निर्गम २१:१-३६
२१ तू त्यांना हे कायदे सांग:+
२ तू एखाद्या इब्री दासाला विकत घेतलंस,+ तर तो सहा वर्षं दास म्हणून सेवा करेल, पण सातव्या वर्षी कोणताही मोबदला न घेता त्याला मुक्त केलं जावं.+
३ तो एकटाच आला असेल, तर त्याने एकट्याने परत जावं. पण त्याला बायको असेल, तर त्याच्या बायकोनेही त्याच्यासोबत जावं.
४ त्याच्या मालकाने त्याचं लग्न करून दिलं असेल आणि त्याला मुलंबाळं झाली असतील, तर त्याची बायको आणि मुलं तिच्या मालकाची होतील. तो दास एकटाच जाईल.+
५ पण जर तो दास सारखं असं म्हणू लागला, ‘माझ्या मालकावर आणि माझ्या बायकोमुलांवर माझं प्रेम आहे. मला मुक्त होण्याची इच्छा नाही,’+
६ तर त्याच्या मालकाने खऱ्या देवाच्या साक्षीने त्याला दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभं करावं आणि अरीने* त्याचा कान टोचावा. मग तो आयुष्यभर त्याचा दास होईल.
७ एखाद्या माणसाने आपल्या मुलीला दासी म्हणून विकलं, तर दासाला ज्या रितीने मुक्त केलं जातं, त्या रितीने तिला मुक्त केलं जाणार नाही.
८ जर तिच्या मालकाला ती आवडली नाही आणि त्याने तिला उपपत्नी म्हणून स्वीकारण्याऐवजी दुसऱ्या कोणाला विकून टाकायचं ठरवलं,* तर कोणत्याही विदेशी लोकांना तिला विकण्याचा त्याला हक्क असणार नाही, कारण त्याने तिला धोका दिला आहे.
९ जर त्याने तिला आपल्या मुलासाठी निवडलं, तर त्याने तिला मुलीचे हक्क द्यावेत.
१० जर त्याच्या मुलाने* दुसरी बायको केली, तर त्याने पहिल्या बायकोला पुढेही अन्न व वस्त्रं पुरवावीत आणि तिचा वैवाहिक हक्क*+ तिला द्यावा.
११ या तीन गोष्टी त्याने तिला दिल्या नाहीत, तर ती कोणताही मोबदला न देता मुक्त होऊन जाऊ शकते.
१२ कोणी एखाद्याला मारलं आणि तो मेला तर त्या माणसालाही ठार मारलं जावं.+
१३ पण जर त्याच्या हातून चुकून खून झाला आणि खऱ्या देवाने असं घडू दिलं, तर त्याला पळून जाण्यासाठी मी एक ठिकाण ठरवून देईन.+
१४ जर एखाद्या माणसाला आपल्या शेजाऱ्याचा खूप राग आला आणि त्याने जाणूनबुजून त्याला ठार मारलं,+ तर त्या माणसालाही ठार मारलं जावं. मग जरी त्याला माझ्या वेदीपासून घेऊन जावं लागलं, तरी त्याला ठार मारावं.+
१५ जर कोणी आपल्या आईवर किंवा वडिलांवर हात उचलला, तर त्याला मारून टाकलं जावं.+
१६ जर कोणी एखाद्याचं अपहरण करून+ त्याला विकलं किंवा तो त्याच्या ताब्यात सापडला,+ तर अपहरण करणाऱ्याला ठार मारावं.+
१७ जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो त्याला ठार मारलं जावं.+
१८ माणसं आपसात भांडत असताना जर एखाद्याने दुसऱ्याला दगडाने किंवा हाताने* मारलं, आणि तो माणूस मेला नाही, पण अंथरुणाला खिळला;
१९ आणि जर तो उठून काठीच्या आधाराने घराबाहेर चालू-फिरू शकत असला, तर मारणाऱ्याला शिक्षा होणार नाही. त्याने फक्त तो माणूस पूर्ण बरा होईपर्यंत, कामावर न गेल्यामुळे झालेल्या त्याच्या नुकसानाची भरपाई करावी.
२० एखाद्याने आपल्या दासाला किंवा दासीला काठीने मारलं आणि त्यामुळे त्याचा किंवा तिचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूचा बदला घेतला जावा.+
२१ पण जर तो एकदोन दिवस जगला, तर त्याचा बदला घेतला जाऊ नये, कारण त्याला मालकाच्या पैशाने विकत घेण्यात आलं आहे.
२२ माणसं एकमेकांशी मारामारी करत असताना, एखाद्या गरोदर स्त्रीला मार लागून तिचे दिवस भरण्याआधीच बाळाचा जन्म झाला,*+ पण कोणतीही जीवहानी* झाली नाही, तर अपराध्याला त्या स्त्रीच्या पतीने सांगितलेली भरपाई द्यावी लागेल; त्याने ती न्यायाधीशांच्या हातून द्यावी.+
२३ पण जर जीवहानी झाली, तर जिवाबद्दल जीव दिला जावा;+
२४ डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,+
२५ चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम आणि फटक्याबद्दल फटका असा बदला घ्यावा.
२६ जर एखाद्याने आपल्या दासाच्या किंवा दासीच्या डोळ्यावर मारलं आणि त्यामुळे तो फुटला, तर त्याने डोळ्याच्या बदल्यात आपल्या दासाला किंवा दासीला मुक्त करून जाऊ द्यावं.+
२७ आणि जर कोणी आपल्या दासाला किंवा दासीला मारून त्याचा किंवा तिचा दात पाडला, तर त्याने त्या दासाला किंवा दासीला दाताच्या बदल्यात मुक्त करून जाऊ द्यावं.
२८ जर एका बैलाने एखाद्या माणसाला किंवा बाईला शिंग मारल्यामुळे तो किंवा ती मेली, तर त्या बैलाला दगडमार करून मारून टाकावं+ आणि त्याचं मांस खाऊ नये; बैलाच्या मालकाला मात्र कोणतीही शिक्षा होणार नाही.
२९ पण, जर तो बैल आधीपासूनच मारकुटा असेल आणि त्याच्या मालकाला ताकीद देऊनही त्याने त्याच्यावर लक्ष ठेवलं नसेल, आणि जर त्या बैलाने एखाद्या माणसाचा किंवा बाईचा जीव घेतला, तर बैलाला दगडमार केला जावा आणि मालकालाही ठार मारलं जावं.
३० जर त्याच्याकडून खंडणी* मागण्यात आली, तर त्याने आपला जीव वाचवण्यासाठी, जी काही किंमत मागितली जाईल ती द्यावी.
३१ बैलाने मुलाला शिंग मारलं असो किंवा मुलीला, त्या बैलाच्या मालकाचा न्याय याच कायद्याप्रमाणे केला जावा.
३२ बैलाने एखाद्या दासाला किंवा दासीला शिंग मारलं असेल, तर बैलाच्या मालकाने त्याच्या किंवा तिच्या मालकाला ३० शेकेल* द्यावेत आणि बैलाला दगडमार केला जावा.
३३ जर कोणी एखादा खड्डा उघडाच राहू दिला, किंवा खड्डा खोदल्यावर तो झाकला नाही आणि एखादा बैल किंवा एखादं गाढव त्या खड्ड्यात पडलं,
३४ तर त्या माणसाला* भरपाई द्यावी लागेल.+ त्याने बैलाच्या किंवा गाढवाच्या मालकाला त्याची किंमत भरून द्यावी आणि मेलेलं जनावर त्याचं होईल.
३५ एखाद्याच्या बैलाने दुसऱ्याच्या बैलाला दुखापत करून मारून टाकलं, तर त्यांनी जिवंत बैलाला विकून त्याच्याबद्दल मिळालेली किंमत आपसात वाटून घ्यावी आणि मेलेला बैलही आपसात वाटून घ्यावा.
३६ पण बैल मारकुटा असल्याचं मालकाला आधीपासूनच माहीत असेल, आणि त्याने त्याच्यावर लक्ष ठेवलं नसेल, तर मग बैलाबद्दल बैल अशी भरपाई त्याने करावी आणि मेलेला बैल त्याचा होईल.
तळटीपा
^ छोटी छिद्रं पाडण्यासाठी वापरलं जाणारं हत्यार.
^ शब्दशः “सोडवू दिलं.”
^ किंवा कदाचित, “मालकाने.” शब्दशः “त्याने.”
^ हे शरीरसंबंधांना सूचित करतं.
^ किंवा कदाचित, “हत्याराने.”
^ शब्दशः “आणि तिची मुलं बाहेर आली.”
^ किंवा “गंभीर दुखापत.”
^ किंवा “नुकसान भरपाई.”
^ शब्दशः “खड्ड्याच्या मालकाला.”