व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २०

येशू ख्रिस्ताचा वध केला जातो

येशू ख्रिस्ताचा वध केला जातो

येशू एका नवीन विधीची स्थापना करतो; त्याच्याच शिष्यांपैकी एक जण त्याचा विश्‍वासघात करून त्याला धरून देतो आणि त्याला वधस्तंभावर मारले जाते

येशूने साडेतीन वर्षे प्रचाराचे व शिकवण्याचे कार्य केल्यानंतर, त्याला माहीत होते की आता लवकरच पृथ्वीवरील त्याचे जीवन संपुष्टात येईल. त्याला मारून टाकण्यासाठी यहुदी धर्मपुढारी कट रचत होते. पण लोक दंगा माजवतील याची त्यांना भीती वाटत होती. कारण, येशू हा एक संदेष्टा आहे असा लोकांचा विश्‍वास होता. दरम्यान, सैतानाने येशूच्या १२ प्रेषितांपैकी एकाला—यहूदा इस्कर्योतला—येशूचा विश्‍वासघात करण्यास प्रवृत्त केले. येशूला पकडून देण्यासाठी धर्मपुढाऱ्‍यांनी यहूदाला ३० चांदीची नाणी देऊ केली.

येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, वल्हांडण सण साजरा करण्यासाठी तो आणि त्याचे प्रेषित एकत्र जमले. यहूदाला तेथून पाठवल्यानंतर, त्याने प्रभूचे सांज भोजन या नवीन विधीची स्थापना केली. त्याने एक भाकरी घेऊन प्रार्थना केली आणि तेथे उरलेल्या ११ प्रेषितांमध्ये ती वाटली. त्याने म्हटले: “हे माझे शरीर आहे; ते तुम्हांसाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” मग त्याने द्राक्षारसाचा प्याला घेऊन तसेच केले. त्याने म्हटले: “हा प्याला माझ्या रक्‍तांत नवा करार आहे.”—लूक २२:१९, २०.

येशूला त्या रात्री आपल्या शिष्यांना खूप काही सांगायचे होते. त्याने त्यांना एकमेकांवर निःस्वार्थ प्रेम करण्याची नवीन आज्ञा दिली. त्याने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) लवकरच घडणार असलेल्या दुःखद घटनांमुळे त्यांनी गोंधळून जाऊ नये असे त्याने त्यांना आर्जवले. येशूने त्यांच्यासाठी कळकळीने प्रार्थना केली. त्या सर्वांनी मिळून स्तुतिगीते गायिली आणि मग ते बाहेर गेले. तोपर्यंत रात्र झाली होती.

गेथशेमाने बागेत, येशूने गुडघे टेकून देवाला कळकळीची प्रार्थना केली. लवकरच सैनिक, याजक आणि इतरांचा एक शस्त्रधारी जमाव त्याला अटक करण्यासाठी तेथे आला. त्यांना येशूची ओळख करून देण्यासाठी यहूदाने त्याच्या जवळ येऊन त्याचे चुंबन घेतले. सैनिकांनी येशूला पकडले, तेव्हा प्रेषित तेथून पळून गेले.

यहुदी उच्च न्यायालयापुढे येशूने आपण देवाचा पुत्र असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या दृष्टीने तो देवाची निंदा केल्याबद्दल दोषी होता आणि त्यामुळे मृत्यूदंडास पात्र होता. नंतर येशूला रोमन सुभेदार पंतय पिलात याच्याकडे नेण्यात आले. पिलाताला येशूमध्ये कोणताही दोष आढळला नाही. पण, जमाव येशूला मृत्यूदंड द्या असा आरडाओरडा करत आहे हे पाहून पिलाताने येशूला त्यांच्या स्वाधीन केले.

येशूला गुलगुथा म्हटलेल्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे रोमन सैनिकांनी त्याला एका वधस्तंभाला खिळले. भरदिवसाचा सूर्यप्रकाश नाहीसा होऊन, चमत्कारिक रीत्या अंधार पसरला. त्या दिवशी दुपारी येशू मरण पावला तेव्हा एक मोठा भूकंप झाला. येशूचा मृतदेह खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवण्यात आला. दुसऱ्‍या दिवशी, याजकांनी कबरेवर शिक्कामोर्तब करून तेथे पहारा लावला. येशू त्या कबरेत तसाच राहणार होता का? नाही. लवकरच, यापूर्वी कधीही न घडलेला एक अद्‌भुत चमत्कार घडणार होता.

मत्तय अध्याय २६ आणि २७; मार्क अध्याय १४ आणि १५; लूक अध्याय २२ आणि २३; योहान अध्याय १२ ते १९ वर आधारित.

^ परि. 15 येशूच्या बलिदानाच्या मूल्याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ५ पाहा.