने एका लहान मुलीला जिवंत करून तिच्या शोकाकूल आईवडिलांच्या स्वाधीन केले. येशूने केलेले एक अतिशय विलक्षण पुनरुत्थान म्हणजे त्याचा मित्र लाजर याचे. लाजराला मरून जवळजवळ चार दिवस झाले असूनही, येशूने त्याच्यासाठी शोक करणाऱ्या लोकांच्या जमावादेखत त्याला पुन्हा जिवंत केले! त्याने हा चमत्कार केल्याचे त्याच्या सर्वात कट्टर शत्रूंनीही मान्य केले.—योहान ११:३८-४८; १२:९-११.
पण येशूने हे सर्व चमत्कार का केले? ज्यांच्यासाठी त्याने हे चमत्कार केले ते लोकसुद्धा शेवटी मरण पावले नसतील का? हो, ते लोक मरण पावले हे खरे आहे. पण, तरीसुद्धा येशूच्या चमत्कारांमुळे येणाऱ्या काळासाठी फार मोठा फायदा झाला. त्याच्या चमत्कारांनी हे सिद्ध केले की मशीहाच्या राज्याविषयी करण्यात आलेल्या सर्व रोमांचक भविष्यवाण्या काल्पनिक नसून त्या अवश्य पूर्ण होतील. देवाने नियुक्त केलेला राजा उपासमार, रोगराई, नैसर्गिक संकटे, दुरात्मे इतकेच काय तर मृत्यूवरही विजय मिळवेल याविषयी आपण पूर्ण खातरी बाळगू शकतो. कारण या सर्व गोष्टी करण्याचे सामर्थ्य देवाने त्याला दिले असल्याचे त्याने आधीच दाखवले आहे.