ईयोब १२:१-२५
१२ मग ईयोबने उत्तर दिलं:
२ “खरोखर, तुम्ही लोकच फक्त शहाणे आहात,तुम्ही जिवंत असेपर्यंतच जगात बुद्धी राहील!
३ पण माझ्याजवळही समजशक्ती* आहे.
मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही.
या गोष्टी सगळ्यांनाच कळतात.
४ मी देवाला हाक मारतो आणि त्याच्या उत्तराची अपेक्षा करतो,+म्हणून माझ्या मित्रांसाठी मी थट्टेचा विषय बनलोय.+
नीतिमान आणि निर्दोष माणसाला लोक हसतात.
५ बिनधास्त राहणारा माणूस संकटाला तुच्छ लेखतो,ज्यांचे पाय लटपटतात* त्यांच्यावरच संकट येतं, असं तो मानतो.
६ लुटारूंच्या तंबूंमध्ये शांती असते,+आणि देवाला चीड आणणारे सुरक्षित राहतात.+
ते आपल्या दैवतांना हातांत नेतात.
७ पण, कृपा करून प्राण्यांना विचार, म्हणजे ते तुला शिकवतील;आकाशातल्या पक्ष्यांना विचार, म्हणजे ते तुला सांगतील.
८ किंवा पृथ्वीकडे लक्ष दे,* म्हणजे ती तुला शिकवेल;आणि समुद्रातले मासे तुला सांगतील.
९ हे यहोवाच्याच हाताचं कार्य आहे,हे यांपैकी कोणाला माहीत नाही?
१० प्रत्येक प्राण्याचा जीव,आणि प्रत्येक माणसाचा श्वास त्याच्याच हातात आहे.+
११ जसं जिभेला चव कळते,तसंच कान शब्दांची पारख* करत नाहीत का?+
१२ म्हाताऱ्या माणसांजवळ बुद्धी नसते का?+
आणि बरंच आयुष्य जगल्यावर समजशक्ती येत नाही का?
१३ देवाजवळ बुद्धी आणि सामर्थ्य आहे;+त्याच्याजवळ समजशक्ती आहे+ आणि तो आपली इच्छा पूर्ण करतो.
१४ तो जे मोडतो, ते पुन्हा बांधलं जाऊ शकत नाही;+तो जे बंद करतो, ते कोणताही माणूस उघडू शकत नाही.
१५ तो पावसाचं पाणी थांबवून ठेवतो, तेव्हा सगळं सुकून जातं;+तो पाऊस पाडतो, तेव्हा पृथ्वीवर पूर येतो.+
१६ त्याच्याजवळ ताकद आणि व्यावहारिक बुद्धी आहे;+वाट चुकणारा आणि वाट चुकायला लावणारा, दोघंही त्याच्याच हातात आहेत.
१७ तो सल्लागारांना अनवाणी चालायला लावतो,*आणि न्यायाधीशांना वेड्यांत काढतो.+
१८ राजांनी घातलेल्या बेड्या तो मोकळ्या करतो,+आणि त्यांच्या कंबरेला तो पट्टा बांधतो.
१९ तो पुजाऱ्यांना अनवाणी चालायला लावतो,+आणि सत्ताधीशांना उलथून टाकतो.+
२० तो भरवशाच्या सल्लागारांचं तोंड बंद करतो,आणि वडीलधाऱ्यांचा* समंजसपणा काढून घेतो.
२१ तो गर्विष्ठ शासकांना तुच्छ लेखतो,+आणि बलवानांना निर्बल बनवतो.
२२ तो अंधारातल्या गुप्त गोष्टी उजेडात आणतो,+आणि घोर अंधकाराला प्रकाशात आणतो;
२३ राष्ट्रांचा नाश करण्यासाठी तो त्यांना शक्तिशाली बनवतो;त्यांना बंदिवासात नेण्यासाठी तो त्यांच्या सीमा वाढवतो.
२४ तो लोकांच्या पुढाऱ्यांची समजशक्ती* काढून घेतोआणि वाट नसलेल्या ओसाड वाळवंटांतून त्यांना वणवण फिरायला लावतो.+
२५ तिथे प्रकाश नसल्यामुळे ते अंधारात चाचपडतात;+तो त्यांना दारुड्यांसारखा भटकायला लावतो.+
तळटीपा
^ शब्दशः “हृदय.”
^ किंवा “घसरतात.”
^ किंवा कदाचित, “बोल.”
^ किंवा “शब्दांचं परीक्षण.”
^ किंवा “सल्लागारांकडून सर्वकाही हिसकावून घेतो.”
^ किंवा “वडीलजनांचा.”
^ शब्दशः “हृदय.”