लूकने सांगितलेला संदेश ११:१-५४

  • प्रार्थना कशी करावी (१-१३)

    • आदर्श प्रार्थना (२-४)

  • पवित्र शक्‍तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढले जातात (१४-२३)

  • दुष्ट स्वर्गदूत परत येतो (२४-२६)

  • खऱ्‍या अर्थाने सुखी असणं (२७, २८)

  • योनाचं चिन्ह (२९-३२)

  • शरीराचा दिवा (३३-३६)

  • ढोंगी धर्मपुढाऱ्‍यांचा धिक्कार (३७-५४)

११  मग येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. प्रार्थना करून झाल्यावर त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याच्याकडे येऊन म्हणाला: “प्रभू, योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं, तसं तूही आम्हाला प्रार्थना करायला शिकव.” २  तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असं म्हणा: ‘हे पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.+ तुझं राज्य येवो.+ ३  आमच्या गरजेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला दे.+ ४  आमच्या पापांची क्षमा कर,+ कारण आम्हीसुद्धा आमचा कर्जदार असलेल्या प्रत्येकाला क्षमा करतो.+ आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस.’”*+ ५  मग तो त्यांना म्हणाला: “समजा तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही मध्यरात्री त्याच्याकडे जाता आणि म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे. ६  कारण नुकताच माझा एक मित्र प्रवास करून माझ्याकडे आलाय आणि त्याला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही.’ ७  पण तो आतून त्याला म्हणतो: ‘मला त्रास देऊ नकोस. आता दार बंद आहे आणि माझी लहान मुलं माझ्याजवळ बिछान्यात आहेत. मी उठून तुला काहीही देऊ शकत नाही.’ ८  मी तुम्हाला सांगतो, मैत्रीमुळे जरी नाही, तरी तो न लाजता वारंवार मागतोय म्हणून+ त्याचा मित्र नक्कीच उठेल आणि त्याला जे काही हवंय ते देईल. ९  म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो: मागत राहा+ म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.+ १०  कारण जो मागतो त्याला दिलं जातं.+ जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जातं. ११  खरंच, तुमच्यामध्ये असा कोणता बाप आहे, जो त्याच्या मुलाने मासा मागितल्यावर त्याला माशाऐवजी साप देईल?+ १२  किंवा त्याने अंडं मागितल्यावर त्याच्या हातात विंचू देईल? १३  तुम्ही पापी असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं तुम्हाला कळतं, तर मग जे स्वर्गातल्या पित्याकडे मागतात त्यांना तो पवित्र शक्‍ती* देणार नाही का?”+ १४  नंतर, येशूने एका माणसातून दुष्ट स्वर्गदूत* काढला. त्याने त्या माणसाला मुकं केलं होतं.+ दुष्ट स्वर्गदूत काढल्यानंतर तो माणूस बोलू लागला, तेव्हा जमलेले लोक थक्क झाले.+ १५  पण त्यांच्यापैकी काही जण म्हणाले: “दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी बालजबूल* याच्या मदतीने हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ १६  तर इतर काही जण, त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याकडे स्वर्गातून एक चिन्ह मागू लागले.+ १७  त्यांचे विचार ओळखून+ तो त्यांना म्हणाला: “ज्या राज्यात फूट पडते ते राज्य नष्ट होतं आणि ज्या घरात फूट पडते ते घरसुद्धा टिकू शकत नाही. १८  तसंच, जर सैतान स्वतःच्याच विरोधात लढू लागला, तर त्याचं राज्य कसं काय टिकेल? कारण मी बालजबूलच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो असं तुम्ही म्हणता. १९  जर मी बालजबूलच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या मदतीने काढतात? म्हणून, तुम्ही चुकीचं बोलताय हे तुमचे शिष्यच दाखवून देतील. २०  पण जर मी देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने*+ दुष्ट स्वर्गदूत काढत असेन, तर देवाच्या राज्याने तुम्हाला गाठलंय.*+ २१  एखादा ताकदवान माणूस सगळी शस्त्रसामग्री घेऊन आपल्या घराचं रक्षण करतो, तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. २२  पण, त्याच्यापेक्षा ताकदवान माणूस त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो. त्या वेळी, ज्या शस्त्रसामग्रीवर त्या माणसाने भरवसा ठेवला होता ती तो काढून घेतो आणि त्याच्याकडून लुटलेली मालमत्ता वाटून टाकतो. २३  जो माझ्या बाजूने नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्यासोबत गोळा करत नाही तो विखरून टाकतो.+ २४  जेव्हा एखाद्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत बाहेर निघतो, तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणांत राहायची जागा शोधत फिरतो. पण त्याला ती सापडत नाही, तेव्हा तो म्हणतो, ‘मी जिथून निघालो त्या माझ्या घरी परत जाईन.’+ २५  पण तिथे आल्यावर ते घर झाडूनपुसून स्वच्छ केलेलं आणि सजवलेलं आहे असं त्याला दिसतं. २६  तेव्हा तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट अशा आणखी सात दुष्ट स्वर्गदूतांना घेऊन येतो आणि त्या माणसात शिरून ते तिथेच राहू लागतात. अशा रितीने त्या माणसाची अवस्था आधीपेक्षाही वाईट होते.” २७  तो या गोष्टी बोलत असताना गर्दीतून एक स्त्री मोठ्याने त्याला म्हणाली: “ज्या स्त्रीने आपल्या उदरात तुला वाढवलं आणि तुला दूध पाजलं ती सुखी!”+ २८  पण तो म्हणाला: “नाही, उलट जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”+ २९  मग लोकांची गर्दी वाढू लागली तेव्हा तो म्हणाला: “ही एक दुष्ट पिढी आहे. ती चिन्हाची अपेक्षा करते, पण योनाच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंही चिन्ह या पिढीला दिलं जाणार नाही.+ ३०  कारण ज्याप्रमाणे योना+ निनवेच्या लोकांसाठी एक चिन्ह ठरला, त्याचप्रमाणे मनुष्याचा मुलगासुद्धा या पिढीसाठी चिन्ह ठरेल. ३१  न्यायाच्या वेळी, दक्षिणेच्या राणीला+ या पिढीच्या लोकांबरोबर उठवलं जाईल आणि ती त्यांना दोषी ठरवेल. कारण शलमोनकडून बुद्धीच्या गोष्टी ऐकण्यासाठी ती खूप लांबून* आली होती. पण पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे.+ ३२  न्यायाच्या वेळी निनवेचे लोक या पिढीबरोबर उठतील आणि तिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या संदेशामुळे पश्‍चात्ताप केला होता.+ पण पाहा! योनापेक्षा जो महान तो इथे आहे. ३३  दिवा लावून कोणी गुप्त ठिकाणी किंवा टोपलीखाली ठेवत नाही. तर घरात येणाऱ्‍यांना उजेड मिळावा म्हणून एखाद्या उंच ठिकाणी ठेवतो.+ ३४  डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमची नजर एकाग्र* असेल, तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली* असेल, तर तुमचं शरीर अंधकारमय होईल.+ ३५  त्यामुळे, तुमच्यात असलेला प्रकाश अंधकारमय होऊ नये म्हणून जागे राहा. ३६  जर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा एकही भाग अंधकारमय नसेल, तर दिव्याच्या किरणांमुळे जसा उजेड मिळतो तसं तुमचं शरीरही पूर्णपणे प्रकाशमय होईल.” ३७  त्याने या गोष्टी सांगितल्यानंतर एका परूश्‍याने त्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं. तेव्हा तो गेला आणि जेवायला बसला. ३८  पण जेवण्याआधी त्याने हात धुतले नाहीत,* हे पाहून त्या परूश्‍याला आश्‍चर्य वाटलं.+ ३९  तेव्हा प्रभू त्याला म्हणाला: “तुम्ही परूशी, प्याला आणि ताट बाहेरून स्वच्छ करता, पण आतून तुम्ही लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेले आहात.+ ४०  अरे मूर्खांनो! ज्याने बाहेरचा भाग बनवला त्यानेच आतला भागही बनवला नाही का? ४१  त्यामुळे, तुम्ही जो काही दानधर्म करता तो मनापासून करा, म्हणजे तुम्ही सगळ्या बाबतींत शुद्ध व्हाल. ४२  अरे परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही पुदिना, सताप* आणि अशा सगळ्या भाज्यांचा दहावा भाग* तर देता,+ पण देवाचा न्याय आणि प्रेम यांकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी देणं तुमचं कर्तव्य होतं, पण देवाचा न्याय आणि प्रेम यांकडे दुर्लक्ष न करता.+ ४३  अरे परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण सभास्थानांतल्या पुढच्या* आसनांवर बसायला तुम्हाला आवडतं आणि बाजारांत इतरांनी आपल्याला आदराने नमस्कार करावा असं तुम्हाला वाटतं!+ ४४  तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही अशा कबरींसारखे* आहात ज्या लगेच दिसून येत नाहीत.+ त्यामुळे लोक त्यांवरून चालतात, तरी त्यांना कळत नाही.” ४५  हे ऐकून नियमशास्त्राचा एक जाणकार त्याला म्हणाला: “गुरू, असं म्हणून तुम्ही आमचाही अपमान करत आहात.” ४६  तेव्हा तो म्हणाला: “नियमशास्त्राच्या जाणकारांनो, तुमचाही धिक्कार असो! कारण तुम्ही लोकांवर जड ओझी लादता. पण स्वतः तर त्या ओझ्याला बोटही लावत नाही.+ ४७  तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरी बांधता. पण खरंतर तुमच्या वाडवडिलांनीच त्यांना ठार मारलं!+ ४८  खरंच, तुम्ही स्वतः तुमच्या वाडवडिलांच्या कृत्यांचे साक्षीदार आहात आणि तरी तुम्ही त्यांना मान्यता देता. कारण त्यांनी संदेष्ट्यांना ठार मारलं,+ पण तुम्ही त्यांच्यासाठी कबरी बांधत आहात. ४९  म्हणूनच, देव त्याच्या बुद्धीद्वारे* असं म्हणाला: ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन. पण त्यांच्यापैकी काहींना ते छळतील आणि काहींना ठार मारतील. ५०  आणि यामुळे, जगाच्या स्थापनेपासून ज्या सगळ्या संदेष्ट्यांचं रक्‍त सांडण्यात आलंय, त्याचा दोष या पिढीवर येईल.*+ ५१  म्हणजे हाबेलच्या रक्‍तापासून+ ते वेदी आणि मंदिर यांच्या मधोमध ठार मारलेल्या जखऱ्‍याच्या रक्‍तापर्यंत.’+ खरंच, मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या रक्‍ताचा दोष या पिढीवर येईल.* ५२  नियमशास्त्राच्या जाणकारांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतः आत गेला नाहीत आणि ज्यांना जायचंय त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही!”+ ५३  मग तो तिथून बाहेर पडला तेव्हा शास्त्री आणि परूशी त्याला चारही बाजूंनी घेरून धमकावण्याचा प्रयत्न करू लागले. तसंच, त्यांनी त्याच्यावर पुष्कळ प्रश्‍नांचा भडिमारही केला. ५४  कारण त्यांना कसंही करून त्याला शब्दांत पकडायचं होतं.+

तळटीपा

शब्दशः “मोहात पाडू नकोस.”
दुष्ट स्वर्गदूतांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेलं एक नाव.
शब्दशः “देवाच्या बोटाने.”
किंवा “देवाचं राज्य आलंय आणि तुम्हाला कळलंही नाही.”
शब्दशः “पृथ्वीच्या टोकापासून.”
किंवा “निर्दोष.” शब्दशः “साधी.”
शब्दशः “वाईट; दुष्ट.”
म्हणजे, हात धुण्याचा विधी पाळला नाही.
ग्रीक ‘पेगानॉन.’  ही एक औषधी वनस्पती असून तिचा स्वयंपाकातही उपयोग होतो.
किंवा “दशांश.”
किंवा “सगळ्यात चांगल्या.”
किंवा “स्मारक कबरींसारखे.”
शब्दशः “देवाच्या बुद्धीने असं म्हटलं.”
किंवा “त्याचा हिशोब या पिढीकडून मागितला जाईल.”
किंवा “त्यांच्या रक्‍ताचा हिशोब या पिढीकडून मागितला जाईल.”