स्तोत्रं ३८:१-२२
आठवण करून देणारं दावीदचं गीत.
३८ हे यहोवा, रागाच्या भरात मला ताडन करू नकोस,क्रोधाच्या भरात मला शिक्षा करू नकोस.+
२ कारण तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत,तुझ्या नाराजीचं* दडपण माझ्यावर आहे.+
३ तुझ्या रागामुळे माझ्या सगळ्या शरीराला रोगांनी ग्रासलंय.*
माझ्या पापामुळे मला* जराही शांती नाही.+
४ कारण माझ्या अपराधांची रास माझ्या डोक्याच्याही वर गेली आहे.+
त्यांचं भयानक ओझं आता मला सहन होत नाही.
५ माझ्या मूर्खपणामुळेमाझ्या जखमा चिघळल्या आहेत आणि त्यांतून दुर्गंधी येत आहे.
६ मी दुःखाने पार खचून गेलोय;दिवसभर मी खिन्नपणे फिरतो.
७ माझ्या अंगाची लाही लाही झाली आहे.
माझं संपूर्ण शरीर रोगांनी ग्रासलंय.+
८ मी सुन्न पडलोय आणि पार चिरडून गेलोय;माझ्या हृदयाच्या वेदनांमुळे मी तळमळून ओरडतोय.
९ हे यहोवा, माझ्या सर्व इच्छा तुझ्यासमोर आहेतआणि माझे उसासे तुझ्यापासून लपलेले नाहीत.
१० माझं हृदय काळजीमुळे बेचैन झालंय, माझ्यात त्राण उरला नाही,माझ्या डोळ्यांचा प्रकाश नाहीसा झालाय.+
११ माझ्या पीडेमुळे माझे मित्र आणि साथीदार मला टाळतात;माझे जवळचे सोबतीसुद्धा माझ्यापासून दूर राहतात.
१२ माझा जीव घेऊ पाहणारे सापळे रचतात;मला इजा करू पाहणारे, माझा नाश करण्याची भाषा करतात;+दिवसभर ते कपटी योजना करत राहतात.
१३ पण मी बहिरा असल्यासारखा, ऐकत नाही;+मुका असल्यासारखा, तोंड उघडत नाही.+
१४ मी ऐकू न येणाऱ्या माणसासारखा झालोय;तो आपला बचाव करण्यासाठी काहीच बोलू शकत नाही.
१५ कारण हे यहोवा, मी तुझी वाट पाहिली,+हे यहोवा, माझ्या देवा, तू मला उत्तर दिलंस.+
१६ कारण मी म्हणालो: “माझ्या संकटांमुळे त्यांना आनंद करू देऊ नकोस,किंवा माझा पाय घसरल्यामुळे त्यांना माझ्यावर वरचढ होऊ देऊ नकोस.”
१७ मला सतत वेदना होत होत्या,+मी कोसळण्याच्या बेतात होतो.
१८ माझ्या पापामुळे मी अस्वस्थ झालो होतो;+मी माझा अपराध कबूल केला.+
१९ माझे शत्रू शक्तिशाली आणि उत्साही* आहेत,विनाकारण माझा द्वेष करणारे पुष्कळ झाले आहेत.*
२० ते माझ्या चांगल्या वागणुकीची परतफेड वाइटाने करतात;चांगलं ते करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, ते माझा विरोध करतात.
२१ हे यहोवा, मला सोडून देऊ नकोस.
हे देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.+
२२ हे यहोवा, तू माझं तारण करणारा आहेस.+
माझ्या मदतीला धावून ये.
तळटीपा
^ किंवा “हाताचं.”
^ शब्दशः “माझ्या शरीरात एकही निरोगी जागा नाही.”
^ शब्दशः “माझ्या हाडांमध्ये.”
^ शब्दशः “जिवंत.”
^ किंवा कदाचित, “पुष्कळ जण विनाकारण माझे शत्रू बनले आहेत.”