उत्पत्ती ९:१-२९
९ मग देव नोहाला आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद देऊन म्हणाला: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका.+
२ मी पृथ्वीवरच्या प्रत्येक प्राण्याला, आकाशात उडणाऱ्या प्रत्येक पक्ष्याला व जीवजंतूला, तसंच जमिनीवर चालणाऱ्या सर्व जीवजंतूंना आणि समुद्रातल्या सर्व माशांना तुमच्या हाती देत आहे.*+ त्यांना तुमची भीती आणि धाक राहील.
३ पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी तुमचं अन्न होतील.+ जसं मी तुम्हाला अन्न म्हणून झाडंझुडपं आणि भाजीपाला दिला होता,+ तसंच सर्व प्राणीही देतो.
४ पण मांसासोबत रक्त खाऊ नका,+ कारण रक्त म्हणजे जीवन*+ आहे.
५ तसंच, मी तुमच्या रक्ताबद्दल* हिशोब मागीन; प्रत्येक प्राण्याकडून आणि माणसाकडून मी हिशोब मागीन; प्रत्येक माणसाकडून त्याच्या भावाच्या जिवाबद्दल मी हिशोब मागीन.+
६ जो कोणी माणसाचं रक्त सांडेल, त्याचंही रक्त माणसाकडून सांडलं जाईल,+ कारण मी माणसाला माझ्या प्रतिरूपात निर्माण केलं आहे.+
७ तुम्ही मात्र फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पृथ्वी भरून टाका.”+
८ मग देव नोहाला आणि त्याच्या मुलांना म्हणाला:
९ “मी तुमच्यासोबत आणि तुमच्या येणाऱ्या संततीसोबत करार करतो;+
१० तसंच तुमच्याबरोबर असलेले सर्व प्राणी,* म्हणजेच जे जहाजातून बाहेर आले असे सर्व पशुपक्षी आणि जमिनीवर राहणारे जीवजंतू+ यांच्यासोबत मी करार करतो.
११ मी तुमच्यासोबत असा करार करतो, की पुन्हा कधीही सर्व जिवांचा आणि पृथ्वीचा जलप्रलयामुळे नाश होणार नाही.”+
१२ देव पुढे म्हणाला: “मी तुमच्यासोबत, तसंच तुमच्याबरोबर असलेल्या सर्व जिवांसोबत, येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी जो करार करत आहे, त्याचं हे चिन्ह असेल.
१३ मी ढगांमध्ये माझं मेघधनुष्य ठेवतो; ते माझ्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये असलेल्या कराराचं चिन्ह असेल.
१४ जेव्हाही मी पृथ्वीवर ढग आणीन, तेव्हा ढगांमध्ये मेघधनुष्य दिसेल.
१५ आणि मी तुमच्यासोबत आणि प्रत्येक जातीच्या सर्व जिवांसोबत जो करार केला आहे, त्याची मला आठवण होईल; आणि पुन्हा कधीही सर्व जिवांचा जलप्रलयाने नाश होणार नाही.+
१६ आणि जेव्हाही ढगांमध्ये मेघधनुष्य येईल, तेव्हा मी ते पाहीन; आणि पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जिवांसोबत मी जो कायमचा करार केला आहे, त्याची मला आठवण होईल.”
१७ देव नोहाला पुन्हा म्हणाला: “मी पृथ्वीवरच्या सर्व जिवांसोबत जो करार केला आहे, त्याचं हे चिन्ह आहे.”+
१८ नोहाची जी मुलं जहाजातून बाहेर आली होती, त्यांची नावं शेम, हाम आणि याफेथ+ अशी होती. पुढे हामला एक मुलगा झाला. त्याचं नाव कनान+ होतं.
१९ नोहाच्या या तीन मुलांपासूनच पृथ्वीवरचे सर्व लोक आले आणि सगळीकडे पसरले.+
२० पुढे नोहा शेती करू लागला आणि त्याने एक द्राक्षमळा लावला.
२१ एकदा तो द्राक्षारस पिऊन नशेत असताना, आपल्या तंबूत उघडा पडला.
२२ तेव्हा कनानचा पिता हाम याने आपल्या पित्याची नग्नता पाहिली आणि बाहेर जाऊन आपल्या दोन भावांना त्याबद्दल सांगितलं.
२३ मग शेम आणि याफेथ यांनी एक कापड आपल्या खांद्यावर ठेवलं; आणि पाठमोरे चालत जाऊन ते आपल्या पित्याच्या उघड्या अंगावर टाकलं. पाठमोरे असल्यामुळे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता पाहिली नाही.
२४ नोहा शुद्धीवर आला, तेव्हा त्याच्या धाकट्या मुलाने त्याच्यासोबत जे केलं होतं, ते त्याला कळलं.
२५ तो म्हणाला:
“कनान शापित आहे.+
तो आपल्या भावांच्या दासांचा दास बनेल.”+
२६ पुढे तो म्हणाला:
“शेमचा देव यहोवा याची स्तुती करा!
कनान शेमचा दास बनेल.+
२७ देव याफेथला भरपूर जमीन देईल,आणि तो शेमच्या तंबूंमध्ये राहील.
कनान त्याचाही दास बनेल.”
२८ जलप्रलयानंतर नोहा आणखी ३५० वर्षं जगला.+
२९ अशा रितीने, नोहा एकूण ९५० वर्षं जगला आणि मग त्याचा मृत्यू झाला.
तळटीपा
^ किंवा “तुम्हाला त्यांच्यावर अधिकार देत आहे.”
^ किंवा “जीव.”
^ किंवा “जिवांच्या रक्ताबद्दल.”
^ किंवा “जीव.”