२ शमुवेल २:१-३२

  • दावीद यहूदाचा राजा बनतो (१-७)

  • ईश-बोशेथ इस्राएलचा राजा बनतो (८-११)

  • दावीदच्या आणि शौलच्या घराण्यातली लढाई (१२-३२)

 त्यानंतर दावीदने यहोवाला विचारलं:+ “मी यहूदातल्या एखाद्या शहरात जाऊ का?” त्यावर यहोवा त्याला म्हणाला: “जा.” दावीदने पुढे विचारलं: “मी कुठे जाऊ?” तेव्हा तो म्हणाला: “हेब्रोनला जा.”+ २  म्हणून दावीद आपल्या दोन बायकांना, म्हणजे इज्रेलमधली अहीनवाम+ आणि कर्मेलमधली नाबालची विधवा अबीगईल+ यांना घेऊन तिथे गेला. ३  दावीद आपल्या माणसांनाही घेऊन गेला.+ ते सगळे आपापल्या कुटुंबांसोबत तिथे गेले आणि हेब्रोनच्या आसपासच्या शहरांत जाऊन राहू लागले. ४  मग यहूदातली माणसं तिथे आली आणि त्यांनी यहूदाच्या घराण्यावर राजा म्हणून दावीदचा अभिषेक केला.+ त्यांनी दावीदला सांगितलं: “शौलला ज्यांनी दफन केलं ती माणसं याबेश-गिलादमधली होती.” ५  म्हणून दावीदने आपल्या दूतांच्या हातून याबेश-गिलादच्या माणसांना असा संदेश पाठवला: “यहोवा तुम्हाला आशीर्वादित करो. कारण तुम्ही तुमच्या प्रभूंना, शौलला दफन करून त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवलं.+ ६  यहोवाही तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवो आणि तुमच्याशी विश्‍वासूपणे वागो. तुम्ही केलेल्या या चांगल्या कामाबद्दल मीसुद्धा तुम्हाला दया दाखवीन.+ ७  तुमचे प्रभू शौल आता राहिले नाहीत. आणि यहूदाच्या घराण्याने मला त्यांचा राजा म्हणून अभिषिक्‍त केलंय. म्हणून आता हिंमत धरा आणि धैर्यवान व्हा.” ८  पण इकडे शौलचा सेनापती, म्हणजे नेरचा मुलगा अबनेर+ याने शौलचा मुलगा ईश-बोशेथ+ याला नदीच्या पलीकडे महनाइम+ इथे आणलं. ९  आणि त्याला अशुरी लोकांवर, तसंच गिलाद,+ इज्रेल,+ एफ्राईम,+ बन्यामीन आणि संपूर्ण इस्राएलवर राजा नेमलं. १०  शौलचा मुलगा ईश-बोशेथ इस्राएलचा राजा बनला तेव्हा तो ४० वर्षांचा होता. त्याने दोन वर्षं राज्य केलं. पण यहूदाच्या घराण्याने मात्र दावीदला साथ दिली.+ ११  दावीदने हेब्रोनमधून साडेसात वर्षं यहूदाच्या घराण्यावर राज्य केलं.+ १२  काही काळाने, नेरचा मुलगा अबनेर आणि शौलच्या मुलाचे सेवक, म्हणजे ईश-बोशेथचे सेवक महनाइममधून+ गिबोनला+ गेले. १३  इकडे, सरूवाचा+ मुलगा यवाब+ आणि दावीदचे सेवकसुद्धा बाहेर पडले. या दोन्ही गटांची गिबोनच्या तळ्याजवळ गाठ पडली. तळ्याच्या एका बाजूला एक गट, तर दुसऱ्‍या बाजूला दुसरा गट बसला. १४  मग अबनेर यवाबला म्हणाला: “चल, आपल्या तरुण माणसांना आपल्यासमोर येऊन एकमेकांशी दोन हात* करू दे.” त्यावर यवाब म्हणाला: “ठीक आहे, होऊन जाऊ दे.” १५  मग त्यांची माणसं उठली आणि समोर आली. त्यांची संख्या एकसारखीच होती. शौलचा मुलगा ईश-बोशेथ याच्या बाजूने १२ बन्यामिनी माणसं, तर दावीदच्या बाजूने त्याचे १२ सेवक समोर आले. १६  प्रत्येकाने आपापल्या प्रतिस्पर्ध्याचं डोकं धरून त्याच्या कुशीत तलवार भोसकली, आणि ते सगळे एकदम खाली कोसळून पडले. म्हणून गिबोनमधल्या त्या जागेला हेलकथ-हसूरीम* असं नाव पडलं. १७  त्या दिवशी झालेल्या लढाईने भयंकर स्वरूप धारण केलं. दावीदच्या सेवकांनी अबनेरला आणि इस्राएलच्या माणसांना हरवलं. १८  तिथे सरूवाची तीन मुलंसुद्धा होती:+ यवाब,+ अबीशय+ आणि असाएल.+ त्यांच्यातला असाएल हा अगदी रानातल्या हरणासारखा चपळ होता. १९  असाएल अबनेरचा पाठलाग करायला लागला. त्याने त्याचा असा पाठलाग केला, की पाठलाग करताना तो ना उजवीकडे वळला, ना डावीकडे. २०  अबनेरने मागे वळून पाहिलं आणि विचारलं: “असाएल, तूच आहेस ना?” त्यावर तो म्हणाला: “हो मीच.” २१  तेव्हा अबनेर त्याला म्हणाला: “माझा पाठलाग करायचं सोड. त्यापेक्षा दुसऱ्‍या एखाद्याला पकड. आणि त्याचं जे काही असेल ते लुटून घे.” पण असाएलने त्याचा पाठलाग करायचं काही सोडलं नाही. २२  म्हणून अबनेर पुन्हा असाएलला म्हणाला: “माझा पाठलाग करायचं सोडून दे. तुला मारून टाकायला मला का भाग पाडतोस? मग मी यवाबला, तुझ्या भावाला तोंड कसं दाखवू?” २३  पण तो काहीएक ऐकायला तयार नव्हता. म्हणून मग अबनेरने आपल्या भाल्याचा मागचा भाग त्याच्या पोटात असा खुपसला,+ की भाला आरपार जाऊन त्याच्या पाठीतून बाहेर निघाला; आणि असाएल खाली पडून जागच्या जागी मेला. असाएल मरून पडला त्या ठिकाणी जो कोणी यायचा, तो क्षणभर स्तब्ध होऊन तिथेच उभा राहायचा. २४  मग यवाब आणि अबीशयने अबनेरचा पाठलाग केला. आणि सूर्यास्त होता होता ते अम्मा नावाच्या टेकडीवर आले; ही टेकडी, गिबोनच्या ओसाड रानाकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर असलेल्या गिहासमोर आहे. २५  मग बन्यामिनी लोक अबनेरच्या मागे एकत्र जमले; आणि सैन्यदलाच्या तुकडीप्रमाणे एका टेकडीवर तैनात झाले. २६  तेव्हा अबनेर यवाबला हाक मारून म्हणाला: “आपण कुठवर असं एकमेकांना तलवारीने मारत राहणार? याचा शेवट कटूच होणार हे तुला माहीत नाही का? मग, ‘आपल्या भावांचा पाठलाग करायचं बदं करा,’ असं आपल्या लोकांना सांगायला तू अजून किती वेळ लावणार आहेस?” २७  त्यावर यवाब म्हणाला: “जिवंत आणि खऱ्‍या देवाची शपथ, तू जर हे बोलला नसतास, तर लोक सकाळपर्यंत आपल्या भावांचा पाठलाग करत राहिले असते.” २८  मग यवाबने शिंग फुंकलं, तेव्हा त्याच्या माणसांनी इस्राएलचा पाठलाग करायचं थांबवलं आणि लढाई बंद झाली. २९  अबनेर आणि त्याच्या माणसांनी मग अराबातून+ रात्रभर प्रवास करून यार्देन नदी पार केली. आणि खोऱ्‍यातून* चालत जाऊन शेवटी ते महनाइमला+ पोहोचले. ३०  यवाबने अबनेरचा पाठलाग करायचं सोडून दिल्यावर आपल्या सगळ्या माणसांना एकत्र केलं. तेव्हा दावीदच्या सेवकांपैकी, असाएलशिवाय आणखी १९ जण नसल्याचं दिसून आलं. ३१  पण दावीदच्या सेवकांनी बन्यामिनी लोकांना आणि अबनेरच्या माणसांना हरवलं होतं आणि त्यांची ३६० माणसं मारली गेली होती. ३२  त्यांनी असाएलला+ बेथलेहेममध्ये+ त्याच्या वडिलांच्या कबरेत पुरलं. मग यवाब व त्याच्या माणसांनी रात्रभर प्रवास केला, आणि दिवस उजाडता उजाडता ते हेब्रोनला+ पोहोचले.

तळटीपा

किंवा “स्पर्धा.”
म्हणजे, “गारगोटीच्या दगडांच्या सुऱ्‍यांचं मैदान.”
किंवा कदाचित, “सगळ्या बिथरोन प्रदेशातून.”