व्हिडिओ पाहण्यासाठी

देवाच्या वचनातून शिका

न्यायाच्या दिवशी काय होईल?

न्यायाच्या दिवशी काय होईल?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला बायबलमध्ये कुठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितलं आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करायला आनंद होईल.

. न्यायाचा दिवस म्हणजे काय?

न्यायाचा दिवस म्हटलं, की बऱ्‍याच लोकांच्या डोळ्यांपुढे उजवीकडे दाखवल्याप्रमाणे एक चित्र उभं राहतं. त्यांना वाटतं की लाखो लोकांना देवाच्या राजासनासमोर आणलं जाईल आणि त्यांनी पूर्वी केलेल्या कामांप्रमाणे त्यांचा न्याय केला जाईल. यांपैकी काहींना स्वर्गातल्या जीवनाचं बक्षीस मिळेल, तर काहींना कायम यातना भोगण्यासाठी नरकात टाकलं जाईल. पण बायबलमधून आपल्याला कळतं, की खरंतर देवाने मानवांना अन्यायापासून वाचवण्यासाठी न्यायाचा दिवस ठरवला आहे. (स्तोत्र ९६:१३) देवाने येशूला न्यायाधीश म्हणून नेमलंय आणि तो पृथ्वीवर न्याय पुन्हा स्थापित करेल.​—यशया ११:१-५; प्रेषितांची कार्यं १७:३१ वाचा.

. न्यायाच्या दिवसामुळे न्याय पुन्हा कसा स्थापित होईल?

पहिल्या मानवाने, आदामने जाणूनबुजून देवाची आज्ञा मोडली तेव्हा त्याने आपल्या सगळ्या वंशजांना पाप, दुःख आणि मृत्यूच्या अधीन केलं. (रोमकर ५:१२) या अन्यायापासून मानवांची सुटका करण्यासाठी येशू लाखो-करोडो मेलेल्या लोकांचं पुनरुत्थान करेल, म्हणजेच त्यांना पुन्हा जिवंत करेल. प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलंय, की हे येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान होईल.​—प्रकटीकरण २०:४, ११, १२ वाचा.

पुनरुत्थान झालेल्या लोकांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी केलेल्या कामांच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाणार नाही. प्रकटीकरणाच्या २० व्या अध्यायात सांगितलंय, की ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान ‘गुंडाळ्या’ उघडल्या जातील. या गुंडाळ्यांमध्ये देव मानवांसाठी आणखी काही मार्गदर्शन देईल. पुनरुत्थान झालेले लोक या मार्गदर्शनाचं पालन करतील की नाही या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल. (रोमकर ६:७) प्रेषित पौलने म्हटलं की “नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना” मेलेल्यांतून उठवलं जाईल आणि त्यांना देवाबद्दल शिकून घ्यायची संधी मिळेल.​—प्रेषितांची कार्यं २४:१५ वाचा.

. न्यायाच्या दिवसामुळे काय साध्य होईल?

ज्यांना देवाबद्दल जाणून घ्यायची आणि त्याची सेवा करायची संधी मिळाली नाही अशा लोकांना पुन्हा जिवंत झाल्यावर स्वतःमध्ये बदल करून चांगली कामं करायची संधी असेल. जर त्यांनी असं केलं तर त्यांचं पुनरुत्थान हे “जीवनाचं पुनरुत्थान” ठरेल. पण पुनरुत्थान झालेल्या काहींना यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करायची इच्छा नसेल. अशा लोकांचं पुनरुत्थान हे “न्यायाचं पुनरुत्थान” ठरेल, म्हणजेच त्यांना शिक्षा होईल.​—योहान ५:२८, २९ तळटिपा; यशया २६:१०; ६५:२० वाचा.

हजार वर्षांचा हा न्यायाचा दिवस संपेपर्यंत, यहोवाच्या आज्ञा पाळणारे सर्व मानव त्याच्या मूळ उद्देशाप्रमाणे परिपूर्ण झालेले असतील. (१ करिंथकर १५:२४-२८) खरंच, देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍या लोकांसाठी भविष्यात किती सुंदर आशा आहे! मग, हजार वर्षांपर्यंत अथांग डोहात कैद असलेल्या सैतानाला देव काही काळासाठी सोडेल. त्यानंतर मानवांची एक शेवटची परीक्षा होईल. सैतान पुन्हा लोकांना यहोवाच्या विरोधात न्यायचा प्रयत्न करेल. पण जे सैतानाला नकार देतील ते पृथ्वीवर कायम जीवनाचा आनंद घेतील.​—यशया २५:८; प्रकटीकरण २०:७-९ वाचा.

. आणखी कोणता न्यायाचा दिवस आहे ज्यामुळे मानवांना फायदा होईल?

बायबलमध्ये एका ‘न्यायदंडाच्या दिवसाबद्दलही’ सांगितलं आहे. तो या जगाच्या व्यवस्थेच्या नाशाला सूचित करतो. हा न्यायदंडाचा दिवस नोहाच्या काळातल्या जलप्रलयासारखा अचानक येईल. त्या जलप्रलयात एका संपूर्ण दुष्ट पिढीचा नाश झाला होता. तसंच, येणाऱ्‍या न्यायाच्या दिवशीसुद्धा ‘दुष्ट लोकांचा’ नाश होईल. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, यामुळे फक्‍त चांगले लोक राहतील आणि पृथ्वीवर कायम “न्यायनीती टिकून राहील.”​—२ पेत्र ३:६, ७, १३ वाचा.